‘एकला चालो रे स्वेच्छा पर्यटनाला’ (२३ नोव्हेंबर) या पायल भोसेकर तिडके यांच्या लेखाने सुरू झालेली संपूर्ण चतुरंग पुरवणी वाचनीय होती. सर्वप्रथम असा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल पायल यांचे अभिनंदन. त्यांचा अनुभव खरोखरीच थरारक आहे. आशिया खंडातील अनेक ठिकाणे, विविध देश खूप प्रेक्षणीय आहेत आणि त्याची चुणूक सदरच्या लेखातून आलेली दिसते. इतर धाडसी मराठी मुलामुलींना हा लेख नक्कीच स्फूर्ती देईल. भोसेकरांकडून त्यांच्या स्वेच्छा पर्यटनाबद्दल आणखी वाचायला नक्कीच आवडेल.
चंद्रकांत चव्हाण यांचा ‘व्हेन्टिलेटर’ हा ब्लॉग आवडला. खूपच अस्वस्थ करणारा वाटला. वैद्यकशास्त्र इतके प्रगत होऊनसुद्धा हल्ली डॉक्टर कोणत्याही गोष्टीची खात्री देत नाहीत! अशा परिस्थितीत पसा का खर्च करायचा हा भाऊसाहेबांचा विचार व्यावहारिक वाटतो. परंतु सर्वसामान्य माणसाला ‘लोक काय म्हणतील’ याची चिंता असते.
 मंगला गोडबोलेंनी ‘वा! गुरू’ मांडलेला जुन्या-मधल्या-नव्या पिढीतील फरक ठसठशीत आहे. पूर्वी शिक्षकांबद्दल खरोखरीच आदराची भावना होती, कारण ते शिकवायचेही उत्तम. वर्गात ३०-४० मुले असली तरी त्यांचे सर्वाकडे लक्ष असायचे. आता त्यांचेच ज्ञान किती आहे (सन्माननीय अपवाद वगळून) हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.  
‘कामस्वास्थ्य’ हे सदरही वाचनीय असते. अनेक रूढ समजुतींना मुरड घालायचे काम या सदराद्वारे होत असते. या सदरावरील प्रतिक्रियाही खूप कमी असतात, कारण अजूनही याबाबतीत आपण उघडपणे काही संवाद साधू शकत नाही वा चर्चा करू शकत नाही, हेच खरे.
– अभय दातार, मुंबई

मोलाची भर
चतुरंगमधील ‘विज्ञानकन्या’ हा डॉ. मानसी राजाध्यक्ष यांचा (९ नोव्हेंबर) लेख वाचला. प्रस्तुत लेखात दोन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा होता असे वाटते. तो न झाल्यामुळे लेख अपूर्ण वाटतो. उल्लेख न झालेल्या विषयांबद्दलचा तपशील. देशातील विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जाणारा ‘भटनागर पुरस्कार’ हा या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. डॉ. शुभा टोळे या हा पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महाराष्ट्रीय महिला वैज्ञानिक आहेत. त्यांचा उल्लेख या लेखात व्हायला हवा होता असे वाटते.
लेखाचा शेवट, ‘विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीची माहिती करून घेऊन ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू आणि नव्या पिढीतील कन्यांना, आगे बढो असे म्हणून प्रोत्साहन देऊ’, अशा वक्तव्याने झाला आहे. त्या ऐवजी या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक काही लिहिले असते तर ते अधिक प्रोत्साहक ठरले असते. जिज्ञासूंसाठी म्हणूनच या क्षेत्राविषयी असलेली माहिती देत आहे. विज्ञान संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली, शंभराहून जास्त वर्षे जुनी असलेली बंगलोरची Indian Institute of Science (IISc) ही संस्था अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. २००६ साली भारत सरकारने विज्ञान संशोधनासाठी व या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुण मुला-मुलींसाठी खास पाच संस्था स्थापन केल्या आहेत. त्या संस्था म्हणजे “Indian Institute of Science Education & Research (IISER).” पुणे, कोलकाता, भोपाळ, मोहाली आणि तिरुअनंतपुरम् या पाच ठिकाणी या संस्था आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात जो दर्जा ककळ या संस्थांना दिला गेला आहे तोच दर्जा भारत सरकारने ककरएफ या संस्थांना दिला आहे. उत्कृष्ट शैक्षणिक व संशोधनाचा दर्जा असलेल्या या संस्थांमध्ये अनेक हुशार विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. डॉ. मानसी राजाध्यक्षांच्या लेखाच्या पाश्र्वभूमीवर मला हे सांगताना आनंद वाटतो की, मुलांच्या बरोबरीने आता अनेक मुलीसुद्धा स्वेच्छेने व कुटुंबाच्या प्रोत्साहनाने विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात येत आहेत.
– डॉ. वर्षां झाडे (नेत्रतज्ज्ञ), नागपूर.

आभासी जग
आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असतानाच कित्येक तोटेसुद्धा झाले आहेत. हे आठवण्याचे कारण ‘ई-व्यसन’ हा गौरी कानिटकर यांचा ‘त्याचं, तिचं ‘लाइफ’ या सदरातील १९ ऑक्टोबर लेख वाचला. इंटरनेट हे माहिती शोधण्याचे प्रभावी माध्यम आहे हे कबूल मात्र फेसबुकसारख्या सोशल नेटवìकग साइट्सवर वापरली जाणारी भाषा चिंताजनक आहे. यापकी किती जणांना व्याकरणदृष्टय़ा एखादे तरी शुद्ध वाक्य तरी लिहिता येईल का, ह्य़ाबद्दल शंका वाटते. तसेच आपल्यावर एखादे संकट कोसळल्यास फेसबुकवरील मित्र वास्तव जगात मदतीला येईल का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच ‘नाही’ असेच द्यावे लागेल, याची तरुण पिढीला जाणीव आहे का..
– केतन र. मेहेर, विरार.

मुलांना यंत्रमानव बनवू नका!
पॅकेज (९ नोव्हेंबर) हा मंगला गोडबोले यांच्या सदरातील लेख अतिशय आवडला. आपल्या मुलांचं उद्याचं जग सुंदर, समृद्ध व्हावं, असं समाजातील प्रत्येक सुज्ञ माता-पित्यांना वाटणं आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणं, हे अपेक्षितच असतं. परंतु त्यासाठी आपल्या मुलांची आवड, गती, शारीरिक आणि मानसिक कुवत या साऱ्याचा विचार करूनच निर्णय घेतले पाहिजेत. केवळ पशाच्या जोरावर आपण आपल्याला हवे तसे त्यांना घडवू शकत नाही. बाजारातील मागणीनुसार कारखान्यात ‘प्रॉडक्ट’ घडवणं वेगळं आणि उद्याच्या जगात जगण्यासाठी लायक माणूस घडवणं वेगळं.
     घर व कुटुंब ही संस्कार केंद्रे असली पाहिजेत, कारखाना नव्हे. उत्पादनाला मन नसतं पण आपल्या मुलांना उपजत आवडीनिवडी असतात. आपण ठरवू त्याच दिशेने त्यांचा जीवनप्रवास घडेल असे मात्र क्वचितच घडते. कारण जग हे फार गुंतागुंतीचे असते आणि म्हणूनच भविष्यात कल्पिताची अपेक्षित फळे मिळण्यापेक्षा अकल्पिताचे अनपेक्षित फटके बसण्याची शक्यता अधिक असते. त्या वेळी गोंधळून न जाता आघात पचवून पुढे वाटचाल करणे सोपे नसते. त्यासाठी धीर धरायची, नकार पचवून प्रतिकूलतेवर मात करायची धमक अंगी असली पाहिजे. याचे बाळकडू प्रामुख्याने कुटुंबाकडूनच मिळते, मिळाले पाहिजे. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या आमच्या बालपणीच्या कुटुंबातून हे सर्व आपसूक आणि अजाणतेपणे मिळत होते. आईने मागितलेले लुगडे तत्क्षणी घेऊन देणे शक्य असतानाही बाबा ते पंधरा दिवसांनी आणून देत असत. तरीही आई आनंदत असे व ते लुगडे घडी मोडण्यासाठी शेजारणीला सन्मानाने नेऊन देत असे. या आणि अशाच प्रसंगांतून घरातील बालगोपाळांवर संस्कार होत असत. आधुनिक साधनसुविधांनी संपन्न असणाऱ्या आजच्या कुटुंबांमधून असे संस्कार होत नसावेत, असे दिसते.
मंगलाताईंच्या लेखामधील प्रातिनिधिक जोडपं आपल्या मुलांना ‘ऑलराऊंड’ करण्याच्या हव्यासापायी (की खोटय़ा प्रतिष्ठेपायी?) त्यांना यंत्रमानव बनवत आहे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. यंत्रमानवाच्या आज्ञावलीत समाविष्ट नसणारे आव्हान त्याच्यासमोर आले तर तो काहीही करू शकत नाही तसे यांत्रिक पद्धतीने घडवलेल्या आपल्या मुलांचे होणार नाही, याची काळजी कोण घेणार?
– सोमनाथ देशमाने, अहमदनगर</strong>

लोकसत्ता वेबपेजवरील प्रतिक्रिया
वस्तुस्थितीवर प्रकाश
संजय पवार यांचा ‘पुरुषाने इंजेक्ट करावी..’ (१६ नोव्हेंबर)च्या अंकातील लेख सध्याच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारा व विचारप्रवर्तक लेख आहे, असे वाटते. किती पुरुष मंडळी आपल्या घरातील महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतात वा मोकळा श्वास घेण्याइतपत मोकळीक देतात? पालक आपल्या मुलीला वाढवतात, शिक्षण देतात परंतु तिचे मनोधर्य उंचावण्यासाठी संवाद साधत नाहीत, त्यामुळे मुलींमध्ये कमीपणाची भावना रुजते. तिचे संपूर्ण आयुष्य सोशिकता, संयम, सहनशीलता ह्य़ातच जाते.
– सतीश लांबे

 या दिनाचाही उत्सव व्हावा
‘पुरुषाने इंजेक्ट करावी..’ यात लेखक म्हणतात त्याप्रमाणे शतकानुशतकं स्वाभाविक म्हणून जपलेली सहनशीलता, सहिष्णुता वा ‘टॉलरन्स’ आता स्त्रीला जाचक वाटू लागलाय. तर स्त्रीची ही निर्भयता पुरुषाच्या सहनशक्तीच्या बाहेर जाऊ लागलीय! ..फक्त काही वर्षांतच? कुठे शतकानुशतकं आणि कुठे काही दशके? फारच कमजोर दिसतेय भारतीय पुरुषाची सहनशक्ती! असो. थोडा विनोदाचा भाग सोडला तरी वृत्तपत्रांत अनेक विषयावर लेख येत असतात, परंतु ‘जागतिक सहिष्णुता दिना’निमित्ताने ‘भारतीय समाजव्यवस्था आणि पर्यायाने स्त्रीची सहनशीलता’ या विषयावर एकच लेख; हे चित्रच पुरेसे बोलके आहे. या विषयाचा उत्सव होऊ शकत नाही? सध्या लोकसत्ताने जोरात सचिनोत्सव साजरा केला. त्याच्या करिअरची एक इिनग संपली म्हणून दुसरी काय असेल ह्य़ावर अनेक व्यासपीठांवर विद्वानांच्या चर्चा झडल्या. पण त्याच्या पत्नीच्या करिअरच्या पहिल्याच इिनगचे काय? त्या उच्चविद्याविभूषित आहे, वैद्यकीय सेवाक्षेत्रात जिथे नेहमीच देशाला सेवाभावी डॉक्टरांची कमी भासते तिथे त्या काही करू शकल्या असत्या किंवा अजूनही करू शकतील त्याबद्दल कोण बोलणार? मीडियाला, चाहत्यांना, राजकीय व्यक्तींना काय गरज एका स्त्रीला दुय्यम स्थानावरून प्रथम स्थानावर आणण्याची? स्वत:चे मनोरंजन झाले, प्रसिद्धीच्या झोकात राहून राजकारण साधून झाले, बस्स झाले की!
-आर  

ही मागासलेपणाची ग्वाही
 ‘पुरुषाने इंजेकट करावी..’ (१६ नोव्हेबर) या संजय पवार यांच्या लेखाच्या निमित्ताने. आजही समाजात कमावती बायको असली तरी एकदा मूल झाल्यावर किंवा होऊ घातल्यावर बालसंगोपन ही एकटय़ा स्त्रीची जबाबदारी आहे, असे मानणारा पुरुषवर्ग नवीन नाही. संसार हा तिने एकटीने करायचा नसून दोघांनी मिळून करण्याची गोष्ट असते. एकाने सांडवला तर दुसऱ्याने सावरायचा असतो याचा बहुतांशी वेळेला विसर पडल्याचे दिसते. प्रत्येक वेळी आई आणि बायको यांची तुलना करणाऱ्या किंवा आईच्या चश्म्यातून बायकोला बघण्याची नवऱ्याची भूमिका त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करत असते. मी ऑफिसमध्ये काम करतो म्हणून घरी काम करणार नाही किंवा आईने म्हटले की तुला बायकोला मदत करावी लागते, म्हणून दुखावला जाणारा पुरुषी अहंकार आजही माणसाच्या मागासलेपणाची ग्वाही देत असतो. बालसंगोपन ही जेवढी आईची जबाबदारी असते तेवढीच ती बाबांचीही असते. त्यात हे माझे काम नाही असा सांगणारा नवरा वर्ग आजही समाजात आढळतो. ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ असं सांगून तिला संसाराच्या गाडय़ात सेविकेची भूमिका करायला भाग पाडणाऱ्या पुरुषाला तिच्या शारीरिक, बौद्धिक किंवा आíथक गरजांचा एवढा विसर पडावा?
-शमक