तीन दिवसांच्या शाळेच्या कॅम्पला मुलगी गेली खरी, पण तिच्या त्या अनुपस्थितीमुळे खूप काही गोष्टींचा ‘साक्षात्कार’ झाला. निसटून जाणाऱ्या क्षणांना पुन्हा पकडण्याची, लेकीचं आणि स्वत:चं आयुष्यही नव्याने पाहाण्याची दृष्टी मिळाली.

त्या दिवशी दुपारी ऑफिसमध्ये असताना लेकीचा फोन आला. कारण काय तर शाळेचा कॅम्प जाणार होता आणि तोही दोन रात्र आणि तीन दिवस. ती आनंदात होती, पण मी मात्र मनातून पुरती धास्तावून गेले. तेवढय़ात, प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. कधी भरायचा फॉर्म, तू घरी कधी येतेस वगैरे वगैरे. मी लगेचच सावध पवित्रा घेत बाबाला संध्याकाळी विचारू म्हणत फोन व कॅम्पचा विषय दोन्ही आवरतं घेतलं. माझ्यापुरता तो विषय तिथेच थांबवला, कारण आता ‘हो’ किंवा ‘नाही’ या प्रश्नाचे उत्तर भेट बाबाकडून येणार होते.
पण घरी पोहोचल्यावर लक्षात आलं की, लेकीने सर्व सोप्पं करून ठेवलं होतं बाबासाठी! ‘हो’ किंवा ‘नाही’ हा प्रश्न नव्हताच मुळी. संमती गृहीत धरली गेली होती आणि फक्त फॉर्म व पैसे कधी भरायचे एवढंच ‘डिसिजन मेकिंग’ बाबाने करायचं होतं. मनाशी म्हटलं, ‘जाऊ दे तिला, थोडं शिकू दे, थोडं कणखर बनू दे, थोडी जबाबदारी घेऊ दे?’ पण जेव्हा खरंच फॉर्म भरून कॅम्पला जाण्यावर शिक्कामोर्तब झाले तेव्हा मात्र मनात धस्स झाले. कशी राहणार ही जेमतेम दहा वर्षांची चिमुरडी. खाईल ना व्यवस्थित? दिवसभरात भरपूर खेळून थकून नाही ना जाणार? उगाचच हो म्हटलं का?
या सगळ्या विचारात कॅम्पची थोडी-थोडी शॉपिंग सुरूही झाली होती. हे नवीन घे, ते नवीन घे, असं करता करता तो दिवस उजाडलाच. एरव्ही ही आई-बाबांच्या अवतीभवती भिरभिरणारी, पण त्या दिवशी मात्र आम्ही तिच्या पाठी-पुढे करत होतो. अगं, हे घेतलंस ना? ते घेतलंस ना? हे इथे ठेवलंय, ते तिथं ठेवलंय, असं कर, तसं वाग आणि प्रत्येक विनंतीवजा सूचनेनंतर ऐकतेस ना गं? हा दटावणीचा प्रश्न होताच वरच्या स्वरात. सगळ्याला ‘हो हो’ म्हणत होती पठ्ठी, पण मनाने कॅम्पला पोहोचल्याची सगळी चिन्हं डोळ्यांत आणि प्रत्येक होकारात दिसत होती.

  मनात आलं, आताच्या कॅम्पवाल्यांसाठी किती सोयी आहेत ना. आता ट्रॉली बॅग आहे दिमतीला. आपल्या वेळेला असं काही नव्हतं. आपल्याला व आपल्या बॅगेला झेपेल एवढंच सामान न्यायची परवानगी होती आणि बॅगेचा रंग तर फक्त ‘मळकट’ या शब्दात मावणारा होता. बॅग रंगीबेरंगी असू शकते किंवा असावी अशी त्या वेळी कुणाचीही किमान अपेक्षाही नव्हती आणि चाकं फक्त गाडय़ांनाच लावण्याची प्रथा होती; पण आजच्या पिढीची ट्रॉली बॅग अलगद, नाजूक हाताने सरकवली जात होती. ‘मॉर्निग वॉक’ला जाणाऱ्या काका-काकूंचे लक्ष वेधून घेत स्वारी निघाली.
शाळेत पोहोचतो तर काय, एकच कलकलाट! बऱ्याच मुलांनी घडय़ाळाच्या काटय़ांचा ताबा स्वत:च्या हातात घेतल्यासारखा वाटत होता. त्यांच्या घडय़ाळात साडेसहा कधीचेच वाजून गेले होते. पालकांच्या सूचनांचा मारा चालूच होता. वस्तूंची काळजी घ्या, नीट जपून ठेवा, नंतर-नंतर वस्तू जाऊ देत, स्वत:ची काळजी घ्या इथपर्यंत सूर लागत होते. कोणी प्रेमाने, कोणी रागावून, पण सर्वाच्या सूचना सारख्याच.
आणि नंतर आला महत्त्वाचा टप्पा, ‘बाय-बाय’ करण्याचा. मुलं तर मजेतच होती. आता पालकांच्या सूचनांना मज्जाव होता. सगळ्या सूचना पाठ होत्या आणि कॅम्पला पोहोचण्याचा अवकाश त्यांची अंमलबजावणी निश्चित होणार एवढा विश्वास ते चिमुकले डोळे देत होते. बाय-बाय, टेक-केअर म्हणताना डोळे पाणावलेच. सगळे पालक धूसर दिसायला लागले. आता तीन दिवस काही संपर्क होणार नव्हता, कारण आजच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजेच मोबाइल घेऊन जाण्यावर बंदी होती. आता थेट-भेट होणार होती तीन दिवसांनी.
रविवारचा दिवस आणि वेळ जात नाही असं पहिल्यांदाच होत होतं. घरी आल्यावर वाटलं की, सगळंच स्तब्ध झालंय, कुणी हलत नाही, कुठेही संवाद नाही. काही करूच नये असं वाटत होतं. दुपार तर खूपच कंटाळवाणी होती. आपण बरे आणि आपले ‘व्हॉट्सअ‍ॅप’ असे मनाला निक्षून सांगितल्यावरही वेळ जात नव्हता. सगळेच रूक्ष होऊन गेले होते. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन शांततेचा पवित्रा घेतलेला बरा ही बऱ्याच वर्षांची शिकवण जपायला नवऱ्यालाही आजचाच दिवस मिळाला होता जणू!
 सोमवार ते मंगळवार या दोन्ही दिवसांना २४ तासांचे बंधन आहे, असे वाटतच नव्हते. घडय़ाळ पुढे सरकत नव्हते. दोन दिवस रेटता-रेटता खूपच कंटाळा आला. मंगळवारी संध्याकाळी पिल्लं कॅम्पवारी करून घरटय़ाकडे परतणार होती. शाळेत गेल्यावर मुलांना पाहताच सर्वाना हायसं वाटलं. पालक आणि मुलं या दोघांच्या नजरेत ‘मिस यू’चा भाव प्रकर्षांने जाणवत होता. लेकीला पाहताच खरंच खूप आनंद झाला.
 पुन्हा आयुष्य त्याच वेगाने सुरू झालं खरं, पण त्या दोन दिवसांत खूप गोष्टी नव्याने शिकता आल्या. आपण ऑफिसमधून थकून घरी जातो आणि मुलांना मिठीत घेतल्यावर, त्यांच्या एका हास्यावर आपला थकवा निघून जातो; पण आपण घरी नसतानाचे क्षण यांना त्या मिठीत मिळत असतील का? दोन दिवस मुलं दूर असतील, तर आपण कासावीस होतो; पण पूर्ण दिवसांत आपण त्यांना कितीसा वेळ देतो? त्या वेळेत त्यांच्या छोटय़ा मनात किती चलबिचल चालू असेल? आपण आपल्या वेळेनुसार, कामानुसार त्यांच्याशी संवाद साधतो; पण तो त्यांच्या दृष्टिकोनातून पुरेसा असतो का? आपण शाळेत असताना वेग, वेळ, काम यावरील गणिते लीलया सोडवली; पण आयुष्याच्या या वळणावर वेग, वेळ, काम या सर्वाची सांगड घालताना आपण नक्की काय घडवतोय? आपलं करिअर? की आपल्या मुलाचं भवितव्य? बाप रे! या विचारानेच कसं तरी व्हायला लागलं. आता ठरवलंय, आपला जास्तीत जास्त वेळ लेकीला द्यायचा.
हे सर्व लिहिताना आजूबाजूला अखंड बडबड चालू आहे.. हवीहवीशी वाटणारी ही बडबड. ही ऐकायलाच माझं मन दोन दिवस अस्वस्थ होतं तर..