महिलांना सामाजिक व राजकीय कामात यथाशक्ती भाग घेता यावा यासाठी अनसूयाबाईंनी ‘नागपूर भगिनी मंडळा’ची स्थापना केली. समाजाचा बहिष्कार स्वीकारून अदिवासी मुलांना शिकविण्याच्या व हरिजन वस्तीत कामावर जाण्याचा त्यांचा उपक्रम सुरूच ठेवला. हिंदी स्वातंत्र्याच्या इतिहासात गाजलेल्या ‘चिमूर अष्टी हत्याकांड’ प्रकरणात २५ पैकी ७ गोंड आदिवासींना सदोष मनुष्यवधाबद्दल फाशीची शिक्षा झाली. या सात जणांची ही शिक्षा रद्द होण्याकरता अनसूयाबाईंनी जिवाचे रान केले. अखेर १९४६ मध्ये या सातही गोंडांना सरकारने सोडले. त्यांचा हा पराक्रम म्हणजे हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ाच्या इतिहासातील एक सोनेरी पान ठरला.
नागपूर विभागातील चिमूर या लहानशा गावातील स्त्री-पुरुषांनी १६ ऑगस्ट १९४२ रोजी प्रभातफेरी काढली. शांतपणे झेंडा फडकवीत व घोषणा देत शिस्तीत चालणाऱ्या त्या प्रभातफेरीवर अचानक अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारामुळे प्रभात फेरी मोडली गेली. या अन्यायकारक गोळीबारात काही जखमी तर काहीजण मृत्यू पावले. हे पाहून तरुणांचा संयम सुटला. त्यांनी पोलिसांवर दगडांनी प्रतिहल्ला चढविला. त्यात पाच पोलीस मारले गेले. शांत प्रभात फेरीचे रूपांतर जमावात झाले. त्यांनी सर्किट हाऊस जाळले. त्यात एक इंग्रज अधिकारी जळून मेला. त्यामुळे २०० गोरे सैनिक, १५० हिंदी सैनिकांनी १९ ऑगस्ट रोजी चिमूरवर हल्ला केला. घराघरातून माणसे बाहेर काढून त्यांना झोडपून काढले गेले. या हल्ल्यातील सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे चिमूर गावातील स्त्रियांवर गोऱ्या व काळय़ा सैनिकांनी केलेला बलात्कार. सात दिवस गावात लष्करशाही चालू होती. नागरिकांच्या छातीवर बंदूक रोखून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला गेला. ना कोणी गावाच्या बाहेर जाऊ शकत होता, ना आत येऊ शकत होता. चिमूर व अष्टी येथे झालेल्या हत्याकांडाला हिंदी स्वातंत्र्याच्या इतिहासात ‘चिमूर-अष्टी हत्याकांड’ म्हणतात.
   या हत्याकांडाच्या निमित्ताने ४ हजार लोकांना अटक झाली. स्त्रियांवरील बलात्काराचा बदला घेण्यासाठी लष्करातल्या सोजिरांना कंठस्नान घालणारे २५ आदिवासी पुरुष पकडले गेले. या सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी व्हावी, ही मागणी लावून धरून प्रा. योगीराज भन्साळी या ज्येष्ठ कार्यकर्त्यांने आमरण उपोषण सुरू केले. या आदिवासी तरुणांना न्याय मिळवून देणाऱ्या अनसूयाबाई काळे यांची ही कथा.
अनसूयाबाईंचा जन्म २४ ऑक्टोबर १८९८ रोजी बेळगावी झाला. सदाशिव बाळकृष्ण भाटे व गंगाबाई हे त्यांचे माता-पिता. सदाशिवराव स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या तीनही मुलींना शिकविले. अनसूयाबाई वयाच्या १६व्या वर्षी (१९१३) मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या. पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्याला फग्र्युसन कॉलेजच्या वसतिगृहात पाठविले गेले. तिथेच त्यांची पु. बा. काळे या इलेक्ट्रिकल इंजिनीयरशी ओळख होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले. काळे हे २६ वर्षांचे विधुर होते. वय, शिक्षण, जात हे कोणतेच अडथळे नसल्यामुळे १९१६ साली दोघांचा विवाह संपन्न झाला. दोघांनाही सामाजिक व राजकीय कामाला आपल्या आयुष्यात प्राधान्य द्यावयाचे होते. नागपूर शहर हे आपल्या कामासाठी व उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या उद्योगासाठी योग्य आहे, असे त्या दोघांना वाटले. ते पुण्याहून नागपूरला गेले व तिथेच स्थायिक झाले.
अनसूयाबाई व सदाशिवराव यांनी हरिजनवस्तीत जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली व आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा लिहिला. त्यांच्याबरोबर सहभोजन केल्यामुळे नागपुरातील ब्राह्मण वर्गाने काळे कुटुंबावर बहिष्कार घातला. पण डगमगल्या तर त्या अनसूयाबाई कसल्या? आदिवासी मुलांना शिकविण्याच्या व हरिजन वस्तीत कामावर जाण्याचा त्यांचा उपक्रम चालूच राहिला. १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले. संपूर्ण हिंदुस्थानच त्यामुळे अपमानित झाला. महिलांना हा व असे सारे प्रश्न समजावेत व त्यांनी सामाजिक व राजकीय कामात यथाशक्ती भाग घ्यावा असे अनसूयाबाईंना वाटले. त्यासाठी त्यांनी ‘नागपूर भगिनी मंडळा’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मोवृत्तीच्या कामाबरोबरच सामाजिक व राजकीय जागृती करणे हे ध्येय त्यांनी ठेवले होते. सामाजिक सुधारणा स्वातंत्र्याचा लढा या आघाडय़ांनंतर अनसूयाबाईंनी खूप परिश्रम केले.
१९२७ मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या त्या संस्थापक-सदस्य होत्या. त्याच ध्येयधोरणाचे वेगळे भगिनी मंडळ चालू ठेवण्यापेक्षा त्यांनी ते अ.भा.म. परिषदेमध्ये समाविष्ट केले.
१९२८ साली अनसूयाबाईंना मध्य प्रांताच्या विधिमंडळावर नामनिर्देशित केले गेले. सरकारने विधिमंडळावर नामनियुक्त केले असले तरी अनसूयाबाईनी विधिमंडळात सरकारला विरोध करणे जिथे शक्य होते तिथे तो केलाच. १९३० मध्ये गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. त्याला पाठिंबा देण्यासाठी अनसूयाबाईनी विधिमंडळातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. स्त्रियांच्या तुरुंगावरील निरीक्षक व ‘व्हीटले लेबर कमिशनने’ आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे त्यांना सदस्यत्वही दिले होते.
अनसूयाबाईंचे पती व्यवसायाने इंजिनीयर होते. त्यांची गांधींजींच्या विचारात अढळ श्रद्धा होती. ते काँग्रेसनिष्ठ होते. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घ्यायचे ठरविले. काळे जर सत्यागृह करून तुरुंगात गेले असते तर चार मुलांसह घर चालविणे अनसूयाबाईंना शक्य नव्हते. म्हणून अनसूयाबाईनी सत्याग्रहात जावे व घरची जबाबदारी श्री. काळे यांनी (अनसूयाबाई परत येईपर्यंतच) घ्यावी असे ठरले. १२ नोव्हेंबर १९३० ला अनसूयाबाईनी मुंबईत वडाळय़ाला सत्याग्रह केला. चार महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा भोगून आल्यावर विदर्भाचा झंझावाती दौरा केला. त्यांची भाषणे प्रभावी होत. विदर्भातील लोकांनी त्यांना उत्स्फूर्त किताब दिला-‘झाशीची राणी.’ अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीवर ही त्याच वर्षी त्यांची निवड झाली. १९३३मध्ये गांधीजीनी अस्पृश्यता-विरोधी प्रचार यात्रा सुरू केली. अनसूयाबाई गांधीजींबरोबर प्रचार यात्रेत राहिल्या. प्रत्येक सभेच्या पूर्वी वंदे-मातरम् म्हणण्याचे काम अनसूयाबाई करीत. १९३५ मध्ये त्यांच्या काँग्रेसमधील कामावर नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन अ.भा.काँग्रेस कमिटीने शिक्कामोर्तब केले. १९३६ मध्ये ‘मोहपा’ येथे मध्य प्रदेश काँग्रेस सभा भरली, त्यांच्या त्या अध्यक्ष होत्या.
हिंदुस्थान सरकारने १९३५ मध्ये राज्यकारभारविषयक सुधारणा कायदा केला. त्या कायद्यामध्येच १९३७ साली निवडणुका झाल्या. अनसूयाबाई मध्य प्रांत कायदेमंडळात विदर्भामधून निवडणूक लढवून निवडून आल्या. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी वंदे मातरम् गायले व त्यानंतर ते नेहमीच कायदेमंडळाच्या कामकाजाच्या सुरुवातीला गायले जाऊ लागले. या कायदेमंडळात वंदे मातरम् म्हणण्याला कोणीही विरोध केला नाही हे लक्षणीय होते. या कायदेमंडळात अनसूयाबाईंची उपाध्यक्ष (ऊीस्र्४३८ रस्र्ीं‘ी१) म्हणून निवड झाली. या पदापर्यंत पोहचलेल्या अनसूयाबाई या पहिल्याच भारतीय महिला आहेत.
अनसूयाबाईंनी नामदार म्हणून केलेली एक कामगिरी आजच्या काळातील आमदार-खासदार यांनी अनुकरण करावी अशी आहे. झाले ते असे, ‘जाफर हुसेन’ नावाच्या शिक्षक निरीक्षकाने एका लहान मुलीवर बलात्कार केला म्हणून त्याला शिक्षा झाली. त्यावेळी काँग्रेसचे मंत्रिमंडळ होते. या मंत्रिमंडळात ‘शरीफ’ नावाचे एक मंत्री होते. त्यांनी कॅबिनेटला न विचारता व काहीही न सांगता जाफर हुसेन याची सुटका आपल्या अखत्यारीत करून घेतली. अनसूयाबाईंना ‘शरीफ’नी केलेल्या शिस्तभंगाचा व गुन्हेगाराला अभय देण्याच्या काँग्रेस मंत्र्याचा खूप संताप आला. या प्रकाराची आयोग नेमून चौकशी करावी याचा त्यांनी पाठपुरावा केला. काँग्रेस सरकारला तो आयोग नेमावयास भाग पाडले. ‘शरीफ’ यांची कसून चौकशी झाली. ‘शरीफ’ दोषी ठरले व त्यांना मंत्रिपदाचा त्याग करणे भाग पडले. हे करून घेणाऱ्या अनसूयाबाईंचे पाऊल आजचे आमदार व खासदार उचलू लागतील तर तो सुदिन ठरेल! काँग्रेसची सत्ता असलेल्या प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळानी राजीनामे दिले. सिंध व पंजाब येथे मुस्लीम लीगची मंत्रिमंडळे होती. पण काँग्रेसच्या सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे तीही सरकारे बरखास्त झाली.
