५० वर्षे झाली. या नोकरीत मी स्थिरावलो. छोटय़ा-मोठय़ा बढत्या मिळाल्या. यशावकाश छोटेसे घर बांधले. निवृत्तीनंतरही मी येथेच स्थायिक झालो. दररोज न चुकता नदीकाठच्या शीव मंदिरात मात्र मी दर्शनाला जातो. कृतज्ञ भावनेने!
खू प प्रयत्नांनी गावाजवळच्याच छोटय़ा कारखान्यात मिळालेल्या नोकरीमुळे आता कोठे जीवनाला स्थैर्य येत होते. कौटुंबिक जबाबदारी, लहान भावंडांचे शिक्षण, जुन्या घराची डागडुजी अशा अनेक गोष्टींचे नोकरीच्या जिवावर नियोजन चालू होते आणि आकस्मिक एक आपत्ती उभी ठाकली. त्यामुळे मी हादरूनच गेलो. उद्योगधंद्यातील मंदीच्या कारणाने कंपनीने काही कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने माझ्यावर आकाशच कोसळले. बेताचे शिक्षण, नगण्य अनुभव, कौटुंबिक जबाबदारीचे ओझे आणि अनपेक्षितपणे आलेली बेकारी यामुळे मी खचून गेलो. सैरभैर झालो.
मन:शांतीच्या शोधात कोठेतरी बाहेर जावे, या विचाराने मोटार सायकलला किक मारली. कोठे जायचे-काय करायचे काहीही ठरले नव्हते. वाट फुटेल तिकडे जायचे. मनातील भावनांचा कल्लोळ सांभाळत अंधार पडेपर्यंत गाडी पळविली. वाटेत कुठली गावे येतात-कोणत्या भागात आपण निघालो आहोत याचा काडीमात्र विचार नव्हता. हताश मनाला थोडा विरंगुळा मिळावा यासाठी त्या अर्थाने ही वेडेपणाची कृती होती. अंधार पडेपर्यंत गाडी दिशाहीन धावत होती. शेवटी एका नदीकाठच्या टुमदार गावात थकून भागून पोचलो. अंधारामुळे रात्रभर तेथेच विश्रांती घ्यावी व सकाळ होताच उद्याचे उद्या ठरवू, असा विचार करून नदीकाठच्या घाटावरील एका मंदिरात थांबलो. वाहत्या स्वच्छ पाण्यात हातपाय धुतले व मंदिराच्या पायरीवर विमनस्कपणे टेकलो. पायरीसमोर वृत्तपत्राच्या रद्दीचा एक कागद पडला होता. पेपर स्थानिक होता. उचलला आणि नजरेसमोर धरला आणि काय आश्चर्य? माझ्या शिक्षणाशी, कामाशी अनुरूप नोकरीसाठी त्या वृत्तपत्रांत जाहिरात होती.
 रात्री उशिरापर्यंत शंकराच्या मंदिरात पणतीच्या प्रकाशात मी प्रार्थना केली आणि ओसरीवरच उपाशीपोटी झोपी गेलो. सकाळी प्रसन्नपणे नदीपात्रात स्नान केले. देवाची मनोभावे पूजा केली आणि दिलेल्या पत्त्यावर नोकरीसाठी जाऊन भेटलो. नवल म्हणजे पहिल्या बोलण्यातच त्यांनी मला नोकरी देऊ केली. पूर्वीच्या नोकरीपेक्षा जवळपास दुप्पट पगार! कंपनीच्या आवारातच कॉलनीमधील कौलारू घर देऊ केले. माझा विश्वासच बसेना.
न सांगता मी घरून निघून आल्याने घरी सगळे विलक्षण काळजीत होते. मी घाईने फोन करून ही सुवार्ता सांगितली. सर्वाना नवल वाटले. आनंद झाला! ५० वर्षे झाली. या नोकरीत मी स्थिरावलो. छोटय़ा मोठय़ा बढत्या मिळाल्या. यशावकाश छोटेसे घर बांधले. निवृत्तीनंतरही मी येथेच स्थायिक झालो. दररोज न चुकता नदीकाठच्या शीव मंदिरात मात्र मी दर्शनाला जातो. कृतज्ञ भावनेने!
मला राहून राहून नवल वाटते की मला वेडय़ासारखे भटकायची बुद्धी का झाली? नेमका मी या दिशेला व या गावातच बोलावल्यासारखा कसा आलो? नेमका स्थानिक वृत्तपत्राचा चुरगळलेला तुकडा माझ्या नजरेला कसा पडला? नियतीच्या या अगम्य करणाचा मला अजून उलगडा झालेला नाही. नोकरी जाणं आणि त्या मन:स्थितीत त्या देवळात पोहोचून ते वृत्तपत्र वाचणं हा माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.