खरं तर एक मतिमंद मूल सांभाळणं हेच पालकांसाठी आव्हान असताना अशा अनेक मुलांचं पालकत्व स्वीकारण्याचं धाडस तेव्हा आम्ही का आणि कसं केलं असेल याचं आज मागे वळून बघताना खरंच आश्चर्य वाटतं. आज संस्कार प्रतिष्ठानच्या अर्थात शाळेच्या छोटय़ा रोपटय़ाचा वटवृक्ष झाला आहे. पण आवर्जून सांगावंसं वाटतं की हे रोपटं आम्ही उभयतांनी लावलं असलं तरी त्याला खतपाणी घालून जोपासण्याचं काम अनेक हातांनी मिळून केलं आहे. विविध क्षेत्रांतील नामवंतांनी आपलं मोठेपण विसरून शाळेला ‘आपलं’ म्हटलं आहे. १९८४ पासून मतिमंद मुलांसाठी निवासी शाळा चालवण्याचा अनुभव सांगताहेत, प्रतिभा केंजळे.
प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे काहीतरी कार्यकारणभाव असतोच. १९८४ साली पुण्याजवळील पिरंगुट या छोटय़ाशा गावात आम्ही आमच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली, याला निमित्त होतं आमचा मतिमंद मुलगा. प्रत्येक मतिमंद मुलाच्या पालकाच्या वाटय़ाला येतं तसं नराश्य, वैफल्य, अगतिकता आणि समाजाच्या रोखलेल्या नजरांमुळे येणारी अपराधित्वाची आणि समाजापासून तुटलेपणाची भावना आम्ही अनुभवली. पण वेगळेपण हे की आम्ही त्यातून लवकर बाहेर पडलो. वैद्यकीय उपचारांच्या मर्यादा जाणून घेतल्यानंतर तो इतर सामान्य ‘नॉर्मल’ मुलांसारखं आयुष्य यापुढे जगू शकणार नाही हे वास्तव आम्ही स्वीकारलं. पण महत्त्वाचा प्रश्न होता त्याच्या शाळेचा. अशा ‘विशेष’ मुलांची शाळा पुण्यात फक्त ‘कामायनी’ हीच होती. १९८० साली पिरंगुटहून रोज त्याला शाळेसाठी पुण्याला नेणं-आणणं आम्हाला अवघडच नव्हे तर अशक्य होतं. त्याचा शाळेत जाण्याचा हट्ट वाढू लागला तशी आमची अस्वस्थताही वाढत गेली. आणि अशाच एका अस्वस्थ क्षणी आपणच त्याच्यासाठी शाळा सुरू करावी या विचाराचं बी मनात पेरलं गेलं. सुरुवात कुठून आणि कशी करावी याविषयी आम्ही अनभिज्ञ होतो. मग महाराष्ट्रातील अशा ‘विशेष’शाळांना भेटी दिल्या, माहिती घेतली आणि १९८४ च्या जूनमध्ये शाळेचा श्रीगणेशा केला तोही स्वत:च्या राहत्या घरात. परिसरातलेच पाच विद्यार्थी पटावर नोंदले गेले. मतिमंदत्व म्हणजे काय याविषयी संपूर्ण अनभिज्ञ असलेले पालक आणि गावकरी यांच्याशी आमची गाठ होती. आपल्या ‘नॉर्मल’ मुलालाही शाळेत पाठवण्याची तसदी न घेणारे पालक मतिमंदांच्या वेगळ्या शाळेचा विचारही करू शकत नव्हते. मतिमंद आणि वेडे यातील फरक न कळणारेच बहुसंख्येने अवतीभवती अधिक. जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं स्वत:ची करमणूक करून घेण्यासाठी आमच्या शाळेत येऊन बसत. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरेत सर्कशीतल्या प्राण्यांना पाहत आहोत, असे भाव असत. खरं तर एक मतिमंद मूल सांभाळणं हेच पालकांसाठी आव्हान असताना अशा अनेक मुलांचं पालकत्व स्वीकारण्याचं धाडस तेव्हा आम्ही का आणि कसं केलं असेल याचं आज मागे वळून बघताना खरंच आश्चर्य वाटतं.
