शहा-लुल्ला इस्टेट डेव्हलपर्स’चा उद्योग कोटीच्या कोटी रुपयांची उड्डाणं घेत असताना, वयाच्या पन्नाशीतच  किशोर लुल्ला यांनी थांबायचं ठरवलं आणि जे जे मिळवलं ते वाटण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी उघडल्या. टी. बी. लुल्ला या चॅरिटेबल ट्रस्टद्वारे त्यांनी कोटय़वधी रुपये दान केले.

कारकीर्दीच्या ऐन शिखरांवर असताना आणि आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टांची पोचपावती लक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देत असताना ‘पुरे’ म्हणण्यासाठी असामान्य धैर्य लागतं. त्यातही हा पूर्णविराम कशासाठी तर समाजाने आजवर जे दिलंय ते कृतज्ञ भावनेने समाजालाच परत देण्यासाठी. ‘अघ्र्यदान’ या उपक्रमातून समाजाचं देणं फेडणाऱ्या, सांगली शहरातील या दानशूर व्यक्तीचं नाव किशोर तोताराम लुल्ला. आपल्या वडिलांच्या नावे सुरू केलेल्या टी. बी. लुल्ला या चॅरिटेबल ट्रस्टद्वारे त्यांनी गेल्या १० वर्षांत कोटय़वधी रुपयांचं सत्पात्री दान दिलंय.
‘अघ्र्यदान’ ही संकल्पना किशोर लुल्ला यांच्या मनात रुजवण्यासाठी निमित्त झालं ते त्यांच्या वडिलांच्या आकस्मित निधनाचं. २०१० मधली ही घटना. त्याच वर्षी किशोरजींच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण होत होती. हा सोहळा धूमधडाक्यात साजरा करण्याचे बेत सुरू होते. पण जन्मदात्याच्या जाण्यानं सगळं चित्रंच बदललं. त्याच वेळी विवाहाच्या रौप्यमहोत्सवाचा संकल्पित खर्च समाजसेवी संस्थांना दान करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली. पत्नी व मुलांनीही पाठिंबा दिला आणि ‘अघ्र्यदान’ नावाने एक आगळावेगळा उपक्रम आकाराला आला. यासाठी त्यांनी सेवावृत्तीने काम करणाऱ्या सांगलीतील अनेक संस्था शोधल्या व त्यांना २५ लाख रुपयांची देणगी दिली. तेव्हापासून किशोरजींनी देण्यातला आनंद घेत दरवर्षी ही रक्कम एक-एक लाख रुपयाने वाढवली आणि गेल्या वर्षी २९ लाख रुपये दान केले. हा उपक्रम तहहयात चालवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
२०११ मध्ये सांगलीतील एका भव्य मैदानावर टी. बी. लुल्ला ट्रस्टने ११० स्टॉल्स उभारले आणि तळमळीने काम करणाऱ्या अनेक संस्थांचं काम सांगलीकरांसमोर आणलं. विशेष म्हणजे या स्टॉल्ससाठी त्यांनी १५० सोलर लाइट्स विकत घेतले आणि प्रदर्शन संपल्यावर सांगली जिल्ह्य़ातील ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या झोपडय़ात हे सर्वच्या सर्व दिवे लावून त्यांची घरं उजळून दिली.
पुढच्याच वर्षी ‘कलाविष्कार २०१२’ या नावाने स्थानिक लोककलाकारांच्या कलेचं आणि सेवा २०१३ अंतर्गत १५० सेवाभावी संस्थांचं राज्यस्तरीय प्रदर्शन भरवण्यात आलं. २०१३ मध्येच ‘पाषाणपालवी’ या नावाने जत तालुक्यातील जाळीहाळ भागातील दुष्काळग्रस्तांच्या ५०० कुटुंबांसाठी सलग ६ महिने अन्नदान योजना राबवण्यात आली.
मानवी जीवन घडतं ते शिक्षणामुळे. ते आनंददायी कसं करता येईल या विचारातून लुल्ला ट्रस्टच्या ‘शिकू आनंदे’ या उपक्रमाचा जन्म झाला. या संदर्भात अनिल अवचट एका कवितेतून म्हणतात,
वय त्यांचे होते मोठे। सुरू होतो मग अभ्यास
दप्तर मार्क वा नंबर। सुखात होई दु:खात
बाल्यावर चाले छिन्नी। सुंदर ते होई सपाट
डोक्यात कोंबतो आम्ही। आपुल्या जगातील दोष
एवढे तरी करावे। पोरांना ठेवू पोर
जमले तर आपणही व्हावे। त्या पोरांमधले पोर

पोरांमधले पोर होऊन शिकवावे व शिकावे या जाणिवेतून लुल्ला ट्रस्टने जून २०१४ मध्ये ४ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी ८ शाळांमधून आनंददायी शिक्षण सुरू केले. आज ८०० मुलं या माध्यमातून आनंददायी शिक्षणाचा लाभ घेतायत.
या उपक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून २०१४ च्या ‘अघ्र्यदाना’साठी याच प्रकल्पाची निवड करण्यात आली. पुण्याची ज्ञानप्रबोधिनी व रोटरी क्लब यांनी सहकार्याचा हात दिला. परिणामी १ ते १३ डिसेंबर २०१४ या काळात सांगली जिल्ह्य़ात ठिक ठिकाणी झालेल्या कार्यशाळांमध्ये चोवीस हजार विद्यार्थी, पाच हजार पालक व एक हजार शिक्षक सहभागी झाले.
१४ डिसेंबरला भावे नाटय़मंदिर येथील कार्यशाळांतून प्रकाश पाठक, विवेक पोंक्षे, रमेश पानसे, सागर देशपांडे, विनय सहस्रबुद्धे, कांचनताई परुळेकर, सुधीर गाडगीळ अशा अनेक प्रभृतींनी मार्गदर्शन केलं.    शंकर अभ्यंकर यांच्या ‘शिक्षणाची पुढील दिशा’ या विषयातील प्रबोधनाने तर कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर लुल्ला यांनी आपलं तन-मन-धन पणाला लावलं, एवढंच नव्हे तर सांगता सोहळ्यातील ‘मस्ती की पाठशाला’ या रंगारंग कार्यक्रमाचं संहिता लेखनही त्यांनीच केलं होतं.
cn16ज्यांच्या नावाने हा ट्रस्ट सुरू झालाय त्या टी. बी. लुल्ला (तोताराम भोजराज लुल्ला) यांची जीवनगाथाही थक्क करणारी आहे. भारताच्या फाळणीपूर्वी सुरू झालेली ही कहाणी. सिंध प्रांतातील सिंधू नदीच्या काठावर वसलेलं शिकारपूर हे त्यांचं गाव. इथे लुल्ला कुटुंबाची धान्य, किराणा, भुसार यांची चार दुकानं होती. घर म्हणजे एक ६ मजली हवेली होती. पण फाळणी झाली आणि हे सुखी संपन्न कुटुंब निर्वासित झालं.
त्या कठीण कालखंडात तोताराम यांनी शाळेच्या फीसाठी ट्रेनमध्ये चणे-कुरमुरेही विकले, पण आपलं शिक्षण जिद्दीने पूर्ण केलं व सांगलीत सेल्स टॅक्स कन्सल्टंट हा व्यवसाय सुरू केला. नीतिमत्तेने वागून व्यवसायाची भरभराट केली. हा संपूर्ण जीवनप्रवास त्यांनी आपल्या ‘सिंधू ते कृष्णा’ या हृदयस्पर्शी पुस्तकातून उलगडला आहे. १४ डिसेंबर १९६० रोजी जन्मलेले किशोर हे तोताराम यांचे कनिष्ठ पुत्र. त्यांचं शिक्षण सांगलीच्या पटवर्धन हायस्कुलातून मराठी माध्यमामधून झालं. सांगलीच्या मराठी मातीत ते इतके मिसळून गेले की, त्यांच्याशी बोलताना ते अमराठी आहेत असा संशयही येत cn17नाही. त्यांची मुलंदेखील मराठीतूनच शिकली. वकिलीची सनद घेतल्यावर किशोरजींनी वडिलांच्या व्यवसायाबरोबर प्लॉट खरेदी-विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. वीज, प्राणी, रस्ते, बागा अशा सुविधासह टाउनशिप विकसित करून देण्याच्या त्यांच्या अभिनव प्रयोगाला (सांगलीत प्रथमच) अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि ‘शहा- लुल्ला इस्टेट डेव्हलपर्स’ यांनी आपल्या उद्योगात कोटीच्या कोटी रुपयांची उड्डाणं घेतली. त्याचबरोबर पारदर्शी व्यवहार करून ‘विश्वास जपणारी माणसं’ अशी आपली प्रतिमाही त्यांनी निर्माण केली. अशा प्रकारे सगळं सुखेनैव सुरू असताना वयाच्या पन्नाशीतच किशोर यांनी थांबायचं ठरवलं आणि आजवर जे मिळवलं ते गरजवंतांना वाटण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी उघडल्या.
सांगलीतील मेघालय विद्यार्थी वसतिगृह उभारण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यासाठी त्यांनी स्वत: सोळा लाख रुपयांची देणगी तर दिलीच शिवाय बाकीची रक्कम झोळी फिरवून उभी केली. या हॉस्टेलने गेल्या १० वर्षांत मेघालयमधील अनेक मुलांना आपल्या पायावर उभं केलंय.
पर्यावरणाचं रक्षण हा किशोरजींसाठी महत्त्वाचा विषय. गणपतीच्या इकोफ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी २०१२ मध्ये संबंधित कारागिरांना ऐंशी हजार रुपयांची मदत दिली. तसंच मुलांच्या लग्नात प्लॅस्टिकचा वापर कटाक्षाने टाळला. दानाचा वसा पुढील पिढीत संक्रमित व्हावा म्हणून त्यांनी उचललेली पावलं दाद देण्यासारखी.
मुलाच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी नव्या सुनेच्या हस्ते बामणोली गावातील विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानला ५ लाख रुपयांचं फिरतं औषधालय भेट दिलं तर मुलीच्या लग्नानंतर कुपवाडमधील ५०० गरीब मजूर स्त्रियांची रक्ततपासणी करून त्यांना औषध व प्रोटिनयुक्त आहाराचं वाटप केलं. किशोरजींचं अघ्र्यदान ऐकताना मला भगवान महावीर यांचं श्रीमंती म्हणजे काय यावरचं भाष्य आठवलं. ते म्हणतात, जास्तीतजास्त पैसे मिळवणं वा पैसे हवे तसे उधळता येणं अथवा होता होईल तेवढे पैसे साठवणं म्हणजे श्रीमंती नव्हे. श्रीमंती म्हणजे, ‘आता आणखी नको असं जेव्हा वाटतं तेव्हाच ती खरी श्रीमंती.’ या अर्थी किशोर लुल्ला यांना कुबेरच म्हणायला पाहिजे. नाही का?
संपदा वागळे
waglesampada@gmail.com