त्या काळाच्या सामाजिक समजुतीप्रमाणे आनंदी नवऱ्याच्या आज्ञेप्रमाणे शिक्षण घ्यायला गेली. तरी तिची घरीदारी अवहेलना का झाली? नातलग, इष्टमित्र, पती, समाज या सर्वानी मिळून आनंदीचा बळी घेतला, असं मानायचं का? आनंदीला पुरेसा मानसिक आधार, परदेशात जगण्यासाठी पुरेसं द्रव्य मिळालं असतं तर तिला पोटभर जेवता आलं असतं. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तिथल्याप्रमाणे कपडे वापरायची परवानगी गोपाळ जोशींनी दिली असती तर तिच्या मागे आजाराचं शुक्लकाष्ठ लागलं नसतं. तरीही आपल्या आयुष्याची आहुती देऊन तिने पुढच्या पिढीतल्या स्त्रियांना शिका आणि वैचारिकदृष्टय़ा सक्षम व्हा, असा संदेश दिला. त्या डॉ. आनंदीबाईंची मंगळवार ३१ मार्चला दीडशेवी जयंती साजरी होते आहे. त्यानिमित्ताने..

आज २०१५ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांचं जीवन समजून घेताना खूप काही प्रश्न मनात उभे राहतात. आणि दुसऱ्या बाजूला डॉ. आनंदी एक थोर तरुणी (दी ग्रेट) असंही मनात निनादत राहतं. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी  स्त्री. किती तरी रूपं.
भारतीय (महाराष्ट्रीय पोशाख) रीतिभाती, आपला शाकाहारी आहार तिथेही सांभाळणारी, तरी इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात (ती तिने इथेही केली होती) करून वैद्यकीय शिक्षण प्रकृतिअस्वास्थ्य सांभाळीत पूर्ण करणारी तरुणी. या सर्वाबरोबर पती, नातेवाईक, सुहृद यांना सतत पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधणारी    डॉ. आनंदीबाई यांच्यावर तिच्या समकालीन आणि लेखिका असलेल्या काशीबाई कानिटकरांनी चरित्र लिहिलं. त्यानंतर अंजली कीर्तने यांनी संशोधन करून नवं चरित्र लिहिलं. श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ कादंबरी लिहिली. त्याचं नाटकही रंगभूमीवर आलं. १५० र्वष झाली तरी या तरुणीची अजून वाचकांना, अभ्यासकांना, स्त्रियांना भुरळ पडते आहे ती वैचारिक संघर्षांच्या संदर्भात.
लेखिका, विचारवंत कृष्णाबाई मोटे या वयाच्या तिसाव्या वर्षी १९३३ साली आनंदीबाईंप्रमाणे नऊवारी साडीत बोटीने इंग्लडला गेल्या त्या ‘इंडस्ट्रिअल वेल्फेअर’ या विषयाचं शिक्षण घ्यायला. पण ही आनंदीबाईंच्या मृत्यूनंतरची गोष्ट. िहगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या पार्वतीबाईही अमेरिकेला गेल्या होत्या, संस्थेसाठी पसे जमा करायला. महाराष्ट्रातल्या स्त्रियांना शिक्षण, सामाजिक कार्य हा रस्ता डॉ. आनंदीबाईंनी दाखवला. डॉ. रखमाबाईंसारखी स्त्री स्वत:च्या न्याय्य हक्कांसाठी झगडली. त्यांचाही प्रेरणास्रोत डॉ. आनंदीच असणार यात शंका नाही. त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्या वेळची कामा रुग्णालयाची वैद्यकीय अधिकारी डॉ. एडिथ हिने रखमाबाईंना वैद्यकीय शिक्षण घ्यायला इंग्लडला पाठवलं आणि त्या १८९५ साली डॉक्टर होऊन परतल्या. नंतर १९५० पर्यंत सुरतेला          डॉ. रखमाबाईंनी डॉक्टरकीचा पेशा सांभाळला. १९५५ साली त्या वारल्या. खुद्द मुंबईच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेली तरुणी म्हणजे आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांची कन्या माणक. ती १८९२ साली पहिल्या पाच क्रमांकात उत्तीर्ण झाली.
हे सगळं डॉ. आनंदीबाईंच्या संदर्भात आठवत राहतं. लहानपणापासून आनंदीला मुलगी म्हणून घरातल्यांची नाराजी पत्करावी लागली. आई चाबूक, लाकूड कशानेही तिला मारीत असे; इतकं की ही
मुलगी डोळे पांढरे करी तेव्हा आजी मधे पडत असे. आनंदीचं वर्णन (माहेरचं नाव यमुना) चरित्रकारांनी बुद्धिमान, जिद्दी, एकपाठी, नम्र स्वभावाची, पण स्वाभिमानाने जगणारी असा केला आहे. तिच्या रूपाचं वर्णनही केलेलं आहे. वयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाईचं लग्न बिजवर असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी झालं. तेव्हा ते तीस वर्षांचे होते आणि त्यांना पहिल्या पत्नीचा मुलगा होता.
इथे गोपाळराव जोशी प्रथम लक्षात राहतात ते त्यांनी आनंदीच्या वडिलांना घातलेल्या अटीमुळे. ते म्हणाले, ‘मी हिला मला आवडेल त्याप्रमाणे शिकवीन. याजबद्दल तुम्ही मागाहून कुरकुर कराल तर कामास पडणार नाही.’ वडिलांनी ती अट मान्य केली. त्यांना वाटले इतर सुधारक (हा त्या काळातला शब्द) जसे बडबडतात त्यातलीच ही एक बडबड आहे. परंतु त्यांना गोपाळ जोशी यांचे विचार माहीत नव्हते. ते वेगळे होते. स्त्रीची अक्कल चुलीपुरती अशी स्त्रीची अवहेलना करणारा समाज मुलगी ५-६ वर्षांची होताच तिचं लग्न करून टाकत असे. घरातली कटकट दुसऱ्या घरी जावी, तिकडे तिचं काही का होईना; ही उदासीन वृत्ती होती. आजही बालविवाहाला बंदी असली तरी पुरुषी मानसिकतेत कितपत फरक पडलेला आहे हे सतत घडणाऱ्या घटनांवरून लक्षात येत आहेच.
गोपाळराव म्हणत, ‘स्त्रियांची बुद्धी ही पुरुषांप्रमाणेच किंबहुना अधिक तीव्र असते. त्यांना शिक्षण मिळाले तर त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतील. एखादी दुर्वर्तनी स्त्री आपले वाईट वर्तन सोडून जर शिकण्यास येईल तर तिला मी शिकवून सन्मार्गाला लावून शहाणी करीन.’
एकीकडे गोपाळराव स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कत्रे, तर दुसरीकडे दहा वर्षांच्या आपल्या पत्नीला, आनंदीला ते खुर्ची आदी फेकून मारीत असत. आनंदीला बाराव्या/तेराव्या वर्षीच बाळंतपणाला सामोरं जावं लागलं. मुलगा झाला. पण तो फार जगला नाही. पुढे तिला आणखी मुलं झाली नसावीत. त्यामुळे आनंदीने शिक्षणात जास्त रस घेतला असावा.
गोपाळराव जोशी पोस्टमास्तर होते. आनंदीच्या शिक्षणात तिच्या आजीचा अडथळा होतो म्हणून त्यांनी कोल्हापूरला बदली करून घेतली. तिथे मिशनरी स्त्रिया तिला शिकवीत. कोल्हापूर, मुंबई, भुज, कोलकता, बराकपूर, श्रीरामपूर (बंगालमधलं) इथे प्रत्येक ठिकाणी गोपाळरावांबरोबर आनंदी जात राहिली आणि गोपाळराव तिला शिकवीत राहिले.
कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आलं की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचं शिक्षण करावं. त्या वेळी गोपाळरावांनाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु ते काही जमू शकलं नाही. आनंदी बुद्धिमान. तिनं इंग्रजी भाषा व अन्य विषय पटकन आत्मसात केले. आनंदीला अमेरिकेला शिकायला जाण्यासाठी पशांची तरतूद आवश्यक होती. ती करण्यात, तिला जायला सोबत शोधण्यात २-४ र्वष गेली. भारतात बदलीच्या ठिकाणी आनंदीला समाजाचे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे विपरीत अनुभव आले. ती गोपाळरावांबरोबर फिरायला जाते. इंग्रजी शिक्षण घेते. याबद्दल कुतूहल म्हणून त्या दोघांना पाहायला लोक गर्दी करीत आणि गोपाळरावांना विचारीत, ही ठेवलेली बाई का? आनंदीलाही खूप अपमानास्पद शेरे ऐकावे लागत. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदी आपला अभ्यास निष्ठेने करी.
