टीसी मला सांगायला लागला. ‘मॅडम, नापास झाला म्हणून घरातून पळून आलाय आणि आता बाहेरच्या परिस्थितीचे चटके बसल्यावर घरी परत निघालाय. होते तेवढे उडवून झाले आणि आता तिकीट काढायला पैसे नाहीत म्हणून रडतोय. लबाड असतात ही मुलं. यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.’ मला राहावलं नाही. मी म्हटलं, ‘कशावरून तो खरं बोलत नसेल, आपण एकदा विश्वास ठेवू या नं त्याच्या शब्दावर.’..

बऱ्याच दिवसांनी सुमती, माझी बालमैत्रीण आली होती. आल्यापासून गप्प गप्पच होती. जेव्हा ती आल्या आल्या काहीच बोलत नाही. फक्त एका शब्दात उत्तरे द्या ‘हो की नाही’ असं सुरू होतं तेव्हा नक्की समजावं की कोंडलेली वाफ भसकन् मोकळी व्हावी तशी ही थोडय़ा वेळाने भडाभड बोलणार आहे, काहीतरी वेगळं, मनाला छळणारं.. आणि झालंही तसंच.
चहा-पाणी उरकून मी डायनिंग टेबलशी येऊन बसले आणि सुमतीचा बांध फुटला. इतका वेळ थोपवून धरलेले अश्रू मुक्तपणे वाहू लागले. ‘‘काय झालं?’’ मी हळूच विचारलं.
‘‘अगं मी चार दिवसांपूर्वी सोलापूरला गेले होते ना, तेव्हा एक अजबच किस्सा घडला.’’ रुमालाने डोळे टिपत सुमती बोलू लागली. ‘‘नेहमीप्रमाणे रिझर्वेशनच्या डब्यात घुसखोरी झालेली होती. गाडीने स्टेशन सोडलं. हळूहळू वेग वाढला, गती आली आणि लय पकडून ती धावू लागली. डबा हलवून हलवून धान्य भरावं तसे प्रवासी शोधक नजरेने आत घुसून जागा पकडत स्थिरस्थावर झाले. ‘जरा सरकता का?’ म्हटल्यावर कोणी खरंच सरकलं, तर कोणी नुसतंच सरकल्याचं नाटक केलं. कोणी नजरेने शेजाऱ्याला इशारा केला तर कोणी चेहऱ्यावरची इस्त्री बिघडू न देता ढिम्म बसून राहिलं. मला छान खिडकी मिळाली होती. त्यामुळे मी निवांतपणे ‘बदलती चौकट’ न्याहाळत बसले.’’
‘‘तेवढय़ात सोळा-सतरा वर्षांचा तरुण वाट काढत माझ्या खिडकीपर्यंत येऊन पोहोचला आणि वारा अडवून उभा राहिला. थोडय़ाशा नाराजीनेच मी त्यांच्याकडे पाहिलं आणि चपापलेच. माझ्या अमितसारखीच चेहरेपट्टी, फक्त रंगात फरक. त्याचा टीशर्ट ही अमितच्या टीशर्टसारखाच, कॉफी रंगावर पांढरे पट्टे. छातीतून एक सूक्ष्म कळ आली. सगळा भूतकाळ क्षणात नजरेसमोर थयथयाट करून गेला. क्षणभर हरवल्यासारखं झालं खरं, पण पुन्हा भानावर आले.’’
‘‘मग सगळय़ा प्रवासाचा विचका झाला असेल ना गं,’’ मी तिला जाणूनबुजून ‘क्षणभर विश्रांती’ दिली.
‘‘हो ना! कितीही पुस्तकात मन रमविण्याचा प्रयत्न केला तरी हट्टी नजर त्याचाच वेध घेत होती. तसा बेताच्या परिस्थितीतलाच वाटत होता. सतत त्याची भिरभिरती नजर कोणाला तरी शोधत असल्यासारखं वाटत होतं. हळूहळू चुळबुळ चालू होती. टीसी दुरून येताना दिसला म्हणून मी तिकीट शोधण्यात गुंतले. तिकीट दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान लक्षात आलं की तो तरुण गायब झाला होता. इतकी हवेशीर जागा सोडली याचं आश्चर्य वाटलं. माझी नजर त्याला धुंडाळू लागली आणि तो दारात सापडला. बेभान होऊन वारं खाण्याचा तरुणाईचा जो आनंद असतो त्याचा मागमूसही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, उलट अपराधीपणा, ओशाळलेपणा, एक अनामिक भीती शरीराला लपेटल्यासारखी देहबोली होती. माझ्याच मनाचे खेळ असतील असा विचार करून मी खिडकीतून बाहेरचं जग बघण्याचा फसवा प्रयत्न करू लागले.’’
सुमती तिच्या तंद्रीतच होती..
‘‘दारात तो दिसला नाही म्हटल्यावर माझं ‘शोधकार्य’ चालू झालं. टॉयलेटला जायला म्हणून उठले तर शेजारच्या डब्यात नखं कुरतडत तो उभा असलेला दिसला. कुठं तरी हायसं वाटलं आणि येऊन पुन्हा  पुस्तकात रमून गेले.’’
  ‘‘बरं झालं, जास्त गुंतवणूक केली नाहीस.’’ मी सुमतीला हलकंच थोपटलं.
‘‘अगं नाही, खरी गोष्ट पुढेच आहे. बाचाबाचीचा आवाज आला म्हणून त्या अनुरोधाने पाहिलं तर टीसीची आणि त्या तरुणाची चांगलीच जुंपली होती. तो तरुण अगतिक होऊन गयावया करीत होता. चूक झाल्याबद्दल क्षमेची याचना करीत होता. टीसी नियमावर बोट ठेवत स्वधर्माचे पालन करीत होता. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्याला खडय़ासारखं टिपणं हे त्याच्यासाठी अभिमानस्पद होतं. आजूबाजूच्या प्रवाशांमध्ये त्याची प्रतिमा उंचावली जाणार होती. त्यामुळे आवाजाची पट्टी वरच्या सप्तकात नेत टीसी सर्वाचं लक्ष वेधून घेत होता. मी अभावितपणे चटकन् उठून पुढे गेले. तो टीसी मला सांगायला लागला. ‘मॅडम, नापास झाला म्हणून घरातून पळून आलाय आणि आता बाहेरच्या परिस्थितीचे चटके बसल्यावर घरी परत निघालाय. जेवढे पैसे खिशात होते तेवढे उडवून झाले आणि आता तिकीट काढायला पैसे नाहीत म्हणून रडतोय. लबाड असतात ही मुलं. यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. पोलिसांच्या स्वाधीन करतो म्हणजे झालं.’ मला राहावलं नाही. मी त्या टीसीला म्हटलं, ‘कशावरून तो खरं बोलत नसेल, आपण एकदा विश्वास ठेवू या नं त्याच्या शब्दावर..’ पण टीसी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याच्यासाठी ही रोजचीच रडकथा होती. टीसीचं बरोबरच असेल म्हणा. म्हणून क्षणभर विचार केला आणि मीच शेवटी टीसीने सांगितले तेवढे पैसे भरून भांडण मिटवलं.’’
‘‘अगं त्या मुलाला काही बोललीस की नाही?’’ मी अंदाज घेत होते.
‘‘खरं सांगू. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला म्हटलं, बाळा, तू घरीच जा हं. सगळे घरचे लोक डोळय़ात प्राण आणून तुझी वाट बघत असतील. पश्चात्ताप झालाय ना, मग पुन्हा झटून अभ्यास कर, परीक्षेला बस. कुठलाही वेडावाकडा विचार मनात आणू नको. तुझ्याचसारख्या घराकडे पाठ फिरवून कधीही परत न आलेल्या एका मुलाची अभागिनी आई तुला सांगतेय. जे दु:ख जन्मभर मी भोगतेय ते तुझ्या आईला भोगायला लावू नकोस. ऐकशील ना माझं एवढं? अभ्यासात गती नसेल तर नसू दे, दुसऱ्याही बऱ्याच गोष्टी आयुष्यात करण्यासारख्या असतात. तेव्हा सरळ घरी जायचं. तुला कोणीही रागावणार नाही. उलट तू डोळय़ासमोर दिसलास की सगळय़ांचा जीव भांडय़ात पडेल. माझे आशीर्वाद आहेत तुला.’’
सुमतीला पुढे बोलवेना. दोन-तीन वर्षांपूर्वीचा तो प्रसंग माझ्याही डोळय़ासमोर उभा राहिला. बारावीचा निकाल लागल्यानंतर नापास झाल्यामुळे घरातून पळून गेलेला सुमतीचा लेक सापडलाच नव्हता. आज पुन्हा जखमेवरची खपली निघाली होती.  ‘‘आजूबाजूचे प्रवासी उलटसुलट प्रतिक्रिया देत होते. माझ्या लेकाला परतीचं तिकीट काढून देणारा भेटला असता तर.. मनाच्या तळाशी दडून राहिलेल्या या विचारामुळेच त्या तरुणाला तिकीट काढून देऊन एक जीव वाचविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. बरोबर केलं ना गं मी?’’
सुमतीच्या प्रश्नाला मी मूक संमती दिली.