गुवाहाटीत परिषदेसाठी गेलो होतो. दहशतवादी वातावरण, मधून मधून होणारे स्फोट अशाही अवस्थेत बाजारात जाऊन साडी घ्यायला माझाच स्त्रीहट्ट मला सोडवेना. खरेदी झाली, पण आणखी एक साडी मनात भरलीच..
शिलाँगला कमाण्डर कॉन्फरन्ससाठी मलाही जावं लागणार होतं. ‘एअरफोर्स सिंघारसी’वर भाषण होतं माझं तीन मिनिटांचं! आफवा (आहहअ) संस्थेनं तसं फोन करून नक्की केलं होतं. बदलीच्या निमित्तानं भारतभर प्रवास केलेला होता. आता  अतिपूर्वेकडच्या भागात जायची संधी, माझ्या दृष्टीने लाख मोलाची होती.
गुवाहाटीच्या हवाई दलाच्या स्थानकावर दोन्ही वेळेस मुक्काम करायचा होता. शिलाँगला कितीतरी ओळखीचे जुने अधिकारी भेटले, आम्ही सगळा स्त्रीवर्ग जेव्हा भेटलो तेव्हा साहजिकच शॉपिंगची योजना आखली गेलीच. माझ्या ज्ञानात मोलाची भर पडली, सौंदर्यस्थळं व बांबूच्या वस्तूंकरिता शिलाँग प्रसिद्ध आहे, तर साडय़ांसाठी गुवाहाटी! कित्येक वर्षांपासून आसाम सिल्क व मेखला चादर (हाही साडीचाच प्रकार) घ्यायचं माझ्या मनात होतं, निश्चय केला, आसाम सिल्क साडीशिवाय परतायचं नाहीच. शिलाँगहून कोचनं गुवाहाटीपर्यंत आलो. हवाई स्थानक शहरापासून बरंच लांब. तिथले कमांडर सचदेव यांना माझा खरेदीचा मनोदय सांगितला. खरंतर अतिरेकी कारवायांमुळे तिथे शांतता अशी नव्हतीच. आमचे ‘हे’ तर आधीपासूनच साडी खरेदी मोहिमेविरुद्ध होते. ‘लुक मॅडम, इट इज नॉट सेफ अ‍ॅट ऑल’ सचदेवांनीही खतऱ्याचं निशाण दाखवलं.  तरी इथपर्यंत येऊन ‘आसाम सिल्क’ घ्यायची नाही हे माझ्या मनाला पटेना. हे म्हणजे काश्मीरमध्ये जाऊन सफरचंद न खाण्यासारखं आणि चेन्नईला जाऊन इडली-डोसा न खाण्यासारखं! साडीच्या मोहाने माझ्या भीतीवर मात केली.
साडी घ्यायचा माझा हट्ट, ध्यास, तळमळ,अट्टहास जे काही असेल ते असो, अखेरीस ‘हे’ही तयार झाले. स्पेशल जीपमध्ये आम्हाला लिफ्ट मिळाली, कारण ती जीप काही कामाकरता बाजारपेठेतूनच जाणार होती. बरोबर शस्त्रधारी चार कमांडो. दोन अधिकारी आम्ही व चालक! रस्ता वळणांचा, कधी बोगद्यातून कधी जंगलातून, कधी कडेकपारीला लागून, खडकाळ, धुळीने भरलेला! बाकी सगळय़ांचं लक्ष समोर! आजूबाजूची चाहूल घेत टवकारलेले कान, शस्त्राच्या चापावर हात. माझ्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त सिल्कचे वेगवेगळे नमुने येत होते. पण थोडं वाईटही वाटत होतं. उगीच सगळय़ांना आपल्यामुळे त्रास, जीव धोक्यात! पण त्याचबरोबर हेही आठवलं की भटिंडय़ात असताना (भिंद्रनवालेच्या) दहशतीच्या काळात धान्य, भाजी, कपडा घ्यायला आम्ही लहान मुलांना घेऊन जीव मुठीत धरून शहरात  जायचोच ना? तसंच इथंही! मी माझ्या वागण्याचं समर्थन करत राहिले आणि स्वस्थ बसले.
सुमारे पाऊण तासानंतर त्या बाजारपेठेत पोहोचलो. दुकाने पूर्णपणे उघडी नव्हती. मी आत शिरले व माझे डोळे चकाकले. किती किती प्रकारच्या साडय़ा! बारीक डोळय़ांच्या त्या मुली मंद  स्मित करीत साडय़ा दाखवू लागल्या. आठ-दहा साडय़ा बघितल्यावर मी मान वर केली तर काय बघते. आमचे एस्कोर्ट शस्त्रधारी आम्हाला घेरून उभे होते. मी भुवई उंचावून विचारण्याचा प्रयत्न केला, तर ‘ते त्यांची डय़ुटी करताहेत आणि तू लवकर निवड काय ते.’ यांनी दबक्या स्वरात खुसफुस केली. मी पुन्हा साडय़ांकडे वळले. पण मनात अस्वस्थता निर्माण झाली होती इतक्या नजरा माझ्यावर रोखलेल्या! तेवढय़ात ‘हे’ दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. तेथूनच मला हाक मारली.  ‘इथून लवकर बाहेर पडू या’ म्हणत माझा हात धरत त्यांनी मला बाहेर खेचलं. लगबगीने गाडीत बसलो, बघता बघता वेगाने निघालो. काही अंतर पुढे गेल्यावर थांबावं लागलं. पुढे जायचा मार्ग रोखला गेला होता. रस्त्याच्या अगदी कडेजवळ जीप पार्क केली. जवळच्या दुकानाची एक फट उघडी दिसली, तिथे शिरलो आणि दोनच क्षणांनी जोरदार स्फोटाचा आवाज झाला. बंदुकीच्या गोळय़ा फायर केल्या गेल्या. धावपळ.. आरडाओरड.. तो अर्धा तास आम्ही सगळे त्या इवलाशा दुकानात श्वास रोखून उभे होतो.  काही वेळाने शांतता झाली. आम्ही बाहेर पडलो. चौकशी केल्यानंतर कळलं की अधून मधून होणारे हे स्फोट, धावपळ, मारामारी सगळय़ा दहशतवाद्यांच्या कारवाया यात सरकारी, लष्करी गाडय़ांना विशेष काळजी घ्यावी लागत होती. यांनी घडय़ाळय़ात बघितलं. पाऊण तास होता. आता साडी घेणं शक्य नव्हतं.. मी साडी घ्यायचा बेत रद्द केला. जीपमध्ये बसलो. दुकानं मागे पडू लागली आणि मी अस्वस्थ होऊ लागले. मन साडय़ांत गुंतलेलं होतं..  रिकाम्या हाताने जायचं? नाही!..
प्लीज थांबा! मी जवळजवळ ओरडलेच. समोर ‘आसाम एम्पोरियम’ नावाचं शेवटचं दुकान होतं. मी दुकानात शिरले व बरोबर लवाजमाही!’ ‘ये नहीं वो’ करीत पुन्हा साडय़ांचा ढीग! आतले लोक विचित्र नजरेने आमच्याकडे बघत होते. ‘यांच्या’ नजरेतला अंगार मला जाणवत होता..! मी पुन्हा त्या साडय़ांमध्ये गुरफटले. ‘‘अगं लवकर कर, विमान गाठायचंय. यांची प्रचंड घाई. मी मेखला चादर व एक आसाम सिल्क निवडली. बिल फाडत असताना माझी नजर आणखी एका साडीवर खिळली. इतकी अप्रतिम! सुंदर साडी! ही व्हरायटी पुन्हा कुठे, कधी मिळेल? मी पुन्हा ती साडी घेण्याकरिता थांबले, पण यांनी मला ओढतच दाराजवळ नेलं. त्या साडीवर माझा हात. डोळय़ांतली चमक. त्या दुकानदाराने माझी नजर बरोबर ओळखली. त्याने ओळखलं मला ती साडी ‘हवीच’ आहे. मी निघताना फक्त ‘आफवा गुवाहाटी’ म्हटलं.
जीप भरधाव निघाली. रस्त्यात काहीही घडण्याची भीती होती. घडय़ाळय़ाचा काटा भराभर पुढे सरकत होता. आम्ही मनात प्रार्थना करीत होतो.. शेवटी कसेबसे आम्ही विमानतळ गाठलं. सिंघारसीला परत आलो. दोनच दिवसांनी गुवाहाटी एअरफोर्स स्टेशनवरून सचदेवांचा फोन आला. त्या एम्पोरियमच्या दुकानदाराने ‘आफवा’मध्ये ती साडी बिलासोबत पाठवली होती.
मी आज अतिशय आनंदाने, उत्सुकतेने हेलिकॉप्टरची वाट बघते आहे. सिंघारसीला येणाऱ्या वैद्यकीय टीमबरोबर सचदेवांनी ती तिसरी सिल्कची साडी पाठवून दिलेली आहे!..