आनंद मोजता येतो का? बरं वाटणं, छान वाटणं, मस्त वाटणं अशा चढत्या भाजणीतून हे मोजमाप होईल का? खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणीशी बोलताना जे वाटतं ते किंवा ठरवलेलं काम चोख पूर्ण झाल्यावर जे वाटतं, त्याची किंमत कशी काढणार?
खूप वर्षांपूर्वी ऐकलेलं गाणं आहे. ‘बाजार’ चित्रपटातील- ‘सीने में जलन आँखो में तूफोन सा क्यों है? इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है?’ हे गाणं गुणगुणायला लागलं तरी त्या सुरावटींमुळे एक प्रकारची विषण्णता लगेच जाणवते. त्या उलट ‘मिली’मधलं, ‘मने कहा फूलोंसे-हसो तो वो खिलखिला के हस दिए..’ असं म्हणत ‘जगणं म्हणजे हसणं’- हे शिकवणारं गाणं ऐकलं की आपणही डोलायला लागतो. छान वाटतं. हे जे ‘छान वाटणं’ किंवा ‘आनंद वाटणं’ आहे ना, ते आपल्या मनातल्या मोजपट्टीवर अवलंबून असतं.
लहानपणी आई मला एका आनंदी कावळ्याची गोष्ट सांगत असे. कधी दुखीच न होणारा हा कावळा एका राजाच्या डोळ्यांत खुपायला लागतो. आपले सगळे प्रयत्न पणाला लावून राजा त्या कावळ्याला रडवण्याचा, दुखी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला भाले टोचवतो, गरम पाण्यात ठेवतो, उपासमार करतो, तरी कावळा आपला आनंदीच. राजा शेवटी हताश होतो, हरतो. तो कावळ्याला विचारतो, ‘कसं काय हे जमवलंस रे? मी बघ, सारखा कशानं तरी दुखी होत असतो. राजपुत्र ऐकत नाही, पक्वान्नं रुचत नाहीत, नोकर बेशिस्त आहेत, डोकंच चढलं आहे, राणीच्या मागण्या संपतच नाहीत.. यांव आणि त्यांव. तू कसा कशावरच कुरकुरत नाहीस?’ कावळा आनंदानं उडय़ा मारत असतो. त्याच प्रसन्न स्वरात म्हणतो, ‘अहो महाराज, तुम्ही आनंद शोधताय तो दुसऱ्यांच्या वागण्यातून तुम्हाला मिळणारा. मग तो तुमच्या हातात कसा गवसणार? मी आपला माझा-माझाच खूश असतो. मग बाहेरची परिस्थिती माझा आनंद कसा हिरावून घेईल?’ राजा खजील होतो, कावळ्याला सोडून देतो.
आनंद मोजता येतो का? बरं वाटणं, छान वाटणं, मस्त वाटणं अशा चढत्या भाजणीतून हे मोजमाप होईल का? एखाद्या वस्तूच्या, संधीच्या मिळण्यातून होईल? उदा. किती आईसक्रीम्स खाल्ली तर मला भारी वाटेल? किती नवे कपडे मिळाले तर मला वॉर्डरोब भरल्याचा आनंद होईल? ही झाली वस्तूंच्या मूल्यांशी जोडलेली खुशी! खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणीशी बोलताना जे वाटतं ते किंवा ठरवलेलं काम चोख पूर्ण झाल्यावर जे वाटते ते याची किंमत कशी काढणार?
लहान मुलांच्या एका शिबिरात ‘तुम्हाला कायम आनंदी ठेवणारं एक मशीन काढा’ अशी सूचना दिली होती. बऱ्याच मुलांनी त्यांना आनंद देणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी दाखवल्या होत्या. चॉकलेट्स पाडणारी, फुगे फुगवणारी, गेम, सी.डी, मोबाइल, शूज अशा फंडू गोष्टी देणारी खूप मशीन्स मुलांनी काढली. एका मुलाचं चित्र मात्र वेगळं होतं. त्याच्या मशीनला नुसतीच चौकोनी आउटलाइन होती आणि ४-५ वर्तुळं होती. त्या एकेका वर्तुळात एक दोन चेहरे काढलेले होते. त्याचं स्पष्टीकरण असं होतं, ‘अ’ बटण दाबलं की मला माझ्या रत्नागिरीच्या मित्रांशी गप्पा मारता येतील, ‘ब’ मुळे माझ्या आजोबांची गोष्ट ऐकायला मिळेल, ‘क’ मधून मला समुद्रातल्या बोटीवरचा कॅप्टन होता येईल. आणि  ‘ड ’ दाबलं तर मी कायम गुड बॉय बनेन, मग मला कुणी रागवणार नाही आणि मी कायम आनंदी राहीन.’ वस्तूंच्या आनंदापलीकडचं काहीतरी त्या मुलानं शोधायचा-मांडायचा प्रयत्न केला होता याचं विशेष वाटलं, आणि प्रश्न पडला की प्रौढांना जर ‘कायम आनंदी ठेवणारं काय? असं विचारलं तर काय उत्तरं मिळतील?’
अभ्यासकांनी दोन प्रकारात याची विभागणी केलेली दिसते. हेडॉनिक (Hedonic)म्हणजे आयुष्यात उपभोगातून मिळणारा आनंद- आणि युडोमॉनिक (Euduaimonic) म्हणजे आपल्या आंतरिक क्षमतांच्या वापरामुळे झालेला आनंद. एक आनंद ‘राजस’ स्वरूपाचा तर दुसरा ‘सात्त्विक’ स्वरूपाचा. (सात्त्विक म्हणजे आध्यात्मिकच असा काही अर्थ इथे नाही!) राजस आनंद हा उपभोगातून येत असल्याने त्याच्या अतिरेकाचा त्रास होऊ शकतो. आयुष्य इतकं वैविध्यतेनं नटलेलं आहे की त्याच त्या आनंदाच्या भोवऱ्यात गरगरत राहिलो तर वरवर ताण/ काहीसं दुख देणारं पण खूप महत्त्वाचं अत्यंत मौल्यवान असं हातातून निसटून जाऊ शकतं. इतर भावनांच्याबरोबर मिसळून जात मिळणारा आनंद हा जास्त उपयोगाचा असतो. उदाहरणार्थ- राघव हा एक सर्वसामान्य टॅक्सी डायव्हर. त्यानं कर्ज घेऊन टॅक्सी विकत घेतली होती. तिचे दोन हप्ते त्याला भरता आले नाहीत. बँकेच्या नोटिसा आल्या आणि तो अस्वस्थ झाला. जागरणं, सततचं गाडी चालवणं, वेळी-अवेळी खाणं यामुळे त्याचं वजन कमी झालं, दमणूक वाढली. पण अक्षरश एका महिन्यात त्यानं दोन्ही हप्ते चुकवले. आता समजू या की राघव अस्वस्थ झालाच नसता, त्याला धास्ती वाटलीच नसती तर? तर तो अजून बेपर्वा झाला असता आणि कधीतरी मोठा फटका बसला असता त्याला! पण त्याला वाटलेली भीती, अस्वस्थता यामुळे पुढचा मोठा दुखाचा फटका टळला! म्हणजेच वस्तुस्थितीपासून दूर घेऊन जाणारा निव्वळ ‘राजस’(शरीर संवेदनांच्या सुखाचा) आनंद आपल्याला धार्जणिा नसतो. तो आपली खरी ‘ओळख’ पुसून टाकतो. थोडा ताण-दुख सोसून मिळालेला आनंद जास्त काळ टिकतो. राजा ययातिची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. अनंत काळपर्यंत तारुण्य उपभोगण्याची त्याची लालसा याला  नतिकतेच्या अशा पायरीवर गडगडत घेऊन गेली, की स्वतला तोंड दाखवणंही त्याला नंतर अवघड झालं. नशेच्या विळख्यात आनंद शोधणारे, सत्तेच्या मदात बेफिकीर जगणारे, पशानं सारं काही विकत घेऊ पाहणारे किती लोक आपण सतत  पाहतो. खरंच मोजता येतो का त्यांना हा ‘कायमचा’ राजस आनंद? की तो कधी संपेल ही धास्ती आजचा ‘आनंद’ झाकोळून टाकते? पण त्या उलट ज्या कृती/ गोष्टी आपली खरी ओळख स्वतसाठी आणि इतरांसाठीही निर्माण करतात त्यांतून मिळणारा आनंद आयुष्याला खोली आणतो, नाही का?
एखाद्याला सहजपणे कवितेची ओळ सुचते आणि ओळीमागून ओळी लडींसारख्या उलगडत-उमटत जातात. एखाद्या व्यापाऱ्याला शेअर बाजारातील उसळीमुळे जो आनंद होतो त्यापेक्षा हा आनंद कमी असेल का? सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या काही ओळी स्मरतात-
लय एक हुंगिली, खोल खोल श्वासात
ओवीत चाललो,शब्दांच्या धाग्यात.
लहडला वेल. तो पाहा निघाला गगनी
देठांना फुटल्या कविता पानोपानी.!
आनंद व्यक्त होतो तो मुख्यत चेहऱ्यावरच्या हावभावातून. ‘स्मित’हास्य ही त्याची पहिली खूण. पण हे हसू खरं उमटतं ते मनाच्या गाभ्यातून आणि मग पोचतं चेहऱ्यावरच्या स्नायूंपर्यंत. पण जर एखाद्या वेळी आपल्याला चेहऱ्यावर हसू मुद्दाम आणायचं असलं तर? विशेषत फोटो सेशन्सच्या वेळी! जरा लग्नाच्या रिसेप्शनमधले वधू-वरांचे चेहरे आठवून बघा. सुरुवातीला उत्स्फूर्त वाटणारं त्यांचं हसू हळूहळू यांत्रिक होत जातं. (शेवटी शेवटी तर आपल्याला ‘जबडा’ आहे का नाही हेच कळेनासं होतं!) पण एखाद्यानं म्हटलं की फोटोतल्या हसूवरून तुमचं भविष्य सांगता येतं- तर बसेल का विश्वास?
असा एक अफलातून अभ्यासक आहे जो चक्क ‘आयकार्ड’साठी महाविद्यालयात काढलेल्या फोटोंचा (त्या व्यक्तींचा) पुढची ३०-४० वर्षे पाठपुरावा करत राहिला. साधारणपणे फोटो काढायच्या वेळी आपल्यातले काही जण अगदी सहज, मोकळंढाकळं, नसíगक स्मित करतात तर काही जण अगदी अवघडून एखादा न कळलेला विनोद ‘कळल्यासारखा’ दाखवायचा असेल तर हसावं तसं हसतात. अशाच काही महिलांचे तरुणपणीचे पंचविशीतले फोटो त्याने मिळवले. मग अनेक वर्षांनी तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आयुष्याचा आढावा घेतला. त्यात असं स्पष्ट दिसलं की ज्या महिलांच्या जुन्या फोटोतल्या हसण्यात उत्स्फूर्तता- सहजता  होती त्यांच्यामध्ये ‘नकोशा भावनांची’ अभिव्यक्ती तुलनेनं कमी दिसली. एकूणच लोकांबरोबरचं नातं जोडणं असेल किंवा स्वतच्या क्षमतांचा नेटका वापर असेल, सर्वसाधारण आयुष्याबद्दलचं समाधान असेल किंवा वैवाहिक नात्यातील समस्या सोडवणं असेल-अशा अनेक गोष्टींवर त्या दुसऱ्या गटापेक्षा तुलनेनं अधिक चांगल्या होत्या.
म्हणजेच जेव्हा आपल्या एखाद्या कृतीमुळे, स्वीकारलेल्या जबाबदारीमुळे आपल्या जगण्यालाच अर्थ मिळतो असं वाटतं तेव्हा तो आनंद जास्त दीर्घकाळ टिकणारा, मुरत जाणारा होतो. मग प्रत्यक्षात ते काम करताना, निभावताना किती का शारीरिक-मानसिक त्रास होवो, ताण येवो!
आयुष्याच्या एका टप्प्यावर नव्यानं त्यातला अर्थ शोधणाऱ्या, नवी क्षितिजं रेखणाऱ्या महिलांच्या ‘संवादिनी’ गटासोबत मी काम करते. त्यातल्या कितीतरी जणींना मी असा आनंद लुटताना गेली १२-१४ र्वषे पाहते आहे. गेल्याच वर्षी त्यातील ४२ जणी एरवीची ‘गृहस्थी’ अगदी बाजूला ठेवून तीन आठवडे ईशान्य भारतातल्या अगदी सरहद्दीपर्यंतच्या गावांमध्ये अभ्यासदौऱ्यानिमित्त गेल्या होत्या. तिथल्या शाळकरी मुलां-मुलींपासून, अजिबात ज्याची भाषा कळत नाही अशा महिलांपर्यंत पोचून त्यांनी अगत्यानं केलेली उंच बांबूवरच्या घरातली सरबराई घेतली. ‘त्या अभ्यासदौऱ्यातून मिळालेला आनंद आजवरच्या कुठल्याही खरेदीपेक्षा, बक्षिसापेक्षा, टाळ्यांपेक्षा मोठा होता,’ असं मत अनेकींनी व्यक्त केलं आहे.
‘आनंदा’चं मोजमाप नेहमीच व्यक्तिसापेक्ष असणार हे उघडच आहे. पण तरीही समाजाप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे पडणारे फरकही असतात. एखाद्या भारतीय माणसाला कामातल्या बक्षिसानं/प्रमोशनमुळे जो आनंद होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद हा नातेवाईक, मित्रमंडळी यांनी केलेल्या कौतुकामुळे होतो. किंबहुना ते ‘कौतुक’ मिळावं म्हणून ‘काहीतरी मिळवणारे’ अनेक जण असतात. त्या उलट एखादा अमेरिकी माणूस त्या कामगिरीवर जास्त खूश असतो. कुणी कौतुक करो वा ना करो, आणि एखाद्या वेळी त्याला हवासा ठसा उमटला नाही, पण इतरांनी कितीही बाजू घेतली तरी तो मनातल्या मनात स्वतवर नाराजच असतो. मुळात ‘सगळ्यांनी आनंदी असलं पाहिजे’ या वैश्विक कल्पनेलाच काही संस्कृतींमधील लोक इतकं मानत नाहीत. अमेरिकन विद्यापीठातील एका प्राध्यापकांनी आपल्या पौर्वात्य विद्यार्थ्यांचा एक किस्सा ऐकवला.
‘We all want to be Happy ’ या पुस्तकावर अभिप्राय देताना त्यांचा एक भारतीय विद्यार्थी चटकन म्हणाला, ‘पण मला नाहीच व्हायचं सुखी!’ त्यांच्या दुसऱ्या एका सिंगापूरच्या विद्यार्थ्यांनं त्यांना सांगितलं की, ‘केवळ जनरीत म्हणून मी माझ्या वाग्दत्त वधूशी लग्न करणार आहे, त्या लग्नातून मी सुखी वगरे होईन म्हणून मुळीच नाही! ‘एका कोरियन मुलानं त्यांना लिहिलं होतं, की मला खूप श्रीमंत बनायचंय. त्यातून मी आनंदी होईन का नाही माहीत, पण माझ्या आईवडिलांना खूप भारी भारी कारमध्ये बसवून फिरवण्याचं माझं स्वप्न आहे. तरच मी त्यांचे पांग फेडले असं होईल!’
तर आनंदाच्या मोजमापांची अशी बिलोरी रूपं आहेत. केवळ ज्ञानेंद्रिये किंवा भोगेंद्रिये यांच्या मर्यादेतून तो जितका बाहेर पडेल आणि आत आत झिरपत राहील तेवढा दैनंदिन आयुष्यातला अपरिहार्य ताण, दुख, नराश्य हे निपटून टाकता येईल. नाही तर आतल्या वादळांना दडवून ठेवून नित्य आनंदाचा मुखवटा लावून फिरणारे महाभाग आपल्याभवती कमी का आहेत?    

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या