पतीनिधनानंतर एखाद्या स्त्रीला काय विदारक अनुभव येतात त्याची मीही साक्षीदार आहे. मीही अनेक बऱ्यावाईट अनुभवांना सामोरी गेले आहे. त्यातून मी एवढं शिकले की, स्वत: आपल्या विचारांशी प्रामाणिक आणि ठाम असलं की, कडवट अनुभव सुसह्य़ होतात, त्यांचा तेवढा त्रास होत नाही. यामुळेच वैधव्य आल्यानंतर जेव्हा काहींच्या घरून पूर्वी येणारं हळदीकुंकवाचं आमंत्रण आलं नाही तेव्हा ती गोष्ट मनाला तेवढी लागली नाही. काहींनी बोलावलं पण हळदकुंकू लावायचं टाळलं. माझ्या डाव्या-उजव्या बाजूला बसलेल्या सौभाग्यवती स्त्रियांना ते लावलं, बांगडय़ा दिल्या. मला वगळलं. दुसऱ्या वर्षी मी त्या घरी हळदी कुंकवाचं आमंत्रण येऊनही जाण्याचं टाळलं. मला माझ्या स्त्रीत्वाचा तो अपमान वाटला. तोसुद्धा दुसऱ्या स्त्रीनेच केलेला. थोडा विचार करता मनात आलं, हळदकुंकू लावणाऱ्या यजमानीण बाईंना कदाचित वाटलं असेल की, मलाच ते लावून घेणं आवडणार नाही. म्हणूनही त्यांनी टाळलं असेल. म्हणून मीच आता हळदीकुंकवाच्या समारंभाच्या वेळी सांगते, ‘मला कुंकू लावलं तरी चालेल.’ ही गोष्ट फक्त हळदीकुंकवापुरती मर्यादित नसते. औक्षण करणं, कुणाची ओटी भरणं, सवाष्ण जेवू घालणं अशा अनेक गोष्टींतून विधवेला वगळलं जातं. ती अपशकुनी मानली जाते. पत्नीचं निधन झालेल्या विधुर पुरुषाच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही. पत्नी गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनही त्याचा दैनंदिन व्यवहार सुरू होऊ शकतो. मात्र पतीनिधनानंतर स्त्री लगेच घराबाहेर पडली तर केवढा गदारोळ उठतो! पतीचं निधन म्हणजे जणू पत्नीने केलेलं पाप वा गुन्हा अशी वागणूक समाजाकडून तिला मिळते. मंगळसूत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो जिच्या तिच्या मर्जीचा, मनाचा प्रश्न! माझ्या भाचीला वयाच्या ४२व्या वर्षी वैधव्य आलं. मृत्यूपूर्वी तिचा नवरा तिला म्हणाला होता, ‘मी गेल्यावर तू आता जशी राहतेस तशीच राहा. काही बदल करू नकोस.’ कदाचित या कारणामुळे असेल किंवा मुंबईसारख्या असुरक्षित शहरात गळ्यातलं मंगळसूत्र संरक्षक कवच वा अस्त्र वाटत असल्यामुळे असेल, तिने गेली ५-६ र्वष ते गळ्यातच ठेवलंय. विशेष म्हणजे त्या बाबतीत तिच्या आई-वडिलांनी वा सासूनेही हरकत घेतली नाही. मागच्या पिढीतल्या तिच्या सासूनेही पतीनिधनानंतर मंगळसूत्र काढलं नव्हतं. ती म्हणायची, ‘हे गळ्यात असलं की माझे पती माझ्या हृदयाजवळ आहेत असं मला वाटतं.’ काहीही असो, समाजाला सामोरं जाण्याचं धैर्य दोघींतही होतं. माझी मुलगी वा सून या मंगळसूत्र व कुंकू दोन्ही गोष्टी नित्यनियमाने परिधान करत नाहीत. त्या नेहमी सलवार-कुरता घालतात. माझ्या सुनेच्या मैत्रिणीची आई नेहमी कपाळावर मोठं ठसठशीत कुंकू, हातभर बांगडय़ा, कानात हिऱ्याची कुडी, केसात कायम फुलांचा गजरा वा वेणी माळलेली, जरीकाठी साडय़ा नेसलेली अशी असायची. ती आपल्या सुनेला एकदा म्हणाली, ‘काय गं, तुम्ही हल्लीच्या मुली, ओक्याबोक्या गळ्याने, मोकळ्या हाताने आणि पांढऱ्या कपाळाने फिरता! लग्न झालंय ना तुझं, मग अशा विधवेसारख्या का वावरता?’ ती सूनही तेवढीच फटकळ. म्हणाली, ‘अहो आई, कपाळभर कुंकू लावून, गोठपाटल्या घालून नवऱ्याशी वचावचा भांडण्यापेक्षा आणि कटकट करण्यापेक्षा हा शृंगार न करता आम्ही आमच्या जोडीदाराचा मान ठेवतो, सुखाने संसार करतो आणि त्याबद्दल आमच्या नवऱ्याची तक्रारही नसते.’
