ख्रिस्तपूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकात चरक, सुश्रुत, हिप्पोक्रेटिस अशा पूर्वसूरींनी प्रथमच वैद्यकशास्त्राच्या संहिता प्रस्तुत केल्या. त्या काळापासून ते आजच्या घटकेपर्यंत वैद्यकशास्त्राचा सातत्याने विकास होत आला आहे. शरीरमनाचं आरोग्य-अनारोग्य याविषयीच्या संकल्पना अधिकाधिक सुस्पष्ट होत आहेत. अनारोग्याची कारणं शोधून काढून ती शक्य तितकी नाहीशी करणं आणि लक्षणसमूहावर उपचार करणं, यावर वैद्यक व्यावसायिकांचा नेहमीच भर राहिला आहे.  रोगलक्षणांचं, रुग्णवर्तनाचं सूक्ष्म निरीक्षण, कल्पक प्रयोगशीलता आणि रुग्णाला लवकरात लवकर आराम मिळवून देण्याची तळमळ, यातूनच वैद्यकशास्त्रात नवनवीन शोध लागत गेले. या शोधांमुळे देश-खंडांच्या भौगोलिक सीमा ओलांडून मोठमोठय़ा मानवसमूहांचा अतोनात फायदा झाला.   त्रास देणारी एखादी गाठ कापून टाकणं, साठवेल्या पू-रक्ताचा छिद्र पाडून निचरा करणं, फाटलेला अवयव शिवून दुरुस्त करणं अशा प्राथमिक गोष्टीतून शल्यकर्माला सुरुवात झाली.  भौतिक, रासायनिक, जैविक साधनांचा वापर उपचारांसाठी होतच होता. त्याला आधुनिक विज्ञानाची जोड मिळाल्यावर नवी क्रांती झाली. लेसर तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, रोबॉटिक्स, एन्डोस्कोपिक उपचार, सी.टी./ एम-आर.आय, पेट स्कॅन ही आजची काही उदाहरणं.  ‘उद्याचे आज’ या सदरात आपण वैद्यकातल्या अशा नवनवीन गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. ज्यामुळे आरोग्यवर्धन, विशिष्ट रोगांपासून संरक्षण, त्वरित निदान-उपचार आणि रोगमुक्तीनंतर पुनर्वसन अधिकाधिक शक्य आणि सुलभ होत आहे. मानवी जीवनाची गुणवत्ता वाढवणाऱ्या या शोधांना आणि संशोधकांना या सदरातून दिलेली ही मानवंदना आहे.
वेदनाशमन किंवा वेदना व्यवस्थापनशास्त्र आता वेगानं विकसित होत असून तीव्रतेतर वेदना कमी वा नाहीशा करण्याचे प्रयोग सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे आजाराबरोबर येणाऱ्या वेदनाचं व्यवस्थापन आता करता येऊ लागले आहे.
वेदना ही शरीरातली संरक्षण यंत्रणा आहे. ती आपले लक्ष शरीरातल्या विकृतीकडे वेधून घेते आणि त्यावर उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करते. एखाद्या ठसठसणाऱ्या गळवाची वेदना ते फुटून निचरा झाला की नाहीशी होते. अगदी हृदयविकाराची जीवघेणी वेदनासुद्धा योग्य उपचार झाले की जाणवेनाशी होते.
मात्र काही विकार असे आहेत की ते बरे तर होत नाहीतच, पण वेदनेला सोबत घेऊन येतात आणि शरीरात कायमस्वरूपी ठाण मांडतात. अशा रुग्णांचं जीवन-‘आज माझे प्राण कासावीस झाले, वेदनेच्या गूढ डोही मी निमाले..’ अशा तऱ्हेचं असतं. ‘क्रॉनिक पेन सिंड्रोम’ अर्थात जुनाट मुरलेली वेदना हिचं शमन कसं करावं, याचंही एक शास्त्र आहे आणि अलीकडच्या अनेक नवनव्या औषधांमुळे, कल्पक उपचारपद्धतींमुळे वेदना सुसह्य़ करून रुग्णाला आराम देण्याची किमया आता या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींना साधू लागली आहे. मोठय़ा शहरांमध्ये आता खास वेदनाशमन केंद्रं (पेन क्लिनिक्स) निघाली असून तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. असे उपचार बहुधा भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ किंवा न्यूरोसर्जन्स करीत असतात.
 शरीरात जिथे-जिथे विकृती आहे तिथे वेदना जन्म घेते आणि तिची जाणीव सूक्ष्म नसांच्या धाग्यांमधून प्रथम पाठीच्या कण्यातल्या मज्जारज्जूकडे आणि नंतर मेंदूच्या थॅलॅमस आणि कॉर्टेक्स या भागांकडे वाहून नेली जाते. तिच्यामुळे मेंदूच्या त्या भागात काही रासायनिक बदल होतो आणि तिथल्या मज्जापेशी त्या रसायनांच्या माध्यमातून वेदनेची नोंद घेतात. वेदना जशी जुनी होत जाते तशी ही नोंद अधिकाधिक लवकर घेतली जाते, म्हणजेच रुग्णाची वेदना सहन करण्याची क्षमता कमी कमी होऊ लागते आणि तो ‘दुखण्याला हळवा’ व्हायला लागतो. एकंदरीत जगणं ही त्याला शिक्षा वाटू लागते. शास्त्रज्ञांना आता वेदनेच्या जाणिवेचा हा मार्ग उलगडला असून यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते काम करीत आहेत आणि वेदनेची जाणीव नष्ट किंवा कमी तीव्र करीत आहेत.
