न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधली नोकरी, टर्किज् स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षांची सल्लागार ते ‘टर्की मायक्रोसॉफ्ट’ची जनरल मॅनेजर हा तिचा प्रवास वरवर जरी पाहता एखाद्या बिझनेस वुमनचा वाटत असला तरी त्या मार्गानेही टर्की अर्थात तुर्कस्थानातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा तिचा मूळचा हेतू साध्य झाला. व्यावसायिक स्त्रियांची आगळी मोट बांधणारी ‘टर्किश विमेन्स इंटरनॅशनल नेटवर्क’ ऊर्फ ‘टर्किश विन’  ही संस्था स्थापन करत, उदयोन्मुख स्त्रियांसमोर नवा आदर्श ठेवणाऱ्या इस्तंबूलच्या मेलेक पुलटकोनाक विषयी..
मेलेक पुलटकोनाक तुर्कस्थानच्या इस्तंबूलची सुकन्या. परदेशात शिक्षण घेण्याचा तिचा प्रारंभीपासूनच मानस होता आणि त्यात ती यशस्वी झाली. तुर्कस्थानातील स्त्रियांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं आर्थिक धोरणं राबवता यावीत, याची तिला तीव्र ओढ वाटत होती. त्या दृष्टीनं ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’  येथून पदवी मिळवल्यानंतर, ‘जेंडर स्टडीज’ या विषयात पीएच.डी. मिळवणं हे तिचं उद्दिष्ट होतं. जेंडर स्टडीज ही विविध ज्ञानशाखांना स्पर्श करणारी समाजशास्त्राची शाखा आहे. त्यात वंश, संस्कृती, राष्ट्रीयता आणि अपंगत्व अशा विविध गोष्टींचा स्त्री-पुरुष भूमिकांवर होणारा परिणाम अभ्यासला जातो. स्त्री-पुरुष भूमिकांमधला भेद नैसर्गिक किती आणि त्याच्या व्याख्येवर सांस्कृतिक प्रवाहांचा परिणाम किती या गोष्टींचासुद्धा परामर्श घेतला जातो. तुर्कस्थानातील स्त्रियांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याच्या हेतूनं तिनं ही ज्ञानशाखा निवडली होती. शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे तिला त्या मार्गानं जाता आलं नाही. तिचं व्यावसायिक जीवन पूर्णपणे भिन्न मार्गावरून गेलं, तरीसुद्धा वेगळय़ा मार्गानं का होईना, स्त्रियांबाबतचं तिचं मूळ उद्दिष्टं ती प्रभावीपणे साध्य करू शकली. हे कसं घडलं हे पाहाताना तिच्या नियोजन-धोरणात घडत गेलेला बदल पाहाणंसुद्धा मोठं मनोरंजक ठरेल.
सुरुवातीला तिच्या डोळय़ांसमोर जे उद्दिष्ट असे, त्या दिशेनं नेणारा ती फक्त एकच मार्ग ठरवत असे. त्याला ती ‘प्लॅन ए’ म्हणत असे. ती कोणताही पर्यायी असा ‘प्लॅन बी’ किंवा ‘प्लॅन सी’ आखत नसे. परंतु जगाच्या शाळेत अनुभव घेऊन शहाणी झालेली मेलेक आता मात्र म्हणू लागलीय ‘‘If  ‘Plan A’ did not work, the alphabet has 25 more letters! Stay cool!’’ म्हणजेच ‘इंग्रजीत पंचवीस मुळाक्षरं आहेत, तेवढे पर्यायी मार्ग तुम्ही शोधू शकता. हिम्मत हारू नका. शांतपणे मार्ग काढा.’ हे नवं तत्त्वज्ञान ती कोठून शिकली? पाहू या तिच्या आयुष्याचा प्रवास.
‘लंडन स्कूल ऑप इकॉनॉमिक्स’मधून बी.एस्सी. पदवी मिळवल्यानंतर ‘जेंडर स्टडीज’ साठी मेलेकला शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे ती तिच्या काकूजवळ न्यूयॉर्कला गेली. तेथे राहायचं तर नोकरी मिळवून पैसे कमावणं भाग होते. ती ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये अर्थशास्त्रातील संशोधनासाठीच्या नोकऱ्या शोधू लागली. तिनं तेथे सापडलेल्या साऱ्या जाहिरातींकडे अर्ज पाठवून दिले. तिला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये नोकरी मिळाली. तिथं तीन वर्षांचा अनुभव घेऊन तिनं तुर्कस्थानमध्ये, ‘टर्किज स्टॉक एक्सचेंज’च्या अध्यक्षांची सल्लागार म्हणून नोकरी मिळवली. परंतु तो अनुभव फारसा सुखद न ठरल्यामुळे तिनं कोलंबिया युनिव्हर्सिटीत एम.बी.ए.साठी अर्ज करून प्रवेश मिळवला. एम.बी.ए.ची पदवी मिळवल्यावर तिनं एका नवोदित टेक्नॉलॉजी कंपनीत सात वर्षे अनुभव घेतला. योगायोगानं एका कॉन्फरन्समध्ये तिची मायक्रोसॉफ्टच्या तुर्कस्थानमधल्या सरव्यवस्थापकाशी ओळख झाली. संभाषणादरम्यान तिचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला, की त्यानं तिला तुर्कस्थानमधील मायक्रोसॉफ्ट टीममध्ये येण्याचं आमंत्रण दिलं.
तिचा हा व्यावसायिक प्रवास तिच्या मूळ कल्पनेपेक्षा सर्वस्वी भिन्न मार्गानं गेला असला, तरी स्त्रियांच्या सबलीकणाचं तिचं मूळ उद्दिष्ट ती एका वेगळय़ाच पद्धतीनं तडीला नेऊ शकली.
२०१० साली मेलेकनं ‘टर्किश विमेन्स इंटरनॅशनल नेटवर्क’ ऊर्फ टर्किश  विन’ची स्थापना केली. व्यावसायिक स्त्रियांची ही एक आगळीवेगळीच संघटना आहे. तुर्कस्थानात जन्मलेल्या आणि त्याच्याशी संबंध राखून असलेल्या जगभरातल्या स्त्रियांना, तेथे राहून काम करणाऱ्या स्त्रियांना भेटवणारं हे आगळंवेगळं व्यासपीठ आहे. या सर्व स्त्रियांची चार महत्त्वाची नीतिमूल्यं समान असतात. कुतूहल, औदार्य, पारदर्शित्व आणि धैर्य. ‘टर्किश  विन’च्या माध्यमातून मेलेक आर्थिकदृष्टय़ा स्त्रियांचं सबलीकरण करते आहे. या माध्यमाद्वारे एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रिया आपापल्या व्यवसायात प्रगती करण्याची आकांक्षा ठेवू लागतात, इतरांना संप्रेरित करतात आणि या संस्थेला सर्वदृष्टय़ा हातभार लावतात. मेलेक या ‘टर्किश वीन’ची संस्थापिका, पालक आणि अधीक्षक आहे. नीलुफर डय़ुकर ही ‘एऑन मर्णर्स अँड अ‍ॅक्विझिशन ग्रुप’ची कार्यकारी संचालिका, अस्ली बेगिन ही स्लोलेम कन्सल्टिंगची प्रमुख यांसारख्या अन्य उच्चपदस्थ तुर्कस्थानातील स्त्रिया या संस्थेला महत्त्वाचं योगदान देत आहेत. बोरूसात होल्डिंग, डोगन डोल्डिंग, इल्टेक मीडिआ, मीडिआनोव्हा, मायक्रोसॉफ्ट आणि टर्कसेल या नामवंत कंपन्यांची सुद्धा ‘टर्किश विन’ला भरघोस मदत मिळतेय. स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम आणि सबल करण्याचा मेलेकचा मूळ हेतू आता भिन्न मार्गानं, उत्तम प्रकारे साध्य झाला आहे. संप्रेरित करणारे अन्य स्त्रियांचे आदर्श डोळय़ापुढे उभे करणं, विविध प्रकारचे सल्ले मिळवण्याची सोय उपलब्ध करून देणं, अन्य बाबतीत मार्गदर्शन पुरवणं या अनेक गोष्टींद्वारे व्यवसायासाठी तुर्कस्थानच्या स्त्रियांना मदत केली जातेय. संगणकानं केलेल्या क्रांतीमुळे असा संपर्क सुलभतेनं साधता येतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
मूळ उद्दिष्टाच्या वाटेत आलेले अनंत अडथळे ओलांडून वेगळय़ा मार्गानं तिथवर पोचण्याची चिकाटी आणि दूरदृष्टी मेलेकनं कुठून मिळवली, हा प्रश्न विचारला असता ती पुढील तीन गोष्टींना श्रेय देते.
१. अनुभवानं तिनं मिळवलेलं तत्त्वज्ञान आहे की, ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित करा, परंतु त्याकडे होणाऱ्या विविध मार्गाचा, पर्यायांचा खुल्या मनानं विचार करा.
 २. तिच्या आयुष्यात आलेल्या दोन अत्यंत खंबीर स्त्रिया आहेत, तिची काकू आणि तिची आई. त्या दोघीही उद्योजिका आहेत आणि तिच्या आदर्श आहेत. या स्त्रियांनी तिला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली, व्यावसायिक स्त्रियांनी एकमेकींना मदत करणारा गट तयार करणं अत्यावश्यक असतं. मेलेकचा अनुभव असा की स्त्रियांच्या व्यावसायिक आयुष्यांत अनेकदा या महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष होतं.
३. आजवरच्या व्यावसायिक आयुष्यात तिनं एकाच वेळेस दोन समांतर गोष्टी केल्या आहेत. एक गोष्ट आहे व्यावसायिक, मिळकत देणारं काम. दुसरी गोष्ट  आहे स्वच्छेनं समाजसेवी संस्थांमध्ये सहभाग घेऊन मानवकल्याणासाठी हातभार लावणं. याच मार्गानं तिनं स्त्रियांच्या सबलीकरणाचं आणि सक्षमीकरणाचं तिचं मूळ ईप्सित साध्य केलं आहे.
ध्येयपूर्तीच्या मार्गात अनेक खाचखळगे येत असतात. पडलं तरी धूळ झटकून हसतमुखानं मार्गक्रमणा करावी लागते. पडझडीतून नवे बोध घ्यावे लागतात. वाटेत समानधर्मी स्नेही जोडावे लागतात. त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी लागते. वेळेला उद्दिष्टाकडे नेणारा मार्ग ठप्प झाला, तर वेगळय़ा मार्गाचा शोध घ्यावा लागतो. हे सारं डोळय़ांपुढे उद्दिष्टाचा अढळ ध्रुवतारा ठेवून करावं लागतं. तेव्हा कुठे मेलेकला सापडला, तसा ‘टर्किश विन’सारखा, कृतकृत्य वाटेलसा जनहिताचा मार्ग गवसतो.