daanसंजय हेगडे यांची ‘सेवासहयोग’ ही संस्था, त्यांना मिळाले १२५ सेवाभावी संस्था व ५ ते ६ हजार सुशिक्षित कार्यकर्त्यांचे पाठबळ. या बळावर गेली ६-७ वर्षे कोटय़वधी रुपयांचे सत्पात्री दान देण्याबरोबर अनेकांच्या हृदयात समाजसेवेचे बी पेरण्याचे अनमोल कार्य संस्था करते आहे.
अलीकडेच विलास कऱ्हाडे यांची एक कविता वाचली, ‘त्या मुलांना’ नावाची. एका गरीब मुलाने देवापाशी घातलेले गाऱ्हाणे त्यात आहे..
त्या मुलांना शाळेत जायला
मोटार, बस नाही तर रिक्षा असते
असू दे, असू दे देवा
आम्ही चालत जाऊ देवा
पण पाय भाजू नये
काटेकुटे बोचू नये
म्हणून स्वस्तातली पायताणं
तरी मिळू दे ना देवा..
ती मुले आणि आपण यांच्यातली तफावत दाखवून देत देत शेवटी तो म्हणतो..
तुझ्यावर राग नाहीए देवा आमचा
तुझ्यावर रागवण्याइतकं बळ तरी
देवा तू कुठे दिलयंस आम्हाला?
वाचता-वाचता गलबलून आले, हताशही वाटलं, मात्र जसे प्रत्येक बोगद्यानंतर उजेड येतोच तसे काही दिवसांतच ‘सेवासहयोग’ या सेवाभावी संस्थेच्या शिवाजी पार्क येथील कार्यालयाला भेट देण्याचा योग आला. त्यांचे लोकविलक्षण काम म्हणजे समृद्ध जीवन जगणारी चकचकीत माणसे आणि याउलट संघर्ष हेच ज्यांचे जीवन आहे, अशी सर्वसामान्य माणसे ही दोन टोके मानवतेच्या पुलाने जोडणे. ‘सेवासहयोग’ला सर्वार्थाने जाणून घेतले तेव्हा जाणवले की, सगळेच काही संपलेले नाही. या पणतीच्या प्रकाशाने अनेक ज्योती पेटतील आणि पैलतीरावरचे अंधारलेले जग उजळून निघेल.
२००७ मध्ये हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलेल्या या सेवायज्ञाचा परीघ आता मुंबई, नवी मुंबई, नाशिक व कोल्हापूपर्यंत पोहोचलाय. १२५ सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) व ५ ते ६ हजार सुशिक्षित कार्यकर्ते यांचे बळ ‘सेवासहयोग’ला लाभलेय. आपआपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेले सात व्यावसायिक ‘सेवासहयोग’च्या संचालकपदी कार्यरत आहेत. या सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने बलाढय़ कंपन्या, बँका आणि दानशूर व्यक्ती यांनी सामाजिक कार्यासाठी राखून ठेवलेला निधी मिळवून त्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात तळमळीने कार्य करणाऱ्या एन.जी.ओं.चे हात बळकट करणे हे ‘सेवासहयोग’चे प्रमुख उद्दिष्ट. गेल्या ६-७ वर्षांत कोटय़वधी रुपयांचे सत्पात्री दान देण्याबरोबर अनेकांच्या हृदयात समाजसेवेचे बी पेरण्याचे अनमोल कार्य ही संस्था करत आहे.