१९४२ साली ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर (आजचे ऑगस्ट क्रांती मैदान) गांधीजींनी, ‘ब्रिटिशांनो चालते व्हा व करेंगे या मरेंगे’ या घोषणा केल्या. काँग्रेसचे सर्वच पुढारी एकाच ठिकाणी व एकाच वेळी पकडले गेले. त्याचे पडसाद भारतभर उठले, तसेच ते नागपूरमध्येही उठले. सरकारने ‘मार्शल लॉ’ लावला. लाठीमार व गोळीबारात जखमी झालेल्यांना अनसूयाबाई स्वत: फिरून मदत करत होत्या. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत होत्या. १६ ऑगस्ट १९४६ ला चिमूर गावी जे हत्याकांड झाले, त्यातील हुतात्म्यांना व गुन्हेगार म्हणून पकडलेल्या २५ आदिवासींचा संबंध असलेल्या या घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी मान्य करून घेण्यासाठी प्रा. योगीराज भन्साळी या सेवाग्राम आश्रमातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने आमरण उपोषण सुरू केले. अनसूयाबाईनी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चिमूर-अष्टीमध्ये जाण्याची परवानगी मिळविली. तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. चिमूर-अष्टीच्या लोकांना सांगितले की ‘बलात्कारी बाई तिच्यावर झालेल्या बलात्कारामुळे भ्रष्ट होत नाही, तिच्यावर झालेला हा क्रूर हल्ला असतो. त्यामुळे तिचा तो दोष नसून ती पीडित असते. शारीरिक व मानसिकदृष्टय़ाही तिच्याशी सौजन्याने वागून तिच्या दु:खावर फुंकर घालून तिला परत उभी करणं हे समाजाचे काम आहे. बलात्कार करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. तसेच २५ आदिवासी गोंडावर जे खटले भरले आहेत, त्यांचीही सुटका झालीच पाहिजे. प्रा. भन्साळी उपोषणाला बसले आहेतच, पण आपणही स्वत: त्यांच्या सुटकेसाठी बांधील आहोत’ असे आश्वासन अनसूयाबाईनी चिमूर-अष्टीच्या लोकांना दिले व त्या दृष्टीने त्यांनी कामाला सुरुवात केली. ७ फेब्रुवारी १९४३ ला फाशी निवारक समितीच्या कार्याध्यक्षपदी अनसूयाबाईंची निवड झाली. अनसूयाबाईंचे अथक काम व प्रा. भन्साळींचे आमरण उपोषण याचा परिणाम होऊन चिमूर-अष्टी हत्याकांडाची चौकशी करण्याकरता सरकारने आयोग नेमला व प्रा. भन्साळी यांनी उपवास सोडला.
अनसूयाबाईंच्या या सत्यशोधक कामामुळे काही स्थानबद्ध सुटले. २५ जणांवर जो खटला चालला, त्यातील कायदेशीर लढय़ात अनसूयाबाईंचे कौशल्य पणाला लागले. पण २५ पैकी ७ गोंड अदिवासींना सदोष मनुष्यवधाबद्दल फाशीची शिक्षा झाली. या सात जणांचीही शिक्षा रद्द होण्याकरता अनसूयाबाईनी जिवाचे रान केले. हे त्यांचे काम हिंदुस्थानात गाजले हे साहजिकच होते, पण ते विलायतेतही गाजले. त्यांच्या धैर्याची व चिकाटीची वाहवा सर्वत्र झाली. अखेर १९४६ मध्ये या सातही गोंडांना सरकारने सोडले. कारण मात्र असे दिले की दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ ही सुटका करण्यात आली आहे. चिमूर-अष्टी प्रकरणामुळे १९४२च्या चळवळीला अनसूयाबाईंचे नाव जोडले गेले. त्यांचा हा पराक्रम म्हणजे हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ाच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर विदर्भातही दंगल पेटली. हजारो घरे जळली. अनसूयाबाईच सर्वत्र फिरून लोकांना धीर देत होत्या. त्यांचे सांत्वन करीत होत्या. गांधीजींच्या मृत्यूचे दु:ख तर होतेच; पण निरपराधी लोक जळून गेले, हजारो कुटुंबे बेघर झाली. त्यांचे दु:ख त्यांना फार झाले.
१९५२ च्या पहिल्या व १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर अनसूयाबाई लोकसभेवर निवडून गेल्या. या दोन्ही लोकसभांमध्ये त्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नांची संख्या मोठी नसली, तरी त्यांनी उपप्रश्न व पूरक प्रश्नांच्या फैरी झाडलेल्या दिसतात. लोकसभेतील सभासद संख्या व काँग्रेस पक्षाचे बळ या दोन्ही गोष्टींचा विचार करता अनसूयाबाईंना प्रत्येक संधी पकडावी लागली आहे हे स्पष्ट होते. स्वत: प्रश्न विचारण्यापेक्षा उपप्रश्न व पूरक प्रश्न विचारण्यासाठी अधिक बुद्धिमत्ता, चपळता व अभ्यास यांची जरुरी असते. विडी कामगार, कुटुंब नियोजन, खतांचे उत्पादन, इंग्लंडहून होणारी मालाची आयात, रोजगारी मंडळ, दिल्लीतील खोटय़ा शैक्षणिक संस्था, महारोगविरोधी कारवाई अशा विविध विषयांवर त्यांचे पूरक प्रश्न आहेत. देशाच्या अर्थकारणातही त्यांना मोठा रस होता. प्रत्येक वर्षांच्या मागण्या कुठे-कुठे कमी करता येतील ते त्यांनी दाखवून दिले आहे. अनाठायी खर्च शोधून काढून त्यावर बोट ठेवण्यात त्या प्रसिद्ध होत्या. श्री. दाभी यांनी मांडलेले जातीयता निर्मूलन विधेयक (१९५५) व हुंडाबंदी विधेयक यावरील चर्चेत त्यांनी संस्मणीय भाग घेतला होता. त्यांच्या भाषणावरून त्यांचे इंग्रजी व हिंदीवरील प्रभुत्व, अभ्यासू व चिकित्सक वृत्ती दिसून येते. १९५३ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेतील संततीनियमनावरील त्यांचे भाषण फारच गाजले होते.
  अनसूयाबाईंनी आपल्या सार्वजनिक कामाला भगिनी मंडळाच्या स्थापनेपासून सुरुवात केली. ठक्कर बाप्पांबरोबर त्यांचेही नाव आदिवासी कल्याण क्षेत्रांत घेतले जाते. अखिल भारतीय महिला परिषदेची अध्यक्षा, महिला अधिकार, कुटुंब कल्याण व परिवार नियोजन या सर्वच क्षेत्रात अनसूयाबाई चमकल्या. त्यांना स्त्रीजातीचा अभिमान असून काँग्रेसमध्ये आपण स्त्रियांना ओढू शकलो नाही याची खंत वाटे. त्याचप्रमाणे आपल्या मुलांकडे जरूर तेवढेही लक्ष देता आले नाही याचीही त्यांना खंत वाटत होती. हाती घेतलेल्या कामाला न्याय मिळवून देण्याची त्यांची जिद्द वाखाणण्यासारखी होती. त्यामुळेच त्यांचे घरादाराकडे गृहिणीच्या नात्याने लक्ष कमी असणे हे स्वाभाविक होते. असे असले तरी मनातून त्यांना त्यांचे वैषम्य वाटे.
अनसूयाबाई एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादाला आपल्या आचरणात संपूर्ण स्थान देणारी काँग्रेस कार्यकर्ती, देशभक्त स्त्री काही कामानिमित्त मद्रासला गेली असता वयाच्या ६०व्या वर्षी अचानक पंचत्वात विलीन झाली. जन्म कर्नाटकात, शिक्षण महाराष्ट्रात, कर्मभूमी मध्य प्रदेश व देह ठेवला तो तामिळनाडूत. अनसूयाबाईंचे शव मद्रासहून नागपूरला नेण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी खास विमानाची सोय केली होती. या एकाच गोष्टीवरून अनसूयाबाईंची महानता समजून येते. नुकतीच २४ ऑक्टोबर १९१३ ला त्यांची ११६वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन.          
gawankar.rohini@gmail.com