पैसे कमावून आनंदी होण्यापेक्षा इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणाऱ्या रवींद्रभाई संघवींनी कच्छमधील चार-पाच शाळा आणि मुंबई व आसपासच्या २०/२५ सेवाभावी संस्था यांना गेल्या दहा-बारा वर्षांत काही कोटी रुपयांचं दान दिलंय. त्यांच्या ‘टॉय फाऊन्डेशन’मुळे गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
तोडीला सजीव, पाषाण पूजीला निर्जीव
सजीव तुळशी तोडती, निर्जीव दगडा वहाती
पाषाणाला पुरणपोळी, अतिथीला शिवीगाळी
मुख्य देव विसरला, लोभ दगडाचा केला
संत तुकारामांच्या या अभंगाचा अर्थ ज्यांना पुरेपूर कळला आहे आणि त्यानुसार जे माणसांमध्येच देव पाहतात अशा दानशूरांमधील एक नाव म्हणजे रवींद्रभाई संघवी. कच्छच्या या सुपुत्राने आपल्या जन्मभूमीचे पांग तर फेडलेच, त्याबरोबर आपल्या कर्मभूमीला म्हणजेच महाराष्ट्रालाही भरभरून दान दिलं, देत आहे. १९९० मध्ये शून्यातून सुरुवात करुन पुढील १५ वर्षांत अंगभूत हुशारीच्या जोरावर मुंबापुरीत आपलं उत्तम बस्तान बसवलं आणि गेल्या १० वर्षांपासून ‘आता उरलो उपकारापुरता’ हाच त्यांच्या जीवनाचा मंत्र बनला आहे.
कच्छमधील चार-पाच शाळा आणि मुंबई व आसपासच्या २०/२५ सेवाभावी संस्था यांना गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांनी दरसाल २५ ते ३० लाख रुपये या हिशेबाने काही कोटी रुपयांचं दान दिलंय.
रवींद्रभाईंची कहाणी म्हणजे एक चित्तरकथाच आहे. पूर्व कच्छमधील फतेहगडजवळचं वल्लभपूर हे त्यांचं गाव. त्यांचे वडील मणिलाल न्यालचंद संघवी हे गांधीवादी होते. विनोबा भावे यांच्या सहवासात वर्षभर राहण्याचं भाग्यदेखील त्यांना लाभलं होतं. सवरेदय योजनेअंतर्गत जीवनशिक्षण देणाऱ्या अनेक लोकशाळांची पायाभरणी त्यांनी कच्छमध्ये केली. पात्रता असूनही स्वातंत्र्यसैनिकांची पेन्शन नाकारली. वडिलांचे संस्कार घेऊन रवींद्रभाई व त्यांची भावंडं वाढली. त्या काळात (१९५० ते ६०) त्यांच्या भावांनी शिक्षणासाठी जे दिव्य केलं ते ऐकताना कमाल वाटते. वल्लभपूरपासून त्यातल्या त्यात जवळच्या ‘आमला’ गावातील लोकशाळेत जाण्यासाठी या मुलांना प्रथम उंट, मग बस, ट्रेन, पुन्हा बस, लाँच, मीटरगेज ट्रेन, घोडागाडी, शेवटी परत उंट अशी आठ वाहनं बदलत जावं लागे. हा दीड दिवसांचा प्रवास ती मुलं दर आठवडय़ाला करत. रवींद्रभाई सर्वात लहान असल्यामुळे आईवडिलांजवळ राहिले, पण रापर या तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेत जाण्यासाठी त्यांनीही दहाव्या वर्षांपासून रोज जाऊन-येऊन १४ कि.मी.ची पायपीट केली, तीदेखील कच्छच्या रणरणत्या उन्हातून. परिस्थितीला टक्कर देण्याची हिंमत या भावंडांत अशी बालपणीच रुजली.
 रवींद्रभाईंचं खरं तर मस्त चाललं होतं आपल्या गावी. बी.एस्सी., बीएड होऊन जिथे शिकले तिथेच अध्यापनाचं काम चालू होतं. पुढे खात्याच्या परीक्षा देऊन त्या शाळेचं इन्स्पेक्शनही केलं. बरोबरीने योग, नॅचरोथेरपी यात विशेष प्रावीण्यही मिळवलं. एकदा सहज मुंबईला कोणा नातलगाकडे आले असताना त्यांना गिरगाव चौपाटीजवळच्या नॅचरोथेरपी सेंटरमधील केंद्रप्रमुखाची जागा रिक्त असल्याचं समजलं. मुंबईत येण्याची ही संधी त्यांनी सोडली नाही. त्यांच्या मेहनतीने १९८३ ते ९० या काळात ते केंद्र चांगलं नावारूपाला आलं; पण मालकाने अचानकपणे सेंटर बंद केल्याने रवींद्रभाई अक्षरश: रस्त्यावर आले. सेंटरवरच राहत असल्याने राहायला जागा नाही, हातांना काम नाही आणि पत्नीची जबाबदारी अशी त्यांची स्थिती झाली; पण मनगटातील जिद्द अशी की, हाती आलेल्या शून्याच्या पाठी स्वकर्तृत्वाने १० लिहून त्याचे शंभर करीन हे त्यांनी ठरवलं आणि तसंच झालं.
मित्रांच्या बोलण्यातून परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी १९९१ मध्ये फोर्ट विभागात टेबलस्पेस जागा भाडय़ाने घेऊन एन.आर.आय. इनव्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सुरू केली आणि गुंतवणूक संदर्भातील कोणतीही पाश्र्वभूमी नसताना अंगभूत हुशारी, अभ्यासू वृत्ती आणि कितीही कष्ट करायची तयारी या गुणांनी ते यशाचा सोपान चढत गेले. स्टॉक ब्रोकर, शेअर दलात, बांधकाम व्यवसाय, विदेशस्थ भारतीयांसाठी गुंतवणूक सल्लागार असे अनेक व्यवसाय त्यांनी केले. त्यांचा अश्वमेध एवढा सुसाट होता की, १९९० मध्ये बेघर असणाऱ्या या सद्गृहस्थांपाशी बघता बघता नेपीयन सी रोड या उच्चभ्रू वस्तीत चार बेडरूम्सचा प्रशस्त प्लॅट आणि तुलसियानी चेंबर्स या नरीमन पॉइंट भागातील व्यावसायिक टॉवरमध्ये सुसज्ज ऑफिस अशी स्थावर मालमत्ता जमा झाली. मात्र समाजाकडून मिळालेलं हे वैभव समाजाला परत करण्याचं भान त्यांच्यापाशी होतं, आहे, म्हणूनच २००५ पासून त्यांनी आपली भूमिका बदलली आणि आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दानाचा वसा हाती घेतला.
 कच्छच्या रणात त्यांचं गाव ज्या बेटावर आहे तिथे माध्यमिक शाळा नव्हती. तिथल्या सात-आठ गावांतील मुलांना आपल्यासारखे कष्ट पडू नयेत म्हणून तिथे शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी भरघोस देणगी दिली. शिवाय एक अॅम्बेसेडर कारही शाळेला दिली. मात्र नावाचा आग्रह धरला नाही. त्या भागातील पाच शाळांना त्यांनी आत्तापर्यंत ५० ते ६० लाख रुपये दिलेत.  मुंबई व आसपासच्या २० ते २५ संस्थांचे रवींद्रभाई ट्रस्टी आहेत. ‘चिल्ड्रन टॉय फाऊंडेशन’ हे त्यातील एक नाव. ज्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य परिस्थितीमुळे मावळलंय त्यांच्या जीवनात खेळणी व खेळांद्वारे आनंद फुलवणं या हेतूने १९८२ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. विविध प्रकारच्या पाचशे ते सहाशे खेळण्यांनी परिपूर्ण अशा चार मोबाइल व्हॅन्स आणि मुंबई व वडोदरा येथील महानगरपालिकांच्या शाळांत चालवली जाणारी २ कायमस्वरूपी खेळ-विज्ञान केंद्रे असे ६ उपक्रम या संस्थेतर्फे सुरू आहेत. या व्हॅन हरकिसनदास, नायर व सेंट जॉन हॉस्पिटल, बांधकामाच्या साइट्स, झोपडय़ा या ठिकाणी जातात. मुलांचे खेळ घेण्यासाठी संस्थेचे २५ प्रशिक्षित कर्मचारी सज्ज आहेत. याशिवाय खेळण्यांच्या लायब्ररीत ३०० संच महाराष्ट्रात व इतरत्र उभारण्यात आले आहेत. यातील एक खेळघर ऑर्थर रोड जेलमध्ये महिलांच्या वॉर्डात आहे, तर एक अंदमानमध्ये. लिम्का बुकमध्ये नोंद झालेल्या या टॉय फाऊंडेशनचा लाभ आज देशातील सहा ते सात हजार गरीब मुलांना होतोय, असं यांनी सांगितलं.
किडनी विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी रवींद्रभाई व समविचारी दानशूरांतर्फे सुरू असलेल्या ताडदेव येथील ‘जीवन ज्योत ड्रग बँके’त केवळ रेशनकार्ड व डॉक्टरांची चिठ्ठी एवढय़ावर किडनीसह इतर गंभीर आजारांवरची औषधं अल्प किमतीत मिळतात. या संस्थेतर्फे महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत एकूण १२० डायलेसिस सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत, जिथे चारशे ते पाचशे रुपयांत हा उपचार होतो. याच दरात ही सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाला ५ लाख रुपयांचं डायलॅसिस मशीन घेऊन देण्याची रवींद्रभाईंची तयारी आहे. ‘टॉय फाऊंडेशन’ व ‘जीवन ज्योत’ या दोन्ही ट्रस्टना देणगी देणाऱ्यांना इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ सेक्शन ३५ एसी अंतर्गत १०० टक्के वजावट मिळते, असंही त्यांनी सांगितलं.
जीवनज्योत ड्रग बँक, शहापूर लायन्स क्लब व इतर दानशूर मंडळींच्या सहकार्याने ६ महिन्यांपूर्वीच शहापूरला आसपासच्या आदिवासींसाठी डोळय़ांचं एक अद्ययावत हॉस्पिटल सुरू झालंय. इथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात. शस्त्रक्रियेआधीच्या चाचण्या, लेन्स, चष्मा, खाणंपिणं सगळं मोफत. इथलं सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्वच्छता व रुग्णांची काळजी घेण्याची पद्धत विस्मयचकीत करणारी आहे.
  रवींद्रभाईंची दातृत्वाची कहाणी ऐकताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानी व विनम्र भाव पाहाताना मनात आलं, मी आनंदी होण्यापेक्षा माझ्यामुळे किती जण आनंदी झाले याचा शोध घेणाऱ्यालाच जीवनाचा खरा अर्थ उमगतो.   
 संपदा वागळे -waglesampada@gmail.com
संपर्क- ravindrasanghvi@yahoo.com