मोबाइल म्हणजेच भ्रमणध्वनी. अर्थात असून अडचण नसून खोळंबा. हे मोबाइल फोन आणि त्यांचे युझर फ्रेंडली वापरकर्ते जे जे अनुभव देतात त्याच्यामुळे माझ्या डॉक्टरी जगात रोज घडणाऱ्या विसंवादांचं मी काय करणार आहे?
दैनंदिन जीवनात सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणाऱ्या माणसांना एकमेकांशी संवाद साधताना सुलभता यावी यासाठी शोध लागलेलं साधन म्हणजे मोबाइल फोन – अर्थात भ्रमणध्वनी! आपण सगळेच आता या यंत्राच्या कमी-अधिक प्रमाणात आहारी गेलो आहोत. त्यामुळे तो कोणी वापरावा, किती वेळ वापरावा, कुठे न्यावा किंवा नेऊ नये, काय काम करत असताना घ्यावा किंवा घेऊ नये, कधी चालू ठेवावा किंवा बंद ठेवावा, २४ तास अंगाचा अविभाज्य भाग म्हणून घेऊन हिंडावे किंवा नाही; या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने आपापल्या संदर्भात ठरवायची. त्या उत्तरांचं प्रमाणीकरण कोण करणार?
आमच्या रुग्णालयात तर या मोबाइलने असे काही गोंधळ माजवले आहेत, की काही विचारू नका! काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला बरा झाल्यावर डिस्चार्ज देताना सिस्टरने त्याच्या हातातील सलाइनची सुई काढून त्याजागी दुसऱ्या हाताच्या अंगठय़ाने पाच मिनिटे त्याला दाबून ठेवायला सांगितले. दुसऱ्याच क्षणी खिशातला मोबाइल वाजला म्हणून बहाद्दराने या सूचनेकडे दुर्लक्ष करून बिनधास्त फोन उचलला. काही कळायच्या आत हा बोलण्यात मग्न आणि हातावर रक्ताचे ओघळ वाहून जमिनीवर टपटप थेंब पडू लागले. ते पाहून कापूस घेऊन त्याचा मोबाइल पकडलेला हात दाबण्याची सिस्टरची धडपड सुरू झाली. मी हे दृश्य बघून वैतागले व त्याला थोडी रागावले. फोन कधी उचलावा किंवा उचलू नये; याचे तारतम्य नको का? परवा एक आई आपल्या चार महिन्यांच्या बाळाला रुग्णालयाच्या खाटेवर खेळत ठेवून त्याच्यापासून थोडय़ा अंतरावर स्वत:च्या मोबाइलवर काही तरी करण्यात दंग झाली होती, इकडे मी त्या खाटेजवळून जायला आणि ते बाळ आपल्याशीच खेळत कुशीवर वळायला एकच गाठ पडली. त्याहीपुढे अजून उपडे होण्याचे त्याचे प्रयत्न चालू होते; ते पाहून मी जरा अस्वस्थ झाले; की याची आई इतक्या शांतपणे मोबाइल कसा खेळू शकते? मी माझी शंका त्वरित बोलून दाखवली तर; ती म्हणाली ,‘माझं लक्ष आहे त्याच्याकडे.’ यावर काय बोलणार?