श्रीरामपूर (बंगाल) येथे गोपाळरावांची नोकरी असतानाच आनंदीचं अमेरिकेला जायचं ठरलं. तिथे जाऊन वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याकरता हेील्ल’२ टी्िरूं’ उ’’ीॠी ऋ ढील्लल्ल२४’५ंल्लल्ल्रं मधे तिनं शिकावं ठरलं.
याआधीची घटना विस्मयकारक आहे. न्यूजर्सीमधल्या रोशेल या गावातील श्रीमती कार्पेटर या दाताच्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. ते साल होतं १८८०. त्यांनी तिथे ‘मिशनरी रिव्हू’ नावाचं मासिक सहज चाळायला घेतलं. त्यात गोपाळराव जोशी व आर. जी. वाईल्डर यांची पत्रं छापलेली होती. त्यावरून कार्पेटरबाईंना समजलं की गोपाळ जोशी यांना आपल्या पत्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायचं आहे. आणि त्यांच्या मनात त्या अनोळखी, न पाहिलेल्या आनंदीबद्दल स्नेहभाव उत्पन्न झाला. त्याच वेळी अजून एक विस्मय वाटावा अशी घटना घडली. कार्पेटरबाईंची नऊ वर्षांची मुलगी आमी आईला म्हणाली, ‘आई, मला स्वप्न पडलं की तू िहदुस्थानात कुणाला तरी पत्र पाठवत आहेस.’ कार्पेटरबाई चकित झाल्या. त्या गोपाळ जोशींना पत्र पाठवण्यापूर्वी नकाशात कोल्हापूर शोधत होत्या. (कारण मासिकातलं गोपाळजोशींचं पत्र कोल्हापूरहून पाठवलेलं होतं.) तेव्हा त्यांच्या मनात इंडियातली शहरं असा विचार होता. परंतु मुलीने येऊन िहदुस्थान हा शब्द उच्चारला हे कसं? तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. याच कार्पेटरबाईने पुढे पत्रव्यवहार करून आनंदीशी आपलं नातं जोडलं. आनंदी त्यांना मावशी म्हणे. त्यांच्याच आधारावर तिने अमेरिकेत पाऊल टाकलं. या कार्पेटरबाई आनंदीला ‘आनंदाचा झरा’ म्हणत.
अमेरिकेला जाण्यापूर्वी श्रीरामपूर (बंगाल) इथल्या बॅप्टिस्ट कॉलेजच्या सभागृहात आनंदीबाई जोशी यांनी ‘मी अमेरिकेस का जाते?’ यावरती अस्खलित इंग्रजीत व्याख्यान दिलं. मुळातून ते भाषण वाचण्यासारखं आहे. त्यातला एक मुद्दा असा, पृथ्वीच्या पाठीवर हिदुस्थानाइतका रानटी देश दुसरा नाही. देशातील लोकांना आपल्या गरजा त्या पूर्ण करून स्वावलंबन करता येत नाहीत. वैद्यकशास्त्रज्ञ स्त्रियांची िहदुस्थानातल्या प्रत्येक भागात अतिशय जरुरी आहे. सभ्य स्त्रिया पुरुष वैद्याकडून चिकित्सा करून घेण्यास प्रवृत्त नसतात. या आनंदीबाईंच्या मुद्दय़ावरून त्या वेळच्या समाजाची मानसिकता, वृत्ती लक्षात येते. इथे स्त्री डॉक्टरची किती गरज आहे हे ओळखून आनंदीबाई डॉक्टरची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या. परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना सतत संघर्ष करावा लागला.
अठराव्या वर्षी १८८३ मध्ये एका अमेरिकी बाईच्या सोबतीने, एकटीने दोन महिन्यांचा बोटीने प्रवास केला. त्यात त्या शाकाहारी आणि साडी हाच पोशाख. बोटीवर त्यांची उपासमार झाली. त्या आजारी पडल्या, पण पुढेही चार र्वष त्यांची उपासमारच झाली. भारतीय पद्धतीचं अन्न मिळालं नाही. परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून त्या साडी नेसून धाबळीचे जाकीट घालीत. त्यामुळे तिथली बर्फाळ थंडी त्यांचं शरीर चिरत राहिली. त्यात अभ्यास, स्वत:चा स्वयंपाक स्वत: करायचा, समाज-नातलग यांनी दिलेली दूषणं सहन करीत इच्छित कार्य करीत त्या राहत असत तिथला समाजही आनंदीशी कुत्सितपणे वागत होता. तिथेही कार्पेटरबाई आणि कॉलेजच्या प्रिन्सिपॉल इत्यादी चांगल्या स्त्रिया भेटल्या, परंतु अन्य बऱ्याच जणांनी आनंदीला त्रास दिला. बोटीवर तर पुरुषांनीही त्रास दिला आणि जिच्या सोबतीने आनंदी निघाली होती, तिचंही वागणं ठीक नव्हतं. याचा तिच्या मनावर परिणाम होत होता. तो शरीरावरही झाला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपणं तिच्या पाठी लागली.
त्यात ज्या गोपाळरावांनी आपली पत्नी शिकावी म्हणून अथक प्रयत्न केले, तेच नंतर पत्रातून आनंदीला नावं ठेवू लागले, टीका करू लागले. त्यांना तिने विनम्रपणे उत्तरं देताना आपलं निरपराधित्व जाणवून दिलं. भारतातले लोक तर म्हणत, आनंदी आता ख्रिस्ती होऊनच येईल. तर अमेरिकेतल्या तिच्या सहवासात येणाऱ्या मिशनरीज तिला ‘ख्रिस्ती हो’ असा उपदेश करीत.
स्वदेश, स्वपोशाख (नऊवारी साडी-पोलकं), स्वदेशी खाणं, पूर्णपणे महाराष्ट्रीय पद्धतीचं आचरण आनंदीचं असे. त्याचा त्यांनी कधीच त्याग केला नाही. आज जे आनंदीबाईंचं छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध केलं जातं (अलीकडे सरकारी जाहिरातीतही ते दिसतं) ते म्हणजे गुजराथी पद्धतीने नेसलेली साडी आणि दागिने घातलेलं चित्र. त्याबद्दल स्वत: डॉ. आनंदीबाईंनी लिहिलं आहे की ‘इथल्या हवेत वारंवार फरक होत राहतो, नऊवारी (कासोटा घातल्याने) साडी नेसल्याने पाय थोडेसे उघडे पडतात. करिता गुजराथी पोशाख असल्याने डोक्याशिवाय सर्व शरीर झाकले जाते.’ एकूण पोशाखाबद्दल त्यांनी आपल्या पत्रात सविस्तर लिहिलं होतं.
cn02जेव्हा आनंदीबाई भारतात परतल्या- १६ नोव्हेंबर १८८६ या दिवशी- तेव्हा मुंबई बंदरावर लोकांनी गर्दी केली. त्यांचं पुष्पवृष्टीनं स्वागत केलं. मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीचं त्यांच्या पोशाखाचं वर्णन आहे. ‘नारायणपेठी काळी चंद्रकळा (नऊवारी), खणाची चोळी, कपाळावर कुंकू, नाकात नथ, कानात कुडी, पायात बूट व स्टॉकिंग्ज’ असा थाट होता. त्या आजारीच होत्या, परंतु िहदुस्थानात घरी जायला मिळणार, घरचं अन्न मिळणार म्हणून त्यांची प्रकृती तात्पुरती स्थिर होती. आनंदीबाईंना अभिनंदनाच्या तारा आल्या, मानपत्रे पाठवली गेली. मानपत्रात त्यांच्या उच्च शिक्षणाचा गौरव केला गेला. अमेरिकेच्या त्यांच्या मेडिकल कॉलेजने ११ मार्च १८८६ रोजी फिलाडेल्फियाला त्यांना ‘वैद्य विद्यापारंगत’ हा किताब दिला. आनंदीबाई जोशी डॉक्टर होऊन स्वदेशी आल्या. जाताना एकटय़ा होत्या. येताना गोपाळ जोशी बरोबर होते.
आनंदीला (यमुना) समजू लागल्यापासून म्हणजे बाल्यावस्थेपासून सतत अडचणींवर मात करून, प्रसंगी बेदम मार खाऊन पुढे जावं लागलं. माहेरची-सासरची मंडळी, समाज, आणि नवरा यांनी तिला प्रचंड मानसिक त्रास दिला. डॉ. आनंदीबाईंचं जीवनकार्य वाचताना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवते. तिनंही स्वातंत्र्यासाठी असाच संघर्ष केला आणि बाविसाव्या वर्षी तिची आहुती त्या यज्ञात पडली. आनंदीबाई इथे येऊन कोल्हापूर संस्थानामधे डॉक्टर म्हणून काम करणार होत्या. परंतु आजारपण औषधांनीही बरं होत नव्हतं. अमेरिकेतच डॉक्टरांनी सांगितलं होतं आनंदीबाईंच्या फुप्फुसाला धक्का लागला होता. त्याचं पूर्ण स्पष्टीकरण म्हणजे त्यांना क्षयरोग झाला होता.  वरून आनंदी दिसणारी आनंदी आतून दुखण्यानं पोखरली गेली होती. स्वजनांनी दिलेल्या दूषणांनी मानसिकदृष्टय़ाही ती ताण सहन करीत होती. पण शारीरिक तणावासाठी अमेरिकेतल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तरी त्यांनी गरम कपडे वापरायला हवे होते. खाण्याची आबाळ झाली असल्याने अंतर्बाह्य़ विपन्नावस्था निर्माण झाली असताना त्यांनी आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा केला. तिथल्या हॉस्पिटलमध्ये काम केलं हेही आश्चर्यच.
लग्न दहाव्या वर्षी झालं. तेव्हापासून सतत बारा र्वष आनंदी प्राक्तनाशी झगडत राहिली. शैक्षणिक यश तिला मिळालं. त्याचा उपयोग ना स्वत:साठी, ना समाजासाठी करता आला. वयाच्या बाविसाव्या वर्षी या तरुणीचा दुखण्याने घास घेतला. एक सुंदर जीवन अनंतात विलीन झालं. मी सुरवातीला लिहिलं की, काही प्रश्न आनंदीबाईंचं चरित्र वाचताना पडतात. ते असे की, त्या काळाच्या सामाजिक समजुतीप्रमाणे पती परमेश्वर, त्यानं सांगितलेलं ऐकायचं, त्याच्या अधीन राहायचं. मग आनंदी नवऱ्याच्या आज्ञेप्रमाणे शिक्षण घ्यायला गेली. आपलं भारतीयत्व नीट सांभाळून ती राहिली तरी तिची घरीदारी अवहेलना झाली. ती टाळता आली नसती का? आनंदीबाईने म्हटल्याप्रमाणे ‘हिंदुस्थानसारखा रानटी देश जगात नाही’ हे खरं आहे तर आम्ही पाच हजार वर्षांची संस्कृती म्हणून छाती पिटून उच्चरवाने सांगत असतो ती संस्कृती तेव्हा कुठे गेली होती?
नातलग, इष्टमित्र, पती, समाज या सर्वानी मिळून आनंदीचा बळी घेतला असं मानायचं का? तिनं अर्धपोटी राहून घेतलेलं शिक्षण आम्ही नतद्रष्ट बनून वाया घालवू दिलं का? आनंदीला पुरेसा मानसिक आधार, परदेशात जगण्यासाठी पुरेसं द्रव्य मिळालं असतं (भारतातले अनेक संस्थानिक घोडय़ावर जेवढा खर्च करत होते त्यातले निम्मे तिला मिळाले असते तर..) तर तिला पोटभर जेवता आलं असतं. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तिथल्याप्रमाणे कपडे वापरायची परवानगी गोपाळ जोशींनी दिली असती तर तिच्यामागे आजाराचं शुक्लकाष्ठ लागलं नसतं. अर्थात आज जाणवणारे प्रश्न तेव्हाच्या समाजमनाला जाणवतच नव्हते. विषारी रूढींचा घट्ट विळखा होता. त्यानंच आनंदीचा चावा घेतला. त्याच विषानं तिचं जीवन संपवून टाकलं. तसा विचार केला तर आम्ही तिचे अपराधी ठरतो. आपल्या आयुष्याची आहुती देऊन तिने पुढच्या पिढीतल्या स्त्रियांना शिका आणि वैचारिकदृष्टय़ा सक्षम व्हा, असा संदेश दिला. डॉ. आनंदीबाईंच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या जिद्दीला, शिक्षणाचं व्रत पुरं करणाऱ्या न्यायी वर्तनाला लाख लाख प्रणाम!    
मधुवंती सप्रे
madhuvanti.sapre@yahoo.com

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!