नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळे ‘ऑफ बीट करिअर’ असेल तर खरोखरच लग्न जमण्यात अडचणी येतात, असा आमचा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो. जरा कुठे चौकटीबाहेरचे काम करणारा मुलगा किंवा अगदी मुलगी जरी असेल तरी त्याचे /तिचे लग्न जमणे लांबणीवर पडते. लोक कुठलाही वेगळा विचारच करत नाहीत असं लक्षात येतं. मला लग्नापासून काय हवंय हे मागे पडते आणि लोक काय म्हणतील याचंच प्रेशर यात अधिक असतं.
‘‘संकेत एमसीएम झाला आहे. दिसायलाही छान आहे. तबला विशारद आहे. त्यानं तबला हेच रोजीरोटीचं माध्यम म्हणून निवडलं आहे. दरमहिना सरासरी ५० ते ६० हजार मिळवतो. शिवाय अनेक दिग्गजांना साथ करतो तबल्याची. यासह सोलो वादनाचे कार्यक्रमसुद्धा होतात त्याचे. असा सुंदर हात आहे म्हणून सांगू त्याचा तबल्यावर! पण.. हल्ली मुलींना नोकरीवालाच पाहिजे नं. नकारच येतात त्याला. त्याच्या लग्नाची काळजी वाटते मला आणि त्याने जमवले नाही स्वत:चे म्हणजे आता आम्हालाच कंबर कसायला हवी.’’ स्मिताताई काळजीत पडल्या होत्या. ती चिंता, काळजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
त्यांना म्हटले संकेत येईल का मला भेटायला. एकदा द्या पाठवून गप्पा मारायला. त्याही उत्साहाने म्हणाल्या, ‘‘हो येईल की. मी सांगेन त्याला.’’ त्या दिवशी संकेत आला भेटायला. छान उंचपुरा संकेत गप्पिष्ट होता. त्याच्या क्षेत्रातल्या गमतीजमती सांगत होता. गेली ३-४ वर्षे भारताबाहेरच्या देशात त्याचे कार्यक्रम होत होते. मी त्याला सहज विचारलं, ‘‘अरे, परदेशातले कार्यक्रम तर वीकएंडलाच होत असतील नं? मग सोमवार ते शुक्रवार तू काय करतोस? साइटसीइंग तर यापूर्वीच झालेलं असेल, मग आता काय करतोस? कंटाळा येत असेल ना?’’
तो म्हणाला, ‘‘हो खूपच कंटाळा येतो. कारण आम्ही ज्यांच्याकडे राहतो ती माणसे कामाला जातात. आपण एकटेच असतो. पण त्यामुळे मी काय करतो, तर मी तिकडे जाण्यापूर्वी ५० तबल्यांच्या जोडय़ा पाठवतो आणि मग सोमवार ते शुक्रवार माझा तबला विकण्याचा उद्योग चालतो.’’ मला एकदम मस्त वाटलं. असं वाटलं की अरे हा मुलगा स्वस्थ बसणारा नाही. उद्योगी आहे. काही ना काहीतरी करत राहणारा आहे. शिवाय त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही.
नंतर एक दिवस अश्विनी आणि तिची आई मला भेटायला आल्या असताना मी सहज संकेतचं स्थळ सुचविलं. अपेक्षेप्रमाणे त्या दोघींनीही नाक मुरडलं. कारण विचारलं असता अश्विनीची आई म्हणाली, ‘‘लोक आम्हाला विचारतील की काय करतो तुमचा जावई? तर काय सांगू, तबला वाजवतो म्हणून? छे कसंतरीच वाटतं.’’
अश्विनीला मी म्हटलं, ‘‘अगं तुला निव्र्यसनी मुलगा हवा होता नं? संकेत या क्षेत्रात असूनही निव्र्यसनी आहे. शिवाय त्याच्या अंगात गट्स आहेत. तो स्वस्थ बसणाऱ्यातला नाही. शिवाय त्याची मिळकतही चांगली आहे. बघ विचार कर. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेमकं काय हवं आहे त्याचं विचार कर.’’
अश्विनी विचारात पडली..

आसावरी जात्याच हुशार. एम.कॉम. झाल्यानंतर कॉम्प्युटरचे विविध कोस्रेस करून एका मोठय़ा नावाजलेल्या बँकेत काम करीत होती. शिक्षण चालू असताना पुण्यातल्या एका नावाजलेल्या संस्थेतून तिने ५ वर्षांचा कीर्तनाचा कोर्स पूर्ण केला आणि नंतर तिला असं वाटू लागलं की बँकेची नोकरी सोडून कीर्तनातच करिअर करावं. त्याप्रमाणे तिनं स्वत:चा कीर्तनात चांगला जम बसवला. हार्मोनियम वाजवण्यात तिला आधीपासूनच रस होता. त्याचाही तिला उपयोग झाला. पण कीर्तन करणाऱ्या आसावरीचे लग्न मात्र ठरत नव्हते. नेहमीपेक्षा वेगळं करिअर होतं ना तिचं?
सूरज नावाचा एक मुलगा मला भेटायला आला होता. संगीताची आवड होती त्याला. त्याला मी आसावरीचे स्थळ सुचविले. तो क्षणार्धात म्हणाला, ‘‘नको नको, कीर्तन करणारी मुलगी नको.’’
म्हटलं, ‘‘अरे का पण?’’
तर म्हणाला, ‘‘नको. नेहमीसारखी नोकरी करणारी असावी.’’
मी त्याला म्हटलं, ‘‘अरे कीर्तन करणाऱ्या व्यक्तीकडे भरपूर गुण असावे लागतात. ती व्यक्ती बहुश्रुत असायला हवी. तिचं वाचन चांगलं पाहिजे. संतसाहित्याचा अभ्यास हवा  आणि त्याचबरोबर नवीन जगाचं ज्ञानही हवं. शिवाय संगीताचं ज्ञान पाहिजे. हजरजबाबीपणा पाहिजे. श्रोत्यांना बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे. अभिनयाचं अंग असायला हवं आणि ते एक सामाजिक कामही आहे. प्रबोधनाचं, जनजागृतीचं काम कीर्तनाद्वारे करता येतं. अशा व्यक्तीला तू काहीच विचार न करता नाही का म्हणतो आहेस?’’
सूरज आश्चर्यचकित झाला  होता. तो म्हणाला, ‘‘बापरे, हा एव्हढा विचार मी केलाच नव्हता. खरंच इतकं सगळं माझ्या मनात आलंच नाही. मी नक्की या स्थळाचा विचार करेन.’’

एखाद्या मुलाचे/ मुलीचे वडील शेती करणारे असतील तर त्यांच्याही मुला-मुलींची लग्ने जमण्यात अडचणी येतात. मग स्वत: मुलगा शेती करणारा असेल तर पाहायलाच नको. नीरजाचे वडील शेती करणारे. नीरजा एका मोठय़ा आयटी कंपनीमध्ये बंगळुरूला काम करते. नीरजाचे वडील पुण्याजवळच्या साधारणपणे ३५-४० किलोमीटरवर असलेल्या गावात शेती करतात. त्यांच्या शेतात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे भरघोस कांदा उत्पादन आले होते, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला होता. नीरजाचे वडील प्रयोगशील शेतकऱ्यांत मोडणारे होते.
पण मुलीचे वडील काय करतात, असा प्रश्न आल्यावर जर त्याचे उत्तर ‘शेती’ असे आले तर मुलांचे पालक फोन ठेवूनच देतात. आबा हताश झाले होते. ते म्हणाले, ‘‘इतके दिवस माझ्या कामाचा, शेतीतल्या प्रयोगांचा मला स्वत:ला अभिमान वाटत होता, पण माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या कामाचा अडथळा येईल असे मला कधीही वाटले नव्हते. वाईट इतकेच वाटते की अशा असंवेदनशील समाजात वावरावे लागते.’’
नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळे ऑफ बीट करिअर असेल तर खरोखरच लग्न जमण्यात अडचणी येत आहेत, असा आमचा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो. जरा कुठे चौकटीबाहेरचे काम करणारा मुलगा किंवा अगदी मुलगी जरी असेल तरी त्याचे/ तिचे लग्न जमणे लांबणीवर पडते. लोक कुठलाही वेगळा विचारच करीत नाहीत, असं लक्षात येतं. त्याच त्याच चौकटीतून फिरायला लोकांना आवडतं. अशा वेळी प्राधान्यक्रम विसरायला होतात. मला लग्नापासून काय हवंय हे मागे पडते आणि लोक काय म्हणतील, याचंच प्रेशर अधिक असतं.
लग्नाच्या संदर्भात कमालीची असुरक्षितता अनेकांच्या मनात लपलेली आहे. प्रतिष्ठेच्या संकल्पना बदलल्या आहेत. केटिरगचा व्यवसाय करणारी मुले/ मुली, कॉर्पोरेट क्षेत्रात छोटय़ा फिल्म्स बनवणारी मुले, इतकेच नाही देशासाठी आर्मी / नेव्हीमध्ये असणारी मुले/ मुली, एअरफोर्समध्ये असणारे, पौरोहित्य करणारे, कमíशअल आर्टिस्ट, आहारतज्ज्ञ, भूगर्भशास्त्र, संशोधन, नृत्य, संगीत तसेच दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांमध्ये काम करणारे अशा अनेक क्षेत्रांतल्या मुला-मुलींची लग्ने जमणे अवघड होत चालले आहे.
हा प्रश्न पशांच्या भोवती फिरणारा म्हणावा तर अशा क्षेत्रांतल्या अनेकांना पसा बऱ्यापकी मिळतो. एक कुटुंब चांगल्या पद्धतीने चालवता येईल इतका पसा तर नक्कीच मिळतो. पण कोणताही धोका पत्करण्याची अनेकांची मानसिक तयारी नसते. पर्यायाने या मुला-मुलींची वये वाढत जातात आणि त्यांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. एकटेपणाला सामोरे जावे लागते. स्वभावामध्ये कटुता येत जाते. मित्र-मत्रिणींपासून ते दूर जातात. घरातल्या लोकांनासुद्धा आपल्या मुलांचे लग्न झालेले नाही याचे वैषम्य वाटते.
नंदा वय ३३. तिचा स्वत:चा उकडीचे मोदक करण्याचा व्यवसाय. रोज सुमारे ८०० ते ९०० मोदक ती करत असे. तिच्या हाताखाली चार-पाच बायका होत्या. आली होती भेटायला. बोलता बोलता म्हणाली, ‘‘होईल न माझं लग्न? घरात भाऊ, वाहिनी आणि त्यांची दोन मुले आहेत. वडील लहानपणीच वारलेले आणि गेल्या वर्षी आई गेली. माझ्या व्यवसायाचा किती नाही म्हटलं तरी पसारा होतोच. घरात उपरं वाटतं. कधी एकदा या घरातून जातेय असं वाटतं..’’
असे अनेक अनुभव. ऑफ बीट करिअर असणाऱ्यांच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच मानसिकता बदलायला हवी हे सांगणारे.