माझ्या एकूण आयुष्यात अपयशापेक्षा यशाचेच पारडे जड आहे असे मी म्हणेन. पण यश म्हणजे तरी काय? केवळ पैसा आणि प्रसिद्धी? अजिबात नाही. मी ही कला किती माणसांपर्यंत पोचवली, किती जणांना आनंद दिला, किती माणसांनी माझ्या कलेला दाद दिली, यात माझे यश सामावलेले आहे. परंतु अजूनही मोठय़ा प्रमाणावर, पूर्ण व्यावसायिक पातळीवर कला सादर करणारी कलाकारांची पुढली पिढी मी घडवू शकलो नाही हे माझे अपयशच समजतो..
माणसाचं आयुष्य म्हणजे त्यात चढउतार आलेच. त्यातही कलाकाराच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असंही म्हणता येईल. आज मी यशस्वी आहे, असं लोक म्हणतात. पण मी एक खूप छोटा कलाकार आहे, माझ्या कलेवर मनापासून प्रेम करणारा! माझ्या अवतीभवती हिमालयाच्या उंचीचे खूप मोठे कलाकार आहेत, याची मला नम्र जाणीव आहे. तरीदेखील माझ्या आयुष्यातील यशापयशांचा लेखाजोखा मांडण्याचा हा एक छोटा प्रयत्न.
 आम्ही दादरला कबुतरखान्याजवळ मध्यवर्ती ठिकाणी राहायचो. मोठ्ठं एकत्र कुटुंब असल्यामुळे सख्खे-चुलत असा फरक नव्हता. आम्ही एकूण पाच भावंडं मी, दोन भाऊ व दोन बहिणी. माझे वडील   कै. प्रो. वाय.के.पाध्ये हे एक उत्तम जादूगार, पेटीवादक होते. ते नाटकातसुद्धा कामे करीत. त्या काळी त्यांनी वॉल टेरी नावाच्या शब्दभ्रमकाराचे कार्यक्रम पाहिले आणि या कलेचे वेड त्यांच्या डोक्यात शिरले. त्यांच्या भावाने त्यांना परदेशातून बाहुल्या आणून दिल्या आणि १९२०च्या आसपास ‘अर्धवटराव’ हे पात्र त्यांनी रंगमंचावर साकारले. काही वर्षांनी त्याची पत्नी ‘आवडाबाई’ व त्यांची दोन इरसाल मुलं रामू व गंपू असे चौकोनी कुटुंब त्यांनी तयार केले व अनेक सामाजिक प्रश्नावर विनोदी कार्यक्रम करायला सुरुवात केली. कार्यक्रम हळूहळू खूप लोकप्रिय व्हायला लागले. त्या काळी ते कार्यक्रमासाठी पैसे घेत नसत. आपली कला विकायची नाही हे त्यांचे तत्त्व. वडील आरशासमोर आवाजाचा रियाझ करायचे तेव्हा आम्ही सर्व भावंडं पाहत बसायचो. मला वाटायचं, ‘या बाहुल्या वडिलांशी बोलतात. मग माझ्याशी का बोलत नाहीत?’ मग वडिलांनी सांगितलं की ही शब्दभ्रमकला आहे, तू ती शिकलास तर तुझ्याशीही बाहुल्या बोलतील आणि मग मी सहा-सात वर्षांचा असताना वडिलांनी मला या कलेचा रियाझ करायला सांगितले.  नऊ वर्षे हा रियाझ चालू होता. तोपर्यंत मला कार्यक्रम करण्याची परवानगी नव्हती.
१ मे १९६७ साली मी वडिलांच्या एका कार्यक्रमात माझा ५ मिनिटांचा छोटा कार्यक्रम सादर केला. तेव्हा वडिलांना अत्यंत आनंद झाला. माझा अर्धवटराव आता कायम बोलत राहील, याची त्यांना खात्री पटली. आणि ८ मे १९६७ रोजी अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. आम्हा सर्वासाठी हा मोठा धक्का होता. आमच्या घरात त्या काळी फक्त माझी मोठी बहीण व मोठा भाऊ कमावते होते. बाकी सर्वाचं शिक्षण चालू होतं. घरातील परिस्थिती मध्यम होती. बिल्डिंगच्या जुन्या भाडय़ावर आमचं घर चालत होतं. वडिलांनी माझ्याकडून करून घेतलेला रियाझ व चार बाहुल्या या शिदोरीवर मला पुढचा प्रवास करायचा होता. वडील आम्हा सर्वाना सांगत, ‘तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण फार महत्त्वाचं आहे. त्याचं चित्र आपल्या कलेत उमटतं. आपली कला विकसित करण्यासाठी शिक्षण उपयोगी पडतं.’ मी इंजिनीअर व्हायचं लहानपणीच ठरवलं होतं. मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. मधून मी मेकॅनिकल इंजिनीअरिंग व त्याचवेळी ‘खालसा’मधून गणितात बी.एस्सी. केलं. त्यावेळचा माझा दिनक्रम अत्यंत व्यस्त होता. दिवसा कॉलेज, रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम आणि रात्री आल्यावर जर्नल्स पूर्ण करणे अशी माझी तिहेरी कसरत चालू होती. पण त्यात खूप मोठा आनंद होता. येथपर्यंत मी अर्ध-व्यावसायिक पातळीवर कार्यक्रम करणे सुरूच केले होते. मी इंजिनीअर झालो व मेटल बॉक्स कंपनीत नोकरीला लागलो, पण याच सुमारास माझ्या आयुष्यात कलाटणी देणारा एक क्षण आला.
‘सन अ‍ॅण्ड सँड’ हॉटेलमध्ये कार्यक्रम करीत असताना १९७० साली माझा कार्यक्रम पाहून एका अमेरिकन माणसाने मला त्याचे कार्ड दिले व तीन महिन्यांनी मला कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीमकडून अमेरिकन टी.व्ही.वर कार्यक्रम करण्याचे निमंत्रण मिळाले. काहीही विचार न करता, मी व माझा भाऊ राजेंद्र आम्ही येत आहोत असे त्यांना कळवून टाकले. हा माझा पहिलाच विमानप्रवास होता. अमेरिकेला जायचं म्हणजे व्हिसा लागणार व तो मला मिळणारच अशा भ्रमात मी होतो. पण आम्ही दोघेही तरुण नुकतेच पदवीधर झालेलो, त्यामुळे आम्ही अमेरिकेत स्थायिक होऊ असे समजून आम्हाला व्हिसा नाकारण्यात आला. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी शेवटी आम्हाला व्हिसा मिळाला. त्यावेळी विमानाचे तिकीट होते ४००० रुपये फक्त! म्हणजे दोघांचे मिळून ८००० रुपये लागणार होते. अर्थात कार्यक्रम झाल्यावर ते मिळाले असतेच. पण पहिले तिकीट काढण्यासाठी एवढी मोठी रक्कम (ही गोष्ट ७० सालातली आहे.) कशी करायची हा मोठ्ठा प्रश्न निर्माण झाला. शेवटी आम्ही ३० दिवसांचा कोकण दौरा आखला व कार्यक्रमांतून पैसे उभे केले. भावाने मला यावेळी मोलाचे साहाय्य केले.
‘योगा आणि ड्रग्ज’ हा विषय घेऊन सी.बी.एस.वर झालेला माझा कार्यक्रम त्याच्या सादरीकरणामुळे अमेरिकी बाहुली जगतात माझा ठसा उमटणारा ठरला. लगेच मला अमेरिकी शब्दभ्रमकार परिषदेचे निमंत्रण मिळाले. अनेक दिग्गज कलाकार मला जवळून पाहायला मिळाले. या कलेत खूप काही करण्यासारखे आहे हे मला जाणवले.  एडगर बर्जेन या सुप्रसिद्ध अमेरिकी शब्दभ्रमकाराचे कार्यक्रम पाहून मी अक्षरश: भारावून गेलो आणि मी राजेंद्रला सांगितले की, भारतात गेल्यावर मी नोकरी सोडणार आणि पूर्ण वेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारणार. त्यावेळीही अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार माझ्या मनालाही शिवला नाही. भारतातच ही कला रुजवायची, असेच मी ठरवले आणि मी भारतात आल्यावर नोकरीचा राजीनामा दिला. जवळच्या सर्व मित्रमंडळींनी, नातेवाइकांनी मला वेडय़ात काढले. चांगला व्ही.जे.टी.आय.चा इंजिनीअर आणि हे बाहुल्यांचे खेळ करून काय पोट भरणार आहे का? अशीच सगळय़ांची प्रतिक्रिया होती. पण घरच्या सर्वानी मला समजून घेतलं. माझी आई म्हणाली, ‘‘तू काय करतोस असं लोकांनी मला विचारलं, तर मी काय सांगू?’’ तेव्हा मी आईला म्हणालो की, मला फक्त दोन वर्षे दे, जर मी हा व्यवसाय नाही करू शकलो, तर मी पुन्हा इंजिनीअर म्हणून हात काळे करीन.
