लहानपणी आंतरशालेय पाठांतर स्पर्धेत मी रवींद्रनाथ टागोरांची ‘Authorship’ ही कविता म्हटली होती. मला कविता आवडली होती आणि बाईंनी दाखविलेला रवींद्रनाथांचा सुंदर फोटो मनाच्या तळाशी जाऊन बसला होता. हीच त्यांची माझी पहिली ओळख. ‘काबुलीवाल्या’तल्या मिनीशी तर गट्टीच जमली. रवींद्रनाथ टागोर हे लहान मुलांसाठी लिहिणारेच कवी, लेखक आहेत; असंच त्यावेळी वाटून गेलं. भरघोस दाढी आणि मोठे काळेभोर डोळे असा त्यांचा फोटो कुठं दिसला की हे आपल्याला माहीत आहेच याचंच समाधान वाटे.
अनेक वर्षांनी रवींद्रनाथांच्या ‘नष्टनीड’ या कादंबरीवरचा ‘चारुलता’ हा चित्रपट पाहिला आणि बालपणातला प्रसंग मनात जागा झाला. चित्रपटाची कथा रवींद्रनाथांच्या जीवनाशी संबंधित आहे, असं समजलं आणि रवींद्रनाथ आणि त्यांचं साहित्य याविषयी मनात परत कुतूहल निर्माण झालं. ‘गीतांजली’ (इंग्रजी) ‘गार्डनर’ परत परत वाचताना मराठी कवितेपेक्षा हे काव्य जास्त उत्कट, तरल आहे असं जाणवलं. ‘मराठीत अनुवादित झालेल्या ‘एकविंशती’ या कथासंग्रहानं, मानवी मनाचा अचूक वेध घेणारा कथाकार म्हणून रवींद्रनाथांचा परिचय करून दिला. ‘वंग भाषा प्रचार समिती’चे वर्ग सुरू झाल्याचं समजलं. मी हौसेनं त्यात नाव दाखल केलं. हेतू हा की बंगाली भाषेतून रवींद्रनाथांच्या जास्त जवळ जाता येईल. या वर्गामुळं मला बंगाली भाषेची लिपी समजली. कोलकात्याहून मागवलेल्या पुस्तकांत ‘गुल्पगुच्छ’ या कथासंग्रहाचे तीन खंड, बंगाली ‘गीजांतली’ ‘शिशु’ (बंगाली बालगीत संग्रह) आणि बंगालीतून इंग्रजीत असा शब्दकोश मिळाला. शब्दकोशाच्या साहाय्यानं एकेका शब्दाचा अर्थ लावून मी ती सारी वाचून काढली. साहित्य अकादमीनं प्रकाशित केलेली, मराठीत अनुवादित केलेली काही पुस्तकं आणि Rabindranath Tagore, A Centenary Volume’ 1861-1961 या पुस्तकातल्या लेखांवरून अनेक विचारवंतांच्या नजरेतून रवींद्रनाथांच्या जीवनाकडे पाहता आलं. पण हे सारं विस्कळीत होतं. त्यात सलगपणा नव्हता. एक दिवस अचानक एका दुकानात बंगालीतून इंग्रजीत अनुवादित केलेलं रवींद्रनाथांचं संक्षिप्त चरित्र मिळाले. त्यात त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो आणि प्रत्येकाचा अल्पसा परिचय दिला होता. मी कोलकात्याला गेले असतानाजोडासांको विभागातील ‘ठाकूरबाडी’ ही हवेली पाहिली होती. मी पुस्तकातल्या रवींद्रनाथांच्या कुटुंबीयांना कल्पनेनंच त्या हवेलीत नेलं तेव्हा माझ्या डोळ्यांपुढं एक सुसंस्कृत, विद्याविभूषित, कलासक्त, नवमतवादी, देशप्रेमी, थोडक्यात सर्वार्थानं वैभवशाली असं ठाकूर कुटुंब उभं राहिलं, ज्यात मला रवींद्रनाथाच्या अजोड व्यक्तिमत्त्वाची मुळं सापडली.
प्रतिभावान, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, सहृदय जमीनदार, ग्रामोद्धाराचा ध्यास घेणारा समाजसुधारक, चित्रकार संगीतज्ज्ञ, स्वाभिमानी देशभक्त आणि पूर्व-पश्चिम संस्कृतींच्या मीलनाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा महामानव असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते आणि त्याला कोंदण लाभलं होतं ते आकर्षक रूपसंपदेचं! बालपण, यौवन, वार्धक्य, आयुष्याच्या कोणत्याही अवस्थेत विलोभनीय असलेल्या रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्या मनावर कमालीचा प्रभाव पडला होता. भेटेल त्याच्याजवळ मी त्यांच्याविषयीच बोले. पण रवींद्रनाथांचं नाव घेतलं की संदर्भ येत, ते फक्त ‘नोबेल पारितोषिक’ आणि ‘शांतिनिकेतन’ यांचेच! इतर गोष्टींबद्दल फारच थोडय़ांना माहिती होती आणि तीच माझ्या मनातली खंत होती. मला रवींद्रनाथांच्या जीवनावर साधं-सोपं सुटसुटीत पुस्तक लिहून त्यांच्या अनेकपदरी व्यक्तित्वाचा वाचकांना परिचय करून द्यायचा होता. म्हणूनच साकेत प्रकाशनने प्रसिद्ध केलेलं ‘रवींद्रनाथ टागोर एक संपन्न व्यक्तिमत्त्व’ हे पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांच्या समग्र परीक्षणात्मक चरित्रलेखनाचा आविर्भाव नसून रवींद्रनाथांबद्दल आपल्याला जे भावलं, आपण जे सुंदर अनुभवलं ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक हेतू होता.
chaturang@expressindia.com