ch17आपल्या समाजात आत्महत्येचे जे सत्र सुरू आहे त्याविरोधात एकसुद्धा चळवळ उभारली जात नाही. ज्या गावातला सरपंच वा गृहनिर्माण वसाहतीचा अध्यक्ष आपल्या परिसरात ‘मानसिक आरोग्य आणि ताणतणाव’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करेल तिथे फार मोठे क्रांतिकारक बदल घडून येतील.

एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे वा नजीकच्या भविष्यात आपल्याला ती लागणार आहे याचा नुसता विचार मनात घोळत असताना, ती गोष्ट किंवा सेवा थेट आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. बघा- आपण बँकेची निवड करण्यापूर्वीच विविध जाहिराती, प्रतिनिधी यांच्यामार्फत बँका आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात- आपल्या बँकिंगविषयक गरजा काय असतील याचा त्यांना बरोबर अंदाज असतो. पूर्वी आपण हॉटेलात बसून पदार्थाचा आस्वाद घ्यायचो, पण आता सगळ्यांनाच हॉटेलात जाऊन खायला वेळ नाही. मग हॉटेलवालेच त्यांची पार्सल सेवा घेऊन आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. डॉक्टरांपासून ते सलून-स्पापर्यंत लोकांच्या गरजा काय असू शकतील याचा इतका अचूक, नेमका अंदाज घेणं शक्य झालंय, तर मग आत्महत्येचा विचार करणाऱ्या मुलांबद्दल, त्यांच्या या विघातक निर्णयाबद्दल समाज म्हणून आपल्याला का नाही आधीच सुगावा लागत? का नाही त्यांच्या मनाचा आधी अंदाज बांधता येत?
विचित्र वाटेल ऐकायला, पण आज अनेक तरुण वयातील मुलं-मुली निराशेनं आयुष्य संपवताना दिसतात, तेव्हा वाटतं की, आपल्या ‘मानसिक आरोग्या’चे रक्षण करणारे सैनिक असते तर? पण दुर्दैवानं आपल्याकडे मानसिक आरोग्याची काळजी घेणारी साधी यंत्रणाही नाही. आजूबाजूला वावरणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मनातील नैराश्य, आत्महत्येचे विचार आधी ओळखता आले, तर किती जीव वाचतील. हिवताप, डेंगू, स्वाइन फ्लूसारख्या आजारांसाठी ज्या पातळीवर आणि जेवढी दक्षता घेतली जाते तशी दक्षता मानसिक आरोग्याच्या बाबतीत असणं ही आता सामाजिक गरज बनली आहे. आपल्याला ‘मेंटल हेल्थ सोल्जर्स’ हवे आहेत.. इथे मी मुद्दामच ‘सोल्जर’ म्हणजे सैनिक असा शब्दप्रयोग केला आहे, कारण तरुणांच्या मानसिक समतोलावर नुसती प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची वेळ मागे पडली असून आता मानसिक आरोग्याच्या रक्षणाची वेळ येऊन ठेपली आहे. चाळीस वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोक ज्या पोटतिडिकीनं उभे ठाकले होते तशाच पद्धतीनं, तितक्याच तीव्रतेनं आजच्या तरुण पिढीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी उभे ठाकण्याची गरज आहे. जितक्या सहजतेनं आणि वेगानं तरुण मुलं आपल्या हातांनी आपल्याच गळ्याभोवती फासाचा दोर आवळतात ते पाहिलं की वाटतं, या घटना आणीबाणीपेक्षा कमी गंभीर नाहीत. काही वर्षांपूर्वी मी सार्वजनिक आरोग्य विभागालाही याबाबत काही योजना सुचविल्या होत्या. तरुण मुलांमधूनच ‘भावनिक आरोग्य साहाय्यक’ तयार करायचे आणि त्यांच्या मदतीने नैराश्यांनी ग्रासलेली मुले शोधून काढायची, जेणेकरून नैराश्याच्या पुढली पायरी टाळता येईल. याबाबत मी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांशीही बोललो होतो, पालिकेने पुढाकार घेत लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती घडवण्याची गरज आहे, कारण आपण राहतो त्या समाजाचे मानसिक आरोग्य सुस्थितीत असणे फार आवश्यक आहे. वेळ, लाट आणि जग कुणासाठीच थांबत नाहीत म्हणूनच राज्य पातळीवर उपक्रम व्हायचे तेव्हा होतील, पण तोपर्यंत तरुणांनीच या कामी आपले योगदान द्यायला सुरुवात करायला हवी. जेव्हा एखाद्या समाजोपयोगी उपक्रमात तरुणाईचा सहभाग असतो तेव्हा तो उपक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो. आपल्या देशात पोलिओ अभियान राबविले गेले त्या पद्धतीने याही प्रश्नाकडे पाहिले जावे असे मला वाटते.
मानसिक आरोग्यरक्षक घडविता येतील
मानसिक आरोग्य विज्ञान हा साधासुधा विषय नाही. कुणीही यावे आणि त्याची खिल्ली उडवावी इतका तो थिल्लर वा हसण्यावारी न्यावा असाही नाही. कुणालाही हाताळता येईल असा नसल्यामुळेच या विषयाचे प्रशिक्षण देऊन आपल्याला मानसिक आरोग्याचे रक्षक किंवा साहाय्यक घडवायचे आहेत. त्यांच्या मदतीने निराश मन:स्थितीतील तरुण शोधून पुढे त्यांच्या काही चाचण्या करून उपचारांची दिशा ठरवता येईल. अर्थात त्यासाठी साहाय्यकांची निवड फार काळजीपूर्वक करावी लागेल. शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण देऊन साहाय्यक तयार करता येतील. मानसिक आरोग्य विषयाच्या मूलभूत सिद्धांतांची ओळख आणि सराव यातून साहाय्यक किंवा मदतनीस घडत जातील आणि त्यांना नैराश्याने ग्रासलेले लोक ओळखता येऊ लागतील.
कल्पना करा की, रेल्वे फलाटावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या व्यक्तीची तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट करताय. काही मोजके प्रश्न विचारून अवघ्या पाच मिनिटांत ही टेस्ट करता येऊ शकते. महाविद्यालयात जाणारी मुलं तर दिवसभरात पाच ते सहा लोकांची अशी चाचपणी करू शकतील आणि तेही अगदी सहज येता-जाता. विचार करा, जेव्हा शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी हा उपक्रम राबवतील तेव्हा दिवसभरात किती मुलांची चाचणी होईल आणि त्यातून निराश झालेली, रागावलेली, वैतागलेली, मनातल्या मनात कुढणारी, अस्वस्थ असणारी, दु:खी किंवा बोलण्याची इच्छाच हरवून बसलेली मुलं सहज सापडतील. तुम्हाला काय वाटतं, की असं कुणाशी जाऊन बोललं तर ती व्यक्ती तुमच्या अंगावर खेकसेल किंवा रागावेल? नाही. तुम्ही जर योग्य पद्धतीने विचारलं तर ती व्यक्ती सगळं सांगेल. अहो, लोकांना आपलं दु:ख किंवा नैराश्य सांगण्याची भीती नसते, त्याला ते कुणाला तरी सांगायचंच असतं, पण आपण विचारायला घाबरत असतो. म्हणूनच आपण मानसिक आरोग्याचे रक्षक तयार करायला हवेत जे अशा केसेस काळजीपूर्वक आणि प्रेमाने हाताळतील. हेच काम शाळा आणि महाविद्यालयांमधले प्राचार्य आणि शिक्षकसुद्धा फार प्रभावीपणे करू शकतात.
एखादा विद्यार्थी अनेक दिवसांपासून शाळेत-महाविद्यालयात येत नसेल, तर त्याच्या अनुपस्थितीचे एक कारण नैराश्य हेही असू शकते. त्याचा जर शोध घेतला तर त्याचं आयुष्य वाचू शकतं. मागील वर्षी नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या ही वेगवेगळ्या अपघातांमध्ये मरण पावलेल्या लोकांपेक्षा किती तरी जास्त होती, यावरून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येईल.
शैक्षणिक संस्थांचा सहभाग
शाळा, महाविद्यालयांमध्ये जी मुलं सतत गप्प असतात, एकटी एकटी राहतात, ज्यांना सारखे रडावेसे वाटते, सहज रडू येते, जी कशातच उत्साही नसतात, स्वत:ला कमी लेखतात, अभ्यासात सतत मागे पडत जातात, व्यसनांच्या आहारी जातात, मित्रांची संगत टाळू लागतात किंवा सतत मरणाविषयी बोलत असतात, अशा मुलांना हुडकून त्यांच्या मनातील नैराश्य दूर करण्याचे काम मानसिक आरोग्याचे रक्षण करू शकतात आणि त्यामुळे काही निष्पाप प्राण वाचू शकतील. शैक्षणिक संस्थांमध्ये वर्षभर कोणते ना कोणते उपक्रम सुरू असतात आणि त्यात विद्यार्थी उत्साहाने म्हणून सहभागीही होत असतात. अशा उपक्रमांमध्ये ‘मानसिक आरोग्य दक्षता सप्ताह’ असाही एक उपक्रम असावा, जिथे विद्यार्थीच स्वयंसेवक बनून आपल्या संस्थेतील निराश मुलं शोधून काढतील. यातून शैक्षणिक उत्कर्षांबरोबरच मुलांचा भावनिक उत्कर्षही साधता येईल. मानसिक आरोग्य, भावनिक ओढाताण, नैराश्य या विषयांवर महाविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सातत्याने चर्चा, व्याख्यानं, परिसंवाद व्हायला हवेत. मानसिक आरोग्यरक्षक म्हणजे समुपदेशक किंवा मनोविकारतज्ज्ञ नसले तरी आपले कान आणि डोळे उघडे ठेवून त्यांना ते मदत नक्कीच करू शकतील. शेवटी कुठल्याही दक्षता विभागाचे कर्तव्य काय? तर कान आणि डोळे उघडे ठेवणे हेच ना! थोडक्यात सांगायचे तर, मानसिक आरोग्य आर्मीची फौज हेच काम करेल.