शाळा सुरू करतानाच प्रशिक्षित शिक्षक ही शाळेची प्राथमिक गरज आहे हे माहीत होतंच. त्यामुळे ‘कामायनी’ या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेऊन मी एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळेच मग या मुलांसाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याचं भान आलं. या प्रशिक्षणाच्या वर्षभराच्या कालावधीत गावातील बालवाडी सांभाळणाऱ्या एक शिक्षिका- सरिता रायरीकर स्वेच्छेने आमच्या शाळेसाठीही वेळ देऊ लागल्या. त्यांना मदतनीस म्हणून पौडवरून, दहा किलोमीटरवर असणाऱ्या गावातून माझी नणंद येई. मोबदल्याची कोणतीही अपेक्षा न करता वर्षभर या दोघींनी शाळा सांभाळली. मुलांच्या देखभालीसाठी एक आजी येत आणि त्यांना मदतनीस म्हणून गावातीलच एक तरुण मुलगा. या सर्वावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून माझ्या सासूबाई आल्या. विशेष म्हणजे या सर्वाचा दोन्ही वेळेला स्वयंपाक त्या स्वत: करायच्या. त्या वेळी माझ्या शिक्षक असलेल्या पतीचा पगार हाच आमचा एकमेव आíथक स्रोत होता. लवकरच मुलांची संख्या २० झाली आणि अशा शाळेची ग्रामीण भागातही किती गरज आहे, हे वास्तव ठळकपणे अधोरेखित झालं.
 मुलांची संख्या वाढायला लागली तशा गरजा आणि जबाबदाऱ्याही वाढल्या. पूर्ण विचारांती माझ्या पतीने नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर शाळा हाच आम्हा दोघांचा ध्यास बनला. याच काळात एका अनपेक्षित संकटाला सामोरं जाण्याचा प्रसंग आला. अचानक आलेल्या वादळी पावसात घरावरचे पत्रेच उडून गेले. मध्यरात्रीची वेळ, कोसळणारा पाऊस, सगळ्या मुलांना जवळ घेऊन, जीव मुठीत धरून आम्ही निसर्गाचं ते तांडव पाहत राहिलो. इतक्यात वादळाला न जुमानता हय़ांनी पत्रे शोधून आणण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच घराची एक िभत पावसामुळे खचली. पण आता काहीही झालं तरी आम्हाला खचून चालणारच नव्हतं. या अस्मानी संकटांला सामोरं जाण्याचं सामथ्र्य परमेश्वरानेच आम्हाला दिलं. ही तर फक्त सुरुवात आहे, हे तेव्हा कुठे माहीत होतं? अर्थात, या घटनेबरोबरच एक दिलासा देणारी घटनाही घडली. आमची शाळा ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मतिमंदांसाठी असलेली पहिली निवासी शाळा असल्यामुळे पहिल्याच वर्षी शासन-मान्यता आणि अंशत: अनुदानही मिळालं. त्या वेळच्या समाजकल्याण खात्याचे अधिकारी बी. व्ही. जोशी यांनी निरपेक्षपणे केलेली मदत अत्यंत मोलाची, प्रेरणादायी तितकीच मार्गदर्शकही ठरली.  यानंतर आम्ही मागे वळून पाहिलंच नाही. दोन वर्षांतच ‘पंगु लंघयते गिरिम्’  हे बोधवाक्य धारण केलेल्या आमच्या ‘संस्कार प्रतिष्ठान’ या संस्थेने शाळेसाठी पिरंगुटमध्येच पण गावापासून दूर माळारानावर दहा गुंठे जागा घेतली. तिथे झोपडय़ा उभारून जणू गुरुकुल पद्धतीने आम्ही राहू लागलो. स्वच्छ-सारवलेल्या जमिनी, कुडाच्या िभती आणि वर चटईचे छप्पर. त्यावर चढवलेले भाज्यांचे वेल, भोवती झाडं, आणि छोटंसं देऊळ. आता आमच्या मुलांना त्रास द्यायला जवळ कोणीही नव्हतं. मुक्त संचाराचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मुलं खूश झाली आणि त्यांच्यामुळे आम्हीही. अर्थात लोकांचा उपद्रव संपला म्हणजे अडचणी संपल्या, असं मात्र अजिबात नव्हतं. तेरा महिने आम्हाला वीजही नव्हती. धो-धो कोसळणारा पाऊस अनेकदा आमची झोप उडवायचा. सर्वाची नजर चुकवून पळून जाणाऱ्या मुलाचा शोध घेण्याचं दिव्यही ऊन-पावसाची, दिवस-रात्रीची पर्वा न करता पार पाडावं लागे. कधी कोणाला िवचू चावे, कोणी झाडावरून पडे, कोणाचा जुना आजार अचानक डोकं वर काढे तेव्हा डॉक्टरांकडे धावावं लागे. प्रचंड पावसामुळे सर्दी-पडशांसारखे आजार मुलांचा पिच्छा पुरवत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आमच्या परिसरातले सर्व डॉक्टर्स आमच्याकडून कसलाही मोबदला न घेता मुलांवर औषधोपचार करतात. सातत्याने तीस र्वष मुलांना मोफत सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे योगदान हेच शाळेच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यांचे महत्त्वाचे कारण आहे, हे निश्चित.
तेही दिवस गेले, काळ बदलला, परिस्थिती बदलली. हळूहळू शाळेचा बोलबाला झाला आणि मदत मिळू लागली. झोपडय़ांची जागा मजबूत डोमने घेतली. त्या वेळी श्रीनिवास पाटील हे पुणे जिल्हय़ाचे कलेक्टर होते. एक दिवस अचानक त्यांनी शाळेला भेट दिली आणि मुलांना झोपण्यासाठी एका मोठय़ा हॉलची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. एका वर्षांत त्यांनी हॉल बांधूनही दिला. आजही त्यांना शाळेविषयी वाटणारं प्रेम आणि आस्था हा आमच्या अभिमानाचा विषय आहे.
शाळा संख्यात्मकदृष्टय़ा वाढू लागली तशी गुणात्मकदृष्टय़ाही मोठी होऊ लागली. सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला. आमचे कुटुंबीय रोटरी, लायन्स, क्लबचे पदाधिकारी, मेंबर्स, मार्केट यार्डमधील व्यापारी तर सुरुवातीपासूनच बरोबर होते. पण कोकाकोला कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि परिसरातील इतरही कारखानदारांनी अतिशय निरपेक्षपणे सर्वतोपरी मदत केली. पुण्याच्या फुले मंडईतील श्री स्वामी समर्थ मठाचा उल्लेखही आवर्जून केला पाहिजे. सेवाभावी संस्थांइतकाच नि:स्वार्थपणे आमची ओंजळ भरणाऱ्या दानशूर, सर्वसामान्य माणसांचाही या संस्थेच्या उभारणीत आणि जडणघडणीत मोलाचा, महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच शाळेतील मुलांचे शिक्षण व संगोपन मोफत करू शकतो.
२००५ साली आम्ही पिरंगुटपासून ५ किलोमीटरवर असलेल्या अंबडवेट इथे पाच एकराच्या प्रशस्त जागेत संस्कार प्रतिष्ठानचे स्थलांतर झाले. संस्थेचे एक आधारस्तंभ असलेल्या वास्तुरचनाकार दसनूरकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अत्यंत देखण्या वास्तूत शिकण्याचं भाग्य मुलांना लाभतंय. तर मुंबईच्या बिर्ला ट्रस्टने वसतिगृहासाठी भव्य इमारत बांधून देऊन आमचं एक फार मोठं स्वप्न नुकतंच पूर्ण केलं आहे. आज ५८ मुलं, ज्यात ३२ अठरा वर्षांखालील व २६ प्रौढ मतिमंद, २२ कर्मचाऱ्यांसह या प्रशस्त जागेत राहत आहेत. भरपूर पाणी, मुलांनीच लावलेली जवळजवळ शंभर फळझाडं, फुलझाडं, शुद्ध मोकळी हवा, गोशाला, नर्सरी, शेती, झोके, घसरगुंडी इत्यादी खेळाची साधनं ग्रंथालय, प्रशस्त पटांगण आणि परिसरातच पिकणारं धान्य, फळं, भाज्या, दूध, तुपाचा सकस आणि सात्त्विक आहार यामुळे इथला प्रत्येक माणूस आनंदाने मुक्त-मोकळा श्वास घेताना दिसेल. रोपवाटिका, जनावरांची निगा, परिसराची स्वच्छता, झाडांना पाणी घालणं, शिवणकाम, प्लास्टिकची फुलं करणं, माळा बनवणं, स्वयंपाकघरात मदत अशी ज्याला जी आवडतील आणि झेपतील ती कामं ही मुलं करतात.