 वेदना कधी एकटी नसते तर तिच्याबरोबर येतात रक्तदाब, धडधड, घाम फुटणे, भीती, चिंता, नैराश्य अशा अनेक दु:खद जाणिवा. वेदना कमी करून या जाणिवाही पळवून लावण्याचं महत्त्वाचं काम यातून साध्य होत आहे. सर्वसाधारण वापरली जाणारी वेदनाशामकं (आयब्यूप्रोफेन, डायक्लोफेनॅक) अशा रुग्णांत जास्त वापरता येत नाहीत. कारण थोडय़ाच दिवसात त्यांचे दुष्परिणाम शरीरावर होऊ लागतात. अशा रुग्णांसाठी आता गुंगी आणणारी, नसा बधिर करणारी, नैराश्य दूर करणारी, अपस्मार किंवा झटक्यांवर वापरली जाणारी अशी विविध प्रकारची औषधं उपयोगी पडत आहेत. यातली गुंगी आणणारी औषधं (नाकरेटिक्स) माणसाला व्यसनाधीन बनवू शकत असल्यानं त्यांच्यावर अनेक कडक र्निबध होते. त्या वेळी खरीखुरी गरज असणारे रुग्णही वेदनेनं तळमळत असत. डॉ. राजगोपालन् या मानवतावादी डॉक्टरांनी पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत ‘माणसाच्या वेदनामुक्त होण्याच्या हक्कासाठी’ लढा चालू ठेवला, त्यामुळे आता ही प्रभावी औषधं तज्ज्ञांसाठी उपलब्ध झाली आहेत. या औषधांची वेगवेगळी मिश्रणं केल्याने त्यांचे दुष्परिणाम कमी करण्यातही डॉक्टरांना यश येत आहे. ही औषधं रुग्णाच्या अवस्थेप्रमाणे इंजेक्शनं, गोळय़ा किंवा त्वचेवर लावण्याच्या पॅचेसमध्येही उपलब्ध आहेत.
परंतु आता अशा औषधांची विशिष्ट मात्रा जिथे गरज आहे, अशा नेमक्या जागी पोहोचवणं आणि शरीरात इतरत्र त्यांचा परिणाम होऊ न देणं हा मार्ग डॉक्टर पसंत करू लागले आहेत. वेदना ‘सिंपथॅटिक नव्‍‌र्हज’मधून संक्रमित होत असल्यानं जिथे कुठे तीव्र वेदनेचा स्रोत आहे. तिथल्या सिंपथॅटिक नव्‍‌र्हज्चं जाळं स्कॅनिंगच्या मदतीनं बरोबर शोधून काढून स्कॅन चालू असतानाच नसा बधिर करणारं इंजेक्शन त्या जागी देऊन त्यातून जाणारे वेदनेचे संदेश आता
थांबवता येऊ लागले आहेत. या उपचारामुळे आता सायटिका, कंबरदुखी, मानदुखी, हर्पिज (नागीण) पश्चात होणारी वेदना, ट्रायजे मिनल न्युराल्जिया हा चेहेरेदुखीचा त्रास अशा अनेक छळवादी व्याधींमधून रुग्णाला कित्येक महिने किंवा वर्षसुद्धा आराम मिळतो आहे. अशा उपचारात अचूकता आणि नेमकेपणा गरजेचा असतो आणि हे शक्य होतंय दीपस्तंभाचं कार्य करणाऱ्या स्कॅिनग सुविधांमुळे. काही ठिकाणी बधिर करणाऱ्या इंजेक्शन्सऐवजी भौतिक साधनांच्या साहाय्याने या वेदनावाहक नसा निकामी केल्या जातात. या उपचाराला म्हणतात, रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅब्लेशन. पूर्वी यासाठी अवघड अशा मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या जात.  
वेदनाग्रस्त व्यक्तींचा एक फार मोठा गट म्हणजे कर्करोगाचे रुग्ण. मस्तक, मान, पोटाच्या वरच्या भागातले म्हणजे अन्ननलिका, जठर, स्वादुपिंडाचा कर्करोग, हाडांमध्ये पसरणारा कर्करोग हे सर्व अत्यंत वेदनाजनक असतात. अशा प्रत्येक ठिकाणी बधिर करणारी इंजेक्शनं नसांमध्ये देऊन वेदना कमी करता येते. दुर्धर अशा कर्करोगाच्या रुग्णांच्या पोटात मॉर्फिनसारख्या गुंगीच्या औषधाचा पंप बसवता येतो. पाठीच्या मणक्यांमधून मज्जारज्जूपर्यंत पोहोचून तिथेही असा पंप बसवता येतो. अशा पंपातून विविध औषधं देता येतात. तीव्रतेनुसार औषधांची मात्रा कमी-जास्त करता येते. कधी अगदी अभिनव पद्धतीनं हा परिणाम साधला जातो. वेदनावाहक मज्जातंतू (डेल्टा फायबर्स) ब्लॉक करून दुसरेच बीटा फायबर्स उत्तेजित करत राहिल्याने वेदनेऐवजी अगदी सौम्य अशा दुसऱ्या संवेदना रुग्णाला होतात.
एकंदरीत वेदनाशमन किंवा व्यवस्थापनशास्त्र आता वेगानं विकसित होत असून आशा आहे की दुर्धर व्याधींवर मात करणं जमेल, ना जमेल, पण जोवर जीव आहे तोवर त्याला आराम मिळवून देणं या उपचारांनी शक्य आहे.   
डॉ. लीली जोशी -drlilyjoshi@gmail.com
(या लेखासाठी विशेष साहाय्य : डॉ. माधुरी लोकापूर- वेदना व्यवस्थापनतज्ज्ञ.)