कन्सलटिंग रूमच्या बाहेर कितीही मोठय़ा अक्षरात आपले मोबाइल बंद ठेवण्याची विनंती करणारी पाटी लावली व प्रत्येक व्यक्ती थोडा तरी वेळ आपापल्या नंबरची वाट बघताना ती पाटी वाचत असला; तरी नेमके आत आल्यावर, आपण रुग्णाला तपासून झाल्यावर, कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेसंबंधी आकृती काढून समजावयाला लागणार; इतक्यात त्यातल्या एकाचा तरी मोबाइल वाजायला सुरुवात होते. कोणी जीभ चावून, चेहऱ्यावर अपराधी भाव आणत तो बंद करतात. कोणी आपल्यासमोर उचलून, ‘अरे थांब रे, मी जरा डॉक्टरकडे आहे. बाहेर आल्यावर तुला फोन करेन. हो हो, आत्ताच आलो, नंतर करतो, पाच मिनिटांनी करतो..’ वगरे बोलून मग फोन बंद करतात. काही जणांना आलेला कॉल फक्त बंद करता येतो; पण मोबाइल पूर्ण बंद वा सायलेन्ट करता येत नाही. मग तो पुन्हा पुन्हा वाजत राहतो. काही रुग्णांबरोबर समजत्या वयातील मुलं असतील, तर ती मोठय़ांचा मोबाइल कॉल पट्कन बंद करून ज्याचा फोन आहे त्याला पटापट मेसेज पाठवायला लागतात; फक्त त्यात ते एवढे तल्लीन होतात की त्यांना त्या मोबाइल तंद्रीमधून जागं करावं लागतं. कधी रुग्ण पडद्यामागे टेबलवर झोपवलेला असतो, अवघड जागेची तपासणी चालू असते आणि पडद्याबाहेरील पिशवीत त्याचा मोबाइल वाजायला लागतो. अशा वेळी फार अवघड परिस्थिती उद्भवते. कधी रुग्णाला टेबलवर झोपायला सांगून आपण स्टेथोस्कोप लावून त्याचे श्वासाचे आवाज एकाग्रतेने ऐकू लागतो; तेवढय़ात स्टेथोस्कोपमधून कानठळ्या बसवत त्याच्या खिशातला मोबाइल वाजायला सुरुवात. शेवटी काय, काहीही झालं, तरी आपल्या विचारांच्या व संवादाच्या सुसंगत ओघात हा मोबाइल व्यत्यय ठरलेलाच! तपासण्याच्या व सल्लामसलतीच्या वेळेस ‘चिकनी चमेली’पासून ‘जय देव जय देव जय मंगलमूर्ती’पर्यंतचे मोबाइलचे िरगटोन आपला विचारभंग व वातावरणाचा रसभंग करतात. यातलं अगदी काहीच नाही घडलं, तर मग अजून एक शक्यता-रुग्ण टेबलवर झोपवलेला, तपासायला सुरुवात, आपण त्याचे पोट तपासेपर्यंत त्याच्या खिशातून त्याचा मोबाइल तपासण्याचे टेबल व िभत यांच्यामधील अरुंद सापटीत पडल्याचा आवाज, त्यामागोमाग सुटय़ा पशांचा आवाज. मग रुग्णालयाचे सेवक, लांब काठी, टॉर्च, झाडू, टेबल सरकवा सरकवी असा जामानिमा हजर व सापटीतून मोबाइल काढण्याचा द्राविडीप्राणायाम सुरू! मोबाइल व पडण्यासारख्या वस्तू आधी खिशातून काढण्याविषयी सूचना न दिल्याचे वा न पाळल्याचे परिणाम!
आत वॉर्डमध्ये राऊंड घेतानाही हीच कथा. रुग्णाला सर्वतोपरी तपासून त्याच्या फाइलमधे नोंद करून त्याच्याशी बोलणार; तोच त्याचा मोबाइल वाजतो व तो लगेच कानमग्न व ध्यानमग्न होतो. मग तो व त्याच्याजवळ बसलेला नातेवाईक यांच्यामध्ये फोनवर कोणी बोलायचं व डॉक्टरांचं बोलणं कोणी ऐकायचं याविषयी एक प्रेमळ सुसंवाद झडतो. मग काय? आपली बोलती बंद! सगळेच रुग्ण असा अनुभव देतात असे नाही. कधी कधी रुग्णाशी बोलून आपण बरोबर असलेल्या सिस्टरला फाइल दाखवून काही सूचना देऊ लागलो; की तेवढय़ात तिच्या खिशातला मोबाइल कंपनं निर्माण करत खुसखुसायला लागतो. त्यावर माझ्या दवाईसुंदरीच्या (या शब्दाची साहित्यचोरी झालेली आहे) चेहऱ्यावर एक ओशाळलेलं हसू किंवा निर्ढावलेलं दुर्लक्ष दिसून येतं. आता बोला, कोणाशी विचारधारा न तुटता अखंड सुसंवाद करताय?
सततचा व्यत्यय आणि विशेष म्हणजे या व्यत्ययाची दिलगिरी कोणालाच नाही. आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमांना व्यत्यय आल्यावर दिलगिरी तरी वाटायची. या माध्यमाला खेद खिजगणतीतही नाही. परवा काही काम सांगण्यासाठी रुग्णालयातील एका आयाबाईंची शोधाशोध सुरू झाली तेव्हा मला एक सिस्टर सांगत आली, ‘ही बघा मॅडम, ही मावशी कामं झाली असं सांगून तिच्या मोबाइलवर गेम खेळत बसली आहे.’ आता बोला! वापरकर्त्यांशी इतकं मत्री ठेवणारं (user freindly) इलेक्ट्रॉनिक माध्यम दुसरं कुठलं असू शकतं?
या ‘नसून खोळंबा’ अशा माध्यमाबद्दल लिहायचं ठरवलं, आणि आज माझ्या एका रुग्णाने मला एक सुखद धक्का दिला. एक अडाणी स्त्री माझ्याकडे पोटाच्या क्षयरोगाचा इलाज करण्यासाठी नियमितपणे येत होती. मे महिन्यात मी पुढील एक महिन्याच्या गोळ्या लिहून दिल्यावर मला ती म्हणाली, ‘मी गावाला जाणार आहे, तिकडे या गोळ्या मिळतील का?’ मी म्हटलं, ‘याची काही शाश्वती नाही. तू जेवढे दिवस तिकडे राहणार आहेस तेवढय़ा दिवसांच्या गोळ्या खरेदी करून बरोबर घेऊन जा; या गोळ्यांत खंड पडलेला अजिबात चालणार नाही.’ तिच्या चेहऱ्यावर मला चलबिचल दिसली. मला म्हणाली, ‘त्यापेक्षा तुम्ही दिलेल्या औषधांचा एसएमएस नातेवाईकांना पाठवते, तिकडे या गोळ्या मिळत असतील, तर येथून जाताना मी फक्त हा महिना संपेपर्यंतचं औषध घेऊन जाईन, पण तिकडे मिळत नसतील, तर मात्र दीड-दोन महिन्यांच्या गोळ्यांचेच ६०० रुपये होतील. गावी जाताना भाचरांना खाऊ, कपडे, खेळणी सगळी तयारी बाकी आहे अजून; तिकडे गेल्यावर औषधे घ्यावी लागली तर नवीन महिना लागल्यावर मिस्टर पुढचे पसे पाठवतील. आत्ता ते तरी एवढे पसे कुठून देतील? मी एसएमएस पाठवून तर बघते.’ वर्षभरानंतरच्या सुट्टीची सारी गणितं कोलमडण्याच्या भीतीने तिने केलेला मोबाइलचा सुज्ञ उपयोग मला आश्चर्यचकित करून गेला. मोबाइल म्हणजेच भ्रमणध्वनी संवादाच्या- वेळेच्या, स्थळाच्या, कालावधीच्या विसंवादाबद्दल भरभरून बोलणारी मी- या माझ्यासमोर रोज घडणाऱ्या अनेक विसंवादांचं काय करणार आहे? याची खंत माझ्या मनाला चाटून गेली.
आप्तेष्टांची रुग्णाबद्दलची काळजी व त्यांच्याशी सहज साधता येणारा संवाद यामुळे मोबाइल हे माध्यम आजारी माणसाला तर खूप जवळचं वाटत असणार; हे मी समजते. या माध्यमाचे फायदेदेखील मी या युगात नाकारू शकत नाही. पण त्याचा उपयोग-स्थळ, काळ, वेळाच्या संदर्भात विसंवादी तर होत नाही ना, याची नीरक्षीर विवेकबुद्धी व तारतम्य जागृत ठेवणारी व्यक्ती हीच खरी सुज्ञ!
vrdandawate@gmail.com

Do you know Swordbilled hummingbird The title bird with the longest beak in the world read about this everything
जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…