प्राणायाम कसा करावा? योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी याचे उत्तर आपल्या पुस्तकात तीन शब्दांत दिले आहे- यत्नमुक्त, यथाशक्ती व जाणीवपूर्वक प्राणायाम करावा.
यत्नमुक्त म्हणजेच हट्टाने, जोर-जबरदस्तीने वा वास कोंडून असा केलेला प्राणायाम लाभ देण्याऐवजी रोग निर्माण करू शकतो. ‘अयुक्ताभ्यास योगेन सर्वरोगसमुद्भव’ असा इशारा आपले ग्रंथ देतात.
यथाशक्ती म्हणजे स्वत:ची क्षमता न ओलांडता! जेवढे जमेल, झेपेल तेवढेच. शेवटी प्राणायाम श्वसनाशी निगडित असल्याने आपल्याला असलेल्या व्याधी आपली पात्रता, शक्ती, आधीचा सराव या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊनच साधना करणे अपेक्षित आहे.
‘जाणीवपूर्वक’ हा शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे. याबद्दल आधीच्या एका लेखामध्ये विस्तृत विचार आला आहे. व्यवहारे गुरुजींच्या मते परिस्थितीचे भान व विषयाचे अवधान सातत्याने सांभाळणे’ म्हणजे जाणीव!
प्राणायामामध्ये शरीर, श्वसन व मन हे तीन घटक अंतर्भूत आहेत.
शरीराची शिथिलता, सुखावहता असेल तरच श्वसननियंत्रण शक्य होईल. श्वसननियंत्रण करण्यापूर्वी श्वसनमार्ग मोकळा असेल, चोंदलेला नसेल तरच सहज श्वास घेता येईल व या साऱ्यांशी मन जोडलेले नसेल तर कृतीत तन्मयता साधता येणार नाही.
आज आपण चोंदलेला श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी एकेक नाकपुडीने श्वसन मार्गशुद्धी करूयात. सुखासनात बसा. पाठकणा समस्थितीत ठेवा. आता उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर नाकाचे हाड जिथे संपते, तिथे अलगद ठेवा. उजवा श्वसनमार्ग बंद करा. आता डाव्या नाकपुडीने पोटाला झटका देत श्वास बाहेर सोडा. पाच आवर्तने करा. डाव्या अंगठय़ाने डावी नाकपुडी बंद करून हीच कृती करा.
दोन्ही बाजूंनी कृती करून झाल्यावर दोन्ही नाकपुडय़ा खुल्या आहेत का, ही जाणीव करून घ्या.

खा आनंदाने : ‘रोजचा वाढदिवस’
वैदेही अमोघ नवाथे,   आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
लेख लिहायला घेतला आणि लक्षात आलं की १ नोव्हेंबरसाठीचा हा लेख आहे. १ नोव्हेंबर म्हणजे आईचा वाढदिवस! ‘या वयात कसले वाढदिवस साजरे करायचे?’ असं आईचं म्हणण असतं. पण डोक्यात एक विचार आला की ‘वाढ’दिवस म्हणजे आपलं आयुष्य एका दिवसानं वाढलं. मग जन्माची तारीख कोणतीही असो रोज आपण एक एक दिवसाने मोठे होतच असतो की! आता ‘वय झालंय’ असं म्हणणं कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं? केस पांढरे होणं, त्वचेला सुरुकुत्या पडणं, हात-पाय कापणं की मधुमेह-अतिरक्त दाब-संधिवात यांसारखे आजार झाल्यावर किंवा नातवंडं झाल्यावर? शारीरिक बदल तर हल्ली लवकर होतात तसेच वर नमूद केलेल्या आजारांना हल्ली ‘वय’ राहिलं नाही, कारण स्ट्रेसफुल आयुष्य झालंय. मग खरं वय झालंय म्हणजे काय? चला आज थोडं बोलू या रोजच्या ‘वाढदिवसाविषयी’.
