एका चित्रपटाच्या वेळी क्लॅप देताना चुकलो. माझ्यावर शिव्यांचा भडिमार झाला.. मला सेटवरून हाकलून दिलं गेलं.. पुढचे पंधरा दिवस मी रोज सेटवर जायचो नि ते मला बाहेर काढायचे. रोज रात्री रडायचो, आईचे शब्द आठवायचे. अदृष्टाच्या वाटेवर काय होतं कुणास ठाऊक.. मी इंजिनीअर होतो. तरीही कोणाच्याही शिव्या खात होतो, कारण मला हेच करायचे होते.. आज त्याच वळणाने मला कॅमेरामन, दिग्दर्शक म्हणून ओळख दिली..
किती वळणं आयुष्यात येतात आणि जातात. त्या वळणांवर कधी आपण विसावतो, तर कधी त्या वळणांना वळणं देत देत पुढे जात राहतो. माझ्या आयुष्याच्या वळणवाटाही कधी मला वळणं देत गेल्या, कधी वळणांवर आणून सोडत गेल्या, तर कधी त्यांना मी वळण देत गेलो; पण प्रत्येक वळणावर मला सापडत गेलं ते आयुष्य! मी पहिल्यापासून नाटकवेडा, सिनेमावेडा. आई- मीना जाधव शिक्षिका होती, तर वडील- शांताराम जाधव बँकेत नोकरी करत होते. त्यांना मी अप्पा म्हणायचो. मी एकुलता एक. त्यामुळे माझ्याकडून सर्वसामान्य मध्यमवर्गीय आईवडिलांना ज्या अपेक्षा होत्या, त्याच त्यांच्याही होत्या; पण मी त्यांच्या अपेक्षांपेक्षा वेगळा होतो. ठाण्याच्या एम.एच. हायस्कूलचा मी चांगला विद्यार्थी होतो. शाळेतल्या नाटकात वगैरे कामं करायचो. गडकरी रंगायतनच्या परिसरात भटकत राहायचो. विनय आपटे, संजय मोने हे माझ्या लेखी परमेश्वरच! रंगायतनच्या जवळ विनय आपटे, संजय मोने, विक्रम गोखले दिसले, त्यांनी आमच्यासमोर चहा प्यायला की, आम्हाला वाटायचं यांच्यासारखं स्टायलीत चहा प्यायला हवा, त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारायला हव्यात. माफक अपेक्षा होत्या. आईला हे अजिबात मान्य नसायचं. ती अभ्यासाविषयी जागरूक असायची. तिच्या आग्रहापोटी केमिकल इंजिनीअिरगला प्रवेश घेतला; पण तिथे काही शिकण्याऐवजी मी रंगायतनमध्ये पडीक असायचो. ठाण्यात त्या वेळीही नाटकाचं वातावरण जोरात असायचं. प्रमोद कुलकर्णी, विजय जोशी, अशोक बागवे, उदय सबनीस, श्रीहरी जोशी सर, विनोद कुलकर्णी, शरद बागवे, कलासरगम, मित्रसहयोग, अशा लोकांनी, संस्थांनी नाटकाचं वातावरण पेटतं ठेवलं होतं. घरी अजिबात कळू न देता माझे नाटकाचे उद्योग सुरू असायचे. रंगायतनात सेट मांडायला मदत करण्यापासून सारी कामं हौसेनं करायचो. ‘अदृष्टाच्या वाटेवर अश्वत्थाची मुळं’ यांसारखी महत्त्वाची प्रायोगिक नाटकं आम्ही केली. स्पर्धात जिंकलो.
एकदा असंच ‘कल्पना एक : आविष्कार अनेक’ स्पर्धेसाठी आम्ही ‘अश्वत्थाची मुळं’ ही एकांकिका केली. मी यूनकचं काम करत होतो. मुख्य भूमिका होती. घरी सांगितलं की, आज एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत. स्पर्धा झाल्यावर घरी पोहोचलो. लेक्चर कसं रंगलं, उशीर का झाला याच्या कहाण्या तयार करून आईला सांगितल्या व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रांमध्ये माझा फोटो, बक्षीस वगैरे सगळं छापून आलेलं. झालं. माझं भांडं फुटलं. आईनं झोपेतनं उठवून विचारलं. ती वैतागलेलीच. मग सगळं स्पष्ट केलं व कबुलीजबाब दिला. तिला मी केमिकल इंजिनीअरच व्हायला हवा होतो. मग मी केमिकल इंजिनीअिरग पूर्ण केलं. तिची इच्छा पूर्ण केली. त्या वेळी आई-अप्पांच्या सांगण्यावरून मी नोकरीसाठी कुठे कुठे अर्ज करायचो. त्यांची कॉल लेटर्स यायची; पण मी पोस्टमनला पटवून ठेवला होता. माझी कॉल लेटर्स तो माझ्या हातात आणून द्यायचा व मी ती नष्ट करायचो. आईला प्रश्न पडायचा की, इतरांना नोकरीच्या मुलाखतींसाठी पत्रं येतात, आपल्या संजूलाच का येत नाहीत? आई-अप्पांना एके दिवशी सांगून टाकलं की, मला नाटक, सिनेमातच काही करायचंय. अप्पा निवृत्तीला आले होते. ते म्हणाले, ‘‘अजून वर्षभर तू प्रयत्न कर. नाटकात, सिनेमात काही जमलं नाही तर मात्र नोकरी कर.’’ मी कबूल झालो.

माझी धावपळ सुरू झाली. संपूर्ण ठाण्यातून त्या नव्वदीच्या दशकात एकटा नंदू लबडे व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचा. त्या वेळी ‘चारचौघी’ नाटक सुरू होतं. त्यामध्ये काम करणाऱ्या सुनील बर्वेला दुसरं काही करायचं होतं. त्या वेळी मी त्याच्याबदली ‘चारचौघी’मध्ये काम केलं. नंदू लबडे मला म्हणाला की, ‘‘तुला अभिनय वगैरे करायचे असेल तर आधी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम कर. त्याचा फायदा होईल. तुला कॅमेऱ्याचं ज्ञान हवं, ते तिथे मिळेल.’’ त्यानंच मला नंतर कुमार सोहोनींकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला पाठवलं व मला चित्रपटाचा कॅमेरा दिसला. त्यांच्याकडे मी ‘आहुती’, ‘अनुराधा’सारखे चित्रपट साहाय्यक दिग्दर्शक म्हणून केले. त्यापूर्वी स्वानंद किरकिरेचे काका डब्बू किरकिरे यांनी मला गिरीश घाणेकरांकडे पाठवलं. त्यांची तेव्हा ‘आमचा हसवण्याचा धंदा’ नावाची मालिका सुरू होती. त्या मालिकेत एक छोटासा रोल होता. भल्या सकाळी मी वरळीच्या एक्सेल स्टुडिओमध्ये पोहोचलो. गिरीश घाणेकरांनी मला बघितलं व म्हणाले, सेल्समनचा रोल आहे. हा त्याला सूट नाही. सगळी स्वप्नं कोसळली; पण आता आलोच आहोत तर शूटिंग काय ते पाहू या म्हणून थांबलो. शूटिंग पाहता पाहता एक माणूस कडक कपडय़ात, डोक्यावर हॅट व सिगरेट तोंडात ठेवून टेचात वावरताना दिसला. प्रत्येक जण त्याच्याशी आदरानं बोलत होता. अगदी अशोकमामा (सराफ) सुद्धा त्याच्याजवळ जाऊन विश करून गेले. सारे जण त्याचं ऐकत होते. तो कोणत्या तरी मोठय़ा डब्यातून बघत लायटिंग वगैरे काही तरी करत होता, लोकांना सांगून कामं करवून घेत होता. ते त्या मालिकेचे कॅमेरामन बेंजामिन होते आणि तेच करायचं मी पक्कं केलं. अप्पांची नोकरी संपण्यापूर्वी स्वत:च्या पायावर उभं राहायला हवं. कॅमेरामनच बनावं म्हणून मग मी फोटोग्राफीवरची पुस्तकं वाचून काढायला सुरुवात केली. अप्पांनी त्या वेळी कर्ज काढून मला पंचवीस हजारांचा कॅमेरा खरेदी करून दिला. (तो कॅमेरा आजही माझ्याजवळ आहे. माझे साहाय्यक तो वापरतात.) दादरला श्रीकांत मलुष्टे यांच्याकडे छायाचित्रण कला शिकलो. छायाचित्रण ही एक अशी गोष्ट आहे की, ती एकदा शिकली की, तुमची गुंतवणूक ठरते.