सर्वसाधारण बलात्कारापेक्षा बाल-बलात्कार जास्त गंभीर स्वरूपाचा व सामाजिक धोक्याचा असतो. कारण अशा गुन्हेगारांकडून असे गुन्हे त्याच व्यक्तीवर वा अन्य व्यक्तींवर वारंवार होऊ शकतात. तरुणीसारखे कुठलेही उत्तेजन देणारे तारुण्यसुलभ कारण, सेक्स अपील वा वर्तणूक नसतानाही कोवळय़ा बालिकांवर (प्रसंगी बालकांवरही) बलात्काराचे येणारे प्रसंग हे अतिशारीरिक क्रौर्याचे द्योतक असतात.
सुनीता होती २८ वर्षांची. दूर गावावरून तिची आई माझ्याकडे घेऊन आली होती. आईसमोर केवळ एकच समस्या होती, ती म्हणजे सुनीताचा लग्नासाठीचा सातत्याने नकार. विशीपासूनच घरचे तिच्यासाठी स्थळं बघत होते, पण सुनीताचे मन काही तयार होत नव्हते. ती सुशिक्षित होती. तिला तिच्या अपेक्षा विचारल्या, प्रेम आहे का कोणावर हेही विचारून झाले तरी सुनीता सर्व नाकारून लग्न टाळत होती. आणि आता तर लग्नाचे वयही उलटून गेले होते. आजवर तिच्या कलाने घरच्यांनी हा विषय घेतला होता, पण आता ते काळजीत पडले होते. त्यांच्या फॅमिली डॉक्टरला काही लैंगिकतेचे कारण नाही ना याची शंका आली. केस माझ्याकडे त्याच कारणांनी आली होती.
सुनीता तशी व्यवस्थितच दिसत होती. पण चिंताग्रस्त वाटत होती. तिच्या आईने थोडक्यात माहिती देऊन त्यांची समस्या सांगितली. आईला बाहेर बसवून मी सुनीताला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तिने लग्न करायचे नाही असेच ठरवले होते. तिला शांत करत मी तिची बालपणापासूनची माहिती घेऊ लागलो. ती घेताना सुनीता जरा दडपणाखाली उत्तरे देत होती. जवळ जवळ अर्ध्या तासाने मोकळी होत तिने जी माहिती दिली ती धक्कादायक होती. आपल्या मनाचा चोरकप्पा हळूहळू उघडत सुनीता बोलती झाली.
ती साधारणपणे सात-आठ वर्षांची असताना तिच्याच नात्यातील एका मोठय़ा पुरुष व्यक्तीने तिला जबरदस्तीने लैंगिक कुकर्म करायला लावले होते. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती घरी यायची तेव्हा तेव्हा ती व्यक्ती वारंवार हा अत्याचार करत राहिली. ते अगदी सुनीता १२ वर्षांची होईपर्यंत. नंतर ती व्यक्ती दुसऱ्या गावी गेल्याने सुनीताची सुटका झाली. बालवयाच्या सुनीताला हे काय चालले आहे याची काडीमात्र कल्पना नव्हती. तिला गप्प बसण्यासाठी सुरुवातीला भीती दाखवली गेली आणि नंतर चॉकलेटचे आमिष.
सततच्या अशा अत्याचाराने सुनीता गप्प गप्प राहू लागली. त्या व्यक्तीचीच नव्हे तर पुरुष जमातीचीच तिला भीती वाटत राहिली आणि लैंगिक गोष्टींची घृणा. सुनीताने तोंड न उघडल्याने तिच्या घरच्यांना याची कसलीही कल्पना आली नव्हती आणि अजूनही नव्हती. सुनीताने मात्र घेतलेल्या धसक्याने लग्न हा विषयच बाजूला सारला होता. समुपदेशन हेच तिचे औषध होते. त्याची तिला सातत्याने गरज लागणार होती हे निश्चित. पहिल्यांदा तिची भीती घालवून मनात आजवर साचलेले दुःख व दडपण तिला बोलते करून घालवायचा प्रयत्न केला. हळूहळूच केस सुधारली. पण समाजाला विचार करायला लावणारी ही गोष्ट होती.
पूर्वी शालेय शिक्षणामध्ये दुसरी-तिसरीपासूनच एक विषय असायचा, नागरिकशास्त्र. जेव्हा एखादी व्यक्ती समाजामध्ये वावरायला लागते तेव्हा ती नागरिक असते आणि त्या व्यक्तीने अशावेळी पाळायचे नियम यालाच आपण नागरिकशास्त्र म्हणतो. त्या त्या समाजामध्ये कायद्याच्या रूपात हे नागरिकांसाठीचे नियम केलेले असतात. हे नियम ज्यावेळी पाळले जात नाहीत तेव्हा त्यातून समाजामध्ये घडणाऱ्या उपद्रव-कृतीला आपण गुन्हा म्हणतो. दुर्दैवाने लंगिक वर्तणुकीविषयी असे नागरिकशास्त्र हे अस्तित्वातच नाही. याची नितांत आवश्यकता असते याची जाणीवच सामाजिक व शासकीय स्तरावर नाही. सामाजिक लंगिक वर्तणुकीमध्ये काय पथ्ये व नियम पाळले पाहिजेत हे प्रत्येकाला कळणे आवश्यक आहे. लंगिक गुन्हेगारी टाळण्यासाठी सामाजिक परिस्थितीमध्ये हे फारच आवश्यक आहे. लंगिक शिक्षणामध्ये म्हणूनच व्यक्तिगत लंगिकतेच्या ज्ञानाबरोबरच लंगिकतेतील नागरिकशास्त्राचाही विचार आवश्यक आहे.
चिमुरडय़ांवर झालेल्या बलात्काराच्या घटना समाजाला प्रक्षोभक तर आहेतच, परंतु अंतर्मुखही करायला लावणाऱ्या आहेत. बलात्कार म्हणजे बळाचा वापर करून केलेली जबरदस्तीची संभोग-कृती. ज्याच्यावर ही कृती होते ती अर्थातच त्या व्यक्तीच्या मनाविरुद्धच असते. तरुणींवर होणारे बलात्कार हे आता वय घसरून पाच वर्षांपर्यंतच्या बालिकांवरसुद्धा? दोन-तीन वर्षांच्या शिशुंवरही? प्रश्न सामाजिक गांभीर्याचा तर आहेच, परंतु या विषयी समाज-जागृती करण्यासाठीही महत्त्वाचा बनला आहे. सर्वसाधारण बलात्काराची लैंगिक मानसिकता व बाल-बलात्काराची विशेष मनोलैंगिकता समाजानेही जाणून घेतली पाहिजे.
सर्वसाधारण बलात्कारापेक्षा असा बाल-बलात्कार जास्त गंभीर स्वरूपाचा व सामाजिक धोक्याचा असतो. कारण अशा गुन्हेगारांकडून असे गुन्हे त्याच व्यक्तीवर वा अन्य व्यक्तींवर वारंवार होऊ शकतात. तरुणीसारखे कुठलेही उत्तेजन देणारे तारुण्यसुलभ कारण, सेक्स अपील वा वर्तणूक नसतानाही कोवळय़ा बालिकांवर (प्रसंगी बालकांवरही) बलात्काराचे येणारे प्रसंग हे अति शारीरिक क्रौर्याचे द्योतक असतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा बळींमध्ये संभोगक्रियामार्ग पूर्णपणे विकसित न झाल्याने अशी क्रिया होण्यासाठी या ‘पेटलेल्या’ नराधमांकडून तो मार्ग रुंदावण्यासाठी विविध वस्तूंचा (काचेच्या, लोखंडी इ.) केला जाणारा वापर हा घातकच नव्हे, तर जीवघेणाही ठरू शकतो. (दिल्ली केसमध्ये हे घडलेले आहेच!). त्या बळी पडलेल्या बालिकांमध्ये कुठल्याही तारुण्यसुलभ भावना अजून विकसितच न झाल्याने ‘हे काय चालले आहे?’ याचा त्यांना थांगपत्ताही नसतो. अशा प्रसंगातून जीव वाचलेल्या बालिकांच्या मनावर शरीरावरील जखमांपेक्षाही कधीही भरून न येणाऱ्या जखमा होत असतात. विशेष म्हणजे बहुतांशी घटनांशी माहितीतली, ओळखीची व्यक्तीच संबंधित असते!