१. भूक कमी झाली असेल किंवा चावण्याचा त्रास असेल तरी कमी प्रमाणात का होईना पण दिवसातून ३-४ वेळा आहार घेतलाच पाहिजे.
२. वयाप्रमाणे कॅलरीजची गरज कमी असली तरी कॅल्शियम, लोह, ब जीवनसत्त्वे, प्रथिने, ओमेगा ३ वगैरे न्युट्रियन्ट्सची गरज असतेच. त्यासाठी आहारामध्ये विविधता हवी. म्हणजेच अन्नपदार्थ बदलून बदलून वापरावेत.
धान्ये- गहू, ज्वारी, नाचणी, राजगिरा, कुळीथ, बाजरी, लाल तांदूळ
डाळी – डाळी आणि कडधान्ये, विविध डाळी आणि उसळी मोड आलेल्या वापराव्या.
भाज्या – फळभाज्या, पालेभाज्या, बिन्स, सुरण, रताळी वगैरे
इतर – विविध फळे, तेलबिया (तीळ, अळशी, शेंगदाणे, चारोळी), ड्राय फ्रुट्स (पावडर करून) वगैरे वगैरे..
या धान्यांचा आलटून-पालटून वापर करावा.
३. नियमित ध्यानधारणा
४. जमेल तसे पाय ‘मोकळे’ करणं
५. आयुष्याच्या या टप्प्याचा ‘सेकंड इनिंग’चा म्हणजेच ‘दुसऱ्या बालपणाचा’ मनसोक्त आनंद घ्या.
६. रात्रीची ५- ६ तास झोप पुष्कळ आहे. दुपारी झोपणं टाळा.
७. ब्लड प्रेशर, मधुमेहासारखे आजार नियंत्रणामध्ये ठेवा.
८. रोज काही तरी नवीन शिका. तुमच्यासारखे सकारात्मक विचार असणारे मित्र-मैत्रीण करा.  
आरोग्यदायी खाऊ –
साहित्य- राजगिरा लाह्या, ताक किंवा दूध, आणि केळ-सफरचंद-चिकू तुकडे, बदाम-काजू-खजूर काप, अळशीच्या बिया
वरील सर्व जिन्नस एकत्र करा आणि खा अथवा प्या. जिन्नस तुमच्या सोयीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे बदलू शकता.
निवृत्तीचं वय जरी ५८ किंवा ६० असलं तरी ते वय आपल्या कार्यालयासाठी- आपल्यासाठी नाही. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपल्या भूमिका आपण सोडता कामा नये. आयुष्याची खरी मजा ध्येय गाठण्यामध्ये असते जे ध्येय आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही असू शकते. आपापल्या ताकदीप्रमाणे पद्धत बदलू शकते. पण आता ‘मी रिटायर’ झालो किंवा झाले म्हणून आपल्या रुटीनला पूर्णविराम देऊ  नये. लोक काय म्हणतात? बाह्य़रूपाप्रमाणे लोक ज्या ‘टिप्पणी’ करतील त्या असतात आपल्या शारीरिक बदलांविषयी. पण हे बदल आपण स्वत: सकारात्मक दृष्टीने स्वीकारल्यावर आपल्या आत्मिक आणि आध्यात्मिक सौंदर्याचे वाटेकरी कोणीही नसतात आणि हाच निखळ आनंद आपल्याला ‘ब्रह्मानंद’ देऊ  शकतो. आपल्या हातात काय आहे? नेहमीच्या रुटीनमध्ये सम-समान वेळ आपण सात्त्विक खाण्याकडे, शारीरिक व्यायामाकडे आणि मानसिक उन्नतीकडे जर विभागू शकलो तर हे खरं आनंदाचं जगणं! माझ्या समस्त प्रिय आजी-आजोबा वाचकांना या ‘रोजच्या वाढदिवसासाठी’ मन:पूर्वक शुभेच्छा!  शुभं भवतु.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

कायदेकानू : वृद्धांसाठी आरोग्य सुविधा
अ‍ॅड. प्रीतेश सी. देशपांडे – pritesh388@gmail.com
‘ज्येष्ठ नागरिक कायदा २००७’ च्या मसुद्यामध्ये वृद्धांसाठी आरोग्यविषयक सुविधा देण्याचा आणि त्यांच्या संपत्तीच्या सुरक्षेबाबतीतील तरतुदींचा सविस्तर ऊहापोह केला आहे.
