मी आज सांगणार आहे माझ्या अनेक छंदांपैकी एका आगळ्या छंदाविषयी. हा छंद आहे जुन्या मित्रांना, खूप काळ न भेटलेल्या नातेवाईकांना शोधून काढायचा!  सध्याच्या संगणक व इंटरनेटच्या जमान्यात अशा सगळ्यांना शोधून त्यांच्याशी पुन्हा सौहार्दाचे नाते प्रस्थापित करणे आता तुलनेत सुलभ झाले आहे, मात्र त्यासाठी वेळ आणि चिकाटी मात्र असावी लागते. ती माझ्यात आहे.
माझ्या रुईया कॉलेजमधील बऱ्याच मित्र-मत्रिणींना या छंदामुळे एकत्र आणण्यात मला यश आले आहे आणि अजूनही आम्ही एकेकाच्या घरी अधूनमधून भेटत असतो. माझ्या जर्मनीतील वास्तव्यात माझी एका भसीन नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याच्या व्यवसायातील पार्टनरने सूड उगवण्यासाठी त्याला जर्मनीत बोलवून वाऱ्यावर सोडून दिले होते. भारतात परतण्यासाठी त्यावेळी मी त्याला जमेल तशी मदत केली होती. पण नंतर आमचा संपर्क तुटला. त्याच्या दिल्लीतील जुन्या पत्त्यावरून मी त्याला ३७-३८ वर्षांनी शोधून काढले.
अभाविपचा एक कार्यकर्ता आíकटेक्टचे शिक्षण घेत असताना चर्चगेट येथील वसतिगृहातच राहात होता. ४५ वर्षांपूर्वी माझी व त्याची हुबळीला अचानक गाठ पडली. त्यानंतर आमचा संपर्क नव्हता. पण तो बंगळुरुला गेल्याचे ऐकले होते. मला नंतर त्याला शोधण्यात यश आले व आमची कित्येक वर्षांनी पुन्हा भेट झाली. त्याच्याकडे गेलो असताना, बोलता बोलता कळलं की त्याच्या लग्नात मध्यस्थी करणारे एक प्रोफेसर माझेही मित्र आहेत. त्यांच्याशी मी या मित्राची फोनद्वारे भेट घडवून आणली. यावेळी झालेल्या संभाषणात, अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे संदर्भ आले, त्यातल्या एकाची प्रकर्षांने आठवण निघाली. आणि तब्बल ४० वर्षांनंतर आमची एकत्र भेट झाली. या पुनभ्रेटीचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. पण माझ्या मित्राने या भेटीचे श्रेय लगेच मला बहाल केले.  
माझ्या एका मित्राचा मेव्हणा आयएएस अधिकारी आहे. तसेच माझे एक नातेवाईकही आयएएस आहेत आणि गमतीची गोष्ट म्हणजे ते दोघेही बॅचमेट आहेत, असे मला समजले, गेली अनेक वष्रे ते एकमेकांना भेटले नव्हते. मित्राच्या नातेवाईकांची व माझ्या नातेवाईकांची सुमारे ५० वर्षांनी फोनवरून भेट झाली. त्या भेटीचं अप्रूप त्यांनाही वाटलं आणि माझे खूप आभार मानले.
    मी शिवाजी पार्क येथील एमजीएम तलावाचा सभासद होतो. तेथे नवशिक्यांबरोबरच पट्टीचे पोहोणारेसुद्धा येत असत. तिथेच माझी एका जलतरणपटूशी ओळख झाली. पुढील शिक्षणासाठी नंतर तो जर्मनीला गेला. तेव्हा मीच त्याला सर्व प्रकारची मदत केली होती. त्यानंतर तो भारतात परत आला व गोव्याला स्थायिक झाला. मध्यंतरी मी त्याला साधारण ३०-३५ वर्षांनी शोधून काढले.
   विज्ञानसंस्थेतील माझा समकालीन विद्यार्थी एम.एस्सीनंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. माझ्या १९७०-७१ सालच्या अमेरिका भेटीच्या वेळी मी त्याच्याकडेच राहिलो होतो. त्याचाही नवा पत्ता मी शोधला व तब्बल ४५ वर्षांनी आमच्या भेटीचा योग जुळून आला.
जुन्या ओळखीच्या मित्रांना भेटण्यात काही वेगळीच मजा असते हे स्वत अनुभवल्याशिवाय कळणार नाही. माझ्या या छंदातून आणखीन अनेक जुन्या मित्रांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा भेटण्याची मला इच्छा आहे.  
     जुन्या परिचितांच्या भेटी-गाठीतून ऋणानुबंध तयार होतात. हा आयुष्यभराचा ठेवा होऊन जातो. माझ्या या छंदाने आयुष्यात भरभरून आनंद दिला. हे अनुभव मी माझ्या ‘असेही काही’ या पुस्तकांत लिहिले आहेत. इच्छुकांनी पुढील वेबिलकलाही अवश्य भेट द्यावी. (www.drmanoharbapat.webs.com) (सदर समाप्त)