११ वर्षांच्या आतील बालकांवर होणारा लंगिक अत्याचार (मोलेस्टेशन व रेप) याला वैद्यकीय भाषेत ‘पिडोफिलिया’ असे संबोधले जाते. पाच वर्षांच्या आतील शिशूंवर होणाऱ्या लंगिक अत्याचाराला ‘इन्फंटोफिलिया’ तर ११ ते १३ वयोगटांतील बालकांवर होणाऱ्या लंगिक अत्याचाराला ‘हेबीफिलिया’ म्हणतात. पिडोफिलिया करणाऱ्या व्यक्तीला ‘पिडोफील’ असे म्हटले जाते. व्हिएन्नाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. क्राफ्ट-एिबग यांनी सन १८८६ मध्ये त्यांच्या ‘सायकोपॅथिया सेक्शुआलिस’ पुस्तकामध्ये पहिल्यांदा ‘पिडोफिलिया इरॉटिका’ हा शब्द वापरला.
‘पिडोफिलिया’ या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ ‘लहान मुलांबरोबर केलेले मैत्रीप्रेम’. आता ‘मुलांवरील लैंगिक अत्याचारा’साठी हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला जातो. व मुलांबरोबर लंगिक दुष्कृत्य करणाऱ्या प्रौढासाठी किंबहुना १६ वर्षांवरील कोणाहीसाठी वैद्यकीय क्षेत्रात ‘पिडोफील’ हा शब्द वापरला जातो. जास्तकरून पुरुषांकडून असे गुन्हे घडत असले तरी स्त्रीकडूनही असे लंगिक अत्याचार घडू शकतात. (माझ्याकडे अशा बालपणातील हिस्टरीची एक केस नुकतीच आली होती). प्रायमरी, स्वभावत ‘पिडोफिलिया’ची कुठलीही खात्रीलायक वैद्यकीय कारणे अजून प्रस्थापित झालेली नाहीत. (आनुवंशिकता?, मेंदूतील हायपोथॅलॅमसची, मॅमीलरी-बॉडी भागाची, प्रौढ-लंगिक (अ‍ॅडल्ट सेक्शुआलिटी) असंवेदनशीलता?, लैंगिक हॉर्मोनची अनियमितता? इ.)
मेंदूच्या गाभ्यातील हायपोथॅलॅमस या भागात सेक्सच्या प्रेरणेचे केंद्र असते. लंगिक आकर्षणाच्या निर्मितीच्या पायाला ‘प्रायमरी इनेट रिलीजिंग मेकॅनिझम (आयआरएम)’ असे म्हणतात. पुरुषामध्ये ‘मॅमीलरी-बॉडी कॉम्प्लेक्स’ हा मेंदूच्या आतमध्ये असणारा भाग पौगंडावस्थेतील टेस्टोस्टेरॉनच्या वाढणाऱ्या प्रमाणामुळे हे ‘प्रायमरी इनेट रिलीजिंग मेकॅनिझम (आयआरएम)’ कार्यान्वित करत असतो असे संशोधकांच्या लक्षात आले आहे. यामुळेच स्त्री-शरीराचे आकर्षण निर्माण होत असते. ‘पिडोफील’ व्यक्तींमध्ये ही ‘आयआरएम’ची विकसन-क्रिया ‘बोथट’ होत असण्याची शक्यता आहे. म्हणूनच तारुण्यसुलभ व्यक्तिमत्त्व नसणाऱ्या बालिकांवर केवळ कामतृप्तीच्या आकांक्षेपोटी त्यांच्याकडून हे बाल-बलात्कार घडत असतात.
