‘नाही कशी म्हणू ..’ हा त्यांचा मंत्रच आहे. तो आहे ‘मोहक’ ग्रुप. नागपूरच्या चारजणी एकत्र येऊन छंदातून सुरू झालेला हा व्यवसाय आता लाखो रुपयांमध्ये खेळला जातोय. ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’च्या उत्साहाचा फायदा घेत त्यांनी आपल्यासारख्या अनेक मौत्रिणींना या व्यवसायात आणले असून नाही न म्हणण्याच्या मंत्रामुळे त्यांचा ‘मोहक’ व्यवसाय अधिकच बहरला आहे.
गेल्या काही वर्षांपासून आकारमानाने फुगत चाललेल्या ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ने बाजारपेठेत अनेक छोटय़ा-मोठय़ा उद्योगांना जन्म दिला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट या एका भल्यामोठय़ा खिडकीतून या असंख्य उद्योगांचे चेहरे आपल्याला बघायला मिळतात. या उद्योगांमधील अनेक हात स्त्रियांचे आहेत ही यातील विशेष आनंदाची बाब. चित्र रेखाटणारी बोटे, गाता गळा, रंगसंगतीची अचूक दृष्टी आणि सौंदर्याची जाण यापैकी एखादा गुण जरी असेल आणि गुणी मैत्रिणींचा गट असेल तर काय काय करता येते? ‘मोहक आर्ट्स’ या नावाने नागपूरमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या गटाने याचे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. वाटीभर तिळांचा हलवा घेऊन चार मैत्रिणींनी घराच्या अंगणात सुरू केलेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आता १२ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि या चौघींच्या हातात आणखी १५-२० मैत्रिणींचे हात गुंफले गेले आहेत. सुरेखा देशपांडे, संध्या घोडकी, कविता इंदूरकर आणि भाग्यश्री जोशी या चौघींनी सुरू केलेला हा उद्योग आपल्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाच्या प्रसंगांचा गोडवा अधिक वाढवतो आहे.
लग्नासारख्या प्रसंगानिमित्त रांगोळ्या, फुलांचे गालीचे काढणे, भेटवस्तूंचे कलात्मक पॅकिंग, अक्षरांचे पॅकिंग, विहिणींच्या पंगतीसाठी सजावट. हलव्याचे दागिने-कपडे आणि त्याबरोबरीने या समारंभांना साजेशी गाणी, मंगलाष्टके म्हणणे अशा तऱ्हेतऱ्हेच्या सेवा देणाऱ्या या मैत्रिणींनी सध्याच्या लगीनघाईमध्ये अक्षरश: उसंत नाहीय!
या उद्योगाची सुरुवात झाली ती मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या संस्कारवर्गातून. नागपूरमधील माता मंदिरात मुलांसाठी सुरेखा देशपांडे यांनी मोफत संस्कार वर्ग सुरू केला. त्यात गाणी, गोष्टी, श्लोक, कविता याबरोबर मुलांमुलींना आवडणारे धमाल मैदानी खेळ होते. दहीहंडी, गणपती, होळी असे सगळे सण आणि छोटय़ा सहली, नाटके अशी मज्जाही होती. अभ्यासाचे ओझे काही काळ विसरायला लावणाऱ्या या वर्गाला बघता बघता एवढी गर्दी होऊ लागली की मुलांची मजा आसपासच्या प्रौढांसाठी सजा ठरू लागली आणि थोडय़ा खट्टू मनानेच सुरेखाताईंनी हा वर्ग बंद केला. पण यानिमित्ताने मैत्रिणी खूप मिळाल्या होत्या आणि सुरेखाताईंच्या बोटांना असलेले कलाकुसरीचे वळण अनेक मैत्रिणींना जाणवलेही होते. त्यापैकीच एकीने तिला हलव्याचे दागिने करून मागितले. एरवी अशाच प्रकारच्या वस्तू शिकवण्याचे क्लास घरातच घेणाऱ्या सुरेखाताईंनी या पहिल्याच कामात पुढील छोटय़ाशा गृहउद्योगाची बीजे दिसत होती. त्यामुळे त्यांच्यासह आणखी तिघींनी ठरवले, या कामाला नाही म्हणायचे नाही.
‘मोहक आर्ट्स’चा मंत्रच मुळी ‘नाही म्हणायचे नाही’ असा असावा. नाहीतर हलव्याचे मंगळसूत्र, चिंचपेटी, बाजूबंद, नथ असे थेट पारंपरिक अलंकार बनवणाऱ्या या मैत्रिणींना अकस्मात ‘हलव्याचा लॅपटॉप’बनवण्याची आर्डर आल्यावर त्यांनी नक्की हातपाय गाळले असते. अमेरिकावासी आयटीतील जावयाला हलव्याचा नारळ आणि हार कसा द्यायचा म्हणून नाक मुरडणाऱ्या एका सासूला हलव्याचा लॅपटॉप होऊ शकतो, हा साक्षात्कार झाला आणि ‘मोहक’वाल्या मैत्रिणींनी त्याला तथास्तु म्हटले. मग काय, हलव्याचा मोबाईल, टाय, जावयासाठी मोजडी, डॉक्टर सुनेसाठी हलव्याचा स्टेथोस्कोप अशी हौशी सासू-आईची प्रत्येक कल्पना या मैत्रिणींनी प्रत्यक्षात आणली. देशपांडेंच्या अंगणात बनणाऱ्या या वस्तू जाणाऱ्या-येणाऱ्याच्या नजरेला पडत आणि त्यातून नव्या नव्या ऑडर्स मिळत. मग हलव्याच्या दागिन्यांबरोबर चौकशी सुरू झाली काळ्या फ्रॉक्स आणि झबल्यांची. या प्रश्नाने शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणी या गटात सामील झाल्या आणि त्यांच्या कल्पनेतून तऱ्हेतऱ्हेचे आधुनिक फॅशनचे काळे कपडे खास संक्रांतीच्या सणासाठी तयार होऊ लागले. आज ‘मोहक’तर्फे तयार होणारे छोटय़ा मुला-मुलींचे काळ्या कपडय़ांचे सेट्स हलव्याच्या लॅपटॉपपाठोपाठ पुणे, मुंबई, बंगलोर आणि अर्थातच थेट कॅलिफोर्नियात पोहोचले आहेत..!
अर्थात ‘मोहक’चे संक्रातीचे माहात्म्य इथेच संपत नाही. कारण आता संक्रांतीनिमित्त केल्या जाणाऱ्या बोरन्हाणाची आणि हळदी-कुंकवाची तयारी त्यासाठी तिळगुळाच्या कलात्मक वडय़ा (तिळगुळाचा स्वेटर वगैरे!) त्या करून देतात. संक्रांतीच्या एका सणातून इतके छोटे छोटे उद्योग निर्माण होत असताना लग्नासारख्या भल्यामोठय़ा संधीपासून या मैत्रिणी दूर राहणे शक्यच नव्हते आणि त्याची सुरुवात झाली ती रांगोळीपासून! सुरेखाताई आणि त्यांच्या मैत्रिणी माता मंदिरात वेगवेगळ्या निमित्ताने मोठाल्या रांगोळ्या काढत होत्याच. त्या बघून एका बाईने विचारले, घरी येणाऱ्या नववधूच्या स्वागताची तयारी करून द्याल? ही गोष्ट आठ वर्षांपूर्वीची. या स्वागताच्या अनेक तऱ्हा आहेत. रांगोळ्या किंवा पायघडय़ा, फुलांचे गालीचे, भोवती पणत्यांची महिरप, येणाऱ्या वधूवर फुलांचा वर्षांव. नटूनथटून, मेंदीच्या पावलांनी फुलांच्या गालिच्यावर पाय ठेवत नववधू घरात येत असताना तिच्या पहिल्या रात्रीचीही तयारी या चतुर स्त्रियांना करायला मिळावी यात नवल ते काय?
या लग्नाच्या हंगामात एक गोष्ट आली, संक्रांतीच्या सणाच्या आगेमागे दोन-तीन महिने काम करणाऱ्या या मैत्रिणी आता वर्षभर सतत काम करू लागल्या. कारण लग्नाच्या बाजारपेठेची गरज सतत वाढत होती. ‘हौस’ म्हणून कितीतरी नवनव्या गरजा वाढत होत्या. आत्ता-आत्तापर्यंत प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून दिला घेतला जाणारा साडय़ांचा आहेर ‘गिफ्ट पॅक’मध्ये जाण्याचे दिवस आल्यावर तर या महिलांना उसंत मिळेनाशी झाली. आता तर वधूच्या साडीला मॅचिंग असे थीम पॅकिंग असते! त्यात रंगसंगती असते. फुलं, परडय़ा, रंगीबेरंगी रिबीनी, त्यावर बांगडय़ा आणि दागिन्यांचे पॅकिंग असे हौशींचे नाना सोहळे सुरू झाले आहेत.
मांडवात सवाष्णीच्या पदरात तांदूळ, खोबऱ्याची वाटी टाकून ओटी भरण्याचे दिवस आता गेले. आता वधूच्या प्रत्येकी साडीवर मॅचिंग ओटी बॅग आणि तशीच कलात्मक पिशव्या ‘मानकरणींसाठी’ लागतात, ज्या ‘मोहक’मध्ये बनतात! आणि वधूची साडी जर अशी थाटात येणार असेल तर वराची शेरवानी का नको? या सगळ्या मागण्यांनी या मैत्रिणींना अक्षरश: अहोरात्र कामाला जुंपले आहे.
२२-२३ वर्षांपूर्वी, नागपूरच्या थंडीत दुपारचे ऊन खात अंगणात हलवा बनवणाऱ्या या मैत्रिणी आता सकाळी लग्नासाठी रांगोळी, दुपारी विहिणीच्या पंगतीसाठी फुलांचे गालिचे आणि रात्री स्वागत समारंभासाठी फुलांची सजावट अशा अष्टौप्रहर व्यस्त असतात. शिवाय या कामात त्यांनी स्वत:च्या हौशीने घातलेली भर म्हणजे मुंजीत गुरुकुलाचा आश्रम त्या मांडतात तर लग्नात सगळी वैवाहिक जीवनाची थीम मांडणारी सजावट त्यांनी तयार करून घेतली आहे. बाहुला-बाहुलीच्या माध्यमातून ही थीम त्या लग्नाच्या मांडवात मांडतात तेव्हा ‘थाटात लग्न करून देऊ’ इच्छिणारी वधूमाय आणखी खूश होते.
रांगोळी, मेंदी काढणे, कागदाची – लोकरीची तऱ्हेतऱ्हेची फुलं करणे, सुबक चौकोनी वडय़ा करणे, तिळावर पाकाचा शुभ्र काटा चढवणे, तऱ्हेतऱ्हेचे हार वेण्या गुंफणे आणि हे करता करता गुणगुणत रहाणे ही भारतीय स्त्रीची कौशल्य आणि ओळख आत्ता आत्तापर्यंत उंबऱ्याआड रहात होती. फार तर सासरी चार लोकांत क्वचित वाखाणली जात होती. पण या सगळ्या कला-कौशल्यातून चार पैसे कडोसरीला लावता येतील असे आमच्या आज्या -आत्यांच्या कधी स्वप्नातही आले नसेल पण लिहित्या स्त्रीची बोटं संगणकावर सफाईने चालता चालता हे छोटे छोटे निर्मितीचे आनंद तिच्या बोटांतून कधी निसटून गेले हेच कळले नाही. सुरेखाताई व त्यांच्या मैत्रिणींनी तेच हेरले आणि त्याचे बघता बघता सचोटीच्या व्यवसायात रूपांतर केले.
हे सगळे त्या पैशासाठी करतात का? त्या म्हणतात, ‘पगार न घेता!’ सणवार लग्नसराईचा हंगाम संपून थोडी धामधूम ओसरली की मग या सगळ्याजणी बसून हिशेब करतात. मिळालेल्या पैशातून आपल्या कामासाठी पोषक, पूरक असे काही घ्यायला हवे का याचा विचार करतात. मग तेच पैसे व्यवसायवाढीसाठी गुंतवले जातात आणि मग उरलेले पैसे सगळ्यांना सारख्या प्रमाणात मिळतात!
या स्त्रियांनी स्वत:चा आनंद पैसे मिळवण्यापुरता मर्यादित ठेवलेला नाही. त्यासाठी त्यांच्या वाटा आणखी वेगळ्या आहेत. एकत्र अथर्वशीर्षांची आवर्तने, स्त्रीसूक्ताचे पठण, रूद्रपठण असे त्या करतातच शिवाय नाटक बसवणे, रामनवमीच्या नवरात्रात रामाची तर नवरात्रात देवीची भजने म्हणताना त्या आनंदात असतात, शिवाय व्यवसाय म्हणून डोहाळे मंगलाष्टकांना मागणी असते ती वेगळीच. नागपूरमधील एका घरात चालणाऱ्या या व्यवसायाने आता गावाची वेस ओलांडली आहे. मुंबई, पुणे, इंदूर आणि विदर्भात अन्य जिल्ह्य़ांत आता या ‘उद्योजिका’ जातात.
.. आणि ‘इंडियन वेडिंग’ची सध्याची नवी गरज आहे, नऊवारीचा थाट! तर या मैत्रिणी आता तुमच्या मांडवातील तमाम मानकरणींना नऊवारी साडी नेसवून देण्याची सेवा द्यायला पण तयार आहेत. नाही कशाला म्हणायचे, नाही ना..