वर्ग नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाही अशी व्यवस्था अस्तित्वात असू शकते? आणि असली तरी त्यात मुलांची सर्वागीण वाढ होऊ शकते? शाळेत न जाणाऱ्या मुलांच्या सामाजिक व भावनिक विकासाचं काय? या आणि अशा अनेक तळमळीच्या प्रश्नांना उत्तर ठरतील ‘होम स्कूलिंग’चा पर्याय निवडणारे कमलाकर इंदुलकर व अजय मंडलिक यांच्यासारखे अनेक पालक; तर मोठय़ा स्तरावर घरीच शिक्षणाची ही चळवळ चालवणाऱ्या ग्राममंगल, भारत विद्यालय अशा अनेक संस्था.
‘होम स्कूलिंग’ हा हल्ली सतत ऐकू येणारा शब्द. खरं तर नवा बिलकूल नाही. रवींद्रनाथ टागोर, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी ते स्टिव्ह जॉब्स ही सारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं शिकली घरच्या घरीच. प्राचीन काळीही मुलं शिक्षणासाठी जात गुरूंच्या घरीच. पण २०१४ मध्ये शिक्षणाचा कायदा अस्तित्वात असताना.. जरा वेगळं वाटलं. म्हणूनच अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना भेटायचं ठरवलंय.
मुंबई, पुणे, वाई, सातारा, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई अशा ठिकाणी यावर संशोधन सुरू आहे. पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारी केंद्रे अस्तित्वात आहेत. प्रथम मला असे पालक भेटले होते अमेरिकेत, १५ वर्षांपूर्वी. तिथे किंवा भारतात साऱ्या चळवळीची सुरुवात झाली काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नांत. मुलं शिकत म्हणजे काय? शिक्षण केवळ शाळेतच होतं का? शाळेत जाण्यापूर्वी मुलं शिकत नसतात का? शाळा संपली म्हणजे शिक्षण संपतं का? इत्यादी इत्यादी.
शिक्षणाय
पालकांनी यावर शोधला पर्याय. मुलाला शाळेत न पाठवता त्यांना शिकण्यायोग्य वातावरण उपलब्ध करून देण्याचा. आपणच मुलाचे शिक्षक बनण्याचा. यांच्यापैकी एक प्राध्यापक कमलाकर इंदुलकर. ते ‘शिक्षणाय’ नावाची चळवळ चालवतात. त्यांना जुळी मुलं. पूर्व विचारांती, अभ्यासाअंती मुलांना किमान प्राथमिक चौथीपर्यंतचं शिक्षण घरीच देण्याचा निश्चय त्यांनी केलाय. त्यांनी सर्व बोर्डाच्या अभ्यासक्रमामधून त्यांना पटणारा अभ्यासक्रम बनवलाय.  शाळा, महाविद्यालय, पालकांच्या गटांसाठी पावरपॉइंट प्रेझेंटेशनस् बनवली. त्यांचे विचार पटणारे आणखी ९ पालक त्यांना भेटले. या साऱ्यांची मुलं एकत्रच शिकतात. मराठी आणि इंग्रजी एकदमच. पण शिक्षणाचं माध्यम असेल मराठीच. मुलं अनेक गोष्टी शिकतात प्रकल्पाच्या माध्यमातून. या जागेला त्यांनी नाव दिलंय ‘नंदनवन.’ मुलं रमतात चित्र, खेळणी, पुस्तक यात. म्हणूनच या दहा मुलांबरोबर इतर मुलांसाठीही ‘बालमोदिनी’ म्हणजेच खेळणी आणि पुस्तकांची लायब्ररी त्यांनी सुरू केली. छंदासारखी भान हरवणारी दुसरी गोष्ट नाही. म्हणून विविध छंदांची ओळख करून देण्यासाठी सुरू झाली ‘छंदोमयी.’ प्रत्येक पालक स्वत:च्या क्षमतेनुसार मुलांच्या विकासासाठी मदत करतात. या मुलांसाठी काय करता येईल? याचा सतत शोध सुरू असतो.