पण मुळात वैद्यकीय व्याख्येत केवळ अशी क्रियाच नव्हे, तर प्रत्यक्ष लंगिक अत्याचार न करता सातत्याने तसा विचार करण्याची, सेक्शुअल फॅण्टसीची व बाललंगिकतेच्या फिल्म पाहाण्याची (चाइल्ड पोर्नोग्राफीची) प्रवृत्तीही ‘पिडोफिलिया’ प्रकारात गणली जाते. असा प्रत्येक ‘पिडोफील’ हा लंगिक गुन्हेगारी करेलच असे नाही. परंतु अशी लंगिक गुन्हेगारी करणारी व्यक्ती मात्र ‘पिडोफील’ असू शकते. याचे कारण काही असे लंगिक गुन्हेगार हे स्वभावत ‘पिडोफील’ (प्रायमरी इंटरेस्ट, एक्सक्लुजीव) असतील असे नसून प्रासंगिकही असू शकतात. असे पिडोफील हे पुरुष व स्त्री या दोन्ही प्रकारात असू शकतात. ते विवाहितही असू शकतात. (माझ्याकडील एका केसमधील विवाहित पुरुषाकडून असे पिडोफिलिक उत्तेजक प्रकार वारंवार घडत असल्याची कबुली त्याने स्वत होऊन दिली होती व त्यामुळे वैवाहिक जीवनात त्याला समस्या जाणवत होती.)
एका अमेरिकन संशोधनामध्ये २४२९ बाललंगिक गुन्ह्य़ांमधील पुरुष गुन्हेगारांमध्ये स्वभावत पिडोफील केवळ ७ टक्के होते, बाकीचे प्रासंगिक पिडोफील होते. त्याची महत्त्वाची कारणे होती, अतिमानसिक ताण, विस्कळीत वैवाहिक जीवन व कामोत्तेजनेच्या प्रसंगी अ‍ॅडल्ट जोडीदार न मिळणे. पण तरीही अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष निघाला की, स्वभावत पिडोफील गुन्हेगार हे जास्त वेळा असा लंगिक अत्याचार करत असतात. म्हणजेच जास्त बालके अशांच्या गुन्ह्य़ाला बळी पडतात.
असे बाललैंगिक गुन्हे घडण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे बालकांविषयी मुळातच गुन्हेगारी लंगिक आकर्षण असणे, बालकांच्याकडून विरोध व प्रतिकाराचा धोका न वाटणे, सावज सहजगत्या मिळणे व गुन्ह्य़ानंतरही त्याची वाच्यता अशा बळींकडून होण्याची शक्यता अत्यंत कमी असणे ही असतात. पिडोफील असणाऱ्या व्यक्तींना ‘ज्ञानसंवर्धक वर्तणूक उपचारा’ला (कॉग्निटिव बिहेवियरल थेरपी) प्रवृत्त करून लंगिक गुन्ह्य़ांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कॅनडियन सेक्सॉलॉजिस्ट मायकेल सेटो याने अशी थेरपी उपयुक्त ठरण्यासाठी अशा स्वभावत पिडोफील असणाऱ्यांच्या दृष्टिकोनात बदल करून वागणुकीत बदल होऊ शकतो असे सांगून अतिकामोत्तेजनेला आटोक्यात आणण्यासाठी बाललंगिक कामस्वप्नांपासून परावृत्त करणारे स्वकामपूर्तीचे ‘मास्टुरबेटरी रिकंडिशिनग टेक्निक’ तसेच बाललंगिक गुन्हे (चाइल्ड सेक्स क्राईम) घडतील असे प्रसंगच कसे हाताळायचे याचेही ज्ञान देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. व्यसनाधीनतेचे उपचार जसे केले जातात, त्या धर्तीवर हे उपचार करणे आवश्यक असते.
