‘एकटीचा घरोबा’ हा रजनी भागवत (१ मार्च) यांचा लेख फार एकांगी वाटतो. एक तर तो ‘टर्निग पॉइंट’ वाटत नाही, तुम्ही खूप सोसलय, अंधारात चाचपडताय, रटाळ जीवन जगताय आणि अचानक तुमच्या जीवनात प्रकाशकिरण आला आणि तुम्हाला प्रकाशाची वाट सापडली अशा वळणाला ‘टर्निग पॉइंट’ म्हटले पाहिजे असे वाटते.
    कुणी कुणाशी जमवून घ्यायला नको. स्वत:च्या मनाला मुरड घालायला नको असे म्हणणारा विचार लेखातून पुढे येत असल्यामुळे तो आपल्या संस्कृतीविरुद्ध वाटतो. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे आधीच आपली कुटुंबव्यवस्था ढासळलेली आहे. त्यात अशा विचारसरणीमुळे भर पडेल अशी भीती वाटते.
    यासह काळजीचा मुद्दा असा की, म्हातारपणी एकटे राहण्यात अनेक धोके आहेत. एकेकटय़ा राहणाऱ्या म्हाताऱ्यांना लुबाडून, त्यांचे खून झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. दम लागणे, घाम फुटणे, जीव घाबरणे असे म्हातारपणी केव्हाही घडू शकते, घरात माणूस नसेल तर अशा वेळी काय करायचे? अत्यावस्थेत फोन तरी करता यायला हवा ना? तेव्हा म्हातारपणी अट्टहासाने एकटं राहणं योग्य नाहीच. किंबहुना आज समाजात ज्यांना नाइलाजाने एकटे राहावे लागते, त्यांना विचारा, किती अडचणीतून जावे लागते ते.
   ज्याचं त्याला अवकाश हवे हे बरोबर आहे पण ते सांभाळून वडीलधाऱ्यांना सांभाळू नये, समजून घेऊ नये असे थोडेच आहे? घरात व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच. मतभिन्नता, जनरेशन गॅप ही असणारच आहे, पण संवाद हरवू नये.
    ‘जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती’ यातले मर्म जाणा. आजपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं त्याचं शहाणपण अंगी यावं. दोघांनीही सामंजस्याने घेतले तर घराचं घरपण टिकेल. ते टिकून राहण्यातला फायदा सर्वाचाच आहे. मात्र समाजात आता वृद्धाश्रमाचं पेव फुटलंय. आपल्या देशातले अठरापगडलोक लोक मुंबईत गुण्यागोविंदाने नांदतात. संकटकाळी एकमेकांना मदत करतात. आपली  संस्कृती आपल्याला हे शिकवते, मग भिन्न स्वभावाच्या चार माणसांनी एका घरात का नांदू नये?
– अंजली सावले, डोंबिवली

घरी शिकवणे फायद्याचेच
   डॉ. मंजूषा जोशी यांनी ‘घरी शिकविण्याचा फायदा हा (२९ मार्च) लेख म्हणजे अनेकांच्या डोळय़ांत अंजन घातल्यासारखा आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मुलांना घरी शिकवण्याचे अनेक फायदे त्यांना झाले, माझाही अनुभव असाच आहे.
   मला दोन मुले. मोठा हेमंत व धाकटा प्रशांत. दोघांनाही मी मराठी माध्यमाच्या शाळांत घातले. पहिली ते चौथीपर्यंत ‘विद्यानिकेतन’ आणि पाचवी ते दहावीपर्यंत ‘म.भि.गोरेगावकर इंग्लिश स्कूल.’ आजच्याप्रमाणे तीस एक वर्षांपूर्वीही इंग्रजी माध्यमाची मोहिनी होती. मराठी शाळेत घातल्यामुळे तुमच्या मुलांचे वाटोळे होईल, असे सर्वाचे एकमत होते. पण मी तिकडे लक्ष दिले नाही.
   मात्र बालवाडीत असल्यापासून त्यांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिले. त्या वेळी ‘स्वस्त पण मस्त’ अशी रशियन पुस्तके मिळायची, फ्लोरा फाऊंटनला जाऊन ती पुस्तके मी मुलांना आणून देत होतो. त्याखेरीज ‘किशोर’ व ‘कुमार’ मासिके, ‘अमर चित्र कथा’ ‘नॅशनल बुक ट्रस्ट,’ ‘बालभारती’ यांची पुस्तके विकत घेत होतो. त्यांना शिकविताना केवळ पाठय़पुस्तकांवर भर न देता अवांतर वाचन आणि विविध उपक्रमे यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांना प्रश्न सोडविण्याची सवय लावली.  अवांतर वाचनामुळे दोघांनी चौथी व सातवी इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये भाग घेतलाच, पण त्याखेरीज ‘भाभा बालवैज्ञानिक शिष्यवृत्ती परीक्षा’, म.भा.गणित         अध्यापक मंडळाच्या परीक्षा (सहावी व नववी), चित्रकला परीक्षा अशा सर्व परीक्षांमध्ये मिळून दोघांना बारा शिष्यवृत्त्या, चार सुवर्णपदके, तीन रौप्य पदके मिळाली. आज दोघंही उच्चपदांवर कार्यरत आहेत. हा झाला घरी शिकविण्याचा फायदा!
शेवटी एक उल्लेख करतो. हेमंतच्या शंका-कुशंकांना तोंड देताना  माझेच अज्ञान उघडे पडू लागले. तरी त्याला ‘गप्प राहा’ म्हणून दटावले नाही. एकदा त्याने विचारले, ‘‘पाचावर धारण बसली तर घाबरगुंडी उडते, मग दहावर बसली तर काय होईल? खरंच काय होईल? मी धांडोळा घेतला.. मग त्याचा दुसरा, तिसरा प्रश्न.. तो विचारायचा नि मी शोध घ्यायचो. यातून साकारत गेला तो पाच खंडांचा, सुमारे अडीचएक हजार पृष्ठांचा ‘संकल्पकोश!’
– सुरेश वाघ, गोरेगाव

जोखड स्त्रियांनीच फेकले पाहिजे
प्रज्ञा ओक यांचा ‘पिंगा ग पोरी पिंगा’ हा (२९ मार्च) हा लेख वाचला. यात लेखिकेने पारंपरिक रुढी-रिवाज, व्रत-वैकल्य याचं ओझं पेलताना आधुनिक उच्चविद्याभूषित व मोठय़ा ठिकाणी नोकरी करणाऱ्या स्त्रीची कशी दमछाक होते याचे चित्रण केलं आहे. यात आधुनिक स्त्रीची होणारी कोंडी लेखिकेने मांडली आहे. पण त्याच्या कारणांचा व त्यावरील उपायांचा लेखिकेने घेतलेला वेध काहीसा एकांगी वाटतो.
 या रूढी-रिवाजांची बंधने स्त्रियांनी फेकून दिली पाहिजेत. त्यासाठी कुटुंबानेच त्यांना पाठबळ देण्याची गरच आहे. पण प्रत्येक स्त्रीने त्याची सुरुवात स्वत:पासूनच का करू नये? कुटुंबाने त्यांच्यावर हे सारं जाचकपणे लादलं आहे हे कबूल केलं तरी मर्यादित अर्थानेच ते खरे आहे. हळदी-कुंकू सारख्या गोष्टीचा घाट स्त्रिया कुटुंबाचा दबाव म्हणून मनाविरुद्ध घालतात असे गृहीत धरले तरी तशा प्रकारच्या कार्यक्रमांना आताच्या काळातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर, बॅक मॅनेजर अशा वरच्या थरांतील महिलांचाही प्रतिसाद व उपस्थिती पाहिली की कुठे तरी विषाद दाटून येतो. अजूनही बहुसंख्य स्त्रियांचे विश्व साडी, दागिने, स्वयंपाक, मुले-बाळे व आमचे ‘हे’ या पलीकडे गेलेले नाही की काय, अशी शंका येते.
महिलांनीच आता यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा निश्चय केला पाहिजे.
– श्रीनिवास गडकरी, पेण

दोन टोकांचा अनुभव
‘पिंगा ग बाई पिंगा’ लेख वाचला आणि मी थेट आमच्या कराडच्या घरात जाऊन आईजवळ बसले. आईला जाऊन ४२ वर्षे झाली पण आईच्या आठवणी व तिने केलेले संस्कार कधी विसरता येत नाहीत.
माझी आई खरंच ग्रेट होती. ती सोवळे, ओवळे, जात-पात मानत नव्हती. (६५ वर्षांपूर्वी) फक्त मानव जातीवर तिने प्रेम केले. रोज सोवळय़ात स्वयंपाक करावयाची पण त्यावेळी दारात कुणी भिकारी आला तर ती स्वत: जे तयार असेल ते त्याला देऊन मोकळी व्हायची.
एकदा तर नवरात्रीचा स्वयंपाक करत होती. तेवढय़ात एक कचरा साफ करणारी बाई (मैला गोळा करणारी) आली. तिचे दिवस भरलेले होते. आई मला म्हणाली, तिला आत घेऊन ये, पाणी दे आणि बसायला सांग. स्वयंपाक झाल्यावर आईने तिला पोटभर जेवू घातले. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान मला अजून आठवते आहे. थोडय़ाच वेळात सांगितलेली सवाष्ण आली, माझ्या आधी त्या भंगिणीला जेवायला दिले आता मला अजिबात जेवायचे नाही म्हणत निघून गेली. पूर्वी सवाष्ण जेवल्याशिवाय घरातील कोणीही जेवत नसे. यावेळी आईने नाही आजीनेच तिला समजावले, कारण आपली सून करते ते चांगलेच असते यावर आजीचा विश्वास होता.
आईने कधी कामे सोडून देवाची पूजा केलेली बघितली नाही किंवा हातात माळ घेऊन जप केलेला आठवत नाही, पण कुठल्याही जातीधर्माच्या माणसाला कधी दारातून उपाशी पाठविले नाही.  
माझ्या आईच्या अगदी उलट सासुबाई होत्या. अतिशय सोवळे-ओवळे, देवधर्म मानणाऱ्या. त्या साताऱ्याला होत्या त्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही. पण मी ८-१० दिवस साताऱ्याला होते. तेव्हा माझी बहीण साताऱ्याला राहायची. ती सहज म्हणून भेटायला आली (तीन दिवस बाजूची होती) तर माझ्या सासूबाईंनी तिला पायरीवरच बसवून ठेवले. आतूनच मी दोन शब्द बोलले आणि ती लगेचच घरी परतली. ती गेल्यावर मला दोन बादल्या पाणी पायरीवर टाकायला लावले. (तेव्हा विहिरीतून पाणी आणायला लागत असे) अशी दोन टोके होती.
माझ्या ओळखीच्या घरात आत्ताच्या मुलींना फार त्रास होतो. नोकरी, देव, कुळाचार सर्व सांभाळताना त्यांची खूप तारांबळ होते तेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगते, ‘सबुरीने घ्या आणि तुमच्या सुना-मुलींना पिंगा घालायला लावू नका नाहीतर पिंगा घालत घालत त्या चक्कर येऊन पडायच्या व परत उठायच्याच नाहीत.’
– शरयु वि. कुलकर्णी
डोंबिवली (पूर्व)

‘मी नाही ना’ ही महत्त्वाचेच
‘मी आहे ना’ हा वंदना धर्माधिकारी यांचा लेख. (१२ एप्रिल) लेख सर्वाना आवडावा इतका अर्थपूर्ण आहे. सकारात्मक ‘मी आहे ना’ या दृश्य-अदृश्य पाठबळासोबत ‘मी नाही ना’ या नकारात्मकतेतून घडलेल्या चांगल्या गोष्टींचाही उल्लेख वंदना धर्माधिकारी यांनी सहउदाहरण देऊन केला आहे. याचे उदाहरण म्हणून त्यांनी वाल्याच्या जीवनाचा दाखला दिला आहे. वाल्याच्या पत्नीने, वाल्याला मी तुमच्या पापाची वाटेकरी आहे ना, असे म्हटले असते तर त्याच्या जीवनात पुढे जे घडले ते घडले नसते आणि वाल्मीकी ऋषी घडले नसते. रामायणाची रचना झाली नसती.
 ‘मी नाही ना’चे हे उदाहरण वाचत असताना आठवल्या त्या समाजसेवी, अनाथांची माता सिंधूताई सपकाळ. त्यांच्या पतीची ‘मी नाही ना’ ही भूमिका आणि त्या ‘ना’मधून पुढे घडलेली सिंधूताई, त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यातून त्यांना मिळालेले अनाथांचे आईपण मिळाले नसते. सिंधूताई आपल्या व्याख्यानातून या गोष्टींचा अवर्जून उल्लेख करीत असतात. गरोदर असतानाच त्यांच्या पतीने त्यांना घराबाहेर काढून गाईच्या गोठय़ात नेऊन टाकले. त्यांनी गोठय़ातच मुलीला जन्म दिला. सिंधूताईंना या अशा स्थितीत दोन दिवसाच्या तान्हुलीला छातीशी घेऊन घर सोडावे लागले. पुढचा सारा इतिहास माहीत आहेच. वाईटातूनही चांगले घडते ते असे. त्यामुळे ‘हा’ इतकेच ‘ना’ ला ही महत्त्व आहेच!
याच अंकातील वृंदा देशपांडे यांनी अनुभव कथन केलेला ‘बर्फीचा गोडवा’ आणि कुमार सप्तर्षी- डॉ. ऊर्मिला सप्तर्षी यांची ‘झाली फुले कळ्याची’ ही उत्तम!
– वसंत खेडेकर बल्लारपूर

‘ते’ तर आनंदयात्री!
 ‘हे जीवन सुंदर आहे!’ (५ एप्रिल) हा अरुंधती देवस्थळे यांचा लेख मनाला चटका लावून गेला. जगण्या-मरण्याच्या हिंदोळ्यावरचं आयुष्य सहज—सुंदरतेनं स्वीकारणं आणि वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला आनंदाची देवघेव करीत जगणं तितकं सोपं नसतं. म्हणूनच असं आयुष्य जगलेल्या कोडी जेनचं कौतुक वाटतं. ‘स्पायना बायफायडा’ नावाचा दुर्धर आजार सोबत घेऊन जन्माला आलेली कोडी जेन, तिची आई मार्ली आणि तिचे सारे कुटुंबच मनाने धडधाकट असल्यामुळे हे शक्य झाले असावे. धडधाकट शरीरात व्याधिग्रस्त मन घेऊन सुतकी चेहऱ्याने वावरणारे आपल्या अवती भवती अनेक दिसतात. मिळालेले जीवन सुंदर आहे हे त्यांच्या गावीही नसते. आनंदाची देवघेव करण्यासाठी तुमचे जीवन आनंदी असले पाहिजे.
वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांना कमी ऐकू यायचे. त्यांनी अंतरीचा आवाज ऐकला म्हणूनच त्यांना देदीप्यमान यश मिळाले. अंतरीचा आवाज सावधपणे ऐकणं, त्याला चांगल्या सकारात्मक गोष्टी पाहण्याची, ऐकण्याची, बोलण्याची सवय लावणं, सकारात्मक चिंतनाची सवय लावणं ज्यांना जमलं ते आनंदयात्री झाले. मग शरीर व्याधिग्रस्त असो की धडधाकट, काही फरक पडत नाही.
सोमनाथ देशमाने, अहमदनगर</strong>