अशा मुलांना शिकवणं ही सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी शिक्षकांकडे प्रचंड सहनशक्ती असावी लागते. अठरा वर्षांखालील तीस मुलं शाळेत आहेत. त्यांच्या बुद्धय़ांकानुसार तीन गटांत विभागणी करून त्यांच्या कुवतीनुसार त्यांना शालेय शिक्षण दिलं जातं. अनेक साधनं आणि वस्तुरूपाने प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या शिकवलं जातं. यासाठी शिक्षकांकडे खूपच ऊर्जा असावी लागते. आणि एकच गोष्ट त्याला समजेपर्यंत पुन:पुन्हा सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी प्रचंड पेशन्सही. सुदैवाने अगदी सुरुवातीपासूनच समíपत वृत्तीनं काम करणारे शिक्षक आणि कर्मचारी शाळेला लाभले. त्यामुळे नॉर्मल मुलांच्या शाळेप्रमाणेच िदडी, भोंडला, नागपंचमीपासून-गणेशोत्सवापर्यंतचे सण-समारंभ मोठय़ा जल्लोषात पार पडतात. प्रत्येक मुलाचा वाढदिवसही तितक्याच उत्साहात साजरा होतो. वर्षांतून एकदा सहलीला जाणं ही तर त्यांच्यासाठी पर्वणीच असते. शिक्षकांचे प्रयत्न आणि प्रोत्साहनामुळेच कोणी चित्रकला स्पर्धामध्ये बक्षिसं मिळवतात. कोणी वाद्यं वाजवण्यात तरबेज होतो, तर कोणी पोहण्याच्या स्पध्रेत निर्वविाद यश मिळवतो. हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये तर मुलांनी मुंबई, चेन्नई, कोलकातापर्यंत मजल मारली आहे. सुरुवातीच्या काळात तर योगेश, संदीप, महेश, तुकाराम, विनोद, आणि इतर अनेक मुलांनी पळणं, गोळाफेक, विणकाम, कोडी सोडवणं, नृत्य व पोहण्याच्या स्पर्धामध्ये राज्यपातळीवर अनेक बक्षिसं पटकावली. अनेक र्वष शाळेतील वीस मुलांचं झांज व लेझीम पथक पुण्याच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भाग घेऊन आपली कला सादर करत. बालकल्याण संस्थेच्या गणपतीपुढे लेझीम खेळणारी मुलं हा सर्वाच्या कौतुकाचा विषय होता. अर्थात त्यांच्याकडून हे करवून घेणाऱ्या शिक्षिका आशा खोले यांचे अथक परिश्रम हेही तितकंच महत्त्वाचं होतं. विशेष म्हणजे त्या लक्ष्मी रोडवरील विसर्जन गणपतीपुढे ढोल वाजवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. मुलांच्या व्यक्तिविकासाचं श्रेय जितकंअपंगांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या पुण्याच्या ‘बालकल्याण’ या संस्थेला आहे. तितकंच त्यांना घडवणाऱ्या (अक्षरश:) आमच्या शिक्षकांचंही आहे.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच शाळेत आलेल्या मुलाचं वर्तन, त्याच्या सवयी एका वर्षांतच जाणवण्याइतक्या बदलतात. अनेक पालक त्याचं श्रेय मोकळेपणाने शाळेला देतात. मतिमंद मुलगा सामान्य मुलांसारखा अभ्यास करू शकत नाही, लिहू-वाचू शकत नाही. अनेकांना लिहिता-वाचता येतं, पण पशाचे हिशेब समजत नाहीत, बहुतेकांना स्मरणशक्ती नसते, आणि व्यवहारज्ञानही. पण प्रयत्नाने त्यांच्या सवयी बदलता येतात, त्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना आकार देता येतो हे आमच्या शिक्षकांनी दाखवून दिलं आहे. शाळेत १०-१२ र्वष राहिल्यानंतर अनेक मुलांनी कारखान्यात, हॉटेलमध्ये, दुकानात छोटी-मोठी कामं करत आपण कुटुंबाला, समाजाला ओझं नाही हे सिद्ध केलं आहे त्यांचा फोन येतो किंवा ते भेटायला येतात तेव्हा श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.
सेवाभावी शिक्षकांचा जसा शाळेच्या गुणात्मक वाटचालीत भरीव वाटा आहे, तितकाच वाटा समíपत वृत्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही आहे. मुलांना आंघोळ घालणाऱ्या, त्यांचे कपडे धुणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, प्रत्येक मुलाचा वेगळा स्वभाव, आवड-निवड, सवय, तब्येत, औषधं, आजारपणं सांभाळून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या मावश्या आणि मामा यांच्या सहकार्याशिवाय अशा मुलांची निवासी-शाळा चालवणं फक्त अवघडच नाही तर अशक्यच आहे. त्यांनी मनापासून केलेलं प्रेम, त्यांची आत्मीयता मुलांपर्यंत पोचते. त्यामुळेच ती न सांगता त्यांना मदत करतात. कोणी भाज्या निवडतं-चिरतं, कोणी टेबल-खुच्र्या साफ करतो, तर कोणी झाडू घेऊन साफसफाई करतो. कोणाचंही कसलंही काम न ऐकणारा माझा मुलगा सारंग मावशीच्या मागे घोटाळत त्यांना त्या म्हणतील ती मदत तत्परतेने करतो. सर्व मुलांना जेवायला वाढायचं कामही तो आवडीने आणि नियमितपणे करतो. अविनाश १५ वर्षांचा. त्याला वाचता येत नाही, पण सर्व वर्गातल्या सर्व मुलांचे (नाव घातलेले) कपडे तो बरोबर ज्याचे त्याला देतो.
शाळेच्या छोटय़ा रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. पण आवर्जून सांगावंसं वाटतं की हे रोपटं आम्ही उभयतांनी लावलं असलं तरी त्याला खतपाणी घालून जोपासण्याचं काम अनेक हातांनी मिळून केले आहे. विविध क्षेत्रांतील नामवंतांनी आपलं मोठेपण विसरून शाळेला ‘आपलं’ म्हटलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध आíकटेक्ट शिरीष दसनुरकर म्हणजे स्वत:ला झोकून देऊन काम करणं म्हणजे काय याचा आदर्श वस्तुपाठच. शाळा, वसतिगृहाच्या वास्तूंची डिझाइन्स तर त्यांनी विनामूल्य केलीच पण स्वत:च्या चित्रांचं प्रदर्शन भरवून त्यांच्या विक्रीतून आणि विविध व्यक्ती व संस्थांकडून देणग्या गोळा करून वेळोवेळी भरघोस आíथक मदत केली. शाळेच्या विकासात त्याचं फार मोलाचं योगदान आहे. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, श्रीराम रानडे यांचाही आवर्जून उल्लेख करेन. त्यांनी आमची ओंजळ तर भरलीच पण या सुहृदांच्या आमच्यावरील निरपेक्ष प्रेमामुळेच संकटांना सामोरं जाण्याची शक्ती आणि नाउमेद न होता काम करण्याची ताकद आम्हाला मिळाली.
या प्रवासात आलेल्या विविध अनुभवांनी आमचं जगणं समृद्ध होत गेलं. आमच्या मुलाला लिहिता-वाचता येणार नसेल तर ही कसली शाळा म्हणणारे पालक इथे भेटले तसंच मुलाच्या छोटय़ाशा प्रगतीचं श्रेय शाळेला देणारे पालकही भेटले. मतिमंद भावाची लाज वाटते म्हणून त्याला बहिणीकडे सोपवून मुक्त होणारे भाऊ या जगात आहेत तसंच बायकोच्या मतिमंद भावाची काळजी घेणारे तरुण मेहुणेही आहेत. स्वत:चा मतिमंद मुलगा शाळेतच अकाली गेल्यानंतरही शाळेशी असणारे ऋणानुबंध जपणारे पालक जसे आहेत तसेच आपल्या आजारी मुलाला भेटायला येण्याची टाळाटाळ करणारे पालकही आहेत. अशी कितीतरी माणसं आणि कितीतरी प्रसंग.
आज मुलांसाठी कशाचीच कमतरता नाही, समाधान याचं आहे की हळूहळू का होईना बदल घडतो आहे. प्रसार माध्यमं, पालक संघटना, सेवाभावी संस्था त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. परदेशात अशी मुलं आवर्जून दत्तक घेतली जातात. तसं आपल्याकडेही व्हावं असं वाटतं. विशेष समाधानाची बाब ही की तरुण मुलं-मुली अशा कामाकडे आकर्षति होत आहेत. एन. एस. एस.च्या कॅम्पच्या निमित्ताने शाळेत येणारे कित्येक तरुण आता या संस्थेचाच भाग बनून गेले आहेत. त्यांच्या मनाचा एक कोपरा आम्ही व्यापू शकलो, ही आमची मोठी कमाई आहे असं मला वाटतं.
संपर्क – प्रतिभा केंजळे
संस्कार प्रतिष्ठान, अंबडवेट, पौड, पिरंगुटजवळ, तालुका मुळशी, पुणे. ४१२ १०८
दूरध्वनी ०२०-२०२९१०६५
http://www.sanskarpratishthan.org

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Fire at Ichalkaranji Loom Factory
इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यास आग; १ कोटींचे नुकसान