कामाची ठिकाणे
एका तरुण समुपदेशकाने त्याच्या कंपनीच्या एचआर प्रमुखाला विचारून कंपनीतील लोकांची स्क्रीनिंग टेस्ट घेतली. सर्दी, खोकला, आम्लपित्ताचा त्रास, मधुमेह, ताणतणाव इत्यादींबाबत बोलता बोलता कंपनीतील लोक ‘नैराश्य’ या विषयाकडे वळले आणि मग त्यातील अनेकांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसून आले. आपल्या देशात मनुष्यबळ विकास मंत्रालयावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात, पण दुर्दैवाने मानसिक आरोग्य या विषयाकडे मात्र दुर्लक्ष होतं.
सामाजिक भान
दिवाळी, दुर्गापूजा, नाताळ, होळी असे अनेक सण समाजाच्या विविध थरांत विविध पद्धतींने साजरे केले जातात, पण आपल्या गावात/ सोसायटीत कधी ‘मानसिक आरोग्य आणि ताणतणाव’ या विषयावर चर्चा, परिसंवाद होतात? पालिकेकडून साथीचे आजार, रोगराई याबाबत जनजागृती करणारे फलक ठिकठिकाणी लावले जातात, पण कधी आत्महत्या किंवा नैराश्य याविरोधात जनजागृती करणारे फलक लावलेले दिसतात का हो? या विषयाला हात घालायलाच लोक घाबरतात.
साथीच्या आजारांनी जेवढी माणसे मरतात तेवढीच नैराश्याला बळी पडतात. हिवतापाचे डास वाढू नयेत म्हणून पांढऱ्या धुराची फवारणी होताना दिसते, पण आत्महत्येचे जे सत्र सुरू आहे त्याविरोधात एकसुद्धा चळवळ उभारली जात नाही. ज्या गावात तिथला सरपंच किंवा गृहनिर्माण वसाहतीचा अध्यक्ष आपल्या परिसरात ‘मानसिक आरोग्य आणि ताणतणाव’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करेल तिथे फार मोठे क्रांतिकारक बदल घडून येतील, हे मी विश्वासाने सांगतो.
नैराश्यावर वैद्यकीय उपचार करण्यापेक्षा त्याची कारणे शोधून काढा, असे लोकांचे म्हणणे असते आणि त्यावरून लोक नेहमी वाद घालतात. मात्र जेव्हा माणसाला हिवताप होतो तेव्हा डॉक्टर त्याला कोणत्या डासाने दंश केला त्याचा शोध घेण्यापेक्षा त्या व्यक्तीवर उपचार सुरू करतात. त्याच न्यायाने इथेही ज्याचे मन दुभंगले आहे त्या दुभंगलेल्या, कोलमडलेल्या मनावर आधी उपचार व्हायला हवेत. त्याच्या किंवा तिच्या नैराश्याला कारणीभूत ठरलेल्या सावकाराचा, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या नवऱ्याचा, शेअर बाजाराचा, ऑफिसमधील साहेबाचा किंवा आणखी कुणाचा पाठलाग करण्यात काय अर्थ? त्याने मनाला पडलेली चीर बुजली जाईल का?
म्हणूनच म्हणतोय की, मेंटल हेल्थ सोल्जर अर्थात मानसिक आरोग्याचे रक्षक ही फक्त आवश्यक बाब नाही, तर त्याची आज तीव्र गरज आहे कारण या बाबतीत आणीबाणीची वेळ आलेली आहे.
डॉ. हरिश श़ेट्टी – harish139@yahoo.com
शब्दांकन :- मनीषा नित्सुरे-जोशी