‘मारिया दास ग्रैकस सिल्वा फॉस्टर’ अर्थात ग्रॅका एका मोठय़ा ऑइल आणि गॅस कंपनीची जगातली पहिली महिला प्रमुख मानली जाते. देशाच्या १०० अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती असलेल्या ‘पेट्रोब्रास’या कंपनीची ही आंतरराष्ट्रीय सीईओ! ग्रॅकाचे संपूर्ण करिअर इंधन, तेल आणि वायू यांच्या स्रोतांचा शोध आणि निर्मिती यांमध्येच घडले. कामाचा जबरदस्त धडाका आणि करडी शिस्त याच्या जोरावर यश खेचून आणणाऱ्या ग्रॅकाविषयी..

जागतिक अर्थकारणात तेल, वायू आणि ऊर्जा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक देशाची ती प्राथमिक निकड आहे. म्हणूनच या क्षेत्रात वर्चस्व असणारी राष्ट्रे आर्थिकदृष्टय़ा अधिक संपन्न आहेत. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशाचे स्थानही या क्षेत्रात मोठे आहे. हा देश इंधन (इथेनॉल) उत्पादन क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या देशाची या क्षेत्रातली सर्वात मोठी सरकारी कंपनी ‘पेट्रोब्रास’ याची प्रमुख आहे एक स्त्री. तिचे नाव आहे ‘मारिया दास ग्रैकस सिल्वा फॉस्टर’ अर्थात ग्रॅका. तीस वर्षांपूर्वी याच कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी ग्रॅका आज या बलाढय़ कंपनीची सीईओ आहे. व्यावसायिक विश्वात तिला ‘मिसेस फॉस्टर’ म्हणून ओळखले जाते, पण तिला ग्रॅका म्हटलेले अधिक आवडते.
ग्रॅकाची कर्तृत्व गाथा आपल्याला अचंबित तर करतेच, पण तिचा जीवनपट हा सततचा संघर्ष आणि त्यातून खेचून आणलेले देदीप्यमान यश यामुळे अधिकच नेत्रदीपक व प्रेरणादायी ठरतो. ज्या वातावरणात ती जन्मली आणि मोठी झाली त्यात आणि  आज ती जिथे आहे त्यात जमीन-आसमानाचा फरक आहे. उत्कर्षांच्या परमोच्च शिखरावर आज विराजमान असलेल्या ग्रॅकाने बालपणी अतिशय हालअपेष्टा भोगल्या असतील हे कोणाला सांगूनही खरे वाटत नाही. ग्रॅकाचा जन्म ब्राझीलमधल्या कॅरटिंगा ग्रॅशस मिनस या ठिकाणी १९५३ साली झाला. ती जेमतेम आठ वर्षांची असताना तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की त्यांना रिओ द जानेरो या शहराच्या बाहेरच्या भागाला असणाऱ्या ‘फवेला’ (अत्यंत निकृष्ट दर्जाची वस्ती) मध्ये जाऊन राहावे लागले. इथे माणसांची प्रचंड गर्दी, गुन्हेगारी, दारिद्रय़, घाण, ड्रग्जचा व्यापार यांचेच साम्राज्य होते. या वस्तीत कुपोषण, प्रदूषण, विविध साथींचे सतत उद्भवणारे आजार हेही प्रामुख्याने दिसून येई. अशा गलिच्छ वातावरणात राहिल्यामुळे मृत्युदरही खूपच जास्त होता. ड्रग्ज विकणाऱ्या टोळ्यांमध्ये सतत मारामाऱ्या आणि हत्याही होत असत. या टोळ्या त्या वस्तीतील सगळ्यांना अगदी लहान मुलांनादेखील आपल्या जाळ्यात ओढत आणि व्यसनी बनवत, जेणेकरून त्यांचा धंदा जोरात चालेल. यामुळेच ब्राझिलियन सुरक्षा दलाकडून या वस्त्यांची सतत पाहणी केली जात असे.
‘फॉस्टर’ कुटुंबाचे इथे स्थलांतरित होण्यामागचे एक कारण होते, ग्रॅकाचे वडील. ते पराकोटीचे व्यसनी होते आणि नशेत ते आपल्या कुटुंबीयांना यथेच्छ मारहाण करीत. ग्रॅकाची आई छोटीमोठी नोकरी करून आपल्या दोन मुलींचा सांभाळ करीत असे. आपल्या मुलींनी कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घेतलेच पाहिजे आणि या आवर्तातून बाहेर पडले पाहिजे, असे ग्रॅकाच्या आईला वाटे. मिळेल ती कामे करून आपल्या मुलींचे पोट ती भरीत असे. ग्रॅका आसपासचे भंगार गोळा करून ते विकत असे आणि आपल्या शाळेची फी जमवत असे. कधी पोर्तुगालमधून स्थलांतरित झालेल्या आपल्या शेजाऱ्यांना ब्राझीलची माहिती देणारी पुस्तके वाचून दाखवत असे. त्या मोबदल्यात तिला थोडेफार पैसे मिळत.
‘आमच्याकडे बरेचदा गरजेपुरतेही पैसे नसायचे. माझ्या ‘एक्स्टेंडेड फॅमिली’प्रति मी सदैव कृतज्ञ आहे, कारण हीच माणसं आम्हाला अन्न, पुस्तके, त्यांना नको असलेले जुने कपडे इ. आणून देत असत. माझे बालपण आनंदात, परंतु कठीण परिस्थितीत गेले’, असे ती सांगते. मात्र आपल्या पूर्वायुष्याबद्दल विशेषत: बालपणाबद्दल बोलायचे ती टाळते.
ड्रग्ज आणि ते विकणाऱ्या गुंडांच्या टोळ्या यांच्यापासून स्वत:चा सतत बचाव करत छोटी-मोठी कामे करून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. ‘फ्लुमिनेन्स फेडरल युनिव्हर्सिटी’तून तिने ‘केमिकल इंजिनीअरिंग’ची पदवी मिळवली. दरम्यान, कॉलिन फॉस्टर या ब्रिटिश व्यावसायिकाशी तिचा विवाह झाला. विवाहपश्चातदेखील तिने आपले शिक्षण सुरूच ठेवले. तिने न्यूक्लियर इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्स आणि पुढे एमबीएचीही पदवी मिळवली. १९७९ साली मध्ये इंटर्न म्हणून ‘पेट्रोब्रास’मध्ये प्रवेश केला आणि इंजिनीअरिंग विभागाची जबाबदारी तिला देण्यात आली.
‘पेट्रोब्रास’च्या समुद्रकिनाऱ्यालगतचा पहिला ऑइल प्लॅटफॉर्म उभारताना तिथे प्रत्यक्ष रुजू असणारी ग्रॅका ही पहिली स्त्री होती. ‘प्रॉडक्शन इक्विपमेंट इन्स्टॉलेशन’ची जबाबदारी तिची होती. ग्रॅकाचे संपूर्ण करिअर इंधन, तेल आणि वायू यांच्या स्रोतांचा शोध आणि निर्मिती यांमध्येच घडले. तिची कामाची जबरदस्त धडक आणि करडी शिस्त बघून तिला ‘कॅव्हेरो’ (शस्त्रास्त्रे वाहून नेणारी सैन्याची गाडी किंवा ट्रक) असेही गमतीने म्हटले जायचे.
ब्राझील वर्कर्स पार्टीच्या पॉलिसीजची उत्तम जाण, त्या अमलात आणण्याची तिची क्षमता आणि नियोजनबद्ध कारभारामुळे ब्राझीलच्या राजकीय वर्तुळातही तिची चर्चा होऊ  लागली. पूर्वी ‘पेट्रोब्रास’च्या अध्यक्षपदी असलेल्या आणि नंतर ब्राझीलच्या अध्यक्षपदी निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला डिल्मा रुसेफ यादेखील ग्रॅकाच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावित झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या दुसऱ्या कंपनीत तिने दोन वर्षे काम केले. २००३ दरम्यान तिचे फेडरल मंत्रालयाशी मतभेद झाले होते आणि फक्त २००३ ते २००५ च्या काळात ती ‘पेट्रोब्रास’पासून दूर होती.
२००५ साली ग्रॅका ‘पेट्रोब्रास’मध्ये परत आली ते पेट्रोकेमिकल डिव्हिजनची प्रमुख म्हणून! पुढे एकापाठोपाठ एक बढती मिळवत ग्रॅका आज कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टपर्यंत पोहोचली आहे, तसेच या कंपनीची सीईओ बनली आहे. ब्राझीलमधली दुसरी प्रभावशाली स्त्री आणि एका मोठय़ा ऑइल आणि गॅस कंपनीची जगातली पहिलीच महिला प्रमुख आहे. हे क्षेत्र तसे स्त्रियांसाठी अतिशय कठीण असल्याने तिचे या क्षेत्रातील योगदान विशेष मानले जाते.
२०१४ सालच्या ‘फोब्र्ज’ मासिकाच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत ग्रॅका सोळाव्या क्रमांकावर आहे. १९८१ मध्ये केमिकल इंजिनीयर म्हणून नियुक्ती आणि हळू हळू व्यवस्थापनाकडेही तिची वाटचाल झाली. डिल्मा रुसेफ या ‘पेट्रोब्रास’च्या अध्यक्ष असतानाच्या काळात ग्रॅका आणि डिल्मा रुसेफ यांनी आंतरराष्ट्रीय संबंध अत्यंत कुशलतेने हाताळत विदेशातून मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आणली. २००९ साली रुसेफ यांच्या अनुमोदनाने ग्रॅका बोर्ड ऑफ डायरेक्टरपदी निवडली गेली. तिच्या कार्यकालात ‘पेट्रोब्रास’ने जी असामान्य प्रगती केली त्यामुळे ब्राझीलच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आणि त्याचा फायदा तिथल्या समाजाच्या सर्वच स्तरांना मोठय़ा प्रमाणात झालेला दिसून येतो.
काही काळ मात्र ग्रॅका आपल्या पतीच्या कंपनीला कंत्राटे मिळवून देण्याच्या आरोपांनी घेरली गेली. परंतु ही कंत्राटे अगदीच फुटकळ स्वरूपाची असल्याने त्यातून काही आर्थिक फायदा तिच्या पतीला झाला नाही, असे म्हणून ‘पेट्रोब्रास’ने हे सर्व आरोप फेटाळले आणि ग्रॅकादेखील आरोपमुक्त झाली. नंतर तिला ‘ऑर्डर ऑफ रिओ ब्रान्को’ या सन्माननीय किताबाने गौरविण्यात आले. तसेच इतर असंख्य पुरस्कारांची ग्रॅका धनी आहे.
१०० अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती असलेल्या ‘पेट्रोब्रास’ची ही आंतरराष्ट्रीय सीईओ!  आज ग्रॅकाच्या पायाशी एवढे ऐश्वर्य लोळण घेत असले तरीही तिच्या राहणीमानात फारसा उच्चभ्रूपणा फिरकलेला नाही. ‘रिओ दि जानेरो’ या शहरालगत एका साधारणशा घरात ती, कॉलिन आणि तिची मुले राहतात.
ग्रॅका स्वत:च्या आलिशान कार ऐवजी बहुधा टॅक्सीने प्रवास करते.स्त्रियांच्या क्षमतांविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांना ग्रॅका आणि तिची ‘इंटर्न’ ते ‘सीईओ’पर्यंतची गरुडभरारी आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.