मलेशियातल्या एका खेडय़ात जन्मलेली आणि जन्मल्याबरोबर लागलीच दत्तक दिली गेलेली एक सामान्य मुलगी, गरिबीत, झोपडपट्टीतच मोठी होते. पण प्रतिकूल परिस्थिती तिला स्वप्नं पाहण्यापासून, ती सत्यात उतरवण्यापासून रोखू शकत नाही. एकेकाळी शुद्ध पाणी पिणं नशिबात नसलेली ही मुलगी पुढे पाणी शुद्धीकरण करणाऱ्या कंपनीची स्थापना करते. तब्बल १६ देशांमध्ये कंपनीचा झेंडा रोवते व हजारोंना रोजीरोटी देणारी आधारस्तंभ बनते. ‘अर्नेस्ट अ‍ॅण्ड यंग वर्ल्ड आन्त्रप्रेन्युअर अवार्ड’ हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवलेल्या सिंगापूरच्या ऑलिव्हिया लम हिच्याविषयी..
एका अशिक्षित म्हातारीने कुठूनशी उचलून आणलेली एक मुलगी पाहता-पाहता एका बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना करते काय आणि जगप्रसिद्ध श्रीमंत महिलांच्या यादीत झळकते काय! सारेच अद्भुत आणि रोमांचक!  मलेशियाच्या ऑलिव्हिया लमचा जीवनप्रवास आरंभी करुण वाटला तरी नियतीचे फासे आपल्या बाजूने पलटवण्याची दुर्दम्य आकांक्षा तिला गगनभरारीचे सामथ्र्य देते.  
ऑलिव्हिया लम ही सिंगापूरस्थित ‘हाय फ्लक्स’ या जलशुद्धीकरण आणि त्यासंबंधीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीची संस्थापक आणि सीईओ आहे. ‘तुम्ही जेव्हा भूक आणि गरिबीच्या वास्तवावर मात करून पुढे आलेले असता तेव्हा जगातले कुठलेही आव्हान तुमच्यासाठी अवघड नसते.’ असे भावपूर्ण उद्गार तिने ‘अर्नेस्ट अ‍ॅण्ड यंग वर्ल्ड आन्त्रप्रेन्युअर अ‍ॅवार्ड’ हा पुरस्कार स्वीकारताना काढले आहेत. जे अज्ञात आहे त्या विषयीचे आकर्षण तिला नवीन धाडस करण्यास उद्युक्त करते असे ती म्हणते.
मलेशियात एका खेडय़ात जन्मलेली आणि जन्मल्याबरोबर लागलीच दत्तक दिल्या गेलेल्या ऑलिव्हियाचे बालपण बेकायदेशीररीत्या बांधलेल्या, अस्थायी, वीज आणि पाण्याची सोय नसलेल्या झोपडपट्टीतील घरात गेले. कम्पूर जिल्ह्य़ातील पेराक गावात एका हॉस्पिटलमध्ये या मुलीला अनाथ म्हणून सोडून दिले गेले. एका अशिक्षित म्हातारीने तिला आपल्या घरी आणले. तिला दत्तक घेतले आणि तिचा सांभाळ केला. या आजीला जुगाराचे व्यसन होते. दुर्दैवाने ती जुगारात आपले घर व इतर सर्व संपत्ती गमावून बसली आणि मग तिला आपल्या कुटुंबीयांसोबत एका निकृष्ट वसाहतीत येऊन राहावे लागले. घराचे छत गळके होते आणि त्यातून जे काही पाणी टपकत असे तेवढेच पाणी त्या घरात आपोआप येई!  
घरात अठरा विश्वे दारिद्रय़. पोटाची खळगी भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याआधीच बांबूपासून होणाऱ्या फर्निचरनिर्मिती कारखान्यात इतर मुलांप्रमाणे बालमजूर म्हणून तीही जुंपली गेली. पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत हे काम चाले. पण तिचे मन मात्र शाळेत जाऊन पुढे शिकावे या इच्छेमागे धावत असायचे. शाळेची फी भरण्याएवढे पैसे ती कमवत नव्हती, कारण बालमजुरांना अगदीच नाममात्र मोबदला दिला जाई. शाळेतील शिक्षकांना ऑलिव्हियाने विनंती केली की शाळेतल्या मुलांना पपईच्या फोडी विकेन आणि त्यातून आलेल्या पैशातून ती फी भरेन. सुदैवाने म्हणा वा तिच्या इच्छाशक्तीमुळे म्हणा-तिला ही परवानगी देण्यात आली.
 परवानगी मिळताच शाळेच्या आवारातच तिने एक टेबल टाकून आपला पहिलावहिला व्यवसाय सुरू केला. तो इतका नफ्याचा ठरला की यात तिची शाळेची फी, पुस्तकांचा खर्च आणि बसचे तिकीट असे सर्व काही भागत होते आणि वर उरलेले काही पैसे ती आपल्या कुटुंबीयांसाठी देत होती. या दरम्यान आजी खूप आजारी पडली आणि त्यातच तिचे देहावसान झाले. एकटय़ा पडलेल्या ऑलिव्हियाला मग त्या घरात राहावे ना! तिच्या आयुष्यात सर्वाधिक प्रभाव तिच्या आजीचा होता. आजीचेही तिच्यावर फार प्रेम होते. ती म्हणते, आजीनंतर माझ्या आयुष्यात शिक्षकच माझ्यासाठी जवळचे होते. मी माझ्या शिक्षकांना एकदा विचारले की काही लोक श्रीमंत तर काही लोक गरीबच का असतात?  तेव्हा ते म्हणाले, ‘‘जे शिक्षण घेतात ते पुढे जातात आणि संपन्न आयुष्य जगतात. शिक्षण हेच सर्वात महत्त्वाचे आहे.’’
शिक्षकांचे हे शब्द तिच्या मनावर कायमचे कोरले गेले. अभ्यासात अतिशय हुशार असणाऱ्या या मुलीला तिच्या शिक्षकांनी सुचवले की पुढील शिक्षणासाठी तिने सिंगापूरला जावे. ते मनावर घेऊन ऑलिव्हियाने १० डॉलर इतकी पुंजी वयाच्या पंधराव्या वर्षी जमा केली व सिंगापूरला पाऊल ठेवले. पुढील शिक्षणासाठी तिच्या शिक्षकांनीही तिला थोडीफार मदत केली आणि नंतर छोटीमोठी कामे करून १९८६ साली ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’मधून पदवीपर्यंतचे शिक्षण ऑलिव्हियाने पूर्ण केले. रसायनशास्त्रातील ऑनर्सची पदवी तिने मिळवली.
‘ग्लॅको फार्मास्युटिकल्स’ या कंपनीत तिला केमिस्टची नोकरी मिळाली. कंपनीच्या ‘वेस्ट वॉटर ट्रीटमेंट’ या विभागात तिचे काम असायचे. तीन वर्षे सलग या क्षेत्रात काम केल्याने तिला थोडा अनुभव आला होता. स्वत:च्या बालपणात साधे पिण्याचे शुद्ध पाणीही नशिबात नसणाऱ्या ऑलिव्हियाला जगाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या विचाराने पछाडले. तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि १९८९ साली ‘हायड्रोकेम’ ही स्वत:ची जलशुद्धीकरण कंपनी सुरू केली.
सुरुवातीला २०,००० डॉलर एवढे भांडवल उभे करताना आपल्याजवळची कार विकून आणि जवळ असेल नसेल तेवढी पुंजी वापरली. सुरुवातीला एक तंत्रज्ञ आणि एक कर्मचारी इतकेच मनुष्यबळ तिच्याकडे होते. आपली उत्पादने विकण्यासाठी ती मोटारसायकलवरून संपूर्ण मलेशियात फिरत असे.
२००१ साली सिंगापूरच्या शेअर बाजारात (SESDAC) हायड्रोकेम म्हणजेच आताच्या ‘हायफ्लेक्स’ ही पहिली पंजीकृत जलशुद्धीकरण कंपनी होती. २००३ पर्यंत ही कंपनी सर्वश्रेष्ठ मानांकित गणली गेली. सिंगापूरचा समुद्राचे खारे पाणी गोड करणारा डी-सलाईनेशन हा पहिला प्रकल्प या कंपनीने बनवला. त्याचप्रमाणे इतर अनेक महत्त्वाचे प्रकल्प या कंपनीने हाती घेतले.
इंटरनॅशनल मॅनेजमेंट अ‍ॅक्शन अवार्ड (२००३), ग्लोबल फीमेल इन्व्हेन्ट अ‍ॅन्ड इनोव्हेटिव्ह अ‍ॅवार्ड (२००४) सारखे असंख्य पुरस्कार तिला मिळाले आहेत. अनेक कंपन्यांच्या महामंडळांवर तसेच सल्लागार समितीवर ऑलिव्हिया काम करते. तिच्या या कार्याची दखल घेऊन तिला २००२ ते २००४ या काळात संसदेचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले. २००४ साली सिंगापूर बिझनेस अवार्डने सन्मानित करण्यात आलेली ही आतापर्यंतची पहिली स्त्री होती. २०१० साली ‘पब्लिक सव्‍‌र्हिस मेडल’नेही तिला सन्मानित करण्यात आले. २०११ सालचा ‘अर्नेस्ट अ‍ॅण्ड यंग वर्ल्ड आन्त्रप्रेन्युअर अ‍ॅवार्ड’ मिळवणारी ही आतापर्यंतची पहिली महिला पुरस्कार विजेती आहे.
२०१२ पर्यंत ‘हायफ्लक्स’चा विस्तार चीन, मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका व भारतात झाला. २०१२ पर्यंत कंपनीचा महसूल ६८० दशलक्ष सिंगापूर डॉलरइतका पोहोचला. जगभरात ४०० हून अधिक ठिकाणी आता ‘हायफ्लक्स’ची जलशुद्धीकरण उपकरणे वापरली जातात. आज या कंपनीत २३०० हून अधिक लोक काम करतात.
२००५ सालापर्यंत तिची निव्वळ संपत्ती २४० दशलक्ष सिंगापूर डॉलर एवढी होती. ‘फोब्र्ज’च्या ‘साउथ ईस्ट आशिया रिच लिस्ट’मध्ये असलेली ती एकमेव महिला आहे. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फार बोलणे तिला आवडत नाही, किंबहुना ते ती टाळते. ‘खूप मोठे यश मिळवण्याच्या उद्देशाने खूप मोठे नियोजन सुरुवातीला करू नका. हळू-हळू एक एक पाऊल सातत्याने पुढे टाकत मार्गक्रमण करत राहा आणि उत्तुंग यश मिळवा’ असे ती नवीन उद्योजकांना सांगते. महिला उद्योजकांविषयी बोलताना ती म्हणते, ‘आजही आशियामध्ये महिला उद्योजकतेचे प्रमाण कमी आहे. इथल्या महिलांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो हे आपल्याला वारंवार सिद्ध करून दाखवावे लागेल.’
स्वत: अनाथ म्हणून वाढलेली ऑलिव्हिया आज हजारो कुटुंबांना नोकऱ्या देते आहे, त्यांना भक्कम आधार देते आहे. जलशुद्धीकरणाच्या क्षेत्रात व दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या मोजक्या कंपन्यांमध्ये ‘हायफ्लक्स’ एक आहे. आजघडीला त्याच्या चीनसह १६ देशांमध्ये शाखा आहेत. ऑलिव्हियाचा जीवनपट केवळ महिलांनाच नव्हे, तर सर्वासाठीच प्रेरणादायी आहे.