बलात्काराला प्रवृत्त करणाऱ्या कारणांमध्ये ‘प्रबळ गुन्हेगारी प्रवृत्ती’ हे कारण महत्त्वाचे असते. बलात्कार करणाऱ्या पुरुषांमध्ये स्वकामपूर्ती करण्याची, स्वत स्वतःची कामोत्तेजना हाताळायला शिकण्याची प्रवृत्ती फारशी आढळत नाही. कामोत्तेजनेनंतर तिच्या पूर्ततेसाठी लगेचच दुसरीकडे शोध घेण्याची प्रवृत्ती बळावत असते. म्हणून अशा पिडोफील व्यक्तींना मानसिक ताण हाताळायला शिकणे, वैवाहिक जीवनातील लंगिकता समाधानकारक करणे, (त्यासाठी वैवाहिक जोडीदारालाही तिची जबाबदारी जाणवून देणे). अशा मार्गदर्शनातूनच पिडोफील व्यक्तींकडून बाललंगिक गुन्हेगारी टळू शकेल.
परंतु न सुधारणाऱ्या किंवा तशी मानसिकताही न दाखवणाऱ्या व्यक्तींकडून समाजातील निरागस बालकांना धोका पोचू शकतो हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, विशेषत कायदेतज्ज्ञांनी यासाठी जागरूक राहाणे गरजेचे आहे. असे गुन्हेगार मानसिक रोगी मानून जर मोकाट राहिले तर तो सामाजिक धोकाच आहे हे निश्चित. अमेरिकेत म्हणून ‘अ‍ॅडॅम्स वेल्श अ‍ॅक्ट’ हा कायदा केला गेला आहे व समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी अशांना मोकाट न सोडण्याची तरतूद त्यात केली आहे. सर्वसाधारण बलात्कारापेक्षा हा बलात्कार जास्त गंभीर स्वरूपाचा व समाजातील कोवळय़ा जिवांना जास्त घातक असल्याने तसेच गुन्हेगाराकडून वारंवार असा गुन्हा करण्याची प्रवृत्ती जास्त बळावत असल्याने याची दखल कायद्याने जास्तच गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण बलात्कारसारखेच याला मानू नये.
कामभावनेचा उद्रेक कसा हाताळावा याची व्यक्तिगत व सामाजिक जाणीव नसणे हा लंगिक शिक्षणाच्या अभावाचा परिपाक आहे. बलात्काराच्या प्रसंगी कामभावनेचा उद्रेक होत असतो, पण त्याच जोडीला तिचे शमन (सॅटिस्फॅक्शन) कशाही परिस्थितीत करायचेच ही ईर्षांही पेटलेली असते. ही ईर्षां एकतर्फी असल्याने तिची पूर्ती करण्यासाठी जबरदस्तीचा वापर करण्याची उचल जेव्हा मन तीव्रतेने घेते तेव्हा लंगिक गुन्हेगारी घडते. ही लंगिक गुन्हेगारीची मनोवृत्ती मुळातच नष्ट करण्यासाठी लंगिक शिक्षण व काउन्सेिलग आवश्यक असते. हे शिक्षण म्हणजेच लंगिकतेचे नागरिकशास्त्र शालेय जीवनापासून, पौगंडावस्थेत व विवाहपूर्व काळातही टप्प्याटप्प्याने देणे गरजेचे आहे. त्यामुळे निकोप लंगिकतेचे सुजाण नागरिक निर्माण होऊन अशा कित्येक बालिकांचा व पर्यायाने समाजाचा ‘बलात्कार’ टळायला मदतच होईल.
पण लक्षात कोण घेतो?
shashank.samak@gmail.com

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
ms dhoni suresh raina
“मी तेव्हा धोनीला सांगितलं होतं”, चार वर्षांनंतर सुरेश रैनानं ‘त्या’ प्रसंगावर केला खुलासा; IPL २०२१ वरही केलं भाष्य!
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक