‘वैद्यकीय इच्छापत्र’ ( १० मे) हा लेख आवडला. डॉ. रोहिणी पटवर्धन व लेखिका माधुरी ताम्हणे यांचे अभिनंदन! या कल्पनेचे जनजागरण होणे जरुरी आहे. माझ्या तीस वर्षांच्या खासगी प्रॅक्टीसमध्ये अशी कित्येक कुटुंबे रुग्णालयाच्या बिलांमुळे गरीब झालेली मी पाहिली आहेत. एकीच्या सासूला गर्भाशयाचा कर्करोग होता. त्यासाठी शेती विकावी लागली. एकीचा तरुण मुलगा अपघातामुळे दोन महिने आय.सी.यू.मध्ये  दाखल होता. दागिने विकावे लागले, पण हाती काही लागले नाही. दोन्ही कुटुंबांतील पुढच्या पिढीची भविष्ये रखडली गेली. एनजीओ व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन वैद्यकीय इच्छापत्राचा पुरस्कार केला पाहिजे. यातूनच अवयवदानासारखा महत्त्वाचा निर्णयही समाजोपयोगी ठरेल.

दुसरी बाजूही लक्षात घ्या
‘वैद्यकीय इच्छापत्र’ हा माधुरी ताम्हणे यांचा लेख मनाला अतिशय भावला. देहाचं मरणानंतर काय करावं? हे ठरविण्याचा प्रत्येक व्यक्तीला जन्मसिद्ध अधिकारच आहे. नजर ‘वर’ स्वर्गाकडे लागलीय, पण देह मात्र पडलाय शरपंजरी या भूतलावर! अशा ‘त्रिशंकू’ अवस्थेतील पीडितांसाठी उपरोक्त लेख फार मार्गदर्शक आहे.
तथापि, मी आणखी एका मुद्दय़ाकडे लक्ष वेधू इच्छिते. भरपूर पेन्शन असणारे अनेक वृद्ध आज समाजात आहेत. त्याच भक्कम आधारावर त्या वृद्धाची पत्नी सन्मानाने जगते. मुलांसाठी ओझे बनत नाही. तथाप तिच्या पतीने उपरोक्त लेखात सुचवल्यामुळे देहत्याग केल्यास (वा करून घेतल्यास) त्याच्या विधवा पत्नीची अवस्था काय होईल? निरनिराळ्या उद्योगसमूहांच्या लिखित नियमांनुसार त्या विधवा पत्नीची पेन्शन बंद होऊ शकते, निम्मी होऊ शकते किंवा त्याहून कमी होऊ शकते! कशाही अवस्थेत असेना का, तिच्या नवऱ्याचा देह (मांसाचा गोळा म्हणा हवा तर!) या भूतलावर असणे तिच्या दृष्टीने अत्यावश्यकच आहे हा, एक पर्याय असू शकतो. तिच्या पतीने रुग्णशय्येवरील हाल, सेवाशुश्रूषा (अहोरात्र) करणाऱ्या पत्नीचे हाल बघवत नाहीत म्हणून वैद्यकीय इच्छापत्र केले तर ज्या उद्योगसमूहात/ संस्थेत तो पती नोकरीत होता तो उद्योगसमूह/ ती संस्था, त्या पतीचा ‘उदात्त’ हेतू विचारात घेऊन त्या पतीला मिळत असणारी पेन्शन (आहे तशीच) त्याच्या विधवा पत्नीला देऊ शकेल काय? त्या दृष्टीने तो उद्योगसमूह/ संस्था आपापल्या पेन्शनविषय नियमात, लवचीकता आणण्याचे बदल करण्याचे ‘धाडस’ दाखवू शकेल का? तसे झाले तरच वैद्यकीय इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीचा ‘सन्मान’ होईल आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याच्या माघारी त्याच्या पत्नीला खराखुरा ‘न्याय’ मिळेल. असे नियम सरसकट संमत झाले तर ‘वैद्यकीय इच्छापत्र’ या सुंदर संकल्पनेस अधिकच ‘बळ’ मिळेल, सामथ्र्य मिळेल.
सुमन टिळक

परमेश्वरी योजना?
‘सीतामाई ते जसोदाबेन’ या लेखाबद्दल कुतूहल होतंच. पण त्यापेक्षा लक्षवेधी ठरले ते कुंटे यांच्या कुटुंबाचे फोटो. सर्वप्रथम फोटोवरच दृष्टी खिळून राहिली. ‘निश्चयाचा महामेरू’ हे शब्द वाचनात होतेच. पण मोरेश्वर कुंटे यांच्या चेहऱ्याने या शब्दांचा अर्थच उमगला. त्यानंतर लक्ष गेलं माधवी कुंटे यांच्याकडे. ‘जिद्द’ साक्षात् सजीव होऊन समोर होती. काही काळ पाहतच राहिलो आणि लेखाच्या शीर्षकाकडे लक्ष गेलं. सर्वाना हा अनुभव आला की नाही माहीत नाही, पण मला मात्र प्रथमदर्शनीच आला.
संपूर्ण लेख वाचला. तळमळ जाणवली. आणि पुन्हा पुन्हा पारायणं केली. कुंटे दाम्पत्याचा जीवनप्रवास अजोड आहे. अतुलनीयच आहे. जसजसा विचार करू लागलो आणि जाणवले की अगदी नास्तिकदेखील कबूल करील की तो अशी काही माणसे निश्चित कार्यासाठी पृथ्वीवर पाठवतो. कुंटे दाम्पत्याला आजही कदाचित ही जाणीव नसेल की काही निश्चित कारण देऊन परमेश्वराने त्यांना पाठविले आहे. माधवी ताईंनी मनाजोगता पती मिळाला याचं समाधान घेऊन कुंटे यांच्या उंबरठय़ावरील माप ओलांडलं. तरुण वयात केवळी स्वप्नं रंगविली असणार? परमेश्वराच्या योजनेबाबत कल्पनाही नसणार.
कुंटे दाम्पत्याचा जीवनप्रवास हा प्रत्येक तरुण तरुणीने हृदयावर कोरून ठेवावा असाच आहे. असं म्हणतात की, एखादा रोग निर्माण होण्यापूर्वीच त्यावर औषध जन्माला येतं. वेळ लागतो तो शोधण्यात. अजितसाठी ज्या काही योजना केल्या गेल्या त्याही या तपश्चर्येचाच भाग असावा. हे सर्व लिहिण्यामागे एक सत्य घटना कारणीभूत आहे. एका सुखवस्तू दाम्पत्यांच्याबाबतीत ही घडलेली घटना आहे.
घरात सर्व सुखं उपलब्ध होती. त्या घरात एका अपंग बालकाने जन्म घेतला. अपत्याला सांभाळण्यासाठी थोडा जास्तच पगार ठरवून दोन मोलकरणी दोन पाळ्यांत ठेवल्या. आता माता निश्िंचत झाली होती. काळ पुढे सरकत होता. वाढत्या वयाबरोबर अपत्याच्या समस्यादेखील वाढत होत्या. एकेक करून मोलकरणी नोकरी सोडून जाऊ लागल्या. नवीन मोलकरणी टिकेनात. सुखासीन जीवनात बाधा येऊ लागली. निर्णय घेणं आवश्यक होतं. परस्पर विचारविनिमय झाला. संगोपन केंद्रामध्ये ठेवण्याचं ठरलं. अपंगासाठीची केंद्रं शोधली व त्यातल्या त्यात उत्तम सोयी सुविधा असलेलं केंद्र निश्चित झालं.
अपत्याला घेऊन पती-पत्नी केंद्रात दाखल झाले. संचलिकेने अत्यंत आनंदाने अपत्याचा स्वीकार करण्याचं मान्य केलं. पण.. संचलिकेने चार भावुक शब्द सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘आपलं मूल स्वीकारण्यात मला आनंदच आहे. मात्र या अपत्याचा आपल्याच घरात जन्म का झाला याचा विचार आपण कधी तरी केला आहे का?
 मी सांगते उत्तर, You are the chosen ones.  परमेश्वराने केवळ त्याच्या जन्माची सोय केली नाही, तर पूर्वसुकृताप्रमाणे त्याची देखभाल अतिशय उत्तम होईल अशा घरांत, तुमच्या घरात त्याला पाठविलं. त्याची योजना आपण धुडकावणार असाल तर माझं काहीच म्हणणं नाही. पण अनुभवाने सांगते. अपंगत्वाबरोबरच एखादी अगम्य शक्ती त्या बालकात परमेश्वराने प्रदान केलेली असते. मूल स्वीकारण्यात मला आनंदच आहे. पण तुम्ही फेरविचार करा.’’
झालं वीजच कोसळल्याप्रमाणे ते दाम्पत्य हादरूनच गेलं. केवढं मोठं पाप आपल्या हातून घडत होतं. वाचनात आलेल्या किती तरी बातम्या नजरेसमोरून सरकू लागल्या. एका कार्यक्रमात हात नसल्याने केवळ पायाने हार्मोनियम वाजविताना पाहिलेला मुलगा. आणखी असाच एक अपंग चित्रकार. आता डोळे खाडकन उघडले होते. मुलाचं स्वत: संगोपन करण्याचा निश्चय त्यांनी संचालिकेला सांगितला.
अत्यंत समाधानाने आणि विश्वासाने उभयतांनी बालकासह केंद्र सोडलं. परतीच्या वाटेवर दोघंही नि:शब्दपणे विचार करीत होते. घराचा दरवाजा उघडून आत आल्याबरोबर मुलाला पलंगावर ठेवून परस्परांना मिठीच मारली. त्या समाधी अवस्थेतून बाहेर आले. उभयतांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांना साक्षात्कारच झाला होता.
“We are the chosen ones.” दोघांच्याही जीवनप्रणालीत आमूलाग्र फरक पडला होता. आपण कोणती तरी आराधना करीत आहोत हे वारंवार पटत होतं. आज मूल मोठं होत चांगलंच सुधारत आहे. जीवनसाफल्याची अनुभूती होत आहे.
अप्पा जोशी गोरेगाव