भावा-बहिणीतले ‘सवाल-जवाब’ असणारं गाणं, ‘आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला’ हा गमतीशीर प्रश्न कालौघात एवढं भीषण रूप धारण करेल असं वाटलं नव्हतं! त्यातले संदर्भ काळानुरूप बदललेत हे सत्य स्वीकारणं भाग आहे, हे अगदी खरंय! परंतु त्या प्रश्नांना असं विदारक वळण मिळेल याची मला कल्पना नव्हती.
‘आज्जी, काय म्हणतेयस? मोठय़ांदा
म्हण नं!’
‘सांग मला रे सांग मला..’
‘मी काय सांगू? तू काय म्हणतेयस् ‘ते’ सांग’
‘अरे तेच ते ‘सांग मला रे’ हे गाणं म्हणतेय मी.’
लगेच रोहिनचा, माझ्या नातवाचा पुढचा प्रश्न हजर होता. गाणी भारी प्रिय त्याला!
‘मूव्हीमधलं आहे का हे गाणं? कोणत्या?

‘बोलकी बाहुली.’
‘तिचं नाव ‘बोलकी’ होतं? ‘बार्बी’ डॉलसारखं?’
‘नाही रे. बोलकी म्हणजे बोलणारी!’
त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव टिपत मी ते गाणं म्हणायला लागले, ‘आई दिसते गोजिरवाणी. आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायला सहज तिला
आई आवडे अधिक मला!’
‘कोणाला आई अधिक आवडते? कोण म्हणतंय असं?’
‘त्या मुव्हीमधला भाऊ सांगतोय त्याच्या बहिणीला असं!’
‘म्हणजे कझिन्समधल्या कॉन्हवर्सेशनचं गाणं आहे?’
‘अं हं! ते सख्खे भाऊ-बहीण आहेत. भावा-बहिणीतले हे ‘सवाल-जवाब’ आहेत बरं. कोणाला जास्त कोण आवडतं आणि का ते सांगताहेत बरं का दोघं. आमच्यावेळचं खूप पॉप्युलर होतं बरं का हे.’
‘सख्खे म्हणजे ते एकाच घरात राहायचे? आई-बाबा सेम होते?’
‘हुं.’ रोहिनच्या प्रश्नांची आता मला गंमत वाटायला लागली.
‘आज्जी, त्याची आईपण गाणी म्हणायची तुझ्यासारखी? वेगवेगळे स्नॅक्स रोज घरी बनवायची?’ रोहिनच्या चेहऱ्यावर खूप सारे आश्चर्याचे भाव उमटले.
‘होऽऽ! पण तू असं का विचारतोयस?’ मी मुद्दाम म्हटलं, ‘ग्रेट! मी तर ‘यु-टय़ूब’वरची गाणी ऐकतो. कधी कधी ‘नेट-सर्च’ करतो आणि ऐकतो. माझी ममा खूपच बिझी असते.’
कुठे तरी ‘दुखलं’ माझ्या मनात रोहिनच्या या प्रतिक्रियेनं, पण त्याचा समजूतदारपणा मात्र जाणवला. ‘पुढे म्हण नं आजी. इंटरेस्टिंग आहे.’
‘गोजीरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला
आवडती रे वडील मला!’
‘त्यांची आई ‘टिमिड’ होती? माझी ममा एकदम फिअरलेस आहे. बाबा खूप वेळा कामासाठी आऊट ऑफ स्टेशन जातो, पण ममा घाबरत नाही. आम्ही दोघं कम्फर्टेबली राहतो.’
माझ्या मुलीबद्दलचा अभिमान माझ्या नातवाच्या डोळय़ात स्पष्ट दिसत होता. मीसुद्धा आत कुठे तरी सुखावले अन् पुढे म्हणायला लागले,
‘कुशीत घेता रात्री आई, थंडी- वारा लागत नाही,
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला
आई आवडे अधिक मला!’
‘ते दोघं आई-बाबांजवळ झोपायचे रात्री? त्यांना सेपरेट बेडरूम नव्हती?’
‘नाही, तेव्हा सगळे एकत्रच असायचे, तशीच ‘अरेंजमेट असायची’ मी कसंबसं उत्तरले.
‘वॉव! किती मज्जा नं!’ रोहिनच्या चेहऱ्यावरचा हा भाव ‘पचनी’ पडणं मला जरा जडच गेलं.
‘‘आई सुंदर कपडे शिवते,
पावडर-तिटी तीच लावते,
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधून वेणीला
आई आवडे अधिक मला!’’
रोहिनच्या छोटय़ाशा चेहऱ्यावरचे संभ्रम निरखत असतानाच प्रश्न आले, ‘तीट म्हणजे? वेणी म्हणजे काय आज्जी? गिफ्टसारखी असते का? म्हणून रिबीन बांधायची तिची आई.’
माझ्या लहानपणीचं हे गाणं, आमच्या खूप जवळचं आणि आवडीचंसुद्धा! माझ्या मुलीलापण ऐकवत असे मी अन् आता रोहिनला! खरं तर रोहिनचे प्रश्न ऐकून ‘गाणं जास्त इंटरेस्टिंग आहे की याचे प्रश्न’, असा मला प्रश्न पडला. मी पुढे म्हटलं,
‘त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवूनी आणती,
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला!
आवडती रे वडील मला!
हे कडवं त्याला पचनी पडणं कठीणच आहे, असा माझ्या मनात विचार येत असतानाच प्रश्न आला. ‘त्यांची आई घरीच बसायची? ऑलवेज् वर्क फ्रॉम होम करायची? मग तिला पे का नाही मिळायचा?’
‘नाही रे राजा, त्यावेळच्या आया ‘वर्क फॉर होम’ करायच्या तेही अहोरात्र! आणि बव्हंशी तो ‘पे लेस’ आणि ‘थँकलेस’ जॉब असायचा.’ ही वस्तुस्थिती या निरागस मुलाला कशी सांगायची हा मोठ्ठा पेच उभा राहिला माझ्यासमोर. त्याच्या प्रश्नांची उत्तरं टाळून मी म्हटलं, ‘शेवटची दोन कडवी अशी..’
‘‘बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला
आवडती रे वडील मला!’’
‘‘धडा शीक रे तू बैलोबा, आईहूनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला
आवडती रे वडील मला!’’
‘काऽऽय? डोण्ट टेल मी! त्यांची आई नमस्कार करायची बाबांना? बाबा आईपेक्षा अगदी नेहमी ओल्डर असायचे? असं ऑलवेज नसतं नं आज्जी?’ ईशानची तर आई मोठ्ठी आहे त्याच्या बाबांपेक्षा ‘कोण ईशान? तुझा शाळेतला मित्र आहे?’
‘माझा बेस्ट फ्रेंड आहे आज्जी! स्कूलमधला आणि ‘डे केअर’ मधलासुद्धा! खूप मस्त आहे तो. आम्ही दोघं खूप धमाल करतो. पण कधी कधी खूप सॅड असतो दीज डेज्!’
‘का रे? बरं वाटत नाही का त्याला?’ मी जरा घाबरूनच विचारलं.
‘तो एकदम फिट आहे गं! पण त्याचे आई-बाबा सेपरेट होणारेत नं आता म्हणून!’
मी चरकलेच, काय बोलावं कळेना क्षणभर! ‘ज्या दिवशी वकील काका यायचे असतात घरी, तेव्हा तो जास्तच सॅड असतो.’
हे एवढंसं पिलू आता काय बोलणारे पुढे, या कल्पनेनं मी धास्तावले.
‘‘तुला आई आवडते की बाबा? कोणाबरोबर राहायला आवडेल तुला?’ असं विचारतात ते काका. हे प्रश्न अजिबात आवडत नाहीत त्याला. त्याला आई-बाबा दोघं आवडतात आणि हवेयत. त्याला फक्त एकाबरोबर नाही राहायचंय! बरोबर आहे नं त्याचं आज्जी? आज्जी सांग नं, तो राँग आहे का?’’
रोहिन माझा हात हलवत विचारू लागला. मी सुन्न झाले! एकेकाळी लोकप्रिय असलेल्या या गाण्यातले संदर्भ काळानुरूप बदललेत हे ‘सत्य’ स्वीकारणं भाग आहे हे अगदी खरंय! परंतु गेली अनेक र्वष लहान-थोर सगळय़ांना ‘जराशी गंमत’ म्हणून रिझवणारं असं हे गाणं आहे. भावा-बहिणीतले हे ‘सवाल-जवाब’ असं हे गाणं आहे. भावा-बहिणीतले हे ‘सवाल-जवाब’ आजच्या पिढीपर्यंत पोचावेत या माझ्या प्रयत्नांना असं विदारक वळण मिळेल याची मला कल्पना नव्हती.
‘आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला’ हा गमतीशीर प्रश्न कालौघात एवढं भीषण रूप धारण करेल असं वाटलं नव्हतं!

Taiwanese nurses protecting babies during earthquake video
Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
idli or dosa batter is never over-fermented
World Idli Day : इडली स्वादिष्ट व्हावी म्हणून पीठ जास्त दिवस आंबवता का? ही सवय आताच थांबवा….
Personality Traits
Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?