मी कॅमेरामन म्हणून काम करायचं ठरवलं आणि माझी उमेदवारी सुरू झाली. क्लॅप कसा द्यायचा, क्ल्यू कसा द्यायचा वगैरे गोष्टी शिकत होतो. अतिउत्साहात चुकाही करत होतो. त्यासाठी शिव्या खात होतो; पण निमूटपणे शिकत होतो. एका चित्रपटाच्या वेळी क्लॅप देताना चुकलो. माझ्यावर शिव्यांचा भडिमार झाला नि मला सेटवरून हाकलून दिलं गेलं. पुढचे पंधरा दिवस मी रोज सेटवर जायचो व ते मला बाहेर काढायचे. रोज रात्री रडायचो, आईचे शब्द आठवायचे. इंजिनीअर होतो. तरीही कोणाच्याही शिव्या खात होतो; पण मला हेच करायचं होतं. जिद्दीनं पुन्हा सेटवर जायचो. या शिव्या खाताना मी मनात ठरवलं होतं की, ‘उद्या जर काही बनलो तर असं नक्कीच वागायचं नाही.’ या शिव्यातून मी शिकत गेलो, सुधारत गेलो, सतत सावध राहू लागलो, तांत्रिकदृष्टय़ा पक्का होत गेलो.माझ्या चित्रपटात कॅमेऱ्याच्या डावी-उजवीकडच्या उडय़ा दिसणार नाहीत. माझा स्क्रीन प्ले चुकू शकेल, पण तांत्रिक चुका दिसणार नाहीत, याचं कारण त्या दिवसांत दडलेलं आहे. नंतर कुणी तरी कुठे तरी बोलवायचे. मी जायचो. एकदा मला जयवंत राऊत यांनी बोलावलं. मी त्यांना जयूदादा म्हणतो. एक ऋणानुबंध पक्का झाला. दरम्यान अप्पा निवृत्तीकडे झुकले होते. त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा कर्ज घेऊन ‘स्टुडिओ व्हिज्युअल्स’ नावाचा स्टुडिओ सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. स्टुडिओ सुरू असताना मी      गिरीश कर्वेसोबत काम करू लागलो. एका चित्रपटात उषा नाडकर्णी काम करत होत्या. त्यांना मी गिरीश सरांचा मुलगा आहे असं वाटे. त्यांनी मला नरेन कोंडरा यांच्याकडे पाठवले. त्यांच्यासोबत मी सहा वर्षे काम केलं. भरपूर काम केलं. जाहिराती केल्या. कॉपरेरेट फिल्म्स केल्या, माहितीपट केले. खूप शिकायला मिळालं. त्यानंतर शरद बागवे यांच्यामुळे मला नितीन केणी सरांनी ‘झी’ नेटवर्कवर साहाय्यक कॅमेरामन म्हणून घेतलं. ते त्याचे अध्यक्ष होते. ‘झी’वर आम्ही तीनच कॅमेरामन होतो. केली मेस्त्री, गुरू पाटील हे ज्येष्ठ व मी साहाय्यक. त्या दरम्यान ‘झी’नं दुबईला आपलं युनिट उभं केलं. ते दोघे दुबईत गेले व मी मुंबईत. येथे भरपूर काम केलं. ‘फिलिप्स टॉप टेन’, ‘लक्स क्या सीन है’, ‘हमजमीन’, ‘ड्रीम मर्चण्टस’ असे शोज केले. घरी फक्त आंघोळ करण्यास जायला मिळायचं. त्यामुळे एक फायदा झाला की, कॅमेऱ्यावर हात साफ झाला. त्या वेळी लग्नाची शूटिंग्जही घ्यायचो. एका बाजूला टॉक शोज, वॉक, पॉप्स, चॅट शोज, डॉक्युमेंटरीज आणि दुसऱ्या बाजूला वेडिंग शोज. या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लाइट्स असतात, ताबडतोब निर्णय घ्यावे लागतात, कॅमेऱ्याच्या खिडकीतून ताबडतोब लाइट्स अ‍ॅडजेस्ट करून शूटिंग करावं लागत असे. याचाच फायदा पुढे ‘डोंबिवली फास्ट’ करताना झाला. धावत्या ट्रेनमधून प्रकाश सतत बदलत असतो. तेच तंत्र इथे वापरलं. ‘झी’वरची नोकरी सुरू होती. काम होतं; पण मला सिनेमाचे वेध लागले होते. एके दिवशी सकाळी मी ‘झी’चा राजीनामा देऊन टाकला व नंतर वर्षभर अक्षरश: बेकार होतो. काही काम नाही. उत्पन्नाचं साधन नाही. साधारण वर्षभरानंतर मला ‘दलाल स्ट्रीट जर्नल’मध्ये कॅमेरामनची नोकरी मिळाली. ‘पुनश्च हरी ओम’ म्हणून कामाला लागलो. काही महिन्यांनी ही नोकरी सोडली व हिंदी मालिका करायला सुरुवात झाली. तेव्हा आजच्यासारखे भरपूर चॅनेल्स नव्हते. ‘दूरदर्शन’ व ‘झी’ एवढेच. तेव्हा मालिकांना झटकन परवानग्या मिळत नसत; पण पायलट एपिसोड्स बनवण्याचं नवं फॅड आलं होतं. मी त्या वर्षांत ३० पायलट एपिसोड्स बनवले होते. त्यातल्या अनेक मालिका बनल्याही नाहीत. या दरम्यान अरुण गोविलची ओळख झाली. त्याच्या एका मालिकेच्या पायलट एपिसोडबरोबरच भोपाळला जाऊन आम्ही २० भागही चित्रित केले होते. याच काळात माझी लहानपणापासूनची पंजाबी मैत्रीण प्रोमिताबरोबर माझं लग्न झालं. माझ्या तोवरच्या साऱ्या प्रवासात आई-अप्पांइतकीच प्रोमिताची साथ व प्रोत्साहन महत्त्वाचं होतं. तिनेच मला विशीमध्ये सिनेमा जगतात प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. त्यामुळे मी प्रतिकूल परिस्थितीतही सार्थपणे झगडत राहिलो.पायलट एपिसोड्स करताना मी बदली कॅमेरामन म्हणूनही काम करत होतो. संजय मेमाने, राजू हलसगी यांसारखे मित्र त्या काळात लाभले. आजही ते माझे घट्ट मित्र आहेत. या मालिका करत होतो; पण ओळख मिळत नव्हती. प्रोमिता सांगायची, ‘माझा नवरा कॅमेरामन आहे.’ पण नाव दिसत नव्हतं. नव्वदीच्या अखेरच्या काही वर्षांत मंदार देवस्थळींनी एक टेलिफिल्म बनवली, ‘अभिनेत्री’ नावाची. विनय आपटे व वंदना गुप्ते त्यात होते. विनयजींसोबत काम करायचं बालपणापासूनचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना माझं काम आवडलं. त्यांच्यासोबत खूप जाहिरातपट, कॉपरेरेट फिल्म्स केल्या.   या टप्प्यावर विनय आपटे यांची एक नवी मालिका दूरदर्शनवर येणार होती. प्रारंभी तिचं प्रसारण आठवडय़ातून एकदाच असणार होतं. त्याच वेळी ‘झी’ने मराठी वाहिनी सुरू करायचं ठरवलं व ती मालिका डेली सोपच्या स्वरूपात अल्फा चॅनेलवर सुरू झाली- ‘आभाळमाया’. या मालिकेनं आम्हाला ओळख दिली. मी हिंदी मालिका, चित्रपटातून मराठीत काम करायला गेलो होतो. साहजिकच प्रकाशयोजनेसाठी मी भरपूर वेळ घ्यायचो. व्यवस्थित काम झालं पाहिजे हाच उद्देश होता. सुकन्या कुलकर्णी तेव्हा प्रस्थापित कलाकार होती. तिच्यासकट सारे वैतागायचे. एके दिवशी सुकन्यानं मला सेटवर थोडंसं बाजूला बोलावलं व त्याबद्दल खूप सुनावलं. मी निमूट ऐकून घेतलं. नंतर सारेच बोलू लागले, ‘‘संजय फार वेळ खातो. त्याला बदला.’’ पण विनयजी ठाम होते. ते म्हणाले, ‘‘शो विकायचाय तर संजयच हवा.’’  प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या एक दिवस आधी आम्ही सारे पहिला भाग पाहायला बसलो. तो पाहून पूर्ण झाल्यावर सुकन्या मोठय़ा मनानं साऱ्या युनिटसमोर मला म्हणाली, ‘‘मला माहीत नव्हतं, तू काय करतोयस ते. जे काही केलंस ते अप्रतिम आहे.’’ आजही सुकन्या मला राखी बांधते.‘आभाळमाया’बरोबरच मी हिंदीत शोभना देसाईंसोबत काम करत होतो. त्यांच्या सुपरहिट ‘एक महल हो सपनों का’, प्रारंभी बाबा सावंत करत होते, नंतर ती मालिका मी करू लागलो. शोभना देसाई, जे.डी. मजेठिया, अतीश कपाडिया यांच्यासाठी मी निदान पायलट एपिसोडस् करावेत असा त्यांचा आग्रह असे. ते मला लकी समजत असत. दरम्यान हर्षदा खानविलकर व माझी मैत्री झाली आणि आम्ही ‘हॅपनिंग्ज अनलिमिटेड’ या नावानं निर्मिती संस्था काढली. आम्ही ‘बेधुंद मनाच्या लहरी’ ही मालिका निर्माण केली. ‘झी’वर ही मालिका लोकप्रिय झाली. यामुळे आमचे कॉन्टॅक्स वाढत गेले. उमेश जाधव, अंकुश चौधरी, सोनाली खरे, दीपा तेली या मालिकेत होते. राजीव पाटील या मालिके त साहाय्यक होता. तो पुढे लिहू लागला व नंतर मोठा दिग्दर्शक बनला. त्यानं ‘सावरखेड एक गाव’ हा सिनेमा बनवला. जणू काही तो शेवटचा चित्रपट असावा या पद्धतीनं आम्ही झपाटल्यासारखं काम केलं. हा चित्रपट पूर्ण होतोय तोवर संजय सूरकर यांच्या ‘सातच्या आत घरात’ हा चित्रपट माझ्याकडे आला. ज्यांच्या चित्रपटांकडे पाहत मी वाढलो त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर गौतम जोगळेकरांचा ‘पक पक पकाक’ हा चित्रपट केला. तिथे नाना पाटेकर यांची ओळख झाली. वेगळाच माणूस! ‘डोंबिवली फास्ट’मध्ये आमची साऱ्यांची काहीतरी करून दाखवण्याची अस्वस्थ ऊर्जा काम करत होती. माझा तो तिसरा चित्रपट होता तर बाकीच्यांचा पहिलाच. एका रात्रीत चित्र बदलतं असं म्हणतात, त्याचा अनुभव आम्हा साऱ्यांना त्यावेळी आला. मी ‘डोंबिवली फास्ट’च्या प्रीमिअरला जाऊ शकलो नव्हतो, कारण त्यावेळी मी पुण्यात ‘आई शपथ’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो. गुरुवारी लोक माझ्याशी जसं वागत होते शुक्रवारचं त्यांचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. लोकांच्या अगदी युनिटच्या पाहण्याचा दृष्टिकोनात सकारात्मक बदल दिसत होता. ‘डोंबिवली फास्ट’नं खूप काही दिलं. त्या चित्रपटानंतर कॅमेरामनला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या मला विनातक्रार कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडून मिळू लागल्या. ‘डोंबिवली फास्ट’ची तामीळ आवृत्ती निघाली होती. तिच्या शूटिंगच्या वेळी आमच्या छायाचित्रण कलेतील दंतकथा मानावी असे प्रतिभावंत पी. सी. श्रीराम त्या सेटवर आले. त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी माधवन व निशिकांतना सोबत घेऊन गेलो. माझ्यावर खूप दडपणं आलं होतं. मी पी.सी सरांसमोर खाली मान घालून बसलो होतो. ते पुढचा तासभर ‘डोंबिवली फास्ट’मधल्या  त्यांना आवडलेल्या गोष्टीसंबंधी माझ्याशी बोलत होते आणि  माझ्या डोळ्यातलं पाणी  थांबत नव्हतं.हळूहळू नाव मिळत होतं. लोकांना काम आवडत होतं. आता मला दिग्दर्शक बनावंसं वाटत होतं. हेमंत देवधरांसोबत वाईला एक जाहिरात शूट करत होतो. अचानक पाऊस आल्यामुळे शूटिंग थांबलं. आता करायचंय काय? मी कोरे कागद मागवले आणि दोन वाजेपर्यंत ‘चेकमेट’ चित्रपटाचा कच्चा स्क्रीन प्ले लिहून काढला. हेमंतसरांना दाखवला. तो त्यांना आवडला. मग दोन तासांचा पूर्ण स्क्रीन प्ले लिहिला. विवेक आपटेंनी त्याचे संवाद लिहिले. हा चित्रपट आपण करू या हा विचार डोक्यात होता. मी वेगवेगळ्या निर्मात्यांना तो ऐकवत होतो. तो चित्रपट गुंतागुंतीचा होता. अखेरीस एक निर्माता मिळाला. काम सुरू झालं. त्या वेळेपर्यंत डोक्यातली हवा निघून गेली होती. यावेळी आर्थिकदृष्टय़ा मी व हर्षदा खूप अडकलो. हर्षदा त्यावेळी ठामपणे उभी राहिली नसती तर हार्ट अ‍ॅटॅकने मेलो असतो. जेवढे पैसे मिळवायचो तेवढे व्याजात जात होते.एकदा रवी काळे डबिंगसाठी आला होता. मीही त्यावेळी तेथे पोचलो. रिक्षानेही जाण्याइतके पैसे खिशात शिल्लक नव्हते. डबिंग स्टुडिओत चालत गेलो. रवीने चहा मागवला. चहावाला पैशांसाठी तिथेच उभा राहिला. त्यालाही देण्यासाठी पैसे नव्हते. संजय मौर्यने खिशात हात घालून त्याचे पैसे दिले. मी विचारात पडलो, एवढं प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा असं का होतंय? कुणाला मी दुखावलं म्हणून असं होतंय का? आणि मग ज्यांना ज्यांना दुखावलंय असं मला वाटत होतं त्यांची मी एक यादी तयार केली. ज्यांचे दूरध्वनी नंबर माहीत नव्हते, त्यांचे नंबर मिळविले व त्यांना प्रत्येकाला फोन केला. अगदी प्रत्येकाला ,‘‘मी तुम्हाला या या वेळी दुखावलंय. मला क्षमा करा.’’ अशा शब्दांत माफी मागितली. आपल्या सवयीनं दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो. आपणास कोणलाही दुखवण्याचा अधिकार नाही. एक व्यक्ती म्हणून माझ्यात त्या दिवशी बदल झाला. या घटनेनंतर माझ्या आयुष्यात फक्त चांगलीच माणसं आली. अनिल सातपुते मला भेटले. त्यांनी ‘चेकमेट’ रिलीज केला. त्याला थोडं यश लाभलं. भविष्यवेत्त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही असं सांगितलं होतं. पण अनिलनं पुण्यात या चित्रपटाच्या प्रिंटची पालखीतून मिरवणूक काढली. ती पालखी खांद्यावरून वाहताना डोळ्यांत पाणी होतं माझ्या.’रिंगा रिंगा’च्या वेळीही असाच प्रश्न उद्भवला होता. गोव्यात अजिंक्य देव, अंकुश, भरत, संतोष, सोनाली यांना घेऊन शूटिंग सुरू होतं. तेवढय़ात मला माझ्या कार्यकारी निर्मात्याचा फोन आला की किती फिल्म शिल्लक आहे?’ मी म्हणालो ‘ऐंशी फूट असेल.’ तो म्हणाला तेवढी संपल्यावर पॅक अप करू या. आपले पैसे संपले आहेत. माझ्या डोळ्यांकडे पाहणारा गोव्यातला शिवा नाईक म्हणाला, तुम्हाला जितका पैसा लागेल तेवढा मी देतो. काळजी नको. शिवाने मला १४ लाख रुपयांचा चेक दिला. मी थोडासा बाजूला जाऊन अनिल सातपुतेला फोन केला. त्याने चित्रपट पूर्ण होईपर्यंत अर्थपुरवठा क रण्याचं मान्य केलं. हाही चित्रपट पूर्ण झाला. समीक्षकांची वाहवा मिळाली. महेश मांजरेकरांनी त्यानंर ‘फक्त लढ म्हणा’ हा चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. तो हिट झाला.‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’ या चित्रपटांची मला एक मोठा धडा दिला तो म्हणजे रसिक प्रेक्षक चित्रपटगृहात येताना मनोरंजनासाठी येतो. प्रेक्षक स्वत:ला चित्रपटाबरोबर पाहत असतो. किंबहुना तो चित्रपटापुढे एक पाऊल जात असतो. त्या दृष्टीने डोळ्यासमोर सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ ही कादंबरी होती. मला तिच्यावर चित्रपट बनवायचाच होता. अनेकांनी तसा तो प्रयत्न केला. कोणीही चित्रपट बनवावा, पण माझा त्यात सहभाग असावा अशी माझी इच्छा होती. पण तसं घडत नव्हतं. ‘दुनियादारी’ करू पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक श्रेयस होता. हे डोक्यात सुरू असतानाच मी ‘७२ मैल’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो.२०१२ सालच्या जून महिन्यापासून नंतर पुढे वर्षभर मी कामात व्यग्र असणार होतो. पण काय कसं, कोणाला ठाऊक, पण जुलै २०१२ मधलं शूटिंग पुढे ढकललं गेलं, नंतर ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यानचं संपूर्ण शूटिंग रद्द झालं. मला वाटलं परमेश्वराच्या मनात माझी अतृप्त राहिलेली इच्छा पूर्ण करणं आहे. मी दुनियादारीवर काम करू लागलो. त्याचे तब्बल बारा खर्डे मी लिहिले आणि तेराव्या ड्राफ्टवर चित्रपट बनला. त्यावेळी परत तीच स्थिती. नाव भरपूर होतं. पण खिशात पैसे नव्हते. नेमकं त्याचवेळी मिफ्ता अ‍ॅवॉर्डसाठी आम्ही सारे सिंगापूरला गेलो होतो. विमानात शेजारी नानूभाई जयसिंघानी होते. अख्खं सिंगापूर शहर फेंग शुईवर उभारलं आहे. तिथल्या तळ्यात फिरताना मनात धरलेली इच्छा पूर्ण होते, बरकत येते असे म्हणतात. मुंबईत उतरल्यावर दुसऱ्या दिवशी नानूभाईंना भेटलो. त्यांना दुनियादारीचा प्रकल्प सांगितला. त्यांना तो आवडला. ही गोष्ट सप्टेंबरची. डिसेंबर २०१२ मध्ये शूटिंग सुरू केलं आणि १६ जुलै २०१३  रोजी तो चित्रपट प्रदर्शित झाला! एका रात्रीत जग बदलतं याचा अनुभव मी दुसऱ्यांदा घेतला दुनियादारीमुळे! या चित्रपटानं पुन्हा एकदा समाधान दिलं, मी योग्य क्षेत्रात आहे याचं!जीवनाच्या या वळणवाटांत प्रत्येक वाटेवर, वळणावर प्रोमिता ठामपणे उभी आहे. ती घर चालवते. जेवढे पैसे आहेत, जितके पैसे आहेत, त्यातच! तिनं कधीही तक्रारीचा सूर काढला नाही. मी टी.व्ही मालिका केल्या असत्या तर भरपूर पैसे मिळाले असते, पण मला सिनेमाच करायचा होता. माझ्या या निर्णयामागे ती कणखरपणे उभी राहिली. व्यावसायिक जीवनात हर्षदा खानविलकरची साथ महत्त्वाची ठरली आहे.कॅमेरा माझ्यासाठी देव आहे. न्यूमॅटिक कॅमेऱ्यापासून ते डिजिटल कॅमेऱ्यापर्यंतचे कॅमेऱ्याचे प्रवास मी पाहिले आहेत. तंत्रज्ञानाचा विकास होत गेला. त्यामुळे सफाई येत गेली. पण डिजिटल कॅमेऱ्यामुळे ‘फिल्म मेकिंग’ची ‘ती’ गंमत गेली! असं हळूच मनाला वाटत जातं. जुन्या कॅमेऱ्याचा घर्र्र आवाज तुम्ही काही गंभीर उपक्रम राबवत आहात याची भावना देत असे, ती भावना हरपली. पण मी चित्रपट बनवतो. चित्रपट बनवण्याच्या आनंदासाठी! प्रेक्षकांना रिझविण्याच्या असोशीनेच! प्रेक्षकांसाठी, त्यांच्या आनंदासाठी मी काम करतो. तेच माझ्यासाठी ‘तू ही रे’ आहेत.
शब्दांकन : नितीन आरेकर  nitinarekar@gmail.com