daanकर्णाचं दातृत्व वादातीत. त्याच्याइतकं मोठं मन आजच्या काळात दुरापास्त वाटलं तरी आपल्याकडेही अशी असंख्य माणसं भेटतात जी आपल्या घासातला काही भाग दुसऱ्यांच्या मुखी भरून येणारी तृप्तता अनुभवतात. हे दान धनाचं असेल, रक्तदान, नेत्रदान असेल, श्रमदान असेल किंवा सेवादान असेल, अनेकांनी असंख्य जीव जगवले, काही कुटुंबं उभी राहिली, हुशार मुलांना यशाची शिखरं गाठता आली. तर श्रमदानाने गावंही वसली. दानाचं महत्त्व लक्षात यावं आणि दानशूर लोक वाचकांसमोर यावेत यासाठी हे सदर    दर पंधरा दिवसांनी.
राजाराम आनंदराव भापकर अर्थात भापकर गुरुजी, वय वर्षे ८४, आपल्या गावातील लोकांच्या सोयीसाठी डोंगर फोडून रस्ते बांधणारा हा श्रमप्रयोगी. गेल्या चाळीस वर्षांपासून आजही तितकेच कार्यरत असणाऱ्या गुरुजींच्या या श्रमदानाविषयी..
‘मी नगरच्या माळीवाडा बसस्टॉपवर एस.टी. स्टँडमधल्या पोलीस चौकीशी उभा हाय. उतरल्यावर कोनाला बी इचारा..’ आसपासच्या शंभरएक माणसांना सहज ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात भापकर गुरुजी मला स्टँडवर कुठे भेटायचं ते समजावून सांगत होते. चौऱ्याऐंशीव्या वर्षीही आवाजात एवढी धग आणि रग.. मग प्रत्यक्ष माणूस कसा असेल.. या विचारात असतानाच बस नगरच्या एस.टी.डेपोत शिरली. भापकर गुरुजींना शोधणं कठीण गेलं नाही. धट्टीकट्टी अंगकाठी, ढगळ पांढरा शर्ट व पायजमा, डोक्यावर गांधी टोपी, हातात काठी आणि उन्हाने रापलेला चेहरा. एकटय़ाच्या हिमतीवर सलग ४० वर्षे श्रमदान करून गावाच्या विकासाचा मार्ग खुला करणाऱ्या भापकर गुरुजींचं मला घडलेलं हे पहिलं दर्शन! सर्वस्व पणाला लावून आपल्या गावी गुंडेगावात त्यांनी जे २६ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले, त्यातील ११ डोंगरघाट, ते बघायला आणि त्यासंबंधी त्यांच्याशी गप्पा मारायला तर मी इतक्या लांब आले होते.
नगर ते गुंडेगाव हे ४० कि.मी.चं अंतर. गुंडेगावला जाणाऱ्या एस.टी.त आम्ही जाऊन बसलो. पाठोपाठ ५-६ गावकरीपण चढले. बस सुटायला पाऊण तास अवकाश होता. तोपर्यंत बसमध्येच आमच्या गप्पा रंगल्या. या मैफिलीत नंतर कंडक्टर व ड्रायव्हरदेखील सामील झाले. जो तो भापकर गुरुजींविषयी अत्यंत आदराने बोलत होता.. गुंडेगाव हे नगर व श्रीगोंदा तालुक्यांच्या हद्दीवरील छोटंसं गाव.. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं.. अनुपम निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेलं. पण तितकंच दुर्गम. आजही इथे माणसं आणि जनावरांसाठी सरकारी दवाखाना नाही. डोंगरांवरील कित्येक वस्त्यांवर वीज नाही. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी तर आजूबाजूच्या गावात जाण्यासाठी इथे पायवाटदेखील नव्हती.
गावाजवळील संतोषा डोंगराच्या पलीकडे असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या बाजारपेठेच्या गावी जाण्यासाठी तब्बल ३५ किलोमीटरचा वळसा घालून जावं लागे. तेसुद्धा वाहन असणाऱ्यांनाच शक्य होई. बाकी बहुसंख्य लोकांना मात्र डोंगरावरील जंगल, दरडी, ओढे, नाले ओलांडतच कोळगाव गाठावे लागे. आजारी माणसाला किंवा अडलेल्या बाईला कोळगावच्या दवाखान्यात नेताना डोंगराच्या पायथ्यापर्यंत बैलगाडी, मग डोली आणि नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने बैलगाडी असा ठेचकाळणारा प्रवास करावा लागे. अशा द्राविडी प्राणायामामध्ये कित्येकदा रोगी दगावत असे. हे पाहून सामाजिक जाण असणाऱ्या भापकर गुरुजींनी गुंडेगाव ते कोळगावदरम्यान डोंगरावरील घाटरस्ता हवा या मागणीसाठी सरकार दरबारी अर्ज विनंत्या करायला सुरुवात केली. पण हताश करणारा अनुभवच पदरी पडला पण, तोच गुरुजींना प्रेरणा देऊन गेला. ग्रामस्थांचा त्रास दूर करण्यासाठी सरकारच्या मदतीशिवाय हा घाटरस्ता स्वावलंबनाने पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला.
ते साल होतं १९५७! सुरुवातीला गावकऱ्यांनीही जोर धरला. पण गरिबीमुळे याच कामाला वाहून घेणं त्यांना शक्य नव्हतं. मग गुरुजींनी मजूर लावले. आपल्या पगारातील अर्धी रक्कम ते मजुरीपोटी देत. त्या वेळी त्यांचा पगार होता ६० रुपये उरलेल्या ३० रुपयांत आपल्या चार मुलांच्या पालनपोषणाचा खर्च ते निभावत. निम्मा पगार देण्याचा हा नेम भापकर गुरुजींनी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ४० र्वष पाळला. मजुरीसाठी पैसे कमी पडले तर घरचं धान्य होतंच. त्यांची ही तळमळ पाहून मजुरांनीही रोज १ तास विनामूल्य काम करून त्यांना सहकार्य दिलं.
शाळा सुटली की कुदळ, फावडं, घमेलं, घेऊन गुरुजी निघत. सुट्टय़ांमध्ये अर्थातच पूर्ण वेळ काम. निवृत्तीनंतर त्यांनी या कामासाठी स्वत:ला वाहूनच घेतलं. डोंगरावरील मोठमोठे दगड सरकवून रस्त्याच्या बाजूने लावणं, सुरुंगांच्या मदतीने खडक फोडणं, आवश्यक तिथे मातीचा भराव टाकणं. झालंच तर पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूने चर खोदणं.. अशी अंगमेहनतीची कामं ते मजुरांच्या खांद्याला खांदा लावून करू लागले. प्रसंगी नगरहून त्यांनी भाडय़ाने जे.सी.बी. मशीनही आणलं. या सगळ्या कामासाठी निवृत्तीनंतर मिळालेली पूर्ण पुंजी (२ लाख रुपये) त्यांनी खर्ची घातली. निवृत्तिवेतनाची तीच गत. अर्थात घरच्या मंडळींना त्यांचं हे लष्करच्या भाकऱ्या भाजणं अजिबात पटत नव्हतं. पण गुरुजी तसूभरही ढळले नाहीत. शेवटी ४० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर १९९७ साली त्यांचं स्वप्न साकार झालं. गुंडेगाव-कोळगाव हा ७ किलोमीटरचा घाट रस्ता बांधून पूर्ण झाला. या रस्त्याबरोबरच गुंडेगाव ते कोथूळ हा दुसरा घाटरस्ताही त्यांनी प्रचंड खडक फोडून बनवला.
संतोषा डोंगरावर घाटाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या धावडेवाडीत व त्यापुढील गुंडेगावचं ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात जाण्यासाठी भापकर गुरुजींनी जो रस्ता बनवला त्याची कहाणी तर चकित करणारी. या मंदिरात दर वर्षी चंपाषष्ठीला खंडोबाची मोठी यात्रा भरते. भाविकांचे डोंगर चढताना होणारे हाल बघून गुरुजी त्या घाटरस्त्याचा प्लॅन काढण्यासाठी नगरमधील अनेक इंजिनीअर्स/ आर्किटेक्टना भेटले. पण ती डोंगरचढण बघून पैसे देऊनही कोणी पुढे येईना. तेव्हा विचार करताना, इंग्रजांना खंडाळा घाटाचा मार्ग दाखविणाऱ्या शिंगरूबा धनगराच्या युक्तीची त्यांना आठवण झाली. त्यानुसार गुंडेगावातील दोन गाढवं भाडय़ाने घेऊन गुरुजींनी त्यांना थेट खंडोबाच्या मंदिरापाशी नेलं. त्यांच्या पाठीवर दोन्ही बाजूंनी दोन-दोन भोकं पाडलेली चुन्याची गोणी लादली. त्यानंतर इशारा देऊन त्या गाढवांना हाकलताच ती सोपी पायवाट शोधत गुंडेगावकडे निघाली. सांडत गेलेल्या चुन्याच्या धारेने रस्त्याचा नकाशा तयार झाला आणि गुरुजींचं काम सुरू झालं. असे २६ कि.मी. लांबीचे एकूण सात रस्ते त्यांनी सरकारकडून एक पैचीही मदत न घेता श्रमदानातून तयार केले. शिवाय गावातील सुढळेश्वर मंदिराचा ६० बाय ४० फुटांचा आर.सी.सी. सभामंडप त्यांनी स्वखर्चाने, स्वहस्ते बांधला.    एखाद्या निष्णात इंजिनीअरला लाजवेल असं काम करणाऱ्या भापकर गुरुजींचं शिक्षण किती.. तर इयत्ता सातवी पास इतकंच. पहिली तीन वर्षे स्वेच्छेने  शिक्षकाचं काम केल्यावर १९५७ ते १९९१ पर्यंत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी केली. अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला हा राजाराम आनंदराव भापकर नावाचा मुलगा शिक्षणासाठी नगरला ४० कि.मी. अंतर पायी तुडवत जात असे. पुढे नगरला राहून शाळेचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी हमालीदेखील केली. १३ व्या वर्षी एका मित्राबरोबर ते गांधीजींचं दर्शन घेण्यासाठी थेट पवनार आश्रमात गेले होते. विनोबांच्या भूदान चळवळीतही त्यांनी भाग घेतला. लग्न केलं तेही एका अपंग मुलीशी. कारण विचारल्यावर म्हणाले, ‘धडधाकट मुलीशी कोनीबी लगीन करील, हिच्याशी कोन करणार?’ पत्नीही गुणी निघाली. तीन मुलगे व एक मुलगी यांनी घराचं गोकुळ बनलं. पुढे १९९१मध्ये तिची साथ सुटली.
‘मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं..’ हे भापकर गुरुजींचं ब्रीदवाक्य. त्यांनी बनवलेल्या रस्त्यांवरून चालणारी जीप, ट्रॅक्टर, दोन चाकी/चार चाकी वाहनांची वर्दळ बघताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात. पण ते एवढय़ावरच थांबलेले नाहीत. जंगलतोड, कुऱ्हाडबंदी, पशुहत्या, व्यसनमुक्ती.. अशा विषयांवर ते गावकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. सायकल, मोटारसायकल, गाडी, जीप आदी वाहनं दुरुस्त करणं हा त्यांचा छंद आहे. बाहेरून भंगार दिसणाऱ्या पण चालू स्थितीतील एक-दोन मोपेड व चार-पाच फियाट/अॅम्बेसेडर कार त्यांनी हौसेखातर घेतल्या आहेत. वेळ आली तर यातली एखादी गाडी चालवत ते आजही थेट पुण्यापर्यंत जातात.’’
या भापकर गुरुजींना सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटलंय. जांभळांच्या झाडांची पाणी व माती धरून ठेवण्याची असाधारण क्षमता समजल्यापासून गावातील नदीनाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा त्यांनी ध्यास घेतलाय. त्यासाठी गुरुजी आपल्या टू सीटरवरून नगरला जातात आणि जांभळं खरेदी करून लोकांना फुकट वाटतात. जांभळं खाता-खाता त्यांना जलसंधारणाचं महत्त्वही सांगतात. त्यानंतर त्या जांभळांच्या बिया गोळा करून रोपं बनवण्यासाठी वनविभागाकडे नेऊन देतात. या विभागाने पुढील पावसात त्या बियांपासून रोपं करून देण्याचं त्यांना आश्वासन दिलंय. पण त्याआधीच या वृक्षमित्राची निरनिराळ्या प्रकारची लाखाच्या वर झाडं लावून झालीत.
गावाच्या उत्कर्षांसाठी आयुष्य पणाला लावलेल्या भापकर गुरुजींचं घर पाहताना मात्र गहिवरून येतं. मोठ-मोठे घाटरस्ते बनवणाऱ्या गुरुजींना स्वत:चं घर ठीकठाक करायला सवड नाही किंवा या कामी पैसा खर्च करणं त्यांना मान्य नसावं. मी गेले त्या दिवशी कधी नव्हे ती पावसाने संततधार धरलेली. त्या तोडक्या-मोडक्या घरात चहूबाजूंनी गळत होतं. जेमतेम एक सुका कोपरा बसायला मिळाला. त्यांचं घर दुरुस्त कसं व कधी होईल?
सैल पडलेल्या स्लिपर्स घालून कितीही अंतर चालायची तयारी. जेवणही एक वेळ. निवृत्तिवेतन मिळतं ते गावकल्याणाकरिता. मिळालेल्या छोटय़ा-मोठय़ा पुरस्कारांची रक्कमही कधी घरी आलेली नाही. आज ८४व्या वर्षीही टिकाव, फावडं घेऊन श्रमदान करीत आहेत. शिवाय गावात वाचनालय सुरू करायचं म्हणून १०,००० पुस्तकांची खरेदी स्वत:च्या खिशातून झालीय. झालंच तर गावातील गरीब वृद्धांसाठी विनामूल्य सेवा देणारा वृद्धाश्रम सुरू करायचाय.
हौसले हो बुलंद तो पत्थर पिघलते है
पर्वतों के सीनेसे भी रास्ते निकलते है..
हे शब्द खरे करून दाखवणाऱ्या भापकर गुरुजींचा निरोप घेताना माझे हात आपोआपच त्याच्यां चरणांशी गेले.    
संपर्क भापकर गुरुजी – ९४२०६४२९८१
संपदा वागळे – waglesampada@gmail.com

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले