ch26ती रस्त्याचं काम करणारी बिगारी कामगार आंबुबाई. रोज उन्हातान्हांत, रस्त्यात डांबराचं काम करणार तेव्हा पैसे मिळणार, पोटाला अन्न मिळणार. दिवसा मुकादमाच्या शिव्या आणि रात्री नवऱ्याचा मार खात जगणाऱ्या तिच्यासारख्या असंख्य कामगार बायांचं आयुष्य हे असं कष्टाचं आहे. ते काम करत असणाऱ्या रस्त्यावर त्यांचा घाम.. अनेकदा तर रक्त गळतं आणि भक्कम रोड तयार होतो.

एऽऽऽ म्हादू आवर की लवकर. कवाधरनं आंघुळ करतोय रं! तुझ्यामुळे उशीर व्हईल ठिय्यावर पोचायला! मंग काम नाय भेटलं तर घरी यावं लागंल. मंग रातच्याला घालू काय पोटात तुमच्या आं? चल आवर पटापटा.

मी म्हादूला वराडली तशी बारकी दोन लेकरं मला चिकटली. तिघांना भाकर खावू घातली आन् निघालो. उपाशीच! मालक आदीच ठिय्यावर पोहोचलं व्हतं. मी गेल्ये तवर ठिय्यावरची गर्दी ओसरली व्हती. पन आमचं ठेकेदार अजून व्हतं तिथं! लगालगा त्यानं मला टेम्पोत घातली आन् मी बी तीन लेकरांसंग कामावर निघाली. नशीब माझं! आज तीन दिवसांनी काम भेटलं, त्ये बी गेलं असतंच महादूपायी! येळेवर नाक्यावर नाय ग्येलं तर ठेकेदार दुसऱ्यासनी घिऊन जातोया रोडच्या कामाला!
धा वाजले कामाच्या जागी पोचाया. साइटवर पोहोचल्याबरुबर दोघं लेकरं पळाली खडीवर खेळाया! आन् मी भाकरीचं गठुडं सोडलं. पहाटं उठून भाजी-भाकरी बनवली व्हती ती घशाखाली ढकलली आन् टिकाव, घमेलं, फावडं खांद्यावर टाकूनशान कामाला भिडली. धाकटं वर्साचं पोर पायात लडबडत व्हतं. मुकादमानं त्याला लाथेनं दूर ढकाललं आन् माज्यावर वराडला. ‘ए.. आंबु.. या पोराला सोड शेडमंदी आन् ये इकडं आवारी करायला!’
‘व्हय जी’ म्हनलं आन् पोराला उचाललं. साइटवर सायबाची शेड असतीया. त्यात लेकराला न्येलं. त्याचं आंग गरम लागतंया! मजुरी हातात पडली की रातच्याला दवाखान्यात न्यायला हवं. खडीवर येक पटकूर पसारलं अन् झोपावलं पोराला त्यावर! पार गपगार पडून गेलंया पोर! मी थोरल्याला हाक मारली. त्याच्याजवळ बशीवलं आन् मी रोडची आवारी कराया निघाली.
या रोडचं काम आजच सुरू झालंया. म्हून पयले रोडचं ड्रेसिंग केलं. म्हंजी रोडवरचं गवत काढलं. झाडझूड काढली. वरून माती पसरून आवारी केली. तवा रोड एक लेवल झाला. तवर ट्रकातून फोडलेली खडी आली. एका हावेमध्ये तीन बरस खडी असतीया. ती सहा जागी खाली क्येली ग्येली. ती रस्त्यावर बेस पसारली. त्यावर मुरूम मारला. साइटवर चाळीस मान्सं काम करत व्हती. आमी बायांनी खडी पसरवली. तोवर बाप्यांनी त्यावर एक लेअर खडी आन् दुसरा लेअर खडी मारला. आता ट्रकमधून मोठी खडी आली. ती बी रस्त्यावर पसारली. त्यावर आणखी ‘एक इंच’ वाली खडी टाकली. तेवढय़ांत जेवणाची सुट्टी झाली.