या कायद्याच्या चौथ्या भागात ज्येष्ठांसाठी आरोग्य तसेच वैद्यकीय सुविधांविषयी सखोल चर्चा आहे. त्यानुसार सरकारी अनुदानित किंवा अंशत: अनुदानित रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्याच प्रकारे सरकारी अथवा निमसरकारी कार्यालयांमध्ये ज्येष्ठांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. ज्येष्ठांना दुर्धर आजारांसाठी औषधोपचार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
ज्येष्ठांच्या जगण्याच्या तसेच संपत्तीच्या हक्काचे जतन करण्याबाबत कायद्याच्या कलम ५ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. त्याअनुसार या कायद्यातील उपलब्ध फायद्यांविषयी सरकारने दूरचित्रवाणी तसेच वर्तमानपत्रे यांसारख्या माध्यमातून अधिकाधिक प्रबोधन करणे अभिप्रेत आहे. या कायद्याचा फायदा अधिकाधिक लोकांना मिळावा यासाठी सरकार जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांस त्याबाबतचे अधिकार देऊ शकतात.
एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने त्याची संपत्ती अथवा मिळकत पाल्यास देताना आपले योग्य ते पालनपोषण करावे, अशी पूर्वअट घातली असेल आणि या मिळकतीत हक्क मिळाल्यानंतर जर पाल्य त्या ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेण्यास वा पालनपोषणास कुचराई करीत असेल, तर अशा प्रकारचे संपत्ती हस्तांतरणाचे व्यवहार रद्दबातल करण्याचा न्यायाधीकरणास अधिकार आहेत.
त्याचप्रमाणे समजा एखाद्या मिळकतीतून किंवा संपत्तीतून येणाऱ्या उत्पन्नावर ज्येष्ठ नागरिकाची गुजराण अवलंबून असेल आणि ज्येष्ठ नागरिकाच्या पाल्याने समजा ही मिळकत/संपत्ती तिसऱ्या व्यक्तीस विकली, तर ज्येष्ठ नागरिक, काही ठरावीक परिस्थितींमध्ये, त्या तिसऱ्या व्यक्तीकडूनही पोटगी व इतर सुविधांची मागणी करू शकतो.आनंदाची निवृत्ती – शाळेचे ऋण फेडले
नंदकुमार साळवी
ch11३१ मार्च १९९८ रोजी मुंबई महानगरपालिकेतून ३६ वष्रे विविध अभियांत्रिकी विभागांमध्ये सेवा देऊन प्रमुख अभियंता म्हणून निवृत्त झालो. आता याला १६ वष्रे होऊन गेली;
मात्र मी निवृत्त झाल्यावर काय करावयाचे हे नोकरीला लागलो त्याच वेळी ठरविले होते. १९५७ मध्ये रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलमधून मी शालान्त परीक्षा पास झालो. त्या वेळी मुंबई राज्यामध्ये पहिल्या तीस विद्यार्थ्यांमध्ये आल्यामुळे भारत सरकारची दरमहा १०० रुपयांची शिष्यवृत्ती कोणताही अभ्यासक्रम पदवीपर्यंत पूर्ण करण्यासाठी मिळणार होती. सरकारच्या पशावर माझे पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीपर्यंत शिक्षण झाले व माझे आयुष्यच बदलून गेले. निवृत्त झाल्यावर ज्या शाळेमुळे मी मोठा झालो त्या शाळेचे काम करून समाजाचे थोडे फार ऋण फेडायचे ही इच्छा बळावली व पूर्वी सोडलेला संकल्प सिद्धीस नेण्याचे ठरविले.
‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीनुसार, शाळेसाठी भरीव योगदान देण्याचे मार्ग आपोआप दिसत गेले. २००१ साली शाळेचा शताब्दी महोत्सव आम्ही साजरा केला. त्या वेळी निधीअभावी बंद पडलेल्या शाळेच्या २८००० चौ. फुटांवरील इमारतीच्या बांधकामप्रश्नी लक्ष घातले व संस्थेच्या लिपिकाला मदतीला घेऊन ६० लाख रुपयांचे उर्वरित काम ठेकेदार न नेमता विविध कामगारांच्या  साहाय्याने ४० लाख रुपयांमध्ये पूर्ण केले. त्यानंतर २००३ साली माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली. शाळेच्या भौतिक सुविधांबरोबर इतर शैक्षणिक सांस्कृतिक कामामध्ये माझा सहभाग वाढू लागला. पंचकोशावर आधारित गुरुकुल पद्धतीचे शिक्षण देणारा प्रकल्पही गुरुवर्य भाऊराव जोग यांच्या मार्गदर्शनाखाली २००४ साली शाळेमध्ये सुरू केला. तो आता उत्तम प्रकारे चालू आहे. शाळेमध्ये खेळघरापासून बारावीपर्यंतच्या विविध शाखांमध्ये जवळ जवळ चार हजार मुले शिक्षण घेत आहेत.
 १९५६-५७ सालच्या शालान्त परीक्षेत आमच्या शाळेचा विद्यार्थी राज्यामध्ये प्रथम आला होता. यंदाही तो योग ५७ वर्षांनी आला. शाळेची विद्यार्थिनी चिन्मयी मटांगे ही ९९.२० टक्के गुण मिळून राज्यात अव्वल आली. या वर्षी शाळेचा निकाल ९९ टक्के लागला. शाळेची निवड महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शंभर शाळेमध्ये या वर्षी झाली व शाळेला दहा लाख रुपयांचे विशेष अनुदान जाहीर झाले.
शाळेच्या कामामध्ये वेळ चांगला जातो. सध्या कार्याध्यक्षांची तिसरी टर्म चालू आहे. दर महिन्याला १०-१२ दिवस रत्नागिरीला माझा मुक्काम असतो. मध्यंतरी ७ वष्रे देवरुखजवळील एका खेडय़ात असलेल्या सांदोपनी गुरुकुल या संस्थेचे काम केले. संस्थेतर्फे ३० अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो. सातच वर्षांमध्ये संस्थेचा कायापालट करण्यात माझे योगदान मिळाले हे परमभाग्य.
२००५ साली मुंबईत झालेल्या प्रलयाची कारणे शोधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. माधवराव चितळे समितीवर तांत्रिक सदस्य म्हणून ८ महिने  काम केले. तसेच मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांवर हायकोर्टामध्ये २००६ मध्ये जनहित याचिका झाली होती. त्यावर मुंबई हायकोर्टाने नेमलेल्या रोड मॉनिटरिंग कमिटीवर तांत्रिक सदस्य म्हणून वर्षभर काम केले. सध्या आम्ही निवृत्त अभियंते व सामाजिक जाण असलेले इतर व्यवसायांतील तज्ज्ञ यांनी स्थापन केलेल्या मुंबई विकास समितीवर मी काम करीत आहे.
सतत समाजासाठी काम करीत असल्याने वेळ चांगला जातो. तब्येतही या वयामध्ये चांगली आहे. दोन वर्षांपूर्वी १० दिवसांची लेह-लडाखची, १० दिवसांची अंदमानची, तर गेल्या वर्षी १८ दिवसांची युरोपची व ५ दिवसांची लक्षद्वीपची सागरी सहलही केली. या सर्व वाटचालीमध्ये पत्नी व मुलींची भक्कम साथ असते. महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा चालविणे दिवसेंदिवस कठीण होते आहे. जर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेचे काम केले, तर त्या शाळांना नवी उभारी येईल व निवृत्तिकालही सत्कारणी लागेल.