जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही गरजेचं आहे. यासाठी माणसालाही संघर्ष करावाला लागतो स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..
सुरवंटाचं फुलपाखरू होण्यापर्यंतची प्रक्रिया फारच जीवघेणी असते. एका अत्यंत कुरूप किडय़ाचं देखण्या फुलपाखरात रूपांतर होणार असतं, त्यासाठी त्याला करावा लागतो जीवघेणा संघर्ष, स्वत:च स्वत:शी केलेला. एकटय़ाने..
असाच एक फुलपाखरू, धडपडत होता कोषातून बाहेर यायला. त्यापूर्वीचा  सुरवंटाचा संघर्ष आता संपला होता. प्रचंड कष्टाने त्याने स्वत:भोवती कोष विणून स्वत:लाच घडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. आता प्रतीक्षा होती कोषातून बाहेर यायची. फुलपाखरू बनण्याचा क्षण आता काही मिनिटांच्या अंतरावर वाट पाहत अधीर झालेला. त्याचं कोषातून बाहेर पडणं निश्चित होतं. कोष फाडून तो किंचित बाहेरही आला. तारेसारख्या पायाचं स्वत:ला उभं करण्यासाठी धडपडणं सुरू होतं..
हे सगळं एक माणूस बघत होता. थोडा जरा जास्तच संवेदनशील होता तो. बुद्धीपेक्षा मनाने विचार करणारा. फुलपाखराची ती धडपड त्याला अस्वस्थ करू लागली. मी याला मदत करू शकतो का? त्याने स्वत:लाच प्रश्न केला. तेवढय़ात बराच वेळ धडपडणारा तो कोष अचानक स्तब्ध झाला.. काही काळ. आता मात्र काहीतरी करायला हवं, त्याच्या हळव्या मनानं सांगितलं. तो कात्री घेऊन आला. आणि त्याने हलक्या हाताने कोषाचा तो पातळ पापुद्रा कापून विभक्त केला. तो वाट पाहत राहिला.. आता फुलपाखराला सहज बाहेर पडता येईल.. आपले रंगीबेरंगी पंख पसरून तो हवेत मस्त विहरेल.. पण तसं काहीच घडलं नाही. त्याचं अंग सुजू लागलं आणि पंख कोरडे पडू लागले. पंख मोकळे होण्याएवजी अर्धवट मिटलेलेच राहिले.. आता ते कधीच फुलू शकणार नव्हतं. फुलपाखरू कायमचं अपंग झालं होतं.. त्या माणसाला हे कळलं की आपण दाखवत असलेली दया त्या फुलपाखराला कायमची अपंग बनवून टाकणारी ठरलीय, पण खूप उशीर झाला होता. कोषातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी संघर्ष करणं ही फुलपाखरावर निसर्गाने सोपवलेली जबाबदारी होती. त्यासाठी होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारं द्रव्यच त्याला कोषापासून विलग करण्यास मदत करणारं होतं, परंतु त्या माणसाच्या दयेमुळे ना संघर्ष उरला होता, ना त्यातून मिळणारा स्वत:ला सिद्ध करण्याचा आनंद. आता उरलं ते फक्त केविलवाणं जगणं. फुलण्याशिवायचं, विहरण्याशिवायचं!
आपलंही आयुष्य असंच असतं. पुढे जाण्यासाठी, स्वप्नांमागे धावण्यासाठी संघर्ष गरजेचाच असतो. आणि तो आपला आपणच करायचा असतो. तरच सोन्यासारखं तावूनसलाखून लखलखीतपणे बाहेर पडता येतं. आपल्याला कुणीतरी फक्त घास भरवू शकतो. पण तो घास चावायचा मात्र आपल्यालाच असतो. दुसऱ्याच्या कुबडय़ा आपल्याला फक्त अपंगत्वच देतात. उठून उभं राहायची ताकद आपली आपणच मिळवायची असते. त्यासाठी संघर्ष महत्त्वाचा.. तो आपल्याला घडवत असतो. आपल्यातल्या सुरवंटाचं फुलपाखरू घडवत असतो..
  खूप काही घडवण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा, तसं खूप काही टाकून देणंही. ते सोपं नसतंही अनेकदा, पण आयुष्य पुढे न्यायचं असेल तर प्रयत्न करणं अपरिहार्य असतं. इथे गोष्ट आठवते ती गरुडाची. असं म्हणतात की गरुडाचं आयुष्य असतं ७० वर्षांचं, पण ही सत्तरी गाठण्यासाठी त्याला काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. त्यासाठी गरुडाने चाळिशी गाठली की त्याला आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घ्यावा लागतो. एक तर मरण पत्करायचं किंवा काही गोष्टींचा त्याग करायचा. चाळीस वर्षांत त्याची भक्ष्य पकडण्याची ताकद कमी झालेली असते, कारण आता त्याच्या नख्या बोथट झालेल्या असतात. सावजाला भक्ष्य करणारी त्याची चोच वाकडी झालेली असते आणि शिकारीचा शोध घेणारे, गगनात यथेच्छ विहार करणारे पंख जड झालेले असल्याने त्यांची उडण्याची ताकद संपलेली असते. पण मरण कुणाला हवं असतं? जातिवंत गरुडाला हवं असतं नवं जीवन, आणि नव्याने भरारी घेणारे विशाल पंख. सावजाला पकडणाऱ्या धारदार नख्या आणि ते खाणारी अणुकुचीदार चोच. ती नव्याने मिळवायची असेल तर त्याला करावा लागतो संघर्ष.. १५० दिवसांचा अविरत चालणारा, पुन्हा एकदा स्वत:चा स्वत:शीच. तो पर्वतराजींमधल्या एका उंच जागी असलेल्या आपल्या घरटय़ात जाऊन बसतो. एकांतात.. पहिल्यांदा त्याला वाकलेल्या चोचीचा त्याग करायचा असतो. जुनी चोच जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत नवी चोच कशी येणार? कठीण कातळावर तो चोच आपटायला सुरुवात करतो. एक-दोन-तीन.. घावावर घाव पडत जातात. अखेर जुनी चोच तुटून जाते. आता प्रतीक्षा नव्या चोचीची.. हळूहळू नवी, भक्ष्याला सहजगत्या पकडणारी चोच उगवू लागते. त्यानंतर त्याला त्याग करायचा असतो तो बोथट झालेल्या नख्यांचा. नुकत्याच आलेल्या त्या अणुकुचीदार चोचीचा उपयोग आता नखं उपटून काढण्यासाठी सुरू होतो.. पुन्हा एकदा जीवघेणी लढाई.. आणि मग पुन्हा एकदा प्रतीक्षा नव्या नख्यांची.. चोच आणि नख्या नव्या आल्या. आता घ्यायला हवी भरारी. ती भरारी जुन्या पंखात नसतेच. त्यासाठी हवेत नवे पंख. पुन्हा एकदा यातनामय प्रवास आपल्याच चोचीने आपलीच पिसं उपटायचा.. एकेक पीसं वेगळं होत वाऱ्यावर उडून जातं..  हळूहळू तीही येतातच. दीर्घ प्रतीक्षेनंतर अणुकुचीदार चोच, धारदार नख्या आणि प्रचंड बळ असलेले पंख घेऊन नवं आयुष्य जगायला गरुड आता सज्ज झालेला असतो.. काही गोष्टींचा त्याग त्याला भरभक्कम आयुष्य देऊन जातो, तब्बल ३० वर्षांचं..
 आपल्याही आयुष्यात असे जुने काही असतेच. कटू आठवणी, जीवघेणे अनुभव, अपयशाचं ओझं. जोपर्यंत ते आपण टाकत नाही. नव्या अनुभवासाठी स्वत:मध्ये नवी जान भरत नाही, तोपर्यंत नवं आयुष्यही आपल्याला कवेत घ्यायला उत्सुक नसतं. भूतकाळ बरोबर घ्यायचा नसतोच. नाही तर वर्तमानाला जागाच उरत नाही. आणि मग उज्ज्वल भविष्याला तर नाहीच नाही..
 जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही. यासाठी माणसालाही संघर्ष करावा लागतो..  स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला.. नुकतंच वाचलेलं देवव्रत पटनाईक यांचं महाभारतावर आधारलेल्या ‘जय’ या पुस्तकातला अर्जुनाचा अनुभव हेच काहीसं सांगतो. देवव्रतांनी आपल्यापरीने गीतेचा अर्थ सांगितलाय. कुरुक्षेत्रावर शेवटची लढाई सुरू होणार असते. रणांगणावर आपलेच नातेवाईक, सगेसोयरे पाहून अर्जुनाने शस्त्रं खाली टाकली आहेत. माझ्याच माणसांविरुद्ध मी युद्ध कसं करू, कोणालाही योग्य वाटेल असा अर्जुनाचा प्रश्न आणि त्यावर भगवान कृष्णाचं गूढ हास्य. म्हणतात, ‘‘तुझा विचार उदात्त आहे, पण तो नेमका कशातून आला आहे. उदारतेतून की भयातून, शहाणपणातून की अज्ञानातून? तुला वास्तवाचा सामना करावा लागतोय म्हणून तू घाबरतो आहेस. इथे पराभवाचीही शक्यता आहे. आणि जर यश मिळालंच तर त्याची किंमतही मोजायला लागणार आहे. या दोन्ही शक्यतांमुळे तू द्विधा आहेस. परिस्थितीला तोंड देण्याऐवजी तू पळून जाऊ इच्छितोस. कारण जी परिस्थिती तुझ्यासमोर आहे त्याचा तू योग्य अर्थ लावत नाही आहेस. हे जग म्हणजे माया आहे, मर्त्य आहे. पण ते जाणून न घेता मृत्यूला घाबरतो आहेस. या घाबरण्यातूनच जन्माला येतो अहंम. आणि हा अहंमच आपल्या मनावर ताबा घेतो. हा अहंमच परिस्थितीचा अर्थ लावतोय. जो तुझ्या भूतकाळातून आला आहे. तो म्हणजे तू नाहीस, हे एकदा जाणून घेतलंस की सगळं नीट होईल.’’ कृष्ण अर्जुनाला आत्म्याचं महत्व पटवून देतोय. भगवान त्याला आत्मशोधाचा घास भरवताहेत, पण तो चावायचा, गिळायचा मात्र अर्जुनालाच आहे..
‘‘हे युद्ध रणभूमीवरचं नाही,  तुझ्या आतलं आहे. तुझ्यातल्या अहंम्मधलं आहे हे जाणून घे. तझ्या जन्माचा उद्देश जाणून घे. हे युद्ध तुझ्यासाठी नाही. ते आहे, धर्माच्या स्थापनेसाठी. तुझं कर्तव्य लक्षात घे. एकदा का हे तुला कळलं की तुझ्या सगळ्या कुशंका दूर होतील. तुला मिळेल फक्त मनभरून शांतता. आणि मग तू प्रत्यक्ष रणभूमीवर असून, हातात धनुष्यबाण असूनही तू शांत असशील. तू लढशील कोणत्याही रागाशिवाय. ठार करशील कुणालाही कुठल्याही तिरस्काराशिवाय..
 भगवानांचं बोलणं अर्जुनाला लख्ख प्रकाशून गेलं.. मनातला संघर्ष संपला होता.. तो आता सज्ज झाला होता, कुणाशीही युद्ध ‘न’ करण्यासाठी..

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…