माणसाच्या आयुष्यात काही गोष्टी योगायोगाने येतात. २ ऑक्टोबर १९७२ साली मुंबई दूरदर्शनची स्थापना झाली आणि त्यावेळचे स्टेशन डायरेक्टर पी.व्ही. कृष्णमूर्ती यांनी मला बोलावून घेतले, ही एक सोनेरी संधी होती. आणि माझी पुढली वाटचाल सुरू झाली. पुष्कळ वेळा नवोदित कलाकाराला कार्यक्रम मिळवण्याच्या दृष्टीने संघर्ष करावा लागतो. पण मला वेगळय़ाच प्रकारचा संघर्ष करावा लागला. प्रथम लोकांना बाहुल्यांचा कार्यक्रम म्हणजे लहान मुलांचा, पोरखेळ आहे असं वाटायचं. (अजूनही काही लोकांना असंच वाटतं) परंतु ही एक वेगळी कला आहे आणि मोठय़ांनासुद्धा यात गंमत वाटेल असे अनेक घटक आहेत. मी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेत कार्यक्रम करीत असल्यामुळे अनेक मोठे फिल्मी शो, मोठमोठे इव्हेंट्स यांमध्ये माझ्या बाहुल्यांचा समावेश अनिवार्य होऊन बसला. तिथपर्यंत दूरदर्शनमुळे (आणि त्यावेळी एकच एक चॅनेल असल्यामुळे) अर्धवटराव-आवडाबाई ही पात्रं अक्षरश: घराघरात पोचली. याचा मला रंगमंचीय कार्यक्रम मिळण्यासाठी प्रचंड फायदा झाला.
कलाकार हा नेहमी अस्वस्थ आत्मा असतो. शब्दभ्रमावर आधारित पूर्ण वेळाचे नाटक करावे, असे वाटू लागले. यातूनच मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर मी पूर्ण वेळाची नाटके बाहुल्यांच्या माध्यमांतून सादर केली. सर्वात प्रथम ज्येष्ठ संगीतकार व माझे मेव्हणे पं. यशवंत देव यांनी लिहिलेले व संगीत दिलेले ‘या चिमण्यांनो या’ हे नाटक मी रंगभूमीवर आणले. त्यावेळी नाटकाचे सुगीचे दिवस होते. अनेक नवनवीन कल्पनांचे मराठी रंगभूमीवर स्वागत होत होते. याही नाटकाचे १०० प्रयोग झाले. परंतु या नाटकाच्या तालमीदरम्यान माझा आवाज खूप बसला. म्हणजे शब्दभ्रमी आवाज मला काढताच येईना. मी प्रचंड अस्वस्थ झालो. नाटक १५ दिवसांवर आले होते आणि मला बाहुलीचा आवाज काढताच येईना. काय करावं ते काहीच सुचत नव्हते. आता आपली कला आपल्यापासून दुरावतेय की काय असंही वाटायला लागले. मग मी माझे मित्र ईएनटी स्पेशालिस्ट अजय कोठारी यांच्याकडे गेलो. त्यांनी मला आठ दिवसांची पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले. अगदी मौनव्रत पाळायला सांगितले. कारण शब्दभ्रमी आवाज हा अनैसर्गिक आवाजावर आधारित असतो आणि जास्त तालमी केल्यामुळे माझ्या आवाजावर ताण पडला होता व घशाला सूज आली होती. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले व माझा आवाज (बाहुलीचा) आपोआप परत आला. या प्रसंगाने मला आवाजाला ताण न देता तालमी कशा करायच्या याची तंत्रे उमगत गेली. शिवाय आवाजाला त्रास होणार नाही यासाठी इतर पथ्ये तर मी पाळतोच. शेवटी कलाकाराला काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. यानंतर मी ‘बोल बोल म्हणता’ आणि भरत दाभोळकरांची इंग्रजी नाटके रंगभूमीवर सादर केली. या नाटकांचा फायदा म्हणजे माझ्या आवाजाची क्षमता यामुळे जास्त वाढली.
आता माझ्या मदतीला पत्नी अपर्णाही होती. अपर्णा स्वत: गायिका अभिनेत्री असल्यामुळे तिचा माझ्या कार्यक्रमात पूर्ण सहभाग असायचा. मी व अपर्णा मिळून अनेक परदेश दौरे केले व अनेक कार्यक्रमांची आखणी केली. कलाकाराचं कौटुंबिक आयुष्य हे चांगलं व मानसिक समाधान देणारं असलं तर तो आपल्या कलेवर पूर्णाशाने लक्ष केंद्रित करू शकतो. याबाबतीत अपर्णाने घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून मला खूप मदत केली. शिवाय घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होताच. जगभरात पाहिलेली विविध तंत्रे आत्मसात करून मी व अपर्णाने ‘हॅट्स ऑफ’ या नावाचा पपेट रिव्ह्य़ू सादर केला. अनेक आधुनिक तंत्रांची यात सरमिसळ होती. ‘स्वप्न पाहाणे’ या संकल्पनेभोवती हा संपूर्ण कार्यक्रम गुंफलेला होता. कार्यक्रम मोठय़ा माणसांसाठी होता. यातल्या संगीतासाठी आम्ही प्रचंड खर्च केला होता. या कार्यक्रमासाठी मी एक वर्षभर बाहुल्या बनवत होतो. खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम आम्ही सादर केला. परंतु कार्यक्रम फक्त मोठय़ांसाठी ही कल्पना लोकांना पटेना. कार्यक्रम लोकांना आवडायचा, पण ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला हवा त्या प्रमाणात तो मिळाला नाही. मला यात प्रचंड आर्थिक नुकसान झाले. पण तरीदेखील मी रंगमंचावर विविध बाहुली नाटय़ तंत्रे एकाच वेळी दाखवू शकलो हे समाधान मला मिळाले. कलाकाराच्या अपयशामध्येसुद्धा काहीतरी शिकवून जाणारी गोष्ट दडलेली असते.
रंगमंचानंतर टीव्हीचे अनेक चॅनेल्स सुरू झाले आणि अनेक कलाकारांना आपल्या कलेसाठी खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. ३१ डिसेंबर १९८३ला मी व अपर्णाने दूरदर्शनवर एक अभिनव कार्यक्रम सादर केला. यामध्ये कावळा-कावळीच्या बाहुल्या व आम्ही दोघं नवरा-बायको अशी विनोदी नोकझोंक दाखविली होती. ती पाहून मला १३ भागांची ‘नवरंग नर्मदा रंगमंच’ ही प्रायोजित मालिका मिळाली. तोपर्यंत प्रायोजित आणि मालिका हे शब्दही लोकांना ठाऊक नव्हते. ही मालिका लोकांना खूप आवडली. पण ती करताना आमची खूप धावपळ व्हायची. विशेषत: अपर्णाची. कारण तेव्हा मुलं लहान होती व मालिकेचे संहिता-लेखन, कपडेपट, अभिनय व बाहुल्यांची हाताळणी ही सर्व कामे आम्ही दोघंच करीत होतो. या मालिकेने खूप समाधान दिले. यातून पुढे  आपण स्वत: मालिका काढावी असे मला वाटले, आणि त्यातून ‘गडबड-गुड्डे’ ही मालिका जन्माला आली. तोपर्यंत दिल्लीत ‘मंडी-हाऊस’ म्हणजे काय असतं, आपली मालिका ‘पास’ करून घेण्यासाठी कुठल्या दिव्यातून जावं लागतं, काय काय करावं लागतं याची मला अजिबात कल्पना नव्हती. या सर्वात मी गुंतत गेलो. १ वर्ष मी आशा-निराशेच्या झोक्यावर झुलत होतो व दिल्लीचे अधिकारी मला झुलवत होते. काय करावं तेच कळत नव्हतं. शेवटी एक दिवस सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी ही मालिका करण्यात रस दाखवला व आम्हाला दिलासा दिला. त्यावेळी त्यांची मुलगी प्रिया तेंडुलकर मालिकांमध्ये खूप नाव कमावून होती. मी स्वत: ही मालिका करतो, तू बाहुल्यांचं सर्व सांभाळ असं ते म्हणाले. तेंडुलकरांच्या सहवासात मी अनेक दिवस घालवले. त्यांच्याबरोबर काम करणे, बोलणे, त्यांचे विचार एकणे ही एक मेजवानी होती. त्यांनाही माझ्या बाहुल्यांबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. त्यांच्यासारख्या बुद्धिजीवी विचारवंतासोबत करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. परंतु या मालिकेचा शेवट खूप क्लेशदायक झाला. सात एपिसोडनंतर ही मालिका बंद पडली. अनेक गैरसमज झाले आणि निर्माता प्रिया तेंडुलकरांशी माझे संबंध खूप ताणले गेले. याचे खूप वाईट वाटले. अर्थात तरीही तेंडुलकरांसारख्या द्रष्टय़ा नाटककाराबद्दल माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे. या मालिकेच्या अपयशाने मला एक शिकविले की आपण आयुष्यात रिस्क घ्यायला पाहिजे, परंतु थोडासा सेफ गेम खेळला तर नुकसान पदरात पडत नाही. दुसरा मोठ्ठा फायदा हा झाला की, या मालिकेमुळे माझ्यात एक नवा विश्वास निर्माण झाला की मी दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे बाहुल्यांचे कुठलेही पात्र निर्माण करू शकतो. आतील हालचालींची यंत्रणा स्वत: बनवू शकतो. यातून मला एक नवं दालन उपलब्ध झालं ते म्हणजे बाहुल्या बनविण्याचं!
मी व अर्पणाने अनेक परदेश दौरे केले ते यशस्वीही झाले. पण सगळय़ात मनस्ताप देणारा दौरा १९९० सालचा, ऑस्ट्रेलिया दौरा ठरला. दौरा नक्की झाल्यावर दौऱ्याची तयारी सुरू झाली, पण आयत्यावेळी तिघांऐवजी दोघांचाच व्हिसा मिळाला. जो कार्यक्रम तिघांच्यात बसवला होता, तो दोघांच्यातच करण्याची वेळ आली. आयत्यावेळी अनेक बदल करावे लागले. सिडनीच्या आर्टिस्ट असोसिएशनने माझ्या दौऱ्याची परवानगी नाकारली. पण दौरा करायचाच या जिद्दीने मी कामाला लागलो. माझ्याबरोबर घरातील सर्व कुटुंबही ताणतणावातून जात होतं. मला मनातून खूप अपराधी वाटत होतं. माझ्यासाठी हा दौरा एवढा महत्त्वाचा आहे का असंही एका बाजूला वाटत होतं. या सवार्ंत दौऱ्याचा पूर्ण विचका झाला व केवळ १-२ कार्यक्रमांसाठी मी ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. दौरा संपवून आल्यावर आईने विचारले, ‘कसा झाला दौरा?’ मी तोंडाने जरी ‘चांगला झाला’ असं म्हटलं तरी ते खरं नाही हे माझ्या नजरेनं तिला कळलं. आम्ही दोघेही अस्वस्थ मनाने झोपायला गेलो आणि त्याच पहाटे आई ब्रेन हॅमरेजने आजारी पडली ती पुन्हा उठलीच नाही. केवळ माझ्या दौऱ्यामुळे, ताणतणावांमुळे आई आजारी झाली का? एवढी प्रचंड किंमत देऊन हा दौरा करणे आवश्यक होते का असे अनेक प्रश्न मला पडले; ज्यांची उत्तरे आजतागायत मिळालेली नाहीत. आई जवळजवळ दोन वर्षे बिछान्याला खिळून होती. खूप प्रयत्न केले, पण ती बरी झाली नाही. वडिलांनी तर माझी या क्षेत्रातली वाटचाल पाहिलीच नाही. आईच माझ्या कलेच्या प्रवासातील साक्षीदार होती. तिने माझे यश डोळा भरून पाहिले. आई आजारी असताना बाहेर कार्यक्रमासाठी जाऊन लोकांना हसवणे खूप कठीण होते. पण कलाकाराला आपल्या वेदना उरात लपवून बाहेर हास्याचा मुखवटा धारण करावाच लागतो. शेवटी या बाहुल्यांच्या छंदानेच मला आईच्या निधनाचे दु:ख विसरायला लावले. मी माझे‘बोलविता धनी’ हे पुस्तक आई-वडिलांना अर्पण केले आहे.
माझ्या एकूण आयुष्यात अपयशापेक्षा यशाचेच पारडे जड आहे असे म्हणेन. पण यश म्हणजे तरी काय? केवळ पैसा आणि प्रसिद्धी? अजिबात नाही. मी ही कला किती माणसांपर्यंत पोचवली, किती जणांना आनंद दिला, किती माणसांनी माझ्या कलेला दाद दिली, यात माझे यश सामावलेले आहे. परंतु अजूनही मोठय़ा प्रमाणावर, पूर्ण व्यावसायिक पातळीवर कला सादर करणारी कलाकारांची पुढली पिढी मी घडवू शकलो नाही हे माझे अपयशच समजतो. याचे एक कारण ही कला सादर करण्यासाठी शब्दभ्रमी बाहुल्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. सर्वसामान्यांना परवडतील अशा स्वरूपाच्या बाहुल्या कशा बनवता येतील याचा मी ध्यास घेतलेला आहे. पण अजून मला त्यात यश आलेले नाही. बाहुल्या बनवणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि तो गुंता अजून तरी सुटलेला नाही. हे माझे काम चालूच आहे. पण कधीतरी मनाला निराशा जाणवते. पण दुसऱ्याच क्षणाला वयाच्या ९३व्या वर्षी रंगमंचावर कार्यक्रम करणारा रशियन बाहुलीकार सर्गेई ऑबरोझॉव्ह आठवतो. ८० वर्षांचा अमेरिकन शब्दभ्रमकार एडगर बर्जन आठवतो, ७०व्या वर्षी त्याच तडफेने रंगमंचावर लीलया वावरणारा मार्सेल मासरे आठवतो आणि मनाची उभारी पुन्हा परत येते व मी नवीन कामात गढून जातो.
माझ्या या यशात माझी सर्व भावंडे, माझे कुटुंबीय अपर्णा, माझे मुलगे सत्यजित, परीक्षित, सून ऋतुजा या सर्वाचा खूप मोठा वाटा आहे. याबरोबरच मला पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रौढ माणसांसमोर कार्यक्रमाची संधी देणारा मॅनेजर, जाहिरातीत ससोबा वापरण्याची संधी देणारा अप्पी उमराणी, चित्रपटातून वेगळय़ा प्रकारचा वापर करून घेणारा अमिताभ बच्चन, बाहुल्यांचा पूर्णाशाने वापर करून घेणारा महेश कोठारे, इंग्रजी रंगभूमीवर बाहुल्यांचे अनोखे जग दाखवणारा भरत दाभोळकर आणि अनेक  चांगले निर्माते व दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर मी काम केलं, त्या सर्वानी माझ्या कलेचा उत्तम उपयोग करून या कलेला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. त्या सर्वाचा माझ्या यशात मोठा वाटा आहे.
 आज मला जे थोडेफार यश-अपयश मिळालं, त्याचं कारण मी एवढंच सांगेन की, मी बाहुल्यांच्या विश्वात रमून जातो, मनापासून ते एन्जॉय करतो. आणि म्हणूनच सतत नवनवीन प्रयोग करीत राहतो..