‘एक अटळ शोकांतिका..’ आरती कदम यांचा (१ फेब्रुवारी) लेख वाचून मन सैरभैर झाले. लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात. या शोषणाला बळी पडणाऱ्या मुली या मुख्यत: अल्पवयीन असतात. त्यांना काय घडते आहे, हे कळेपर्यंत अनेकदा उशीर झालेला असतो. जवळच्या नातेवाइकांकडून हे कृत्य होणे ही लज्जास्पद बाब आहे. मुलगी वयात येताना तिला जपायला पाहिजे, आईने विशेषकरून तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तिला माहिती दिली पाहिजे. एनजीओतर्फे विविध शाळांमध्ये माहिती देण्यात येणार आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे निदान मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. पण यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत, समाजाच्या सर्वत थरांतून प्रयत्न होण्याची गरज आहे, हे नक्की.
-मनीषा जगताप, पुणे.

हृदयस्पर्शी लेख
‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ आणि ‘देहरूपी उरावे..’ १५ फेब्रुवारीच्या अंकातील हे दोन्ही हृदयस्पर्शी लेख वाचले. डॉ. ऋतुजा पाटील- कुशलकर व सदानंद राजवाडे हे दोघेही दुर्मीळ अशा रोगांनी व्यथित आहेत. मृत्यू अटळ आहे. पण, तो त्या दोघांना समोर दिसत आहे म्हणून त्याच्या भेटीला जाण्यासाठी दोघेही आनंदाने सज्ज होत आहेत!
परंतु दिनेश गुणे यांचे मित्र सदानंद राजवाडे यांनी देवरुखसारख्या अर्धशहरात केलेला निर्धार मानवतावादी व लक्षणीय आहे. दोन अंधांना दृष्टी मिळावी व आपल्याला झालेल्या दुर्मीळ अशा रोगाची कारणमीमांसा व त्यासाठीच्या संशोधनासाठी मृत्यूनंतर नेत्रदान व देहदान करण्याचे त्यांनी योजले आहे. खरोखर मनापासून त्यांना सलाम!
या निमित्ताने मला समस्त वाचकांना आवाहन करावेसे वाटते की, मृत्यूनंतर चितेत किंवा मातीत जाणारा देह संशोधनासाठी, भावी डॉक्टरांना शिकण्यासाठी व गरजुंना अवयव दानासाठी वापरला जावा यासाठी त्यांनी देहदान, नेत्रदान, त्वचादान आणि मेंदू मृत झाल्यानंतर विविध अवयवदानांचा विचार अवश्य करावा. हजारो रुग्ण अशा दात्यांची मृत्युशयेवर वाट पाहात आहेत.
-गोविंद काजरोळकर, पुणे</strong>

विचारप्रवर्तक लेख
‘चतुरंग’मधील ‘प्रयोगशील पालकत्व’ या सदरामधील ‘मी शाळा बोलतेय’ या शीर्षकांतर्गत ४ जानेवारी व १८ जानेवारीमधील पुरवणीतील अनुक्रमे ‘मैत्रीचा अवकाश’ व ‘घडवणं स्वत:ला’ हे रेणू दांडेकर यांचे दोन्ही लेख अत्यंत आवडले. सर्वच पालकांनी व शिक्षण क्षेत्रातील लोकांनी आवर्जून वाचावेत असेच हे लेख आहेत. मुला-मुलींच्या वयानुसार बदलणारे रूप व टप्पे याबाबतचे दांडेकर यांचे सूक्ष्म निरीक्षण त्यांनी अचूक व नेमकेपणाने शब्दबद्ध केले आहे.
शाळा ही प्रयोगशील कार्यशाळा हवी. मुलं स्वत:च शिकतात. मुलांच्या परीने त्यांचा शोध सातत्याने सुरू असतो. घर, परिसर आणि समाज येथे जशी मुलं शिकतात, तशीच शिकण्याची रचना शाळेत हवी. मुलांना संधी देणं एवढंच आपलं काम. शाळा व पालक यांना मुलांच्या शिकण्याच्या शोधातील अडसर बनता कामा नये. त्यांचे विचार अनुकरणीय आहेत.
-दस्तगीर शिकलगार, सातारा.