प्रत्येक नव्या तापाबरोबर देशमुख अशक्त होत गेले, चेहरा काळवंडू लागला, दम लागायला लागला. त्यांच्या दोन्ही फुप्फुसांत फायब्रोसिसची सुरुवात झाली आणि तिथले वायुकोश एका विशिष्ट पदार्थानं भरून गेले. हे दम लागण्याचं कारण होतं. हे काही तरी विचित्रच दुखणं होतं. फुप्फुस रोगतज्ज्ञाचा जेव्हा सल्ला घेतला. त्यांनी पहिला प्रश्न केला, ‘तुमच्या घरी कबुतरं आहेत का? तुम्ही कबुतरांच्या जवळ जाता? त्यांना हाताळता? तसं असेल तर तुम्हाला झालाय, ‘हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया’. म्हणजेच कबुतरांची अ‍ॅलर्जी.
सुधीर देशमुख – माझे ‘टेकडीमित्र’. अचानक लक्षात आलं, गेले १०-१५ दिवस दिसलेच नाहीयेत. न राहवून चौकशी केली तर कळलं, ते आजारी आहेत. ‘काय झालंय हो?’ मी डॉक्टरी हक्काने खोदून विचारल्यावर एकानं माहिती पुरवली, ‘न्यूमोनिया आहे म्हणतात- आज-उद्या तुमच्याकडेच येणारेत ते.’ आणि खरंच, त्याच दिवशी सुधीर देशमुख आणि त्यांची पत्नी अंजली दोघेही क्लिनिकमध्ये आले. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांना अगोदरच प्रतिजैविकं दिली होती, तसे ते बरे होते. पण ‘न्यूमोनिया म्हणजे काळजीचं दुखणं म्हणून आलो,’ म्हणाले.
मी तपासलं. एक्स-रे पाहिले. पहिल्या एक्स-रेमध्ये दोन्ही फुप्फुसांत न्यूमोनियाचे डाग दिसत होते. रक्तातल्या पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या. दुसऱ्या एक्स-रेमध्ये न्यूमोनिया बराचसा क्लीअर झालेला होता. मी देशमुखांना तीच औषधं पूर्ण १५ दिवस घ्यायला लावली. त्यांना लवकरच बरं वाटलं. थोडं थोडं फिरायलाही लागले. औषधं संपली आणि २-३ दिवसांत पुन्हा ताप, खोकला, रक्तातल्या पांढऱ्या पेशी वाढलेल्या. या वेळी औषधं बदलून दिली. ताप पुन्हा आला म्हणून पुष्कळशा इतर तपासण्याही केल्या. हिवताप, टायफॉइड, क्षयरोग अशा शक्यता तपासून पाहिल्या. हिवतापाची औषधंही दिली. याही वेळी देशमुखांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढचे १५ दिवस चांगले गेले. समस्या संपली असं वाटलं.
परंतु तसं व्हायचं नव्हतं. ध्यानीमनी नसताना, पूर्वसूचना न देता पुन: पुन्हा ताप, खोकला असं व्हायला लागलं. प्रत्येक नव्या तापाबरोबर देशमुख अशक्त होत आहेत, वजन घटतंय, चेहरा काळवंडतोय, दम लागायला लागलाय असं लक्षात आल्यावर मी छातीचं सी.टी. स्कॅनिंग करून घेतलं. रिपोर्ट आला. दोन्ही फुप्फुसांत फायब्रोसिसची सुरुवात आहे आणि तिथले वायुकोश एका विशिष्ट पदार्थानं भरून गेले आहेत. फायब्रोसिसमुळे फुप्फुसाचं आकुंचन-प्रसरण चांगलं होत नव्हतं. वायुकोश भरल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता. हे दम लागण्याचं कारण होतं. हे काही तरी विचित्रच दुखणं होते. मी तातडीनं फुप्फुस रोगतज्ज्ञ डॉ. केळकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी काळजीपूर्वक देशमुखांना तपासलं, सर्व रिपोर्ट्स पाहिले आणि प्रश्न केला, ‘तुमच्या घरी कबुतरं आहेत का?’ सुधीर आणि अंजली एकमेकांकडे पाहायला लागले, त्याला कारण तसंच होतं.  सविस्तर चौकशी केली तेव्हा साऱ्या गोष्टी स्पष्ट झाल्या.
देशमुख पती-पत्नी पाचव्या मजल्यावर राहत होते. चारही बाजूला खिडक्या. सभोवार पूर्ण वाढलेली झाडं. त्यांच्यावर साळुंक्या, शिंजिर, वेडा राघूंची किलबिल. घरात घुसून दंगा करणारे बुलबुल अन् खिडकीबाहेर वळचणीला घुमणारी कबुतरं. वरून छप्पर घातलेल्या मोठय़ा बाल्कनीत अंजलीनं हौसेनं ठेवलेल्या लाकडी पक्षिघरात कबुतरांची वस्ती, अंडी, पिल्लं, सर्व काही.
‘तुम्ही कबुतरांच्या जवळ जाता? त्यांना हाताळता?’ डॉ. केळकरांनी विचारलं, ‘होय. कबुतरं म्हणजे निर्बुद्ध पक्षी. शुकशुक केलं तर छोटी पाखरं भुर्रकन उडून जातात. हे जागचे हलत नाहीत. हाकलून काढलं अन् उडायला लागले तर पंखांची फडफड इतकी होते- त्यातून पिसं गळतात, बारीक बारीक कण हवेत तरंगतात आणि बाल्कनीत घाण तर विचारूच नका. आमच्या बाल्कनीतच वसाहत केलीय त्यांनी म्हणून बरेचदा हाकलत असतो बाहेर.’ देशमुखांनी कबुली दिली.
‘देशमुख, तुम्हाला झालाय ‘हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया’. म्हणजे कबुतरांची अ‍ॅलर्जी समजा.’ केळकरांनी निकाल दिला.
‘म्हणजे, हा साधा न्यूमोनिया नव्हता?’ ‘न्यूमोनिया कधीच साधा नसतो. पण तुम्हाला कबुतरांपासून धोका आहे. वर्षांनुवर्षे कबुतरांची विष्ठा आणि पिसं यांच्या संपर्कामुळे तुमच्या फुप्फुसात हे बदल होताहेत आणि तुमचा स्टॅमिना खलास करताहेत.’
‘अरे बाप रे, म्हणजे यातून बरा होईल का नाही मी?’
‘प्रथम ब्रॉन्कोस्कोपी आणि लंग बायोप्सी करून हे निदान पक्कं करू या. मग स्टेरॉइड औषधांचा उपचार करू. तीन-चार महिन्यांनीच समजू शकेल, तुमची रिकव्हरी किती होणार ते!’ केळकरांनी निर्णायक आवाजात सांगितलं.
बायोप्सी होऊन निदानाची खात्री पटेपर्यंत आजारपणाचे तीन महिने लोटले होते. ८-९ किलो वजन कमी झालं होतं. घरातल्या घरात साध्या हालचाली करतानाही दम लागत होता. ‘पल्स ऑक्सिमीटर’ या उपकरणानं देशमुख वरचेवर रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण बघत होते. निरोगी माणसाचं हे प्रमाण ९५ ते १०० टक्के इतकं असतं. देशमुखांचं कायम ९० टक्केच्या खाली असे आणि धोक्याचा अलार्म वाजू लागे. ८५ टक्केच्या खाली हे प्रमाण जाता कामा नये असं डॉक्टरांनी बजावून सांगितलं होतं. पण सुरुवातीला तसं सारखंच घसरत होतं. याला उपाय होता घरातच ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्याचा आणि अधूनमधून ऑक्सिजन घेण्याचा. त्याचीही तयारी ठेवली. पण त्याला अजून एक चांगला पर्याय मिळाला.
‘पर्सनल ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ म्हणजे खोलीतली हवा आत घेऊन त्यातला नायट्रोजन काढून घेऊन ऑक्सिजनचं प्रमाण वाढवायचं आणि मग नळीतून तो ऑक्सिजन रुग्णापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारं मशीन. एखाद्या छोटय़ा स्मार्ट सूटकेससारखं हे मशीन त्याला लावलेल्या चाकांमुळे सहजतेनं या खोलीतून त्या खोलीत नेता येतं. देशमुखांना या मशीनमुळे खूपच आराम मिळाला. ऑक्सिजनची पातळी सुरक्षित ठेवता येऊ लागली.
एकीकडं स्टेरॉइड्सची मोठी मात्रा सुरू केली होती. त्यानंही आपलं काम करायला सुरुवात केली होती. फुप्फुसातली अ‍ॅलर्जी हळूहळू कमी होऊ लागली, तसा दमही कमी लागायला लागला. खोकला तर पहिल्या आठ दिवसांतच थांबला. देशमुखांचा काळवंडलेला चेहरा हळूहळू पूर्ववत दिसू लागला. स्टेरॉइड्स द्यायची म्हणजे त्यांच्या दुष्परिणामांना तोंड द्यायचं. आम्लपित्त, मधुमेह, हाडांचा ठिसूळपणा, जंतुसंसर्ग या सगळ्या गोष्टींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं काम मी करत होते. देशमुखांच्या रक्तातली साखर ताब्यात ठेवण्यासाठी औषधांचा वापर करावा लागला.
परंतु कबुतरांचा संसर्ग चालू राहिला असता, तर स्टेरॉइड्स आणि ऑक्सिजन या दोन्ही गोष्टी अपुऱ्याच पडल्या असत्या. डॉ. केळकरांनी स्पष्ट केलं होतं की रुग्णाला कबुतरांपासून दूर ठेवा. तेव्हा मग अंजलीनं कंबर कसली. तळमजल्यावर राहणाऱ्या आपल्या भावाकडे देशमुखांची रवानगी केली. आठ दिवसांत घरातली सगळी अडगळ- जिथे जिथे धूळ साचू शकते, ती काढून टाकली. कबुतरांनी घाण केलेल्या सर्व जागा, विशेषत: बाल्कनी, खिडक्यांचे सज्जे सर्व धुवून घेतलं. त्यानं समाधान होईना म्हणून बाल्कनी एका दिवसात रंगवून घेतली. हे सर्व करताना मास्क आणि ग्लोव्हज वापरणे, काम झाल्यावर कपडे जंतुनाशकात बुडवून ठेवून स्नान करणे ही काळजी घ्यायला अंजली विसरली नाही. तिला मदत करणाऱ्या कामवाल्यांनाही तिनं मास्क वापरायला लावले.
घराच्या सर्व खिडक्या आणि मोठी बाल्कनी सगळीकडे मजबूत नायलॉनच्या जाळ्या (बर्ड नेट) बसवून घेतल्या. इमारतीच्या चारी बाजूंना ड्रेन पाइप झाकण्यासाठी ज्या डक्ट्स बनवलेल्या असतात, त्याही बर्डनेटनं सुरक्षित केल्या. अशा प्रकारे घर कबुतरमुक्त केल्यानंतरच अंजलीनं नवऱ्याला घरी आणलं.  आता अशा मोकळ्या वातावरणात देशमुख पुष्कळच बरे आहेत. हळूहळू चालायला लागलेत. चेहराही टवटवीत दिसायला लागलाय. स्वस्थ बसले तर ऑक्सिजनचे प्रमाण ९३-९४ टक्के राहायला लागलंय. एकंदरीत देशमुख बऱ्याच प्रमाणात सुधारतील अशी आशा निर्माण झालीय. मात्र यानिमित्तानं या विचित्र दुखण्याची माहिती सर्वाना असावी, असं वाटायला लागलंय.
हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस: व्याख्येनुसार अर्थ आहे कोणत्याही ऑर्गनिक (सेंद्रिय) प्रकारच्या धूलिकणांच्या संपर्कामुळे होणारा फुप्फुसांचा दाह. ऑर्गनिक म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यांच्यापासून हवेत मिसळणारे प्रथिनयुक्त कण आणि त्यातले बुरशीसारखे सूक्ष्म जीव. असे असंख्य प्रकारचे कण आहेत, ज्यामुळे हा आजार होऊ शकतो, पण त्यात सर्वात जास्त प्रमाण आहे ‘फार्मर्स लंग’ या आजाराचं. जो खेडय़ात शेतक ऱ्यांना होतो. साठवून ठेवलेल्या गवताच्या गंजी, कडबा, उसाचं चिपाड, धान्य यातून हे कण येतात. अर्थात शहरी लोकांना ‘फार्मर्स लंग’ होण्याची काहीच शक्यता नाही. त्यांना धोका आहे ‘पिजन ब्रीडर्स लंग’ या आजाराचा. म्हणजेच वर वर्णन केलेली देशमुखांची कथा. मोठय़ा शहरांमध्ये या आजाराचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. काय बरं कारण असावं याचं? शहरामध्ये झाडं कमी, मोकळ्या जागा कमी. काँक्रिट जंगलाची बेसुमार वाढ, सर्वत्र बहुमजली इमारती उगवत आहेत. कबुतरांची आश्रयस्थानं आता या इमारतीच आहेत. त्यातून काही धार्मिक मंडळी पोती-पोती धान्य टाकून पुण्य गोळा करतात. हे आयतं अन्न मिळवण्यासाठी पाखरांची एकच झुंबड उडते. त्यात कबुतरं लहान पाखरांवर कुरघोडी करतात. एका वेळी अक्षरश: शेकडो पारवे गोळा होतात. दाणे टिपतात. भुर्रकन् एवढा मोठा थवा उडतो, तेव्हा पिसं आणि विष्ठेचा खच खाली पडतो. हाच प्रकार बहुमजली इमारतींच्या डक्ट्समध्ये दिसून येतो. आज शहरात अशी एक जागा उरली नाही जिथे कबुतरं नाहीत.
छंद किंवा व्यवसाय म्हणून कबुतरं पाळणारे, त्यांना भरपूर धान्य घालून गलेलठ्ठ करणारे, आकाशात त्यांच्या शर्यती लावणारे आणि लाडानं त्यांना कुरवाळणारेही लोक आहेत. बरेच पक्षिमित्र, निसर्गप्रेमी पाखरांसाठी धान्य घराच्या खिडकीत-बाल्कनीत ठेवतात, पाणी भरून ठेवतात. अशा प्रत्येक ठिकाणी निव्वळ संख्याबळावर कबुतरं शिरजोरी करतात असं दिसून येतं. इमारतींच्या तळमजल्यावर सहसा कबुतरं येत नाहीत. दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यांपासून त्यांची ये-जा चालू होते.
वास्तविक पक्षितज्ज्ञ, पर्यावरणवादी यांचं मत आहे, की पशु-पक्ष्यांना त्यांचं नैसर्गिक वसतिस्थान आणि नैसर्गिक भक्ष्य मिळाल्यास त्यांचा उपद्रव माणसांना होत नाही. पण वाढत्या शहरीकरणामुळे अशा जागा कमी होऊ लागल्यात आणि आपल्यापैकी प्रत्येकालाच कबुतरांचा संपर्क कधी ना कधी होत राहतो. अशा संपर्कानंतर किती जणांना तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात याची निश्चित आकडेवारी मी प्रयत्न करूनही हाती लागली नाही. एका पाश्चात्त्य पाहणीनुसार हे प्रमाण १ ते ५ टक्के असावं. ज्या लोकांचं श्वसन संस्थेचं आरोग्य आणि एकंदर सुदृढता मुळातच कमी आहे, त्यांना हा आजार जडला तर जिवावर बेतू शकतं. उदा.- दमा, ब्राँकायटिस, धूम्रपान, मद्यपान, कर्करोग, मधुमेह, एचआयव्ही वगैरे. अॅलर्जी हा प्रकार कधीही निर्माण होऊ शकतो. सुधीर देशमुखांची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. त्यांचा मूळ एरोबिक स्टॅमिना खूप चांगला असल्यामुळे ते एवढय़ा मोठय़ा आजारातून बाहेर पडू शकले.
मग कबुतरांपासून स्वत:चं रक्षण करायचं तरी कसं? कबुतरांना भूतदया दाखवणाऱ्यांना कळकळीचं आवाहन आहे, की त्यांनी भरवस्तीत हे पुण्यकर्म करू नये. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका होऊ शकतो, हे लक्षात घ्यावं. गावाबाहेर, मैदानावर करावं. ग्राहकांना नवनवीन कल्पक सुविधा देणाऱ्या गृहसंकुलांच्या निर्मात्यांना विनंती करायची आहे, की त्यांनी सर्व नवीन इमारती बर्ड प्रूफिंग करूनच ताब्यात घ्याव्यात. बांधकाम होत असतानाच याची योजना करावी. इमारतींच्या दर्शनी भागावर शोभिवंत गवाक्षं, झरोके केलेले दिसून येतात. अशा ठिकाणी कबुतरांना आमंत्रणच मिळतं हे लक्षात घेऊन वास्तुशास्त्रज्ञांनी इमारतींचा आराखडा बनवावा.
सुधीर देशमुख पुन्हा टेकडीवर दिसायला लागलेत. स्टेरॉइड्सचा डोस कमी झाल्यावर मधुमेहानं पण काढता पाय घेतला. त्यांच्या खिशात आता मास्क ठेवलेला असतो. जवळपास कबुतरं दिसलं की ते ताबडतोब नाकावर मास्क चढवतात.   

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित