बँकेचं गृहकर्ज घेऊन छोटं घर बांधलं. हक्काचा निवारा मिळाला तरी स्थैर्य काही मिळत नव्हतं. नव्या जागी नव्याने शिकवणी वर्ग सुरू केले. प्रतिसाद इथंही मिळाला. थोडा हुरूप आला. म्हणूनच आता बी.एड्. करायचंच, असा मी निश्चय केला.
झो पडीवजा घरात राहणाऱ्या कुटुंबात माझा जन्म झाला आणि काम करतच शिक्षण चालू होतं. त्याचवेळी १९९१ ला लग्न झालं. तेव्हा बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांला होते. लग्न होऊन ज्यांच्या घरी आले ती सासरची मंडळी खाऊनपिऊन सुखी आहेत, असं कळलं होतं. गावाकडे सासुसासरे दोन-चार एकरांची शेती सांभाळायचे. आम्ही शहरात नोकरीनिमित्त राहायचो. शिक्षण चालू असणारे दोन दीर आमच्याजवळ असायचे. गाव जवळ असल्यामुळे नातेवाइकांचा राबता असायचा. वर वर पाहता सारं आलबेल वाटायचं. मात्र यजमानांचा कमी पगार, त्यात शहरात भाडय़ाचं घर. घरभाडं आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यातच पगार जेमतेम पुरे पडायचा. वर्षभरातच मुलगी झाली. खर्च आणखी वाढला. त्यामुळे बऱ्याचदा भाडं थकीत व्हायचं. घरमालक पाणउतारा करायचे. माझ्या जिव्हारी लागायचं. आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, असे विचार मनात घोळायचे. अशा बिकट परिस्थितीत मी बी.ए. पूर्ण केलं. लागोपाठ दोन घरं सोडल्यानंतर यांच्या जवळच्या मित्राचं घर मिळालं. त्यांची बदली झाल्यामुळे त्यांचं रिकामं घर आम्हाला मिळालं होतं. घरमालकाची किटकिट थांबली असली तरी अडचणींचा पाढा मात्र कायम पिच्छा पुरवीत होता आणि याच काळात आयुष्याला एक वेगळं वळण देणारी घटना घडली.
आमच्याकडे दूध घालायला मुन्नी यायची. आठवीत शिकत होती. एके दिवशी माझ्याकडे गणितातला एक प्रश्न घेऊन आली. मी अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने तिला अडचण सोडवून दिली आणि सरावासाठी काही गणितं करायला दिली. तिने ती गणितं सोडवली आणि मला संध्याकाळी टय़ुशन घेण्याचा आग्रह केला. सोबत माझे दोन भाऊदेखील तुमच्याकडे येतील, असंही सांगितलं. या तीन मुलांमुळे माझा शिकवणी वर्ग सुरू झाला. ‘माऊथ पब्लिसिटी’ झाली आणि आठ-दहा मुलं यायला लागली, थोडी आशा वाटू लागली. आता गाडी सुरळीत चालेल असं वाटत असतानाच त्याच वर्षी ‘ओव्हरियन सिस्ट’चं माझं ऑपरेशन झालं. अंदाजे दोन किलोंचा गोळा होता. ऑपरेशनसाठी तातडीनं सोसायटीचं कर्ज घ्यावं लागलं. बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडायचं बाकी असतानाच हे नवं कर्ज घ्यावं लागलं. कर्जाचा डोंगर वाढतच होता. दोन महिने अंथरुणाला असल्यामुळे शिकवणीतही खंड पडला. नवीन सत्रात पुन्हा शिकवण्या सुरू केल्या. बाराशे-पंधराशे रुपये मिळायचे. दोन वर्षांत चांगला जम बसला. तोपर्यंत घरमालकांना परत यायचे असल्यामुळे घर खाली करून द्यावं लागलं. सततच्या घरबदलीनं जीव मेटाकुटीस आलेला. अशातच ओळखीतल्या व्यक्तीने अर्धा अर्धा प्लॉट दोघं मिळून घेण्याचा प्रस्ताव ठेवला. मला अत्यंत आनंद झाला. भावाकडून दहा हजार रुपये उसनवारीने घेऊन टोकन दिलं. उर्वरित रक्कम जी.पी.एफ.मधून घेतली. बँकेचं गृहकर्ज घेऊन छोटं घर बांधलं. हक्काचा निवारा मिळाला तरी स्थैर्य काही येत नव्हतं. नव्या जागी नव्याने शिकवणी वर्ग सुरू केले. प्रतिसाद इथंही मिळाला. थोडा हुरूप आला. म्हणूनच आता बी.एड्. करायचंच, असा मी निश्चय केला. बी.एड्.ची सीईटी दिली. चांगले मार्क्‍स मिळाल्यामुळे नंबरही लागला. मात्र गावाबाहेर तालुक्याच्या ठिकाणी हे महाविद्यालय असल्याने अपडाऊन करावं लागणार होतं. शिकवण्या बंद होतील आणि लहान दोन मुलांना घरी एकटे टाकून कशाला त्रास करून घेतेस, असं नातेवाइकांनी सांगितलं. बी.एड झालेले कितीतरी बेरोजगारीत खितपत पडले आहेत, असं काहींनी म्हटलं. पण मी निर्णयावर ठाम होते. कारण या शिक्षणामुळे फायदा होईल हा विश्वास होता. २००६ ला बी.एड्. होत नाही तोच कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले. सकाळी शाळा आणि दुपारनंतर शिकवणी वर्ग. खूपच आनंदी होते मी. कारण अडचणींवर मात करीत आयुष्याला वेगळं वळण मिळत होतं. स्पर्धापरीक्षेतही नशीब अजमावत होते. अशातच एका जाहिरातीनं लक्ष वेधलं, सर्व शिक्षा अभियानांतर्गत विषयतज्ज्ञांच्या जागा भरतीची प्रक्रिया सुरू होणार होती. अर्ज भरण्याचा तोच शेवटचा दिवस होता. शाळेतनं थेट घर गाठलं. टय़ुशनला सुट्टी दिली. संपूर्ण कागदपत्रांची फाइल सोबत घेऊन सोमेश्वर मार्गदर्शन केंद्रात फार्म घेऊन फार्म पूर्ण भरला आणि थेट शिक्षण विभाग गाठला. लेखी व तोंडी परीक्षा झाली. निवड यादीमध्ये नाव होतं. नाव पाहून स्वत:चा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता. अडचणीतून तावून सुलाखून निघत, दहा हजार रुपये मानधनाची नोकरी माझ्यासाठी क्षितिजाला कवेत घेणारी बाब होती. आर्थिक बळ पुरवणारी ही घटना माझ्यासाठी आनंदाचा ठेवा होती.
जीर्ण वस्त्रं टाकून नवी वस्त्रं धारण केल्यानंतर जो अत्यानंद होतो ना तसाच आनंद मला तत्क्षणी झाला. आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा माझ्यासाठी तो ‘राजमार्ग’ होता. सोबतच ज्या क्षेत्रात काही करण्याची आवड पूर्वीपासूनच दडी मारून होती तेच क्षेत्र मला मिळालं. या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतल्या मुलामुलींसाठी नवनवे उपक्रम राबवता येईल याचं समाधान मिळालं. शिवाय आपल्या दोन पिलांसाठी आर्थिक पाठबळ उभं करता आलं याचंही सौख्य शब्दातीत आहे. आयुष्यात आलेल्या अडचणींना मी दिशादर्शक म्हणूनच मानत गेले आणि ‘नव्याचा शोध’ घेण्याचं शिकले. या अडचणी व ही संकटे आपल्याला मार्ग शोधण्यास भाग पाडतात तेव्हाच यशाची यशस्वी वाटचाल शक्य होते आणि अडचणींवर विजय मिळविता येतो हे सिद्ध होतं.