मुलं न वाचण्याची अनेक कारणं. पण एककारण आपण नेहमीच दुर्लक्षित करतो. सरावाचा अभाव, अध्ययन अक्षमता. या मुलांना मग शिक्षा केली जाते वा दुर्लक्षित केलं जातं. मग ती मुलं अभ्यासात मागे पडतात. म्हणूनच मुलांवर वाचन-लेखनसंस्कार व्हावेत यासाठी अनेकांनी पर्यायी उत्तरे शोधण्यास सुरुवात केली. खरंतर पैसा वा साधनांची उपलब्धता नसणं ही असते केवळ सबब. कमी असते इच्छाशक्तीची.

नमस्कार. या वर्षांतील या सदराचा हा शेवटचा लेख. मला माहीत आहे की प्रचलित शिक्षण व्यवस्थेत दर्जात्मक बदल घडवून आणणाऱ्या, विविध पर्यायी व्यवस्था निर्माण करणाऱ्यांची संख्या खूप प्रचंड मोठी आहे. कारण १५ जानेवारीला प्रसिद्ध झालेला या सदरातील पहिला लेख म्हणजे बहुसंख्य मराठी शाळांचा आरसा होता. अनेकांच्या ही गोष्ट पूर्वीच लक्षात आली. त्यांनी मुलांवर वाचन-लेखनसंस्कार व्हावेत म्हणून प्रयत्नांना सुरुवात केली त्यांची ही तोंडओळख.
एकदा मूल वाचायला लागलं की अनेक गोष्टी सोप्या होतात. पण हे संस्कार खाली झिरपायला हवेत. म्हणून ‘वाचक दिन’, ‘कुसुमाग्रज दिन’ सुरू झाले. वाचक मंडळं, पुस्तक भिशी सुरू झाली. ‘ग्रंथाली’ ही वाचक चळवळ दूरवरच्या शहरां-खेडय़ांपर्यंत पुस्तकं पोहोचवणं आणि नवनवीन लेखकांकडून वेगवेगळय़ा विषयांवरच्या पुस्तकांचं लिखाण करून घेणं या कामी उतरली. पुढे जाऊन या पुस्तकांचं प्रकाशन करू लागली. हुशार मुलांसाठीची शाळा ज्ञानप्रबोधिनी, वाचनवेगावर प्रयोग करू लागली. डॉ. मेघमाला राजगुरू यांनी याच विषयावर डॉक्टरेट केलं. आजही मोठय़ा सुटय़ांत असा छोटेखानी अभ्यासक्रम इथे राबवला जातो. त्याचं वाचनवेगावरचं पुस्तक म्हणजे असं काम करू इच्छिणाऱ्यांचा दीपस्तंभ!
रवींद्रनाथ टागोर, कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या लेखनासारखे अपवाद वगळता बाल किंवा किशोरांसाठी पूर्वी वाङ्मयच निर्माण होत नव्हतं. हे लक्षात येताच अनेकांनी या कामाला वाहून घेतलं. चित्रमय पुस्तकं, जोडाक्षरंविरहित पुस्तकं बाजारपेठेत आली. ‘किशोर’, ‘छात्रप्रबोधन’, ‘पासवर्ड’, ‘चंपक’, ‘वयम्’ अशी अनेक मासिके आणि टाइम्स ग्रुपचं वृत्तपत्रं निघू लागलं. बहुसंख्य वृत्तपत्रांनी मुलांसाठी एखादं पान वा कॉलम राखून ठेवला. नवनीत, अनमोल, जोत्स्ना ही या क्षेत्रातली नामवंत प्रकाशनं. ‘जोत्स्ना प्रकाशका’नं अत्यंत मेहनतीनं मुलांचं वय आणि क्षमतांनुसार वाचण्याजोगी पुस्तकांची यादीच प्रसिद्ध केली.
अनेक वाचनालयांनी बदलत्या काळाची पावलं ओळखत मराठीबरोबर इंग्रजी पुस्तकांची खरेदी केली. संस्कृती संवर्धन संस्थेने रामायण, महाभारत, स्वातंत्र्य योद्धे यांच्या जीवनावर पुस्तके तयार करून अगदी अल्प किमतीत हजारो शाळांपर्यंत पोहोचवली. याच विषयावर आधारित स्पर्धा सुरू केल्या. शेकडो कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी जोडले गेले. किमान काही मोजक्या शाळांनी पुस्तकांच्या बंदिस्त पेटय़ा वर्गात नेण्याऐवजी ग्रंथालयाची दारं मुलांसाठी खुली केली. वाचनासाठी प्रोत्साहन, प्रेरणा म्हणून काचपेटय़ा, एवढे तरी वाचाच, काव्यपूर्ती, कथाकथन स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वाङ्मयीन पुरस्कार सुरू केले. खरंतर पैसा वा साधनांची उपलब्धता नसणं ही असते केवळ सबब. कमी असते इच्छाशक्तीची. खारच्या अनुयोग विद्यालयात वृत्तपत्रांच्या कात्रणांचा खूप छान उपयोग करून घेतलेला आठवला. ही शाळा तसेच डोंबिवलीची टिळक विद्यालय या शाळा खास विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेचे आयोजन करतात. सांताक्रुझच्या राजाराम पोतदार शाळेत अनेक उतारे, पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली. मुलं वाचनालयापर्यंत पोहोचतील. पुस्तकं हाताळतील याची कटाक्षाने काळजी घेतली गेली. मुलं वाचू लागली. काही शाळांनी क्रमिक पुस्तकांबरोबरच किमान काही पूरक पुस्तकांचं वाचन आणि क्षमता चाचण्या सक्तीच्या केल्या.
मा. दत्ता टोळ कित्येक वर्षे गावोगावी फिरून वाचन प्रसार, पुस्तकांचं वितरण हे काम आनंदाने करीत आहेत. मोठय़ांसाठी ‘पुस्तक तुमच्या दारी’ वा ‘हक्काचे’ उपक्रम राबवणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने आता बाल वाचकांसाठीही पुस्तक पेटी योजना सुरू केली आहे. ५००० रुपये देऊन आपण त्याचे स्पॉन्सर होऊ शकता. समकालीन प्रकाशनही देणगीदारांमार्फत पुस्तकं खरेदी व वितरणाचं काम करते ‘क्वेस्ट’ हे दर्जेदार शिक्षणासाठी काम करणारं आणखी एक नाव. टाटा फाऊंडेशन, अझीम प्रेमजी विद्यापीठ आणि ट्रस्ट याचं आर्थिक साहाय्य आणि नीलेश निमकर यांच्यासारखे झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते यामुळे त्यांचं काम तीन जिल्ह्य़ांत पसरलं आहे. मुलाचं शिक्षण, वाचन, लेखन प्रक्रिया यावर संशोधनात्मक काम इथे चालतं. क्षमता चाचण्या, शिक्षक प्रशिक्षण या उपक्रमाबरोबर दूरवर पसरलेल्या आश्रमशाळांसाठी फिरती वाचनालयं, अॅक्टिव्ह वाचनालयं असे उपक्रमही संस्था चालवते. पालिकेच्या शाळा किंवा जिल्हा परिषदांच्या शाळांत खास करून हे काम चालतं.
‘गाव तिथे बालवाडी आणि छंदवर्ग’ असं काम करणाऱ्या ‘वनस्थळी’ ग्रामीण विकास केंद्रानं मुलांची अभिव्यक्ती, लेखन वाचनाचा सराव यासाठी ‘नेटके लिहावे’ हा पुस्तक संच प्रकाशित केला आहे. माधुरी पुरंदरे लिखित हे पुस्तक अनेकांना उपयोगी पडणार आहे.
‘नेटके लिहावे’ मराठी मातृभाषा असणाऱ्यांना व्याकरण, शुद्धलेखन हे पक्के करायला शिकवते तर मराठी मातृभाषा नसणाऱ्यांना मराठी शिकवण्याची सोय झाली आहे ऑडिओ, व्हिडीओ आणि My Marathi या पुस्तक संचाने. मुंबई विद्यापीठाचा ‘जर्मन भाषा’ विभाग आणि ग्रंथाली यांचा हा संयुक्त उपक्रम अगदी तसाच ग्राममंगलचा ‘लिहूया वाचूया’ हा पुस्तक संच. पॉप्युलर प्रकाशन, नॅशनल बुक ट्रस्ट, मराठी विज्ञान परिषद यांनीपण प्रचंड मेहनतीनं मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारी असंख्य दर्जेदार पुस्तकं बाजारात आणली आहेत.
वरील सर्वच संस्था/ व्यक्ती नामवंत. पण वैयक्तिक पातळीवरही तळमळीनं, अभ्यासपूर्वक काम करणारेही अनेक. मिथिला दळवी त्यांच्यापैकी एक. स्वत: मेरिट होल्डर, इंजिनीअर, अमेरिका रिटर्न असणाऱ्या मिथिला- मुलांच्या अनेक समस्या, विकासाचे टप्पे यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून काम करतात. मुलं, पालक यांच्यासाठी कार्यशाळा घेतात. त्यांची स्वत:ची वेबसाइट आहे आणि ती काही हजार जणांशी जोडली गेली आहे.
मुलांना लिहिणं-वाचन करावं, यासाठी धडपडणारं आणखी एक नाव ‘मंथन.’ राहुल कोकील आणि त्यांचे तरुण सहकारी यांनी चालवलेली ही संस्था. वाचनावर कालबद्ध कार्यक्रम शाळा-शाळांत नेऊन राबवते. सुट्टीच्या कालावधीत वाचन आणि सॉफ्टस्किल्स मुलांना शिकवते. याचं आणखी एक वेगळेपण म्हणजे स्वातंत्र्योत्तर लढायांवर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम. काही निवृत्त शिक्षकांनी काव्य, लेखन, गोष्टी यावर ८-१० दिवसांचे छोटे अभ्यासक्रम तयार केले होते. त्यांची सुरुवात व्यवस्थित झाली मात्र प्रतिसादाअभावी ती चळवळ थंडावली. ‘बदल खूप झपाटय़ानं होत आहेत. ते पचवणं आपल्याला कठीण जातंय’ हे त्यांनी मान्य केलं. ‘पुस्तक तुला’ करून ती पुस्तक शाळा-शाळांत पोहोचवणारेही अनेकजण आहेत.
प्रत्यक्ष शिक्षक नाहीत, शिक्षणाशी जोडलेले नाहीत तरी मुलांनी वाचावं म्हणून धडपडणारे काही सच्चे शिक्षणप्रेमी आहेत. त्यांच्यापैकी एक सतीश कोळवणकर. पर्यावरणप्रेमी, योगासनाचे अभ्यासू, व्यवसायाने आर्किटेक्ट त्यांचा फॅमिली ट्रस्ट आहे. शिकण्याची इच्छा आहे पण परवडत नाही अशांना ट्रस्ट मदत करतो. शिक्षणाला पूरक सर्व गोष्टींचा खर्च ट्रस्ट करतो अट एकच मुलांनी वाचावं. यासाठी त्यांनी चोखंदळपणे पुस्तकं निवडली आहेत. ग्रामीण वा शहरी भागातल्या शाळांत तो पुस्तक संच दिला जातो. मुख्याध्यापक व एखादे शिक्षक जबाबदारी स्वीकारतात. मुलं ती पुस्तकं वर्षभर वाचतात. वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण करतात. किमान १५ पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं असतं आणि वर्षांच्या शेवटी त्याचं सादरीकरण करतात. मुलांच्या आवडीची, त्यांनी सुचवलेली पुस्तके ट्रस्ट आवर्जून खरेदी करतो. आजपावेतो शेकडो विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
अॅड्. गणपुले हे पण दिल्लीच्या उच्च न्यायालयात वकिली करीत. त्यांच्या वाचनात कोकणातील चाकरमान्यांनी आपल्या गावांच्या मदतीकरता स्थापन केलेल्या ट्रस्टची माहिती आली. त्यांच्या मूळगावाचं नावही त्या गावांच्या यादीत होतं. त्यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना जाणवलं की त्यांची इच्छा प्रामाणिक आहे, पण त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी गावकऱ्यांना समजावलं की आपल्याला घेणारे नाहीत तर देणारे हात तयार करायला हवेत. मग शाळांना संगणक पुरवणं, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवणं सुरू झालं. त्यात त्यांनी पुस्तकं वाचावी, त्यावर विचार करावा, त्यातून त्यांच्यात वर्तन बदल घडावा हा हेतू होता. यंदाच त्यांनी माजी सेनाधिकाऱ्यांचे अनुभव सांगणारं ‘गाऊ तयांना आरती’ हे पुस्तक शाळांना दिलं. पुढच्या वर्षी यावर आधारित निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा असे कार्यक्रम शाळा-शाळांतून घेतले जातील. त्यातून आपण केलेली मदत योग्य होती ना याचा त्यांना अंदाज येईल.
मुलं न वाचण्याची अनेक कारणं. पण एककारण आपण नेहमीच दुर्लक्षित करतो. सरावाचा अभाव, अध्ययन अक्षमता. या मुलांना मग वेगवेगळी लेबल्स लावली जातात, शिक्षा केली जाते वा दुर्लक्षित केलं जातं. मग ती मुलं अभ्यासात मागे पडतात. यावर उपाय म्हणून हल्ली अनेक शाळांत स्पेशल टीचर्स, समुपदेशक यांची नेमणूक झाली आहे. अशांपैकी एक डॉ. मुग्धा. त्यांचं स्वत:चं क्लिनिक आहेच, पण त्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनबरोबरही काम करतात. त्या सांगतात जितक्या लहान वयात अशा समस्यांवर उपाय सुरू केले जातील तितके उत्तम. मात्र त्यात सातत्य हवं. पालक आणि शिक्षकांची साथ हवी. खाण्याच्या चुकीच्या सवयी, मुलांना त्या त्या वयात योग्य असं चालणं, धडपडणं, रांगणं, आईच्या कामात लुडबुड करणं असं करू न देणं हेसुद्धा मुख्य कारण असू शकतात. त्यांना घरातली छोटी छोटी कामं करू द्या. शारीरिक मेहनतीचे खेळ खेळू द्या. त्यांचं निरीक्षण, कुतूहल, प्रश्न विचारणं, त्यांनी थोडी मस्ती करणं हे सारं स्वाभाविक असतं हे स्वीकारायला हवं. अतिकाळजी करणंही वाईट. मुलांवर खरंखुरं प्रेम, आंधळं नव्हे, असेल तर या अध्ययन अक्षमतांवर उपाय सापडतो. शिस्तीचे प्रश्न सुटतात. मुलांना व्यक्त व्हायला आपण संधी पुरवायला हवी.
असो. ही यादी आणखीही लांबवता येईल. पण आपला निरोप घेत आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार. या पर्यायांच्या शोधयात्रेतील आपण वारकरी व्हा, अशी नम्र विनंती. धन्यवाद. (समाप्त)

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा