सहजोबाई ही संत चरणदासांची भाची आणि शिष्या. १७८२ मध्ये चरणदासांचा देह पंचत्वात विलीन झाल्यानंतर जवळजवळ २३ र्वष सहजोबाईनं संप्रदायाची गादी सांभाळली. आजही दिल्लीत तिच्या नावानं गादी आहेच. चरणदासी संप्रदायाच्या अस्तित्वाची ती आजची जिवंत खूण आहे.

काळ जुना. जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वीचा! डेहरा नावाच्या मेवात प्रांतातल्या एका लहानशा गावात लग्नाची धामधूम चाललेली. मुलगी जेमतेम बारा वर्षांची. आई-वडिलांना चार मुलांमागे ही पाचवी एकच मुलगी. सर्वाची लाडकी. तिचं लग्न होत आहे म्हणून सर्वाना आमंत्रणं गेली. मुलीचे मामा तेव्हा दिल्लीत होते आणि ते cr10साधू बनलेले होते. भाचीला आशीर्वाद देण्यासाठी तेही लग्नमंडपात आले. असं म्हणतात की, त्यांनी तिला आशीर्वाद दिला तो जगावेगळा. ज्या संसारात ती लग्न करून गुरफटून जाणार होती, त्या संसाराची क्षणभंगुरता त्यांनी तिला समजावली आणि खऱ्याखुऱ्या परमश्रेयाची वाट दाखवली. ते तिला म्हणाले, ‘तुझ्या क्षणिक सौभाग्याचा अभिमान कशाला बाळगतेस? एक दिवस मरायचं आहे तुला. इथे कायमची राहणार नाहीयेस तू.’ आणि मग जिथे कायमची शांती मिळते त्या विश्वाची वाट त्यांनी तिला दाखवली.
इकडे ती नववधू आपल्या मामांचे ते शब्द ऐकून खाड्कन भानावर आली आणि योगायोग असा, की तिकडे वरातीतल्या आतषबाजीला बिचकून नवरदेवाचा घोडा उधळला आणि झाडाला धडकला तेव्हा नवरदेवाचा लग्नमंडपात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. लग्नापूर्वीच लग्नबंधनातून मुक्त झालेली ती मुलगी मग आपल्या मामानं दाखवलेल्या परमार्थाच्या मार्गानं निघाली. मोठी तत्त्वचिंतक बनली, ग्रंथकार बनली आणि गुरुपदालाही प्राप्त झाली. तिचं नाव सहजो. सहजोबाई.
सहजोबाई ही संत चरणदासांची भाची आणि शिष्या. १७८२ मध्ये चरणदासांचा देह पंचत्वात विलीन झाल्यानंतर जवळजवळ २३ र्वष सहजोबाईनं संप्रदायाची गादी सांभाळली. आजही दिल्लीत तिच्या नावानं गादी आहेच. चरणदासी संप्रदायाच्या अस्तित्वाची ती आजची जिवंत खूण आहे. ‘ज्ञानस्वरोदय’सारख्या प्रसिद्ध ग्रंथाचे रचनाकार चरणदास हे अठराव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेले कबीर पंथाचे मोठे अध्यात्म गुरू होते. योगसाधक होते आणि श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी इतर संतांप्रमाणेच प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेटी दिल्या आणि नंतर ते दिल्लीत स्थायिक झाले. सहजो त्यांची शिष्या झाली. त्यांच्या सर्व शिष्यमंडळात सर्वात प्रमुख, सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रसिद्ध अशी शिष्या. सहजोबाई आणि पाठोपाठ दयाबाई या दोघींची नावं चरणदासांच्या शिष्यपरंपरेत अग्रमानानं येतात. चरणदासांनंतर २२-२३ र्वष सहजोबाईनं संप्रदायाची गादी सांभाळली. तिची बुद्धी कुशाग्र होती. अष्टांग योग आणि नवविधा भक्तीची रहस्यं तिनं सहज आत्मसात केली. असं सांगितलं जातं की, महिना महिना ती समाधिस्थितीतच राहू शकत असे. अशा विदेही स्थितीला पोहोचूनही सहजोबाई योगमार्गानं आपल्या श्रेयाकडे निघून गेली नाही. तिनं गुरुचरणाशी आपली संपूर्ण श्रद्धा समर्पित केली आणि अनेक धार्मिक यात्रा करीत भगवद्भक्तीचा प्रसार केला. श्यामविलास, सुमतीबाई, अगमदास, हरनामदास असे तिचे शिष्य तिनं आपल्या संप्रदायाचं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी ठिकठिकाणी पाठवले आणि शिष्य-प्रशिष्यांच्या द्वारा धर्मजागरणाचा अखंड प्रयत्न केला. १७२४ ते १८०५ अशा ८०-८१ वर्षांच्या आपल्या दीर्घ आयुष्यात तिनं राजकीय-सामाजिक अधोगतीची नाना रूपं पाहिली. मुसलमान आमदानीचा उत्कर्ष-अपकर्ष पाहिला. परकीय शासकांचे विलास पाहिले. एतद्देशीय छोटे राज्यकर्ते, त्यांचा नाकर्तेपणा आणि शरण्यभाव पाहिला आणि समाजातली अराजकता, अस्थिरता आणि अशांती पाहिली. धर्माच्या नावाखाली चाललेलं ढोंग, अनाचार आणि शोषणही पाहिलं.
या विपरीतातून पार होण्याची एक वाट तिला भक्तीच्या प्रांगणातून जाताना दिसत होती. तिच्या गुरूंनी- चरणदासांनी तिला ती दाखवली होती.
गुरूने दीप दिला,
सहजो, गुरूने दीप दिला।।
कणकण त्याने गेला उजळुन
त्रलोक्याचे झाले दर्शन,
विरला तम सगळा,
गुरूने दीप दिला।।
अशा शब्दांत गुरूची कृपा तिनं सांगितली आहे. चरणदासांच्या चरित्रातले काही महत्त्वाचे तपशीलही तिच्याच नोंदींवरून निश्चित करता आले आहेत. ‘सहजप्रकाश’ हा तिच्या नावे प्रसिद्ध असलेला ग्रंथ म्हणजे मुख्यत: दोहे, चौपाया आणि पदांमधून तिनं केलेलं परमार्थ मार्गाचं विवरण आहे. सांप्रदायिक तत्त्वज्ञान आहे आणि जगाविषयीचं मुक्त चिंतनही आहे. असं मानलं जातं की, या ग्रंथाची रचना केली तेव्हा सहजोबाई अवघी अठरा वर्षांची होती. पण वयाचा विचार दूर सारणारी दार्शनिक प्रतिमा तिच्याजवळ असली पाहिजे.
सहजोनं काय काय वाचलं होतं, ऐकलं होतं, आत्मगत केलं होतं याचा अंदाज तिच्या रचनांवरूनच करावा लागतो. तिनं केलेलं ब्रह्माचं वर्णन थेट उपनिषदांमधूनच उतरलेलं दिसतं.
अग्नी त्याला जाळु शके
शस्त्रहि काटु शके ना
उन्ह नं सुकवू शके तयाला
वारा उडवू शके ना

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

नवे न होई, जुने न होई
कीड न लागे ज्याला
मारूनही मारता न येई
भय कसले ना त्याला

असं परब्रह्माचं रूप तिनं जाणलं. सागरावर असंख्य लाटा उठल्या तरी शेवटी ते सगळं पाणीच असतं तसं प्रचंड वैविध्यानं भरलेलं, अनंत रूपांत नटलेलं जीवन दिसलं तरी शेवटी त्याचं मूलतत्त्व त्याचं आत्मतत्त्व एकच असतं, हे तिनं जाणलं आणि निर्गुणाची खूण हृदयात दृढ धरली तरी सगुण भक्तीचा आनंद जिवाला अधिक हवासा वाटतो हेही तिनं जाणलं. म्हणून सहजोबाईच्या रचनांमधून तिच्या तत्त्वविचारांचं स्वतंत्र वैशिष्टय़ दिसत राहिलं.
उत्तम योगमार्ग माहीत असताना, अनेक यौगिक क्रियांवर प्रभुत्व असताना आणि स्वत: सिद्धपदाला पोहोचलेली असतानासुद्धा तिनं योगाऐवजी भक्तीचाच उपदेश केला आहे.
रस-रूप नाही त्याला, ना गंध, ना ठिकाणा
ना स्पर्श, शब्द नाही सर्वापल्याड जाणा
असं ती परब्रह्माचं वर्णन करते आणि तरी नामस्मरणाचा मूलमंत्र शरीरात प्राण असेतो जपत राहिलं पाहिजे असाही आग्रह धरते.
सहजो फिर पछताओगे,
श्वास निकस जब जाय।
जब लग रहे शरीर में,
राम सुमिर हरि गाय।।
साधू कोणाला म्हणावं, सज्जनांनी दुष्ट संगतीकडे कसं पाहावं, संसारातल्या मोहाचं मायावी रूप कसं ओळखावं हे सहजोबाईनं सांगितलं आहे. वेगवेगळय़ा नातेसंबंधांबद्दल, वेगवेगळय़ा व्यवसायांबद्दल ती रूपकांच्या भाषेत बोलते आणि त्यातून कधी ईश्वराच्या सत्यस्वरूपाचा बोध घडवते तर कधी गुरूचं थोरपण विशद करते.
सहजोबाईची पदं साथीला संगीत घेऊनच आली आहेत. ती श्रुतिमधुर आहेतच, पण रसमधुरही आहेत. ज्ञान आणि योगाच्या सीमांना स्पर्श करणारी आहेत तरी प्रेमभक्तीनं भिजलेली आहेत. तिची गादी आजही दिल्लीत अबाधित चालू आहे ती त्याच तिच्या सामथ्र्यशाली वाणीमुळे.
डॉ. अरूणा ढेरे -aruna.dhere@gmail.com