हा अनोखा सेतू उभारावा अशी ठिणगी ज्या माणसाच्या मनात पडली त्याचे नाव संजय हेगडे. ‘प्राइस वॉटरहाऊस कुपर्स’ या नामांकित कंपनीत सी.ए. पदापासून सुरुवात करून स्वकर्तृत्वावर भागीदार होण्यापर्यंत मजल गाठलेल्या या अवलियाचा पिंडच मुळी समाजसेवेचा. जन्मभूमी गोव्यातील शांत वातावरण, एकत्र कुटुंबपद्धती व संघशिस्त या त्रयीतून त्यांची जडणघडण झाली. देशासाठी काही तरी करावे या ऊर्मीतून त्यांनी गरजू व गरीब मुलांना दफ्तरे वाटणाऱ्या पुण्याच्या एका ग्रुपबरोबर काम करायला सुरुवात केली. ‘सेवासहयोग’चा उगम इथूनच झाला. २००९ साली संस्था रजिस्टर झाली. कामाचा पसारा वाढू लागला. योग्य दिशा मिळालेल्या या जहाजाचे सारथ्य करण्यासाठी पूर्ण वेळ देणाऱ्या कुशल कप्तानाची गरज होती. पत्नी व मुलाने पाठिंबा दिला आणि त्यांनी निवृत्तीच्या पाच वर्षे आधीच स्वत:ला मुक्त करून घेतले. संस्थेला २४ तासांचा द्रष्टा सेनानी मिळाला व ‘सेवासहयोग’चा अश्वमेध सुसाट सुटला. संजय हेगडे यांच्या प्रभावशाली व्यवस्थापनाचा लाभ आज अनेक सेवाभावी संस्थांना होतोय.
‘सेवासहयोग’ने पाच वर्षांपूर्वी झोपडपट्टीत राहणाऱ्या व आदिवासी मुलांना वाटलेल्या उत्तम व परिपूर्ण (वहय़ा, ड्रॉइंगचे साहित्य, पेन, पेन्सिल, रबर, पट्टी, कंपास पेटी इ. सर्व) दप्तरांची संख्या होती पाच हजार. हा आकडा या वर्षी पन्नास हजारांवर गेलाय. सर्व वस्तू स्वतंत्रपणे घाऊक बाजारातून घेतल्या तरी प्रत्येक दप्तरामागे ३०० रुपये खर्च आला. ही एकूण दीड कोटी रुपये रक्कम संस्थेने अनेक दात्यांकडून (त्यातील पाच हजार दाते मध्यमवर्गीय) मिळवली. सव्वाशे एन.जी.ओं.मार्फत ही दप्तरे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गोवा, अरुणाचल प्रदेश, ओरिसा या राज्यांतही पोहोचली.
 या उपक्रमातील सर्वात हृद्य गोष्ट म्हणजे स्वतंत्रपणे आणलेल्या सर्व वस्तू (अंदाजे ५ लाख नग) भरून, परिपूर्ण दप्तर करण्याच्या कामात ५ ते ५० वयोगटातील सुमारे ३००० स्वयंसेवकांनी आनंदाने भाग घेतला. पुणे व मुंबई येथील दहा-बारा शाळांच्या इमारतीत मे महिन्यातले सलग ५/६ शनिवार व रविवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळात हा आनंदयोग सुरू होता. आत्तापर्यंत मी असे कधीच केले नव्हते.. मला आज खूप छान वाटतेय.. ‘सेवासहयोग’च्या वेबसाइटवर टाकलेल्या अशा प्रतिक्रियांनी स्वयंसेवकांचा ओघ वाढला. जेव्हा स्वत:चा वेळ दिला जातो तेव्हाच मने जुळतात, हा संस्थेचा विश्वास खरा ठरला.
अंध अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था किंवा अगदी लहान उद्योग यांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न म्हणजे त्यांनी स्वयंरोजगारासाठी बनवलेल्या वस्तूंचे मार्केटिंग. त्यासाठी संस्थेच्या सेवाकेअर उपक्रमाद्वारे विविध कंपन्या, बँका, व्यापारी पेठा अशा ठिकाणी स्टॉल्स उभारून स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांच्या मालाची विक्री केली जाते. ‘सेवासहयोग’चा सम्युत्कर्ष प्रकल्प म्हणजे जिथे गरज आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन काम करणे. या उपक्रमाने आता पुण्यात चांगलेच मूळ धरलेय. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शाळेतून आल्यावर शैक्षणिक मार्गदर्शन व उत्तम संस्कार देण्यासाठी त्या त्या ठिकाणी काढलेल्या अभ्यासिकांची संख्या आता तीसवर गेलीय आणि मुले १२००च्या वर. या मुलांचा रोजचा अभ्यास घेण्यासाठी त्यांच्या वस्तीतीलच जागा भाडय़ाने घेऊन तिथे तिथल्याच एखाद्या सुजाण, सुशिक्षित व्यक्तीची शिक्षण म्हणून नेमणूक करण्यात येते. असे एकूण ८० पगारी शिक्षक, शिवाय शनिवार, रविवार इंग्रजी कॉम्प्युटर शिकवणारे आसपासचे २०/२५ स्वयंसेवक. या सर्वाचा ताळमेळ बसवणारे दोन पर्यवेक्षक आणि या संपूर्ण टीमला मार्गदर्शन करणारे ५ तज्ज्ञ अशा शे-सव्वाशे कार्यकर्त्यांच्या तळमळीचे पडसाद आता दिसू लागलेत. या मुलांमधली काही आता कॉलेजात जाऊ लागलीत, तर काहींना अभ्यासिकेत शिकवायला सुरुवात केलीय. मुंबईच्या डबेवाल्यांकडेही सेवासहयोगचे लक्ष आहे. या वर्षी त्यांनाही २००० रेनकोट्सचे वाटप करण्यात आले. अर्थात हा सर्व डोलारा चालवण्यासाठी सतत प्रायोजकत्व मिळवणे आलेच.
सेवादर्शन म्हणजे स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांना एखाद्या सामाजिक संस्थेत प्रत्यक्ष नेऊन तिथले काम दाखवणे, पर्यायाने त्यांची सहसंवेदना जागृत करणे. अशाच एका ग्रुपला घेऊन संजय हेगडे नुकतेच ईशान्य भारतात जाऊन आले. त्याआधी जम्मू काश्मीर मिशन पार पडले. या चमूतील काही डॉक्टर्सनी तिकडे वैद्यकीय शिबीर घेण्याची इच्छा प्रकट केलीय. या इच्छेला मूर्तस्वरूप देण्यासाठी आता ‘सेवासहयोग’ची आखणी सुरू झालीय.
 ज्यांना व्यस्त दिनचर्येमुळे कार्यस्थळी जाऊन सेवादर्शन शक्य होत नाही त्यांच्यासाठी संस्थेचा दुसरा पर्याय तयार आहे. त्यानुसार अलीकडेच म्हणजे १४ नोव्हेंबरला सेवासहयोगने ३००/३२५ प्रथितयश सी.ए.ना एकत्र जमवून त्यांच्यासमोर आनंदवन, समतोल फाऊंडेशन, डॉ. हेगडेवार हॉस्पिटल व स्नेहालय या संस्थांचे सादरीकरण केले. अशा प्रकारे येत्या काही वर्षांत डॉक्टर्स, वकील तसेच इतर व्यावसायिकांना या उपक्रमाला जोडण्याचे संस्थेने ठरवले आहे. २ वर्षांपूर्वी पुण्यात ‘सेवासहयोग’ने ‘टेक ऑफ सेवा’ नावाने एक परिषद भरवली होती, त्यात ७५ कंपन्यांनी सहभाग घेतला. शिवाय उपस्थित १२०० स्वयंसेवकांत ७५ शास्त्रज्ञ होते.
 याशिवाय महाविद्यालयीन मुलांना सामाजिक संस्थांच्या कामात सहभागी होण्याची संधी देणारा सोशल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, घराघरांत अडगळीत पडलेल्या सायकली गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा बायसिकल डोनेशन ड्राइव्ह, हरितक्रांतीसाठी झाडे लावा, झाडे जगवा मोहीम, अशिक्षित स्त्रियांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन, गरीब कुटुंबांना धान्यवाटप.. अशा विविध माध्यमांतून सेवासहयोगाची आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि ती अशीच निरंतन चालू राहील अशी खात्री त्यांच्या सेवाकार्यातून मिळते आहे.    
संपदा वागळे

सेवासहयोग
पितृछाया, पहिला मजला,
एस. एच. वरळकर मार्ग,
शिवाजी पार्क, दादर (प.),
मुंबई-४०० ०२८.
फोन- (०२२)२४४४६०९४
mumbai@ssevasahayog.com
http://www.sevasahayog.com