घरात एकटय़ा, एकाकी राहणाऱ्या अनेक ज्येष्ठांसाठी परोपकाराचा हात पुढे केलाय आपल्या पोलीस खात्याने. हद्दीतील पोलीस ठाण्यात ज्येष्ठांची नोंद केली की त्या पोलीस ठाण्यातून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला जातो. त्यातून अनेक वृद्धांना आणि पोलिसांनाही मिळतात समाधानाचे क्षण.
सायरस आजी ऐंशीच्या घरातल्या! दोन्ही मुलं उच्चशिक्षित, परदेशी स्थायिक. त्यांनी अनेक वेळा आग्रह करूनही त्यांचा परदेशी मुलांजवळ राहायला जाण्यास ठाम नकार! त्या वांद्रयाला एकटय़ा राहात. जवळच राहणारी मुलगी, नात त्यांची अधूनमधून भेट घेई. हवं नको पाही. एकदा नातीसोबत तिचा मित्र आला. आजींना हा मुलगा खूप आवडला. बोलका, मदतीला तत्पर. हळूहळू त्याची व आजीची गट्टी झाली. इतकी की तो एकटा येऊनही आजीला भेटू लागला. त्यांची कामं करून देऊ लागला आणि एक दिवस तो घातवार उजाडला. भरदुपारी एका मित्राला घेऊन तो आला. थकलेल्या, वाकलेल्या आजीचा गळा आवळून, तिच्या अंगावरचे दागिने, घरातली रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला. अर्थात पोलिसांनी त्या दोघांना गजाआड केलेच. पण म्हणून आजीचे प्राण काही परत येणार नव्हते.
मुलांचं उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचं, तिथेच स्थायिक होण्याचं प्रमाण वाढलं तसं विभक्त कुटुंबातील, वृद्धत्वाकडे झुकलेल्या त्यांच्या आईवडिलांच्या एकटं राहण्याच्या प्रमाणात वाढ झाली. आर्थिकदृष्टय़ा संपन्न, पण एकाकी अशा वृद्धांची नवी समस्या निर्माण झाली. त्यांना आधार द्यायला पोलीस खातं पुढे सरसावलं. मुंबईच्या आयुक्तांनी वृत्तपत्रात निवेदन दिलं. साठीपुढच्या ज्या वृद्धांना मुलबाळ नाही अथवा मुलं परदेशी आहेत म्हणून एकटं राहावं लागतं, त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये नाव नोंदवावं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेक एकाकी वृद्धांनी आणि वृद्ध जोडप्यांनी आपली नावं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली.
आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये वृद्धांनी आपलं नाव नोंदवलं की त्यांना एक ओळखपत्र दिलं जातं. त्यात त्या पोलीस ठाण्यामधील अधिकारी व हवालदार यांचे नाव व क्रमांक असतो. तसंच त्या व्यक्तीचं नाव, पत्ता व फोन क्रमांक असतो. त्यासाठी त्यांनी राहात्या जागेचा पुरावा व वयाचा दाखला देणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे या कार्डावर ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन (१०९०) आणि पोलीस कंट्रोल रुमचा क्रमांकही दिला जातो. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत मध्यरात्रीसुद्धा ज्येष्ठ त्यावर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागू शकतात. अशा नोंद झालेल्या वृद्धांकडे पोलीस ठाण्यामधील ‘गोपनीय’ शाखेचे पोलीस नियमित गृहभेटी देतात. या भेटीची नोंद एका वहीत केली जाते. हे पोलीस साध्या वेषात जातात. पण त्यांच्याकडे ओळखपत्र असते. ते पाहूनच वृद्ध त्याच्याशी बोलतात. ते या वृद्धांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतात. सोडवतात. या गृहभेटीसाठी वरिष्ठ अधिकारीही ज्येष्ठांच्या घरी नियमितपणे जातात. नोंदवही तपासतात. त्यांच्या व्यक्तिगत गरजा व अडचणी जाणून घेतात.
पोलीस आयुक्तालयात ‘ज्येष्ठ नागरिक केंद्रीय सुरक्षा समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीत प्रत्येक विभागांतील ज्येष्ठ नागरिकांचे दोन प्रतिनिधी समाजसेवक व पोलीस अधिकारी असतात. या समितीची दर तीन महिन्यांनी आयुक्तालयात बैठक होते. ज्येष्ठांच्या समस्यांचा त्यात ऊहापोह होतो. स्वत: पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांना थेट सूचना देऊन मार्गदर्शन करतात. त्याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यामध्येही दर महिन्याला बैठका घेऊन गृहभेटीसाठी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्या त्या विभागातील ज्येष्ठांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात. या बैठकांसाठी ज्येष्ठांच्या प्रतिनिधींना रिक्षा भाडे देऊन अथवा पोलीस व्हॅनमध्ये बसवून सन्मानाने नेले जाते.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे.व्ही. पवार म्हणाले, ‘‘एकटय़ा राहणाऱ्या वृद्धांकडे येणारे साफसफाईवाले, पेपरवाला, दूधवाला, स्वयंपाकी त्याच्यावर आमची कडक नजर असते. त्यांची ओळखपत्रे कधी-कधी घेतो. आमच्या सतत संपर्कामुळेही अशा लोकांवर चांगला वचक राहतो!
त्याशिवाय आम्ही त्यांच्या शेजाऱ्यांनाही विनंती करतो की तुम्ही दिवसातून एकदा तरी त्यांच्या घरात डोकावून पहा. त्यांना हवं नको विचारा! ज्येष्ठांच्या नातलगांचे फोन-पत्ते आम्ही घेऊन ठेवतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांनाही आम्ही बोलवू शकलो.
‘अर्थात ज्येष्ठांनीही आम्हाला सहकार्य करायला हवं. बरेचदा वयपरत्वे ते दरवाजा लावायला विसरतात व मग घरांत चोरी होते. कधी कधी पोलीस गृहभेटीसाठी जातात त्यांनाच ज्येष्ठ दरवाजा उघडत नाहीत.’ पोलीस  पतंगराव नाईक आपली व्यथा मांडतात. ‘ज्येष्ठांनी स्वत:ची काळजीसुद्धा घ्यायला हवी. त्यांनी अनोळखी व्यक्तीला दार उघडू नये. घरात घेऊ नये. दरवाज्याला सेफ्टी लॉक लावावं. बाहेरच्या व्यक्तींना घरातील तपशील सांगू नये. आपण परगावी जात असल्याचेही सांगू नये. कामवाली, वॉचमन यांचे फोटो, फोन क्रमांक व पत्ता आवश्य घेऊन ठेवावा. गॅसवाले, केबलवाले, प्लंबर, इलेक्ट्रिशीअन, टीव्ही रिपेअर शक्यतो ओळखीचे असावेत अथवा ज्या एजन्सीकडून ते आलेत त्यांना फोन करून त्यांची खात्री करून घ्यावी. अगदी अनोळखी पोलीस जरी पोलीस गणवेषांत आला तरी संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून त्याची खातरजमा करून घ्यावी. नंतरच त्याला घरात प्रवेश द्यावा!’’
याच पोलीस खात्याला ज्येष्ठाचे चांगलेच अनुभवही येतात. गृहभेटीसाठी वारंवार ज्येष्ठांच्या घरी जावं लागत असल्याने त्यांच्याशी पोलिसांचे छान सूर जुळतात. ‘अहो, एकदा त्यांच्या घरी गेलं की ते तासनतास आम्हाला सोडत नाहीत. अगदी उठवत नसलं तरी चहा, सरबताचा आग्रह करतात. एवढं आमच्यावर प्रेम करतात.’ पोलीस हवालदार रवींद्र आंब्रे आपला अनुभव सांगतात. ‘एकदा एका वृद्ध जोडप्याच्या घरी गेलो होतो. मी त्यांची प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा ते भारावले. म्हणाले, ‘आमची मुलं गावातच राहातात. त्यांना आम्ही नको. आमची प्रॉपर्टी हवी. आमची मुलं आमच्यासाठी वेळ काढत नाहीत, पण तुम्ही पोलीस मात्र तुमची डय़ुटी सांभाळून आमच्यासाठी वेळ काढता. तुम्हीच आम्हाला मुलासारखे आहात.’ आम्ही फक्त हजेरी न लावता त्यांच्या व्यक्तिगत अडचणीही सोडवतो. एकदा अपरात्री एका आजोबांच्या छातीत दुखू लागलं. आजींचा मला फोन आला. आम्ही तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलवून त्यांना जवळच्या रुग्णालयांत हलवलं. त्यांच्या मुलीला कळवलं. कधी त्यांची औषधं संपतात. ती आणून देतो. एकदा एका आजोबांनी फोन केला. माझ्या घरात दूध नाही आणि मी खाली उतरू शकत नाही. मी त्यांना दीड लिटर दूध घरी नेऊन दिलं. असाही अनुभव येतो. अर्थात हे फारच क्वचित होतं. एकदा एका आजींच्या घरी ‘लीकेज’ होतं. मी सोसायटीच्या अध्यक्षांना भेटून ते काम करून घेतलं. लीकेज थांबवलं. सोसायटीचे लोक एखाद्या वृद्धाला त्रास देत असतील तर त्यांनाही समज दिली जाते. गरज पडल्यास ज्येष्ठांच्या घरची दुरुस्तीची कामंही प्लंबर, इलेक्ट्रिशीअन बोलवून आम्ही करून देतो. तरीही एका ठिकाणी विपरीत अनुभव आला. मी घरात शिरताच ते आजोबा माझ्या अंगावर धावून आले. म्हणाले, ‘तुम्ही फक्त हजेरी लावायला येता. चालते व्हा!’ मी अक्षरश: गेटवर येऊन रडलो. त्यांच्या बायकोने येऊन माझी माफी मागितली. पण त्यांना म्हटलं, ‘अहो माझे पॅरालीसीस झालेले वडीलही असाच त्रागा करायचे. मी जसं त्यांना समजून घेतलं तसच यांना समजून घेतलं. तुम्ही मुळीच वाईट वाटून घेऊ नका.’ मुलांकडून दुर्लक्ष झाल्याने, एकाकीपणामुळे ते असे वागतात हे आम्हालाही कळत असतं!’
पोलीस इन्स्पेक्टर के.जी. चव्हाण म्हणाले, ‘आम्ही ज्येष्ठांच्या प्रत्येक तक्रारीची योग्य ती दखल घेतो. एकदा एका आजोबांनी फोन केला. माझ्या इमारतीखाली बरेच भिकारी बसतात. मला त्यांचा संशय येतो. आम्ही जाऊन पाहणी केली. ताबडतोब कारवाई केली. एकदा एक तक्रार आली की एका नाक्यावर वृद्धांना क्रॉस करणं कठीण होत होतं आम्ही तातडीने ट्रफिक पोलिसांशी संपर्क साधून झेब्रा पट्टी, स्पीड ब्रेकरची सोय केली. कधी कधी बाजूच्या वस्तीतील लाऊडस्पीकरचा वृद्धांना त्रास होता. अशी तक्रार आली की आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही कार्यक्रम करा, पण त्याचा वृद्धांना त्रास होऊ देऊ नका! आम्ही स्वत: नोंद केलेल्या ज्येष्ठांच्या घरी जाऊन नोंदवही तपासतो. आमचे कर्मचारी नियमित येतात का, त्रास होतो का वगैरे चौकशी करतो. यापुढे पेट्रोलिंगला असणाऱ्या कर्मचारी वर्गाला आम्ही ज्येष्ठ नागरिक वाटून देणार आहोत आणि ‘दत्तक पालक’ योजना सुरू करणार आहोत. अर्थात कामतेंसारखे ज्येष्ठ नागरिक अशीही तक्रार करतात की पोलीस नियमित हजेरी लावत नाहीत, पण पोलिसांची अत्यंत अपुरी संख्या व त्यांच्यावरील अमाप जबाबदाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा त्यांचा विचार करता ते हे काम किती आपुलकीने करतात ते जाणवतं. अर्थात नाण्याची दुसरी बाजू तितकीच गंभीर आहे. एका वृद्ध गृहस्थांना अचानक रस्त्यात चक्कर आली. ते आपली गाडी पार्क करून जवळच्या रुग्णालयात गेले. बाहेर येऊन पाहतात तर ट्रॅफिक पोलिसांनी गाडी उचललेली! त्या गृहस्थांनी हवालदाराला कळकळीने परिस्थिती समजावली. हातांतली औषधं दाखवली. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊनच त्यांची गाडी परत करण्यात आली.
समाजसेवक ज्येष्ठ लिंगन कृष्णन म्हणाले, ‘अशा तक्रारी ज्येष्ठांनी जरूर आयुक्तांच्या बैठकीमध्ये त्यांच्या नजरेस आणून द्याव्या. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल!’ असा अपवाद वगळता सर्वसामान्यपणे पोलिसांच्या सेवेबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली जाते.
स्पेशल ब्रांचचे डी.सी.पी. कुंभारे सांगतात, म्हणूनच अमेरिकेत असणारी त्यांची मुलं ‘तुमच्यामुळे आम्ही निश्चितपणे तिथे जॉब करू शकतो’ असं कृतज्ञपणे सांगतात तो क्षण आमच्यासाठी खूप समाधानाचा असतो.’