‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’चं काम पाहत असताना, त्यातल्या कामगाराच्या न्याय्य हक्कासाठी लढताना त्यांच्यातलं माणूसपण वेगळ्या तऱ्हेने सामोरं आलं तर अनेक माणसांचं माणुसकीहीन वागणंही दिसलं. सफाई कामगार म्हणून जगताना प्राण्याच्या पातळीवर जगणाऱ्या या कामगारांच्या प्रश्नांवर गेली वीस वर्षे काम करणाऱ्या मुक्ता मनोहर सांगताहेत त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत. ‘प्रत्यक्ष जगताना’ या सदराचा हा शेवटचा लेख.
का मगारांनी मला सांगितलं की, तुम्ही स्वत: येऊन बघाच ससून हॉस्पिटलात. मलाही परिस्थिती पाहण्याची गरज वाटतच होती. त्याप्रमाणे मी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी ससून हॉस्पिटलच्या शवागारापाशी पोचले. प्रत्यक्ष आत जाण्यापूर्वीच तिथे पसरलेला वास कुजलेल्या प्रेतांचा मला जाणवत होता. फक्त डोळे उघडे राहतील अशा पद्धतीनं तोंड बांधून मी कामगारांबरोबर तळघरात असलेल्या प्रेतागृहाच्या पायऱ्या उतरायला लागले. कुजलेल्या मासात कोणत्या तरी अ‍ॅसिडचा मिसळलेला दर्प. प्रत्येक पायरी उतरताना अजून अजून गडद होत जाणारा. माझ्या कातडीच्या प्रत्येक रंध्रातून शरीरात घुसत असल्याचं मला जाणवत होतं. त्या खोलीच्या दारवाजापाशी मी पोचले. आतला प्रकार बघून मी शहारून गेले. एव्हाना त्या उग्र दर्पामुळे माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. खोलीच्या अध्र्या िभतीपर्यंत तिथे प्रेतांचा ढीग लागलेला होता. टरटरून फुगलेले, सडलेले, उघडेनागडे स्त्री-पुरुषांचे देह, क्वचित तुटलेले हातपाय इत्यादी अस्ताव्यस्त. मी गर्रकिनी मागे वळले. झपाझपा जिना चढून मी वर आले. ‘‘बघा ताई, गेली आठ दिवस ए.सी. बंद आहे. कशी ही प्रेतं उचलणार आम्ही. हात लावला तर मुडद्यांचे हातपायसुद्धा कधी हातातच येतात. आम्ही काम केलं नाही तर आख्या ससूनमध्ये कोणी येऊपण शकणार नाहीत, इतका या घाणीचा वास येत असतो..’’ मला कामगार सांगत राहिले. मी एव्हाना ससून हॉस्पिटलच्या गच्च गर्दीच्या परिसरातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. कमी खर्चात बरं औषधपाणी मिळावं म्हणून तिष्ठत असलेली माणसं. बहुसंख्येने गरीब माणसं. त्यांचे सगेसोयरे घेऊन सरकारच्या कृपेची अपेक्षा करणारी ती महाकाय गर्दी. तरीही त्या गर्दीला एकमेकांचा आधार होता. पण मी जे बघितलं ते यापेक्षाही खालच्या पातळीवरचं होतं.
ज्यांना नाव नाही, ज्यांच्याकडे धन नाही, कुटुंबं नाहीत, सगेसोयरे नाहीत अशा बेवारस माणसांचे भयावह वाटणारे ते सडलेले मृतदेह होते. आणि त्या देहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेच्या त्या कामगारांची होती. ते तर सगळे मुडदेच होते. पण जे आमचे कामगार जिवंत होते, त्यांचं जिवंतपण कसं जोपासायचं, हा प्रश्न मोठा अवघड होता. रोज नित्यनियमितपणे बेवारस प्रेतांची गाठोडी बांधायची. स्मशानात नेऊन त्या देहांना मुक्ती द्यायची हेच काम. न कुरकुरता, आठ तास हे काम करायचं. आठवडा, महिने आणि निवृत्त होईस्तोपर्यंत वर्षांनुर्वष.
या विशेष घृणास्पद कामाचा काही तरी स्वतंत्र भत्ता आमच्या मागणीनुसारच सुरू झालेला होता. हा रोजचा मिळणारा भत्ता वाढवून द्या ही कामगारांची मागणी होती. ‘अनेक वेळा शवाघराची एअर कंडिशन व्यवस्था बंद व्हायची, त्यामुळे आणखी समस्यांना तोंड द्यावं लागायचं, भत्ता वाढवा, काय करणार? दारू प्यायल्याशिवाय आम्ही हे काम करूच शकत नाही. घरी गेलं तरी बायको-पोरं, कुटुंबातली माणसं आमच्या अंगाला येणाऱ्या वासानं आमची किळस करतात.’ त्यांची तक्रार होती. त्यांचा भत्ता वाढवताना युनियन प्रतिनिधी म्हणून मी चर्चा केली. तर तेव्हाचे आरोग्यप्रमुख म्हणाले, ‘‘अहो, किती पसे आपण वाढवायचे, मुंबईत तर हे काम कंत्राटीपद्धतीनच दिलं जातं.’ ‘म्हणजे अजूनच अमानुषता’  मग कंत्राटी पद्धतीवर वाद,चर्चा. हो नाही करता करता भत्त्यात थोडी वाढ. शेवटी मान्य. मान्यतेच्या सगळ्या फायली पार होऊन मग त्या कामगारांना न्याय मिळणार. महानगरपालिका कामगारांचं अनेक खात्यातलं काम हे असंच. माणसाला ज्या कामाची प्रचंड घृणा वाटेल. जी कामं करायला सर्वसाधारणपणे कोणी तयार होणार नाही अशी अनेक कामं.
कचरा डेपोवर गेलं तरी तेच. ड्रेनेज सफाईचंही तेच. मल्यानं गच्च भरलेली गटारं. आत अडकलेले दगड किंवा कधी मेलेलं जनावर, साठलेला गाळ. त्यात उघडय़ा अंगानं उतरणारी माणसं. आजच्या चमकत्या, शहरीकरणाच्या अवाढव्य घाणीची विल्हेवाट लावणारी ही जिवंत माणसं, जणू फार जिवंत राहूच नयेत अशीच ही व्यवस्था. जातीयतेचा विचार केला तर ही सगळी माणसं तळागाळातल्या मागास जातीजमातींची. दलित समाजाची. ज्यांच्या मुक्तीची स्वप्न महात्मा फुले यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या अनेक चळवळींनी बघितली. ट्रेड युनियन चळवळ म्हणजे अशाच मानवमुक्तीच्या लढय़ातलं एक नवं पर्व. औद्योगिक क्रांतीच्या युगात सुरू झालेलं. जन्माधिष्ठित बंधनं काहीशी ढिली करणारं युग. अर्थात त्या युगाच्याही जीवघेण्या मर्यादा आहेतच. बाजरपेठेच्या जोखडात बंदिस्त झालेली मानवता. ही मर्यादा मान्य करूनही या चळवळीतलं सामथ्र्य मान्य करणरे असंख्य जण, त्या वाटेची मी एक पथिक. तर अशी माणसाचाच अवमान करणारी घाणीची कामं महापालिकांतले देशभरातले असंख्य कामगार बिनबोभाट करत आहेत. या सगळ्यांनाच या कमातून खरी मुक्तता देण्याचा विचार, अत्याधुनिक यंत्रयुगात करण्याची गरज कोणाला फारशी जाणवत नाही.
तो आवाज त्यांनीच उठवणं भाग आहे. ड्रेनेज फुटलेली असतात. त्याचं प्लॅस्टर धड नसतं, आत रोज घुशी लागतात, कचरा देताना विभक्त करूनच दिला पाहिजे याची जाणीव शहराला नाही. आजही असंख्य मुलं, माणसं रस्त्याच्या कडेला, नदी-नाल्यांच्या किनाऱ्याला उघडय़ावर शौचाला बसतात. हे मलमूत्र उचलायला जिवंत माणसं कामाला जुंपलेली असतात. अशा हजारो कामगारांची आमची युनियन. म्हणजेच ‘पुणे महानगर पालिका कामगार युनियन.’ या युनियनचं काम करायची जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी खरं तर फारच एक्साइट झाले होते. माझी एक्साइटमेंट माझ्या वैचारिक बांधीलकेवर आधारलेली. या युनियनचं काम करण्यापूर्वीही मी कामगार चळवळीशी फार जिव्हाळ्यानं बांधलेले होते. मी िपपरी चिंचवड परिसरातले कामगार लढे जवळून बघितले होते. बजाज कामगारांवरचा पुण्यातला पहिला गोळीबार झाल्यावर मी त्या गल्लीबोळातून फिरले होते. डॉ. बेक कंपनीच्या लढय़ात तर बायांवर झालेल्या हल्याच्या वेळेस तर त्यांचं शिष्टमंडळ व्यवस्थापनाकडे घेऊन जाण्यात मी होते. टेल्कोमधला राजन नायर यांच्या पुढाकाराखालच्या शनिवार वाडय़ावरच्या दीर्घ उपोषणाच्या लढय़ातही अन्य महिलांसह माझा सहभाग होता. मुंबईच्या गिरणी कामगारांचा डॉ. दत्ता सामंतांच्या काळातला अखेरचा लढा बघून तर मी अवाक् झाले होते. कामगारांचे निघालेले लाँग मार्च, ग्रामीण भागामधले कामगारांचे दौरे, सांगलीमधली विधानसभा निवडणूक, दैनिक श्रमिक विचार, कामगार अघाडीची निवडणूक हे सगळंच मला विलक्षण मोलाचं वाटलेलं होतं. त्या मागच्या कामगार वर्गीय राजकारणाचा अभ्यास मला नेहमीच ग्रासून टाकत असे. मात्र माझं दैनंदिन काम होतं ते महिला संघटनेचं. त्याची व्याप्ती आणि कामाची पद्धतही काहीशी वेगळी होती. आणि मला नेहमीच आपण कामगार संघटनेचं काम केलं पाहिजे, आपल्याला तशी संधी मिळाली पाहिजे असं मनोमन वाटत राही. मी जे करते ते काहीसं मला काठावरचंच वाटत असे. अशा स्थितीत पुणे महानगर पालिकेसारख्या एका दीर्घ इतिहास असणाऱ्या संघटनेत काम करायला कॉ. अप्पासाहेब भोसले यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी जामच एक्साइट झाले होते. कॉ. अप्पासाहेबांनी एक भक्कम युनियन रुजवली होती. अनेक करार, अनेक फायदे आणि कामगार बाण्याचा लढवय्येपणा त्यांनी कामगारांत रुजवला होता. त्यांच्याबरोबर ट्रेड युनियनचं काम करायला मिळण्यानं मी भारावून गेले होते.
आज प्रचंड बदललेल्या काळात, लाल बावटा म्हणजे काय? कामगारवर्ग म्हणजे काय? कामगारवर्गाचं सामाजिक बदलात स्थान काय असू शकतं अशा प्रश्नांना चच्रेच्या परिघातही खूप महत्त्व राहिलेलं नाही. तरीही मी ज्या महापालिका कामगारांच्या संघटनेचं काम करते आणि त्या माध्यमातून कामगारांचं जे दर्शन मला होतं, त्यामुळे आजही मला या तळातल्या माणसांच्या अफाटपणाच्या दर्शनामुळे मी अवाक् होते. या माणसाची घाण काम करण्याची आणि ते करूनही जीवन रसरशीतपणे जगण्याची दिसणारी झलक मला आश्चर्यात बुडवते. माणूस किती सहन करू शकतो? स्वत:च्या सामुदायिकपणाचेही तो सहजपणे भान घेऊ शकतो. व्हेइकल डेपोमधल्या एका साध्या ड्रायव्हरने जेव्हा महापौरांची गाडी, निवडणूक काळात एका खासदारांना द्यायला धीटपणे नकार दिला. तेव्हा संतापून महापौरांनी त्याच्या श्रीमुखात लगावली. त्या वेळी तो संयामाने गप्प बसला, पण डेपोत आल्यावर त्याचा बांध फुटला. आणि मग सर्व मोटार सारथींनी डेपो बंद पाडला. महापौरांनी डेपोत येऊन माफी मागितली पाहिजे ही मागणी प्रत्यक्षात साकार झाली. सगळ्यांनी एकत्रित विचार केला. आग्रह धरला. त्यांच्या मागण्यांचे तर असे किती तरी लढे त्यांनी लढवले.
हे कामगार औद्योगिक कामगारांपेक्षा वेगळे आहेत. ते विखुरलेले आहेत. ते उत्पादनाच्या प्रक्रियेत तसेही जोडले गेलेले नाहीत. त्यांच्या जीवनाची आणि कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठी युनियनच्या वतीनं आम्ही ‘कचराकोंडी’ हा माहितीपट तयार केला. अतुल पेठे यांनी खूप मेहनत घेतली. ‘कचराकोंडी’मुळे तर नवाच इतिहास घडला. त्यातूनच शासनाने निवृत्त सफाई कामगारांना मोफत घरं दिली. या घरांच्या चाव्या घेतानाच कामगारांच्या मुलांच्या जागरूक गटानं या इमारतींच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न समोर आणले आहेत.
व्यवस्थेतली घाण कामं करताना महापालिकेचा कारभार हा संपूर्ण उतरंडीवर आणि नोकरशाही तत्त्वावर आधारलेला आहे. हा तळातला कामगार तसाही हक्क विहीनच आहे. अनेक अपप्रवृत्तींचा तो शिकार बनू शकतो. अशा स्थितीतही संधी मिळाली तर तो उत्तम गातो, तो कलाकार आहे. ‘सत्यशोधक’ हे गो. पु. देशपांडे लिखित नाटक, अतुल पेठे यांनी त्यांना घेऊनच रंगभूमीवर आणलं. मग या नाटकानेही एक इतिहासच घडवला. तो उत्तम गातो, तो उत्तम वादक आहे. अशा त्यांच्या सुप्त ताकदींना जागं करण्यासाठी ठेवण्यासाठी युनियनने प्रस्थापित ट्रेड युनियनच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कार्यक्रम आखावे लागतात. आमच्या युनियनची ती परंपराच आहे. त्यांनी युनियनला साथ केली आहे आणि हीच गोष्ट मला नव्या गोष्टी घडवायला हिम्मत देते. इतरांना संघटित करणे हा तर या कामगारांनी पूर्वीपासूनच घेतलेला वसा आहे. कॉ. ताराबाई सोनवणे या सफाई सेविका होत्या. त्यातर स्त्री-मुक्ती चळवळीच्या एक लढाऊ कार्यकर्त्यांही झाल्या होत्या. अनेक कामगार लढय़ांत या कामगारांनी भाग घेतला आहे आणि आज त्यांनी कंत्राटी कामगारांनाही संघटित करायचं आव्हान पेललं आहे. मी कामाला सुरुवात केली त्या वेळी कामगारवर्ग समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतो, या विचारांनी मी भारावलेली होते.
आज सुमारे वीस वर्षांच्या वाटचालीनंतर ही काम करणारी माणसं अफाट शक्तीची आहेत. त्यांच्याकडून खूप काही समाजाने शिकायची गरज आहे. हे मला जाणावलं आहे, पण त्याचबरोबर त्यांना अधिक समृद्ध आणि रसरशीतपणे समाजबदलाचे दूत व्हायला, त्यांची ती सुप्त ताकद संघटित होण्यास काय करता येईल या प्रश्नाचं उत्तर मात्र गुंतागुंतीचं आहे. किंवा ते कदाचित काळाच्या ओघातच मिळेल ही अपेक्षा आहे.
युनियन कमकुवत करण्याचे, मोडून काढण्याचे, युनियनविरोधी अफवा पसरवण्याचं काम आजही काही मंडळी करतात, मात्र हा कामगार युनियनच्या बाजूनं ठाम उभा राहिलेला आहे. व्यवस्थेत, यंत्रणेत नाकारलं जाणारं त्यांचं सृजनात्मक माणूसपण जिवंत ठेवणं, समृद्ध करणं, कामगार संघटनेचं लोकशाही मूल्यं त्यांच्यात रुजवणं हे महा कठीण काम आहे या निष्कर्षांला येता येता येताच मला दमायला होतं. एक विलक्षण झगडाही आहे. कारण समाजातलं वातावरण व्यक्तिवादावर आधारलेलं, जात जमातवादी राजकारणाच्या प्रभावाखाली असलेलं, दबावतंत्रांच्या सापळ्यात गुंतवून टाकणारं, माणसांना निष्क्रिय करणारं, अशा स्थितीत खासगीकरण जागतिकीकरणाच्या आजच्या या वातावरणात या कामगारांनी लाल बावटा आणि चळवळ जिवंत ठेवण्याची  सतत दाखवलेली भावना मला समृद्ध करते. मग मीही अनेक संस्थांना बरोबर घेऊन युनियनच्या माध्यामातून त्यांच्या बळावर कधी रामानुजन गणित विज्ञान प्रकल्प, कधी शिक्षकांसाठी प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, सत्यशोधक नाटक, करू स्वप्न साकार सारखे दृक्श्राव्य गीत अशा उपक्रमांना सुरुवात करते.
कार्यकत्रेही स्वतहूनच अनेक नवे कार्यक्रम लढे सुचवतात. महापालिका ही संस्था जिवंत राहिली पाहिजे, ती आíथक दृष्टय़ाही संपन्न राहिली पाहिजे. नागरी सेवांचे खासगीकरण होता कामा नये, अशी अनेक अव्हाने मग पेलायला आम्ही सज्ज होतो. (समाप्त)