ग्राममंगल
ते मुलांसाठी काय करत आहेत हे ऐकून त्यांचं खूप कौतुक वाटत होतं. पण मनात प्रश्न येत होता त्यांच्या भावनिक, सामाजिक विकासाचं काय? ‘मी शाळेत कधी जाणार?’ असं रोज विचारणारी माझी नात रिया डोळ्यासमोर येत होती, म्हणूनच भेटायचं ठरवलं अनुराधाला. वय वर्षे १२. तिच्या आई-बाबांनी तिच्या जन्माआधीच ठरवून टाकलेलं ‘हिला शाळेत घालायचं नाही.’ तिची ताई क्विनस्मेरी शाळेतून एसएससी उत्तीर्ण झालेली. आई रेल्वेत नोकरीला. बाबा अजय मंडलिक यशस्वी व्यावसायिक. अनुराधा एकदम गोड मुलगी. गाणं शिकते, व्यायामशाळेत जाते, इंग्रजी, मराठी दोन्ही भाषा छान बोलते. तिला कथाकथन आवडते, ताईची १२ वीची पुस्तकं पण तिला वाचायला आवडतात. गाणं, निबंध लेखन, वक्तृत्व अशा अनेक स्पर्धातून बक्षिसे मिळवते. ती राहाते ते ‘शास्त्री हॉल’ म्हणजे एखादं गावच. म्हणून तिला मित्र-मैत्रिणी भरपूर. आपण शाळेत जात नाही याचा तिला जराही न्यूनगंड नाही. उलट तिच्या वयाच्या मुलांना वाटतो तिचा हेवा. यंदा प्रथमच तिनं तिच्या वयाच्या मुलांच्या शाळेतील प्रश्नपत्रिका सोडवल्या. सगळ्यात ८० टक्केपेक्षा जास्त आणि दोन विषयात १०० टक्के गुण मिळाले! तिच्याशी बोलून वाटलं, ‘अनुराधा खरंच लकी आहे.’
अर्थात याचं श्रेय जातं तिचे बाबा अजय यांना. ते नेहमी काळाच्या पुढे पाहातात. विविध देशात आणि भारतात होणारे शैक्षणिक प्रयोग, बदल यांबद्दल त्यांना माहिती असते. माहिती प्रस्फोटच्या काळात आणि ऑनलाइन एज्युकेशनच्या जमान्यात शाळेतला बंदिस्त अभ्यासक्रम त्यांना अपुरा वाटतो. अनेक दूरचित्र वाहिन्या आणि व्हिज्युअल माध्यमं शिकण्यासाठी उपलब्ध व्हायला हवी असं त्यांना वाटतं. अगदी आयआयटी इंजिनीअर्सनादेखील नोकरीसाठी प्रशिक्षणाची गरज भासते. कोणत्याही शाखेचा पदवीधर स्वत: व्यवसाय करण्यास किंवा एखादी नोकरी करण्यास फिट असत नाही, म्हणून आपल्या शिक्षणपद्धतीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. मुलांनी अनेक गोष्टी शिकाव्यात स्वत:च्या सोईनं, आवडीनं आणि एखाद्या गोष्टीत पारंगत व्हावं आणि त्यातच करिअर करावं, असं त्यांचं प्रामाणिक मत.
कामाच्या निमित्तानं ते प्रा. रमेश पानसे आणि ‘ग्राममंगल’च्या संपर्कात आले. आता ते या चळवळीचे ट्रस्टी आहेत. अनुताई वाघ आणि पानसेसरांच्या प्रेरणेने ‘ग्राममंगल’ची स्थापना झाली. आता रचनात्मक प्रयोग, प्रकल्प, शैक्षणिक साधन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक चळवळ म्हणून ती फोफावली आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शाळा एवढंच काय, पण जयंत नारळीकर, अच्युत गोडबोले, अनिल काकोडकर यांच्यासारखे नामवंत, विचारवंत या चळवळीशी जोडले गेले आहेत. सतत अभ्यास, आढावा, प्रगती, सुधारणा, प्रशिक्षण अशी ही प्रक्रिया बनली आहे. हल्ली ते भर देतात शिक्षक प्रशिक्षणावर. त्यांनी चला लिहू या, वाचू या अशी पुस्तकं स्वत: तयार केली आहेत. स्वत:चा अभ्यासक्रम आहे. साधारण इयत्ता दुसरीपर्यंतच्या क्षमता विकसित करून घ्याव्यात आणि मग मुलाला शिकण्याला साह्य़ करावं. पूरक वातावरण पुरवावं, असा साधा विचार यामागे आहे.भारत विद्यालय
 प्रसिद्ध उद्योगपती किलरेस्कर यांनीही आपल्या मुलाला शाळेत न घालण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलासोबत ज्यांचे आईबाबा शाळेत गेलेलेच नाहीत अशा इतर मुलांसाठीही सुरू झाला विनाअनुदान तत्त्वावर चालणारा उपक्रम ‘भारत विद्यालय.’ पुण्यातील उच्चशिक्षित ७० पालकांनी आपणच मुलांना शिकवायचं ठरवलं. एवढी मोठी संख्या म्हणून व्यवस्था आली. मात्र या व्यवस्थेत वर्ग नाहीत. वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत. विज्ञान, भाषा, गणित, समाजशास्त्र अशा खोल्या आहेत. कधी कधी तर मुलं शांतिनिकेतनप्रमाणे मोकळ्या हवेत शिकतात. सकाळी ९ ते ४.३० पर्यंत एकत्र येतात. पालक त्यांच्या सोईनुसार आपला वेळ देतात. सातारा, वाई अशा अनेक ठिकाणी असे गट सुरू झाले आहेत. इथे खडू, फळा नाही. व्याख्यानं नाहीत. मुलं येतात, शिकतात, एकमेकांना मदतही करतात. त्यांना इंग्रजी व मराठी उत्तम बोलता येतं. वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत मुलं कोणतीही भाषा पटकन शिकू शकतात. फक्त ती त्यांच्या कानावर पडायला हवी. हा त्यामागचा विचार. मुलं लिहायला मात्र उशिरा सुरुवात करतात.
इयत्ता १०वीची बोर्डाची परीक्षा द्यायची तर किमान चौथी उत्तीर्ण हवी. म्हणून पालक जिल्हा परिषदेकडे गेले. त्यांनी परीक्षा घ्यायला संमती दर्शवली. मात्र मुलांच्या क्षमतेवर अविश्वास दाखवला. त्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवण्याचं सुचवलं. हे आव्हान पालकांनी स्वीकारले. १०० टक्के निकाल आणि १०-१२ जणं मेरिटमध्ये आली. स्वत:ला सिद्ध केल्यावर त्यांनी हे थांबवलं. हेतू एकच, ‘स्पर्धेचा ताण व परीक्षांचा तणाव नको.’ काही पालकांनी इयत्ता ९ वीत रीतसर प्रवेश घेतला. पण एकदाही शाळेत न जाता १० वी उत्तीर्ण विद्यार्थिनी सध्या आर्किटेक्चर करत आहे. याच पद्धतीतून आदिवासी भागातील विद्यार्थी पदवीधर झाले. कोणी व्यवसायात रमले आहेत. कर्नाटक, राजस्थान अशा अनेक राज्यांत उद्योगसमूह आणि भारतीय जैन समाजसारख्या संस्था शिक्षणशास्त्र, मेंदूशास्त्र यावर प्रयोग करीत आहेत.
स्वत: गरवारे महाविद्यालयातून निवृत्त झाल्यावर आदिती नातू गेली १८ वर्षे अशा पालकांना मार्गदर्शन करतात. सिंहगड रोडवर ‘ग्राममंगल’च साधन केंद्र आहे. तिथे येऊन पालक किट्स घरी नेऊ शकतात. ‘शिक्षणवेध’ नावाचं मासिक चालवलं जातं. जी मुलं इतर शाळांतून जातात, पण त्यांना काही संकल्पना समजून घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी लर्निग होम आहे. इथे येऊन ती संकल्पना समजून घेतात. पार्ले टिळक विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून निवृत्त झालेल्या बिजूरबाई ही जबाबदारी सांभाळतात.
हे सारं समजून घेणं खूप कठीण वाटतं. पण असंही मनात येतं ‘शाळा आहेत, पण शिक्षण नाही’ ही एक अवस्था तर वर्षांची लाखो रुपये फी मोजून आयुष्याची महत्त्वाची वर्षे शाळानामक तटबंधित खर्च करण्यापेक्षा पालकांनीच अशा उपक्रमात सहभागी व्हावं. शिक्षण प्रक्रियेचा घटक बनावं. यासाठी त्यांना दाखवावं लागेल, केवळ थोडंसं धाडस. चला तर मग..
अजित मंडलिक ९८६९०४९८४९
प्राची / आदिती नातू ९८५०९२०३९१
कमलाकर इंदुलकर  ९७०२६०६००२

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा