एक अपंग मुलगी. अचानक अनाथ झाली आणि तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर उभा राहिला. या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत अनेक गोष्टीतून जावं लागलं.. आशा निराशा, समज गैरसमज, मनस्ताप दिलासा या खेळातून जात जात अखेर तिचं पुनर्वसन घडलं.. हे टाळता आलं असतं का?

त्यादिवशीची आमच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या कचरा वेचक महिलांची बैठक जरा जास्तच लांबली होती. अंधारूनही आले होते. या अंधारातच एक आवाज आला, ‘मॅडम, माझ्या पोरीलाबी शाळंत घाला की..’ इतर बायका हसू लागल्या. गर्दीतून हे बोलणारी, मालन झोकांडय़ा देत होती. तिला धड उभेही राहता येत नव्हते. पण मनापासून बोलत होती ती. ‘काय झाले हिला?’ मी विचारले. ‘काही नाही, ती ‘फुलटाइट’ आहे.’ बायका परत हसू लागल्या. त्यांनी सांगितले, मालन दिवसभर दारू पिते. कचरा वेचते. तो विकून पैसे आले की दारूची बाटली सोबतीला घेऊनच येते. तिला एक बारा वर्षांची मुलगी आहे. अपंग आहे. कचरा वेचायला गेली की मुलीला खांबाला बांधून जाते..’
ही घटना मी विसरूनही गेले होते. काल पुन्हा एकदा तिथेच बैठक झाली. तिथली कार्यकर्ती सीमा म्हणाली, ‘बाई, मालन वारली. तिच्या मुलीची अवस्था फारच वाईट आहे.’ म्हटलं, चल बघू. आम्ही सगळ्याजणी गल्लीबोळ पार करत तिच्या झोपडय़ापाशी आलो. गटार ओलांडून मी दार नसलेल्या एका खोपटात शिरले. मातीची चढ-उताराची खडबडीत जमीन, चारीबाजूंनी चार-साडेचार फूट उंचीचं विटांचं बांधकाम, दोनेक फुटाची जागा सोडून वर पत्रे टाकलेले. एका पोत्यावर मालनची मुलगी राधा पडली होती. अंगात फ्रॉक होता. तिने फ्रॉकमध्येच शी-शू केले होते. त्याचा एक उग्र दर्प सर्वत्र भरला होता. तिच्या साऱ्या अंगावर माशा घोंघावत होत्या. बारीक सुरात राधा रडत होती. ते दृश्य बघून मी थिजून गेले. कोपऱ्यात विटांची चूल होती. त्यावर अल्युमिनियमची एक-दोन भांडी दिसत होती. मांडीपासून राधाचे पाय म्हणजे काडय़ा होत्या. ‘जन्मापासून राधा अशीच आहे, बोलत नाही, चालत नाही. उठवून बसवली की तिथल्या तिथे खुरडते. वस्तीतल्या बायका तिच्याकडे डाळभात व पाण्याचा तांब्या ठेवून जातात तेवढं ती खाते.’ एकीने माहिती दिली. हा प्रकार पाहून, आमची कार्यकर्ती विजया चिडून म्हणाली, ‘‘देवाच्या पायावर पाणी टाकायला दिवसातून चार-चार वेळा जाता व या पोरीच्या अंगावर एकदाही पाणी टाकावे, तिला स्वच्छ करावे वाटत नाही तुम्हाला.’’ जे समोर होतं ते भयानक होतं. अस्वस्थ करणारं होतं..
तिची तिथेच तात्पुरती व्यवस्था करून घरी आल्यानंतरही राधा डोळ्यासमोरून हलत नव्हती. मन बधिर झाले होते. जनावरापेक्षाही वाईट अवस्थेत ही मुलगी जगतेय. तिच्या रडण्याचा आवाज कानात घुमत होता. माझ्या जगण्याची लाज वाटावी, असे दृश्य पाहिले होते ते पिच्छा सोडत नव्हते.. तिची लवकरात लवकर कायमस्वरूपी व्यवस्था करणं भाग होतं.
कर्जतच्या एका मतिमंद मुलांच्या संस्थेतील विश्वस्तांनी राधाला ठेवून घेण्याचे कबूल केल्याचं कळलं. मी त्यांना फोन केला, राधाची अवस्था त्यांना सांगितली. काही दिवसांच्या पाठपुराव्यानंतर ते म्हणाले, ‘‘मॅडम, आपण ‘शारीरिक विशेष’ मुलांना ठेवत नाही. फक्त ‘मानसिक विशेष’ मुलेच ठेवून घेतो.’’ त्या गृहस्थांना मी खूप पर्याय सुचविले. खूप काथ्याकूट करून काहीच निष्पन्न झाले नाही. तो मार्ग आता बंद झाला होता. मी इंटरनेटवर शोध घेतला आणि १०९८ या क्रमांकावर ‘चाइल्ड लाइन’ला फोन केला. ते म्हणाले, ‘आम्ही मुंबईतल्या संस्थांनाच मदत करतो.’ मी त्यांना ‘नवी मुंबईत अशी संस्था आहे का,’ असे विचारताच त्यांनी त्याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. सामाजिक संस्थांचं जगही किती संकुचित व मर्यादित आहे, असं वाटून गेलं. गरज व निकड हा निकष महत्त्वाचा नाही काय? मी ‘गूगल’वर शोध घेताना अनेक संस्थांची माहिती होती, पण या साऱ्या शाळा असलेल्या संस्था किंवा उपक्रम घेणाऱ्या संस्था निघाल्या.
आमची कार्यकर्ती पुष्पलता, पनवेलजवळ असलेल्या एका संस्थेत गेली होती. त्यांनी ‘बाल कल्याण समिती’चे पत्र आणले तर मुलीला आम्ही ठेवून घेऊ, असे सांगितले. मी समितीच्या मनीषाला फोन केला तर तिने संस्थेलाच मुळात ‘महिला बाल कल्याण’ची परवानगी नसल्यानं प्रकरण अवघड असल्याची कल्पना दिली. पण तरीही भिवंडी येथे असलेल्या ठाणे जिल्ह्य़ाच्या बाल कल्याण समितीला भेटा, असे तिने सुचविले.
राधाची सर्व माहिती घेऊन आम्ही भिवंडीला आलो. दुपारचे साडेबारा वाजले होते. तेथील सर अजून यायचे होते. इन्स्पेक्टर भेटले. त्यांनाही राधाविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘असे केंद्र मानखुर्द व उल्हासनगरला आहे. राधाला ठेवता येईल तेथे.’ दोन वाजता सर आले. सरांच्या समोर बसलो. राधाची माहिती, पत्र, फोटो दाखवले. सरांनी पत्र बारकाईने वाचले व ते म्हणाले, ‘असे ठिकाण महाराष्ट्रात कोठेच नाही.’
मी उल्हासनगरचा उल्लेख करताच ते म्हणाले, ‘ते फक्त मुलग्यांसाठी आहे.’ मानखुर्दविषयी विचारताच म्हणाले, ‘ मानखुर्दचे केंद्र भरलंय पूर्ण. तिथे अजिबातच जागा नाही. एकदा का तिथे मूल ठेवले की म्हातारे होऊन मरेपर्यंत तिथेच राहते.’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आमच्या चर्चेच्या वेळी टीस (टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स) मधील एक मॅडम वेगवेगळ्या संस्थांची नावे घेत होत्या. सतत अडथळे आणत होत्या. त्यांना संस्थांच्या नावाखेरीज काहीच माहिती नव्हती. अखेर कंटाळून येथे येण्यापूर्वी मी केलेला नेटसर्च त्यांना सांगितला. सरांनी मला एखाद्या संस्थेची ऑर्डर दिली तरच काही तरी होईल, असे मी सरांना म्हणत होते.
‘त्या मुलीवर उपचार केलेत का?’ सर.
‘नाही. पण उपचार केले पाहिजेत. असे मला वाटते.’ मी.
‘ मग तुम्ही असे करा प्रथम उपचार करा.’ सर.
‘पण कसे करायचे? तिला दवाखान्यात कोण नेणार?’ मी.
‘तुमच्या संस्थेचं पत्र द्या. सरकारी दवाखान्यातील डॉक्टर येतील.’ सर
‘अहो सरकारी दवाखान्यात गेले तरी उपचार मिळत नाहीत अन् वस्तीत डॉक्टर येणे शक्य आहे का?’ मी.
‘मॅडम, तुम्ही किती नकारात्मक बोलता. करून तर बघा!’ त्यांच्या सहकारी मॅडमनी मला ‘ऐकवलं’.
‘मग तुम्ही १०३ वर फोन करा. पोलीस येतील व तिला घेऊन जातील. तुम्ही फक्त लांबून बघत राहा. पुढील कार्यवाही आपोआप होईल?’ सर.
‘असे पोलीस येतात की नाही हे सर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे.’ मी.
‘तुम्ही नकारात्मक किती बोलता हो.’ परत मॅडम बोलल्याच.
‘नाही मॅडम, हे अनुभवाचे बोल आहेत.’ मी.
‘अहो, करून बघायच्या आधीच तुम्ही बोलताय.’ परत त्या मॅडम.‘सर मी एवढय़ा लांबून आलेय. तुम्हीच काही तरी करा.’
‘तुम्ही आमच्याकडे कशा काय आलात?’ सर.
‘ म्हणजे?’ मी.
‘हे पत्र तुम्ही ‘महिला व बाल कल्याण’ अधिकाऱ्यांना लिहिलेत. ही महाराष्ट्र शासनाची बाल कल्याण समिती आहे.’ सर.
‘सर, सॉरी मायना चुकला असेल तो मी दुरुस्त करते. पण मी योग्य जागी आलेय एवढे नक्की.’ मीही ठाम होत म्हटले.
‘टीस’च्या बाईंनी परत एकदा मोघम संस्थांची नावे सांगितली.
‘मी मगापासून तुम्हाला पर्याय सुचवलेत ना..’ असे सर म्हणत होते. पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हते. माझे नीतिधैर्य खचून जात होते. मी खरेच अपुऱ्या माहितीवर बोलतेय का? हे लोक मला मदत करणार नाहीत का? मी आज अशीच परत गेले तर पुढे काहीच होणार नाही.. माझी विचारचक्रे सुरू होती.
‘सर आता तुम्हीच काही तरी करा. मनीषा मॅडमनी तुमचे नाव सुचविल्यानं मी आलेय.’ खूप हतबल होत मी काकुळतीनं बोलले.
‘होय, काल आम्ही बैठकीला एकत्रच होतो. बरं असे करा, कर्जत व डोंबिवली येथील तुम्ही सुचविलेल्या संस्थांना लायसेन्स (परवाना) आहे का विचारा व ते तयार आहेत का तेही बघा.’ सर.
मी बाहेर येत, राधाला कर्जतला ठेवू म्हणून सगळ्यांसमोर बढाया मारणाऱ्या एका गृहस्थांना फोन केला. ‘राधाला ठेवून घ्या. आपण तिच्यासाठी फंड उभा करू. सांभाळायला कोणीतरी ठेवू. काही तरी मार्ग नक्की निघेल,’ असं सांगत होते, पण त्या गृहस्थांनी मला इतके उपदेशाचे डोस द्यायला सुरुवात केली की माझी सहनशक्ती संपुष्टात येऊ लागली. मी डोळे मिटून घेतले. हिम्मत करून संस्थेला परवाना आहे का, याची विचारणा केली. ‘नाही ना.’ म्हणत त्यांची बडबड सुरूच राहिली. मी फोन कट केला.
डोंबिवलीच्या संस्थेतील गृहस्थांनी, शासकीय परवानगी आणली तर काही तरी करू, असे आश्वासन दिले होते. पण मुलगी अल्पवयीन असल्याने ठेवता येणार नसल्याचा नकाराचा पाढाच अखेर वाचला.
मी परत सरांच्या केबिनमध्ये. झालेला वृत्तान्त सांगून आता काय करायचे असे विचारताच, त्यांनी पुन्हा आधी सुचविलेल्या पर्यायांवरच विचार करण्याचे सुचवले. ‘पण ते होणार नाहीत हे तुम्हालाही माहीत आहे,’ असे मी म्हणताच, ‘प्रयत्न तरी करा मॅडम.’ असे त्यांच्या त्या सहकारी मॅडम पुन्हा म्हणाल्या. मी सामाजिक कार्याच्या क्षेत्रात अनेक वर्षे आहे आणि सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊनच बोलते आहे, हे तिच्या गावीही नव्हते. पण आता सरांनीच मला ‘चाइल्ड लाइन’चा पर्याय सुचवला. तसेच राधा राहात असलेला गणपतीपाडा नवी मुंबईत येत नसून ठाण्यात येतो, अशी महत्त्वपूर्ण माहितीही दिली.
शेवटचा पर्याय म्हणून मी बालकल्याण समितीची ऑर्डर मिळाली तर वांगणी येथील सील आश्रम (SEAL) तिला ठेवून घ्यायला तयार असल्याचं त्यांना सांगितलं. सील आश्रमाकडे परवाना नाही आणि ते रायगड विभागात आहे हे माहीत असूनही मी माहिती रेटली. मला जाचक नियमाच्या चौकटीत न बसविता राधाचं पुनवर्सन कोणी तरी करावे, असे मनोमन वाटत होते. राधा ही मुलगी जात, धर्म, पंथ या साऱ्याच्या पलीकडे आहे. तिने जिवंत राहणे व माणसासारखे जगणे, मला महत्त्वाचे वाटत होते. माझ्या सततच्या बडबडीमुळे सर ‘चाइल्ड लाइनशी बोला.’ म्हणाले.
शेवटी मी मनीषाशी बोलले. तिचे व सरांचे बराच वेळ बोलणे झाले. त्यानुसार बालहक्क संरक्षण आयोग, वरळी व ‘चाइल्ड लाइन’ यांना पत्र देण्याचे ठरले. मी परत एकदा सरांच्या पुढे उभी.
‘बसा थोडा वेळ. ऑर्डर काढतो.’ सर म्हणाले.
‘तुम्ही म्हणाल तितका वेळ बसेन. अगदी मुक्काम ठोकावा लागला तरी चालेल, पण ऑर्डर घेऊनच जाईन.’ मीही हट्टाला पेटले. त्यांनीही ती दिली आणि अखेर ऑर्डर घेऊनच आम्ही बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मी १०९८ला फोन लावला. दुपारी तीन वाजेपर्यंत मी अनेक जणांशी बोलत होते. समज, गैरसमज, होकार-नकाराचे अनेक टप्पे पार करीत होते.
‘मॅडम तुम्ही कोठे राहता?’
‘वाशीत.’
‘मग आम्ही नाही मदत करू शकत.’
‘पण मुलगी गणपतीपाडा, ठाणे जिल्ह्य़ात आहे.’
‘मग तसे सांगा की..’
बाल कल्याण समितीच्या सरांनी संचालक, चाइल्ड लाइन यांना दोन दिवसांत गणपतीपाडा येथे व्हिजिट करून अहवाल द्यायला सांगितला होता.
मी ‘चाइल्ड लाइन’च्या लोकांना मला संस्थेचा ई-मेल वा पत्ता द्या. मी ऑर्डर पाठवते, असं सांगायचा प्रयत्न करीत होते, परंतु प्रत्येक फोनच्या वेळी वेगळी व बहुधा फारशी न शिकलेली व्यक्ती बोलत होती. किमान संस्थेचा ई-मेल व पत्ता मेसेज करा, अशी विनंती करत होते. शेवटी चार वाजता ई-मेल व पत्ता मिळाला. मी ऑर्डर पाठवली. फोन करून माहिती कळविली आणि तुमचे काय ठरतेय ते सांगा. वस्तीत व्हिजिटला याल तेव्हाही सांगा. मीही येथून येईन, असेही सांगितले.
साधारण साडेपाच वाजता ‘गणपतीपाडा’ कोठे आला म्हणून फोन आला. आम्ही गणपतीपाडय़ाच्या रस्त्यावर उभे असल्याचेही त्या बाईंनी सांगितले. मी खाणाखुणा सांगितल्या. थोडय़ा वेळानं परत फोन आला. ‘इथे आम्हाला कोणी मुलगी दाखवत नाहीय.’ सीमाने वस्तीतील राठोड नावाच्या व्यक्तीला फोन करून मुलगी दाखवायला सांगितले. मुलीची अवस्था पाहून ‘चाइल्ड लाइन’वालेही हादरून गेले.
दुसऱ्या दिवशी बारा वाजता फोन आला. ‘मुलीला भिवंडीला नेतोय. कसे न्यायचे.’ मीच त्यांना नेहमी तुम्ही कसे नेता, असा उलट सवाल केला. त्यावर त्यांचे प्रामाणिक उत्तर होते, ‘अशा अवस्थेतील मुलगी नेण्याची कधी वेळ आली नाही. त्यामुळे अंदाजच नाही.’
मग त्यांनी वस्तीतल्याच लोकांशी बोलून त्यांना काहीसे राजी करून मुलीला भिवंडी नाक्यापर्यंत नेले. तिथून रिक्षानं पुढे भिवंडीला घेऊन गेले. साडेसहा वाजता इन्स्पेक्टरचा फोन आला. वागंणीचे ‘सील’ आश्रमवाले ठेवतील ना मुलीला. ऑर्डर काढू का?’ असे विचारले.
‘ऑर्डर काढाच, पण आश्रमात तुम्ही येत असल्याचे आधी सांगा म्हणजे तेथील लोक तयारीत असतील,’ असे म्हणत आश्रमाचे संपर्क क्रमांक दिले.
रात्री नऊ वाजता, वांगणीवाले राधाला ठेवून घेत नाहीत, असा इन्स्पेक्टरचा फोन आला. मी हादरले. ‘टेन्शन घेऊ नका. मी दहा मिनिटांत सांगते,’ असे म्हणत थोपवून धरले. नंतरचा एक तास नुसती फोनाफोनी करण्यात गेला. आश्रम दूरस्थ ठिकाणी असल्यानं फोनची रेंज पोचत नव्हती. इन्स्पेक्टरला सारखा धीर द्यावा लागत होता. ‘आपल्याकडे ऑर्डर आहे. त्यामुळे राधाला तुम्ही तिथे ठेवून येऊ शकता,’ असे म्हणत होते. अखेर आश्रमातील संबंधित अधिकारी व्यक्तीशी संपर्क झाला व त्यांनी राधाला आश्रमात ठेवून घेतले. मी इन्स्पेक्टरला म्हटले, ‘खूप त्रास घेतला तुम्ही. तुमचे खरेच खूप खूप आभार.’ तर तेच मला म्हणाले, ‘मॅडम, तुमचेच आभार मानतो. तुम्हीच आम्हाला इतके चांगले काम करायची संधी दिलीत.’
दुसऱ्या दिवशी अकरा वाजता ‘चाइल्ड लाइन’मधून एका बाइर्ंचा फोन आला व म्हणाल्या, ‘वस्तीत राधाचे लांबचे नातेवाईक आहेत. ते तिचं ते झोपडं विकून पैसा घेतील. ते बघा कसे करायचे. आम्ही तिचे प्रॉपर्टी पेपर मागितलेत म्हणून सांगा.’ मला त्यांची सूचना फारच आवडली. हे पैसे राधाच्या पुढच्या उपचार आणि उपजीविकेसाठी वापरता येणे शक्य होते.
चौकशी केल्यावर, राधाच्या आईकडे राधाचा जन्म, वय असा कोणताही पुरावा नव्हता. तसेच या झोपडपट्टीचेही काहीही पेपर नसल्याचेही कळले. मी स्त्री-मुक्ती संघटनेच्या लेटरहेडवर ‘झोपडं विकलं तर महाराष्ट्र बालकल्याण समिती कायदेशीर कारवाई करेल,’ अशा आशयाचे पत्र वस्तीतल्या राधाच्या एका नातेवाईक बाईंच्याकडे दिले. कारण त्या झोपडय़ांची किंमत लाखात असल्याचे वस्तीतल्याच महिलांच्या माहितीवरून कळाले होते..
काही दिवसांनी राधाला भेटायला मी वांगणीला गेले. ‘सील’ संस्थेचे प्रमुख फादर फिलीप भेटले. राधाला कोणी तरी घेऊन आले व खुर्चीत बसवले. राधामधला बदल सुखद होता. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की राधाला आणले तेव्हा तिची अवस्था इतकी वाईट होती की, अजून दोन दिवस जरी उशीर झाला असता तरी राधा वाचली नसती. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये राधाची तपासणी झाली होती. राधाला हिवताप झाला होता. फिट्स येत होत्या. कुपोषण प्रचंड होते. कामोठेच्या एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये ती महिनाभर होती. राधाला पचेल असा थोडा थोडा व हलका आहार दिला जात होता.
फादर फिलिपना ‘किडेवाला बाबा’ म्हणून ओळखतात. केरळमधून स्वत:ची सर्व प्रॉपर्टी विकून वांगणीत पस्तीस एकर जमीन घेऊन ‘सील’ आश्रम १९९५ साली सुरू झाला. रस्त्यावरील अगदी वाईट, जखमी, जखमेत किडे झालेले लोक उचलून आणून फादर त्यांच्यावर उपचार करतात. रात्री-बेरात्री पोलीसही असे लोक आणून टाकतात. महिला, पुरुष व मुले असे एकूण २२६ लोक येथे आहेत. मुले जवळच्या गावात शाळेत जातात. २७१ लोकांना बरे करून त्यांचे पत्ते शोधून घरी पाठविले गेले आहे. कोणत्याही नियमाच्या चौकटीत न बसवता गरीब, गरजू, निराधार, मानसिक, शारीरिक व अपंग लोकांसाठी हे रेस्क्यू होम आहे. परवाच पुन्हा एकदा ‘सील’ मध्ये गेले, राधाला भेटले. राधाला बघून अत्यानंद झाला. दोन किलोने तिचे वजन वाढले होते. हाक मारल्यावर ती प्रतिसाद देत होती.
गेल्या महिनाभराचा मनस्ताप, आशानिराशा, पोकळ आश्वासनं, माणसांचे स्वभावविशेष अर्थात काही चांगले अनुभव अनुभवत मी इथपर्यंत पोहोचले होते. समाधान वाटले. अखेर राधाचे पुनर्वसन झाले होते. फक्त मनात एकाच प्रश्नांचा गुंता होता, हा मनस्ताप, तिचे हाल, तिचं कुपोषण थांबवता आलं नसतं का?