कुणी अंगाखांद्यावर काय घालायचं, किती दागिने घालायचे हा जिचा तिचा प्रश्न आहे. पण माझे पती निधन पावल्यावर माझी मुलगी जेव्हा मला काही दिवसांनी तिच्या घरी घेऊन गेली तेव्हा माझ्या आवडीच्या मोगऱ्याच्या गजऱ्यांनी माझं स्वागत केलं. तिच्या हाताने माझ्या केसात माळले. तेव्हा माझा ऊर भरून आला. कारण गजऱ्यांचा घोस केसात माळायला मला खूप आवडायचं हे तिच्या लक्षात होतं. त्या आनंदाला आईला का पारखं करायचं? हा विचार तिच्या मनात आला. त्या क्षणी माझ्या मनात आलेल्या विचारांना, उसळलेल्या भावनांना शब्दबद्ध करायला मी असमर्थ आहे. तिच्या या एका कृतीने मला जाणीव करून दिली की, समाजाने मला, मी या या गोष्टीला अपात्र आहे, अमुक अमुक गोष्टीतून आपण वगळले जाणार आहोत, माझे काही हक्क नाकारले जाणार आहेत, असं दाखवून दिलं तरी आपण खचून जायचं नाही. आपल्या अंतर्मनाचा कौल घ्यायचा आणि त्याचप्रमाणे वागायचं. त्यामुळेच ४५ वर्षांच्या सहजीवनानंतर आलेलं एकटेपण मी निभावू शकते.
– प्रमिला राऊत, सोलापूर

वहिनीची भीती गेली
डॉ. शारदा महांडुळे करत असलेल्या समाज प्रबोधनाचा अभिमान वाटतो आहे. मीही तो प्रयत्न केला. माझ्या आतेभावाचे निधन झाले. दोन महिने उलटले आणि नवरात्रीचा उत्सव जवळ आला. आमच्याकडील समाज मंदिरातील देवीची ओटी भरण्याची प्रथा घरी असल्याने वहिनीला मी नवी साडी आणण्यास सांगितले. विविध समजुतींच्या पगडय़ामुळे ती साडी आणण्यासाठी तयार होईना. मी तिला समजावलं. तुझ्या वैधव्याचा देवीची साडी आणण्यात अडथळा येईलच कसा? खूप समजावल्यावर, काहीशी जबरदस्ती केल्यावर ती यासाठी राजी झाली. मुख्य म्हणजे घरातीलही कुणी काही बोललं नाही. सारं सुरळीत पार पडलं. मात्र, या प्रसंगामुळे आता तिची भीती गेली व तिला आत्मविश्वास आला.
– शैलेंद्र बोचकारी

काळनिर्णय
‘जिणे वैधव्याचे’ या लेखामुळे काही महिन्यांपूर्वी आमच्या दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या अंकात लिहलेल्या एका लेखाची आठवण झाली. आपल्या हिंदू धर्मात काही गोष्टींना खूप प्राधान्य दिलं जातं. अर्थात ते सर्व अयोग्य आहे, असं नाही पण त्याचा जास्त बाऊ केला जाऊ नये. कुंकू तर मुली-स्त्रिया अगदी लहानपणापासून लावत असतात. म्हणून कुंकू लावणं किंवा टिकली लावणं हा प्रत्येक स्त्रीचा अधिकारच आहे. तो अधिकार बजावायचा की नाही हासुद्धा तिचा वैयक्तिक प्रश्न! तेव्हा एका मुलीने किंवा विवाहित स्त्रीने कुंकू-टिकली लावली किंवा नाही तर त्यावर टीका केली जाऊ नये. म्हणूनच आम्ही मुलुंड दैवज्ञ समाजाच्या महिला मंडळाने निर्णय घेतला की, चैत्रगौरी, श्रावणमास, नवरात्र व संक्रांत यानिमित्ताने आयोजित होणाऱ्या हळदी-कुंकू समारंभाच्या कार्यक्रमाचा ‘हळदी-कुंकू’ असा उल्लेख न करता त्या त्या वेळेचे ‘स्नेहमीलन’ असा उल्लेख करायचा. निर्णय ताबडतोब अमलातही आणला गेला. आमच्या कार्यक्रमांमध्ये हळदी-कुंकवाव्यतिरिक्त इतरही कार्यक्रम आयोजित केले जातात, पण ‘हळदी-कुंकू’ या शब्दामुळे काही महिला येऊ शकत नव्हत्या. आता मात्र सर्व महिला आनंदाने, स्वखुशीने समारंभात भाग घेऊ लागल्या. प्रतिसाद छान मिळतोय.
मंगळसूत्राबाबतही असेच होते. नवराच बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. मंगळसूत्र म्हणजेच पवित्र दोरा! मग तो फुलांचा असो, मण्यांचा असो- सोन्यामध्ये गुंफलेला असो तो एक पवित्र धागाच! यामागे आशीर्वाद आहे, पवित्रता आहे. मग असं हे मंगळसूत्र नवरा गेल्यानंतर अपवित्र समजून वज्र्य का करावं? तन-मन-धन या गोष्टीने जर स्त्री तो असताना एकरूप होत असेल तर त्याने बांधलेलं ते पवित्र सूत्र तो गेल्यानंतर काढून का टाकावं? तो गेला म्हणून त्या सूत्रातला पवित्रपणा नष्ट होतो का? उलट तो पवित्र धागाच तिचं रक्षण करण्यास समर्थ ठरतो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे कुणी तरी पुढे तर कुणी मागे जाणारच! तरीही स्त्री कुठल्याही क्षेत्रातली असो, तिने मंगळसूत्र घातलं किंवा नाही याचा फार बाऊ न करता त्याचा सन्मान करावा. एखाद्या विधवा स्त्रीने मंगळसूत्र घातलं तर तिचा अपमान न करता तिचा सन्मानित करावा. अर्थात या सर्व गोष्टी रूढ व्हायला काळ जावा लागेल अखेर निर्णय काळाचाच!
– हेमा धोंडे, मुलुंड (पूर्व)
अनोखा उपक्रम
विधव्या महिलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या पारंपरिक विषमतेला आळा घालण्यासाठी माझी आई स्मिता जोशी आणि तिच्या ‘बांधिलकी’ या सामाजिक संस्थेने आगळावेगळा उपक्रम राबवला. देगांव या दापोली तालुक्यातील एका खेडेगावात आम्ही एक १० विधवा सासूंच्या ओटय़ा त्यांच्या सवाष्ण सुनांकडून भरून घेतल्या व काही विधवा सूनांच्या ओटय़ा सवाष्ण सासूबाईंकडून भरुन घेतल्या. विशेष म्हणजे उपक्रम राबवण्यापूर्वी झालेल्या चर्चेतही ग्रामीण भाग असूनही महिलांनी आढेवेढे घेतले नाहीत. उलट या सोहळ्याचे स्वागतच केले. कारण औक्षण करणे, हळदीकुंकू सोहळा वा ओटी भरणे या शंभर टक्के महिलांच्या अधिकारातील बाबतीत विधवा, सधवा असा भेद का, सरसकट सर्वच महिलांना यात सहभागी होता यावे हा विचार आता रुजू पाहतोय.
-वृषाली कान्हेरे
परिवर्तन घडो
डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे यांचा लेख म्हणजे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, पुरोगामी म्हणवणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचं जळजळीत वास्तवच जणू. आजही आपल्या समाजात विधवांना मिळणारी कौटुंबिक व सामाजिक वागणूक ही समस्त स्त्री-जातीकडूनच मिळत असते. तेही त्याच ‘स्त्री’कडून जिला उद्या कदाचित याच वास्तवाला सामोरं जायचं आहे. जाणाऱ्या पुरुषाने मरताना कदाचित एकदाच मरणयातना भोगल्या असतील, पण विधवा स्त्री तर रोज मरणयातना भोगत असते. त्याच्या निराकरणाकरिता            डॉ. महांडुळे करत असलेल्या प्रयत्नांना लक्षावधी विचारांचं बळ मिळून परिवर्तन घडून येवो यासाठी शुभेच्छा.
– अपर्णा ठाकूर, चंद्रपूर</p>

‘क्रांती’ हेच उत्तर
मंगळावर मानवनिर्मित यान पाठवल्याच्या आजच्या प्रगत काळातही विधवांच्या वाटय़ाला येणाऱ्या हृदयद्रावक व अपमानास्पद वागणुकीबाबत वाचल्यावर मनाला खूप क्लेश झाला. स्त्रिया सुशिक्षित होऊन सर्व क्षेत्रांत नेत्रदीपक यश संपदून चमकताना दिसतात. तरी त्यांचं वैधव्याचं जिणं एवढं केविलवाणं का? बायको वारल्यावर नवरा लगेच महिन्याच्या आधीच बोहल्यावर चढून आपला ‘पराक्रम’ दाखवितो. परंतु स्त्रियांच्या नशिबी दु:खाचा पर्वत का? विधवांचं पुनर्वसन होण्यासाठी समाजसुधारक धोंडो कर्वे यांनी विधवेशी पुनर्विवाह करून समाजाला मार्गदर्शन केलं. तरी २१व्या शतकातही समाजात त्याचं अनुकरण का नाही?
माझ्या मते समाजात आमूलाग्र बदल म्हणजे ‘क्रांती’ हेच त्याचं उत्तर आहे. फ्रान्सची राज्यक्रांती ‘स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व’ यांनी जगाला मार्गदर्शन केलं. तसंच आपल्या देशात स्त्रियांनीच स्त्री-भ्रूणहत्या, बलात्कार व विधवांचं पुनर्वसन सर्वार्थाने क्रांतीचे ध्वज लावले पाहिजेत.
एका बारशाला मी अनुभवलेला प्रसंग मन घायाळ करणारा होता. बाळाचं नाव ठेवून झाल्यावर सर्व जणी बाळाच्या आईची ओटी भरून बाळाला आहेर देतात. माझ्या मागून विधवा स्त्री आल्यावर तिला त्यासाठी नकार मिळाला. मी तिची बाजू घेऊन थोडं बोलण्याचा प्रयत्न केला. तर मलाच समजुतीचे चार शब्द ऐकवत इतर बायकांनी एकीचं बळ दाखविलं.
प्रत्येक स्त्रीने असा नेम करावा की, एका तरी विधवेच्या आयुष्यात मी आनंदाचा नंदादीप तेवत ठेवीन. वैधव्याच्या वाळवंटाचं निर्मूलन करून तेथे आनंदाची हिरवळ निर्माण करण्यासाठी अशा अनेकांचे परिश्रम, प्रयत्न व सातत्य आवश्यक नाहीत का?
– मधुमालती पुजारे, देवनार, मुंबई</p>