मी पळतपळत शेडमंदी गेलो. तर बारकं पोरगं शेडमंदी यकटच गळा काडून रडत व्हतं. थोरलं कारटं कुठं उलाथलं होतं यल्लमा जाणे.. मी पयलं बारक्याला अंगाशी घ्येतलं, दूध पाजलं. महादू आन् दुसऱ्या पोराला हाक द्येली. त्ये बी आलं-‘भूक लागली माय’ वरडत. त्याला भाजी-भाकरी चारली. मी बी खाल्ली तवर मालक आलं. त्यान्ला भाजीभाकरी दिली आन् मी उठली. धाकलं पोर तापानं फणफणलं होतं. कण्हत होतं. मी पुन्हय़ांदा त्याला पटकुरावर झोपिवलं. येक डाव वाटलं, पयल्यासारखी अफु चारावी गपगुमान झोपून जाईल. पर न्हाय चारवली. म्हधलं पोर त्या अफूपायी अर्धवट झालंया. ह्य़ेचं नगं व्हायला तसं. तेवढय़ात अंगणवाडीची मास्तरीण आली. दोघा पोरान्ला घेऊन ग्येली. आता दोन तास पोरं कायबाय शिकतील. उन्हात उंडारनार न्हाईत. धाकलं पोर झोपलं तशी उठली मी. पंधरा-वीस मिनिटावर बसलं तर मुकादम खाडा लावतो. काम क्येलं न्हाय तर मजुरीबी न्हाय भेटतं.
रोडवर जाऊन हुबी ऱ्हायली तवर गडी मान्सांनी डांबराचा बॅरल उकळया ठिवलं हुतं. वरून ऊन आग ओकतंया, गडी माणसांनी त्ये उकाळतं काळ डांबर रस्त्यावर टाकलं. फावडय़ानं पसरलं. गरम डांबराच्या झळांनी आंग निसतं भाजून निघत व्हतं. मधीच गरम डांबराची खडी पायात घुसली का पायाचा निसता जाळ व्हत होता. तसंच आमी बायामान्सांनी त्यावर ‘अर्धा इंच वाली’ खडी पसरली.
रेडिमेड मालाचा ट्रक आला. त्यातून काढूनशान बोजर मिशीननं डांबराचा मिक्स माल खडीवर ओतला. अंग लय भाजत हुतं पन तशीच त्या मालाची आवारी क्येली. तेवढय़ात रघुबाय माज्याजवळ आली. तिचं तोंड उतारलं व्हतं. मी समजली, ‘म्हयन्याचा’ लय त्रास हुतो. खडीनं भरलेली घमेली उचलून लय अंगावर जातं. पोट दुखतं, मी तिचं घमेलं उचलू लागल्ये- तो मुकादमानं पाहालं. लय वराडला दोघींना! म्हनला, ‘काम व्हत नाय तर घरला जा. हिथं कशापायी येता? कामचोर.’ माज्या डोळ्यात पाणी आलं. कसलं कुम्यावाणी जिणं हो? कामावर दिसभर मुकादम शिव्या घालतो आन् घरी रातच्याला मालक दारू पिऊनशान बडिवतो. रोज रात्री त्याचा मार खायचा. शरीराचं लय हाल करतो. तो बी सोसायचा. आन् सकाळी उठूनशान रेतीची घमेली व्हायची. बापानं शिक्शान दिलं असतं तर कशापायी असलं जिणं जगलं असतं. बाप चांगला सोलापूर नगरपालिकेला माळी व्हता. मला तिसरीपर्यंत शिकविलं आन् घरात डांबलं. लगीन लावून दिलं तवा व्हती अठरा वर्साची. म्हायेरची प्रस्थिती गरिबीची, तशीच सासरची बी. घरात खाणारी तोंडं धा-बारा. सासू, सासरा, नणंद, जावा, दीर ही सगळी मान्सं लोणावळ्यापर्यंत कामाला जायची. आम्ही सगळी सोलापूर, विजापूरहून या मुलखात आलो आन् इथलेच झालो. घरात तुळू बोलतो पण कामावर मऱ्हाठीत! तर हे सगळे मला बी लगीन झाल्याबरोबर कामावर घिऊन जाऊ लागले. कामावर फावडय़ानं दगड उचलून रेतीची घमेली आन् उसची पोती वाहून आंग लागलं दुकाया! हातपाय पार मोडून ग्येलं! पण सांगायचं कोणाला! सगळ्या बायांची तीच तऱ्हा! लय बेकार काम हे! गरम डांबराच्या झळा लागूनशान गडीमान्सांच्या छातीत लय दुखतं. दम लागतो. उन्हानं जाळ भडाकतो. गेल्यासाली अंगावर गरम डांबर पडलं आन् धन्याची छाती जळाली. तवापासून त्यालाही काम झेपत न्हाय. पन काम नाय क्येलं तर मजुरी भेटत नाय. मजुरी नाय भेटली तर पोटात काय घालायचं? तसं काम जडच आसतं हो! खूप तरास व्हतो. पन मला झाली सवय आता त्याची बी! चार लेकरं झाली मला! गरोदरपनात नऊ म्हयने काम क्येलं. सक्काळी कामावर ग्येले. दिसभर काम क्येलं. संध्याकाळी घरी यिऊन भाजी-भाकरी बनवली. आन् रातीला चांगली बाळंत झाली. कदी आडली नाय काय नाय. यलम्माची चांगली किरपा. दुसरं काय? म्हून दरसाली आम्ही यात्रंला, आईच्या दर्शनाला जातो. तिला नारळ, फुलपात्र देतो. माझ्या सासूला जट आलीया. मला बी आलीया. जट आलेली चांगली असते! आपल्या घरात सुख-शांती ऱ्हाते. जट आली तवाधरनं आमी डोक्याला फणी लावत न्हाय, तरी डोक्यात उवा नसत्यात. शिवाशिव झाली तरच डोक्यात उवा पडत्यात, न्हायतर नाय. आता ही जट आमच्या संगच जानार. फकस्त बाहेर पडताना, कामावर जाताना मी डोक्यावरून पदर घट्ट लपेटून घेती. हांही जट आली तवाधरनं मी दर नवरात्रीत यल्लमाची पूजा करती. देवीची परडी डोक्यावर घेती आन् नऊ दिवस जोगवा मागते. उपास बी करते.
आगं बया..केवढय़ानं गाडीचा हॉर्न वाजला. मी आपली माज्याच नादांत! ती गाडी आली न्हवं अंगावर? मेन रोडवर काम करताना लय भ्या वाटतं? रस्त्याच्या मधोमध आमी काम करत असतो. तर दोनीबी बाजूंनी गाडय़ा अंगावर येतात. थांबत न्हाईत का बाजूला बी जात न्हाईत. लई मान्सं गावलीत गाडीखाली. म्हनून दोन्हीकडं बघून मगच काम करावं लागतं. नायतर जीव गेलाच समजावा. घरी येईसपतुर माणूस आपला नसतोया. शंभर रुपये रोजासाठी जीव बी गमवावा लागतो! आन् गडी मान्सांची काय गोस्ट! गेल्याच म्हयन्यात वडाराची येक बाई रोडच्या कामाला गेली व्हती. बारकं लेकरू आईसाठी हठ धरून बसलं. माय काय काम सोडून गेली नाय त्यांच्याकडं. शेवटी ते रडून रडून रोलरखाली जाऊन झोपलं. ड्रायव्हरनं बघितलं नाय काय नाय? आन् रोलर चालू क्येला. त्याखाली चिरडून मेलं ते पोर! सरकारकडनं पैसे भेटलं पन पोर ग्येलं ते ग्येलच!
त्ये समधं आठवलं आन् मी शेडमंदी धावले. माझं पोर गरम वाळूवरच्या पटकुरावर झोपून गेलं व्हतं. आंग तापानं फणफणलं व्हतं. मधल्या लेकराला खेळताना सळ्यांचा बार डोक्याला लागला व्हता. त्येबी रडत व्हतं. लेकरांची दशा बघून लय वंगाळ वाटलं. आम्हाला शिक्शान न्हाय म्हून आमची ही गत! पोरांनी तरी शिकलं पायजे! काका यिऊन सांगून गेलेत. ह्य़ा साली काकाच्या हास्टेलात (गिरीश प्रभुणे) पोरान्ला पाठवाया पायजे.
आमचा घाम आन् रगात रोडवर गळतं. तवा रोड भक्कम व्हतो. पोरांची जिंदगी भक्कम करायची आसलं तर शिक्शान पायजे! व्हयं! पोरांनी शिकलं पायजे! पटतंय मला.
माधुरी ताम्हणे