‘वयाला वळसा’ या सदरातील इतिहासाचा शोध घेणाऱ्या संस्कृत पंडित डॉ. प्र. पां. आपटे आणि त्यांना साथ देणाऱ्या संजीवनी आपटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारा ‘इतिहासाचा शोध’ हा संपदा वागळे यांचा लेख नवयुवकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. डॉ. आपटे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यातून प्रकट होते, त्याबरोबरच त्यांनी अभ्यासलेले, पण आजवर दुर्लक्षित राहिलेले प्राचीन स्थापत्याचे विषय त्यामुळे पुढे आले आहेत. या विषयावरील संशोधनाला खूप वाव आहे. ते आव्हान नव्या पिढीने स्वीकारून त्यातील तथ्य प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळून पाहिले पाहिजे. सुदैवाने भारतात प्राचीन विज्ञान परंपरेचा मागोवा घेण्याचे असे अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे केवळ पाश्चात्त्यांच्या शोधांची नक्कल करण्याची मानसिकता कमी होईल. भारतीय युवा शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढेल. पाश्चात्त्याचं लक्ष्य भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान सांगणाऱ्या संस्कृत ग्रंथांकडे वेधलं जातंय. भारतीयांनी मागे राहून चालणार नाही, हाच आदर्श डॉ. आपटे यांनी घालून दिला आहे. अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेख.
– डॉ. क. कृ. क्षीरसागर, पुणे.

‘ताटली-भाकरी’ची आठवण
अमृता सुभाष यांचा भाकरी लेख (२८ जून ) वाचला. त्यात दुर्गाबाईंच्या ‘दुपानी’चा उल्लेख आहे. दुर्गाबाई या जिज्ञासू व सतत बारीक-सारीक गोष्टी कुतूहलाने जाणून घेणाऱ्या होत्या. कोणाकडूनही नवीन गोष्ट रसिकतेने जाणून घेणाऱ्या होत्या.
दुर्गाबाई अनेक वेळा नवीन काही बघितले की मला सांगत. एक दिवस त्यांनी मला सांगितले. ललिता, आज मी एक नवीन प्रकारची भाकरी बघितली. अगं, रस्त्याने येत असताना रस्त्याचे कामगार होते तेथे एका कामगाराच्या बाईकडून मला शिकायला मिळाले. कामगार बाई रस्त्याच्या कडेला भाकरी थापत होती हातावर. ती बाई भाकरी हातावर थापताना अशी थापत होती की भाकरीच्या कडा किंचित वळवून त्या भाकरीला काठ-ताटाला जशी उभी कडा असते, तशी कडा तयार करीत होती. मी कुतूहलाने बघत होते की भाकरी अशी ताटलीसारखी ही का करते आहे. ती उभी कडा असलेली चांगली मोठय़ा ताटलीएवढी भाकरी छान गोल, कुठे त्यास भेग नाही, वेडावाकडा आकार नाही. एका क्षणात त्या कामगार बाईने चुलीवरच्या त्या मोठय़ा तव्यावर ती भाकरी टाकली. भाकरी छान फुगली. चुलीच्या विस्तवावर कडा शेकवून झाल्या. बाई म्हणाल्या, ही ताटली-भाकरी नवीन तर खरीच, पण अशी का ती थापत होती. मी विचारले, (दुर्गाबाईंनी त्या कामगार बाईस विचारले) अशी ताटलीसारखी भाकरी का गं करतेस? आणि किती सुरेख झालीय. कामगार बाई म्हणाली, ‘अवो, आमच्याकडं कुठ ताट-वाटय़ा असणार आणि कुठे कुठे कामाच्या जागी जावं लागत ना. मग या भाकरीचीच ताटली व त्यावर भाजी घातली की झालं की हो काम. भाकरीचीच वाटी केल्याने भाजीचा रसबी भाकरीवर रहातू ना.’ अशी ही रस्त्यावरच्या अत्यंत गरीब कामगार बाईची ताटली-भाकरी व तिची कहाणी अगदी मनापासून दाद देऊन दुर्गाबाई सांगत होत्या. भाकरी म्हटलं की मला दुर्गाबाईंच्या ताटली भाकरीची आठवण होते.
– ललिता खाडिलकर, गिरगाव, मुंबई</strong>

lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

अजुनी यौवनात मी
भारतात एखादी व्यक्ती साधारण ७०-७५ वर्षांची झाली की तिला वा त्याला म्हातारा किंवा ज्येष्ठ नागरिक अशा गोंडस नावाने संबोधिले जाते. काही वर्षांपूर्वी मी जर्मनीला गेलो होतो. रस्त्यावरून किंवा फुटपाथवरून चालणारे फार क्वचितच दिसत होते. आमच्यापेक्षा वयाने जास्त अशी काही जोडपी चालत होती. आमच्यापेक्षा त्यांचा चालण्याचा वेग खूप जास्त होता. आम्ही वयाने जास्त असलो तरी आम्ही अजूनसुद्धा तरुणच आहोत, असेच जणू काय त्यांना दाखवायचे होते.
भारतातल्या आणि विदेशातल्या ज्येष्ठांत जमीन-अस्मानाचा फरक असतो. ‘अजुनी मी यौवनात’ (चतुरंग २८ जून) हा लेख वाचत असताना माझ्या जर्मनीच्या आठवणी जागा झाल्या. जर्मन लोक आपण निवृत्त झालो असे कधीच समजत नाहीत. हीच त्यांची खासियत असावी. कचेरीत काम करताना ते जितके ‘तरुण’ असतात, किंबहुना त्याहून व्यग्र जीवनशैली ते निवृत्तीनंतरच्या काळात स्वीकारतात. अनेक समाजोपयोगी कामात स्वत:ला गुंतवून घेतात. सदोदित ‘तरुण’ राहणे हेच त्यांना आवडते. मनात आणले तर आपण भारतीयही लेखात सांगितल्याप्रमाणे तरुण नक्की राहू शकू.
– रा. आ. कंटक, पुणे</strong>

मग आजच्या बाबीही चिंतामुक्त
सुचित्रा साठे यांच्या ‘कालचे बाबा आणि आजचा बाबा’ (१४ जून) या लेखात त्यांनी जणू आमच्याच मनातले विचार मांडले आहेत. पण नाण्याप्रमाणे यालाही दुसरी बाजू आहेच की! मुलांचे कान बंद करायला, वायरला लावलेली ‘बुचे’ आजचा बाबाच आणून देतो ना? त्याला आईचीही सहमती असतेच. तसेच प्रत्येकाच्या ‘स्पेस’चे महत्त्व अवास्तव वाढल्यामुळे मुले बंद दाराआड काय करतात ते आपल्याला कसे कळणार? याचा अर्थ सोशल मीडियाची साधने (मोबाइल, लॅपटॉप) इ. मुलांच्या हातात द्यायचीच नाही असा नाही. तर ती देताना त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही जाणीवपूर्वक करून द्यायला हवी. त्यासाठी प्रसंगी थोडेफार कठोर व्हावे लागले तरी हरकत नाही. हल्लीची मुलेही जरा जास्तच स्मार्ट आहेत. आई-बाबांसमोर जरासा त्रागा केला की आई-बाबा विरघळतात हे त्यांना माहीत आहे.
आपल्या भल्यासाठी आपले बाबा जरा कठोर वागले हे पटतंय ना? मग तोच कित्ता आजच्या आई-बाबांनी थोडा फार गिरवायला काय हरकत आहे? उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याचे फाजील लाड नकोत. तसेच मेंदूच्या सकसतेसाठीही थोडेफार कठोर व्हावेच. आपोआपच विचारांच्या दरीची खोली कमी होण्यास नक्की मदत होईल. मग ‘आजचा बाबाही’ बिनघोर जीवन जगू शकेल.
– अंजली अरविंद भातखंडे, नागांव, अलिबाग

माणसातल्या देवाचा शोध
माणसातल्या देवाला आपल्या कार्याने शोधून समाजाला सेवेची दारे उघडी करणाऱ्या ८१ वर्षीय स्मिता जोशी यांचे बांधीलकीच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. (७ जून) ते वाचून ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ते’च्या उपक्रमांतर्गत तीस संस्थांच्या सामाजिक कार्याचे स्मरण झाले. लेखिका संपदा वागळे यांचे मन:पूर्वक आभार! कारण असे वृतान्त म्हणजे भ्रष्टाचाराने परिसीमा गाठलेल्या ‘जळो जिणे लाजिरवाणे’ असे वाटावे अशा परिस्थितीत स्मिता जोशी यांच्यासारखे कार्यकर्ते जगण्याची उमेद वृद्धिंगत करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक सक्षम संघाने अशा सामाजिक संस्थांचे ‘दत्तकत्व’ स्वीकारावे.
– वि. शं. गोखले, पनवेल सिटी