ch08मनावरचे ताण पेलण्याची क्षमता येते स्वसन्मानातून! पराभवाचं, अपयशाचं कडूपण सहन होतं स्वसन्मानामुळे! प्रवाहाबरोबर वाहून न जाण्याचं बळ मिळतं तेही स्वसन्मानातूनच. पण याचा अर्थ स्वसन्मान बरोबर दुरभिमान किंवा ‘मीच ग्रेट’अशी दर्पोक्ती नव्हे.
एक छान, शांत संध्याकाळ. अगदी आपल्या आपल्याशी संवाद करावासा वाटणारी. अचानक वाऱ्यावर वाहात कुठूनसे स्वर आले, ‘गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा ल्यावे.. जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्य्ोचा!’ स्वातंत्र्यवीरांचे भिडणारे शब्द आणि सर्व मंगेशकरांचे जुळलेले स्वर या साऱ्याची मनावर मोहिनी पडली नाही तरच नवल!
त्यातल्या ‘गुणसुमने’ या शब्दावर मी रेंगाळले. कशाला म्हणायचं गुणसुमने? ती अशी स्वप्रयत्नांनी मिळवता येतात का? त्यामुळे आपल्या जगण्याची गुणवत्ता वाढते का? जरा आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला प्रत्येकातील अशी खास गुणसुमनं दिसू लागतात. विद्याचं लोकांमध्ये मिळून-मिसळून, तरीही ठाम असणं मला खूप आवडतं. मनोजची शिस्तप्रियता त्याला अनेक आव्हानात्मक कामं एकाच वेळी सांभाळताना उपयोगी पडते, तृप्ती अत्यंत विश्वासू माणूस आहे तर प्रज्ञेश नावाप्रमाणेच अत्यंत बुद्धिमान! विनयचा स्वभाव खूपच खुला- नवनवीन कल्पनांना जन्म देणारा आहे. या सगळ्यांचं कॉमन वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा सर्वसाधारण मूड फार कधी बिघडत नाही. वर-खाली होत नाही. एक प्रकारचं समाधान त्यांच्या मनात नेहमी वास करून असतं. अनेक वर्षांच्या संशोधनातून हे दिसून आलंय, की प्रत्येक जणच जन्माला येताना अशा काही खास देणग्या घेऊन येत असतो. आधीच्या पिढय़ांच्या रक्तातून (गुणसूत्रांतून) त्या आपल्यापर्यंत पोचतात. मग आसपासच्या परिस्थितीमुळे, आपल्या प्रयत्नांमुळे त्या प्रकाशात येतात. प्रत्येक कृतीवर त्यांची छाप पडते, इतकंच नाही तर आपल्या भावना विश्वावरही त्यांचा परिणाम होत असतो. त्यामुळे जगणं अर्थपूर्ण बनत जातं. हे ‘सद्गुण’ म्हणजे ‘सदैव आनंदाची ग्वाही’ असं शंभर टक्के घडत नाही, कधी तर त्यामुळे क्लेशही होतात. ‘The difficulty of being Good’ या पुस्तकात उद्योग जगतातील प्रसिद्ध व्यक्ती- गुरचरण दास यांनी खूप नेमकं भाष्य केलं आहे.
आपली सांस्कृतिक कथा- रामायण महाभारत तरी वेगळं काय सांगतं? जीवनात सगळ्यात जास्त क्लेश कुणाला भोगायला लागले तर सद्गुणांचा समुच्चय असणाऱ्या मंडळींनाच! मग एखाद्याला वाटले की कशाला जोपासायचे असले सद्गुण? त्यापेक्षा चटकन सुख देणारे- दुसऱ्यावर अधिकार गाजवायची प्रेरणा देणारे व्यक्तीगुण बरेच की! काही मानसशास्त्रज्ञांनी मुद्दाम अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केला. त्यात असं दिसलं की स्वभाव स्वभावगुणांतील हे फरक अगदी बालपणातच दिसू लागतात. अगदी पहिल्या दोन-तीन आठवडय़ांतच मुलांचे मूड्स, खेळणं, प्रतिसाद देणं, रडताना शांत होणं अशा अनेक गोष्टींमध्ये फरक दिसायला लागतो. काही मुलंअगदी किरकिरी, अनोळखी वातावरणात बुजणारी असतात तर काही शांत, नव्या ठिकाणी जुळवून घेणारी असतात. साधारण २० टक्के मुलांमध्ये असे टोकाचे व्यक्तीगुण दिसतात. या दोन प्रकारच्या मुलांना त्यानं ‘प्रतिक्रियावादी आणि निश्चिंत’ अशी नावं दिली. पहिल्या गटातली मुलं अगदी छोटय़ातल्या छोटय़ा बदलानंही चटकन अस्वस्थ होत होती तर निश्चिंत मुलं त्या मानानं पुष्कळच आश्वस्त राहात होती. त्याच्या शरीरातसुद्धा तुलनेने कमी बदल जाणवत होते (उदा. हृदयाचे ठोके, मेंदूतील लहरीत वाढ इ.). अभ्यासकांना त्यांच्यानंतरच्या सामाजिक विकासातही फरक दिसला. प्रतिक्रियावादी मुलं मोठेपणी बुजरी, चिंता करणारी आणि थोडी एकलकोंडी होण्याची, तर निश्चिंत मुलं इतरांशी पटकन जोडली जाणारी, निवांतपणे आयुष्य घालवणारी होण्याची शक्यता असते, असं आढळलं. ज्या व्यक्तीमध्ये मोकळेपणा आणि आश्वासक भावनांचं मिश्रण असतं त्यांचं एकूण मनारोग्य खूपच स्वस्थ असतं तर ज्यांच्यात खूप उत्तेजितता अस्वस्थता आणि तात्काळ प्रतिक्रिया असं मिश्रण असतं त्यांच्या भावना चटकन विचलित होणाऱ्या, खूपच संवेदनशील असतात.
अशोक हा एक लघु उद्योजक आहे. त्याला व्यवसायात छोटे-मोठे धोके पत्करावेच लागतात. कधी अंदाज खरे होतात तर कधी हुकतात. पण तो उमेद सोडत नाही. त्याचा मूड खूपच खराब झालाय असं कधी होत नाही. बघू काही तरी मार्ग निघेल, असं म्हणून तो स्वत:ची प्रसन्नता टिकवून ठेवतो. त्याउलट शीला आहे. अगदी दुधातुपात वाढून श्रीखंडपुरीत लोळणाऱ्या शीलाला कधीही विचारा, ‘कशी आहेस?’ तर ब्युटी पार्लरमधून नुकतीच आल्यासारखीच दिसणारी शीला चेहरा पाडून म्हणते, ‘कसलं गं! काऽही खरं नाही! बघ ना सगळं कसं उलट-सुलट होतंय. काहीच नीट होत नाहीये!’
अशोक आणि शीला आपापल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कसं जोखतात? एकाकडे स्थिरचित्तता आहे तर दुसरी कशाचंच स्वागत करू शकत नाही. अशोकला आयुष्यातला चांगल्या गोष्टी स्मरणात राहतात तर शीलाला सगळ्या ‘कुरकुऱ्या’ गोष्टीच आठवतात. जणू काही ती दोघं दोन स्वतंत्र जगातच राहात आहेत. अशी दोन विश्वं निर्माण होण्यामागे आणखीन एक कारण असतं ते म्हणजे ‘स्वसन्मानाची जाणीव!’ हा गुण ज्या व्यक्तींमध्ये जोपासला जातो त्यांचं भावविश्वच बदलून जातं. ही जाणीव मूलत:च असते की परिस्थितीप्रमाणे बनते, या प्रश्नाचं उत्तर देताना संशोधक म्हणतात, ‘प्रत्येकाची स्वसन्मानाच्या जाणिवेची एक पायाभूत पातळी असते. ती कमी/जास्त होणं मात्र परिस्थितीवर काहीसं अवलंबून असतं.’ ‘स्वसन्मान’ चांगला असणं ही आनंदाची-समाधानची एक महत्त्वाची खूण आहे. त्यावर अज्ञानाची/नराश्याची धूळ बसली असेल तर ती झटकायला आपणच प्रयत्न करायला लागतात.
‘आत्मविश्वास’ हा १९९० मध्ये प्रदíशत झालेला एक अत्यंत परिणामकारक चित्रपट मला आठवतो. आरती मंगलकर या मध्यमवयीन गृहिणीवर असलेली कुटुंबीयांच्या उपेक्षेची- नाकारलेपणाची मोहोर तिच्यातील ही सन्मानाची जाणीव इतकी खच्ची करत असते की कधी काळी आपण एक हुशार विद्याíथनी होतो, नेतृत्वाची क्षमता असणाऱ्या होतो, हे ती पार विसरून गेलेली असते. तिच्या अचानक भेटलेल्या एका जुन्या मत्रिणीला ते उमगतं. तिच्या साध्याश्या युक्तीमुळे आरतीचा कायापालट होतो, म्हणजेच तिच्या सुप्त स्वसन्मानाला धक्का मिळतो, आणि एक समर्थ, कणखर पण प्रेमळ व्यक्ती त्यातून उभी राहते. हे सगळं ज्या टिपिकल फिल्मी गतीनं घडतं, तसं प्रत्यक्षात घडत नसलं तरी विविध अनुभवांतून जाताना स्वसन्मानाची प्रचीती घेतलेले असे अनेकजण आपल्याला आजूबाजूला दिसतात. ही जाणीव किंवा व्यक्तीगुण नसलेले लोक खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकत नाहीत, असं दिसून आलं आहे.
मनावरचे ताण पेलण्याची क्षमता येते स्वसन्मानातून! पराभवाचं, अपयशाचं कडूपण सहन होतं स्वसन्मानामुळे! प्रवाहाबरोबर वाहून न जाण्याचं बळ मिळत तेही स्वसन्मानातूनच. पण याचा अर्थ स्वसन्मान बरोबर दुराभिमान किंवा ‘मीच ग्रेट’ अशी दर्पोक्ती नव्हे. फुगलेल्या बेडकीसारखा हा फुगवलेला ‘स्वसन्मान’ मूळ अर्थ गमावून स्वत:च्याच प्रेमात मश्गूल होण्याकडे जातो. अशी ‘स्वयंखुषित’ मंडळी त्यांच्या स्वत:बद्दलच्या कल्पनांना आव्हान देणाऱ्या कुठल्याही माणसाला पिवळ्या (रोगट) चष्म्यातूनच बघतात. पण खराखुरा स्वसन्मान जपणारी लोकं रोजच्या आयुष्यात, जीवनात कशी असतात ते विचार करण्याजोगं आहे. जरा हे उद्गार बघूया! (कंसातील वाक्ये अर्थातच विरुद्ध मनोभूमिका सांगतात.)
० इतर लोक माझ्याविषयी काय विचार करतात किवा करतील याची मी अनावश्यक चिंता करत नाही (इतरांनी माझा आदर केला नाही तर मला माझा सन्मान कसा वाटेल?).
० मी आकर्षक दिसण्यावर माझा स्वसन्मान अवलंबून नाही (इतरांना मी आकर्षक छान दिसणं मला खूप हवंहवंसं असतं- तेच माझं टॉनिक असतं!).
० वेगळं काही करू शकलो तर मला खूप समाधानी वाटतं (स्पध्रेत इतरांना मागे टाकल्याखेरीज मी काही मिळवलं असं मला वाटत नाही.).
० मी शाळेत/ कॉलेजात किती मार्क मिळवले याचा माझ्या आत्मविश्वासाशी काय संबंध? (मला जर चांगले मार्क पडले नाहीत तर माझ्या जगण्याला काही अर्थच नाही.)
० माझ्या घरच्यांबरोबर माझं नातं चांगलं असणं किंवा नसणं यामुळे माझ्या स्वत:वरच्या विश्वासावर परिणाम होत नाही (जेव्हा माझ्या कुटुंबीयांना माझा अभिमान वाटेल तेव्हाच माझ्या कर्तृत्वाची मला खात्री होईल.).
० परमेश्वराचं प्रेम असलं की भरून पावलं! (देवाची अवकृपा असेल तर मी कसा मोठा होणार?)
या सगळ्या विचारांमध्ये जिथे जिथे स्वसन्मानासाठी दुसऱ्या कशावर तरी अवलंबित्व आहे, तिथे तिथे समस्या निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त आहे. मात्र ज्यांचा स्वत:वरचा (वाजवी) विश्वास फार हळवा नाही, पण तथ्यांवर भक्कम आधारलेला आहे अशा व्यक्ती स्वत:च्या मन:स्वास्थ्याची जपणूक दीर्घ काळ करू शकतात.
स्वभावातील मोकळेपणा, अनुभवांसाठीचा खुलेपणा, आवश्यक तिथे तडजोडींची तयारी, किमान शिस्तप्रियता आणि भावनांच्या हेलकाव्यांवरचं नियंत्रण ही पाच अशी खास गुणसुमनं आहेत की जी आपला स्वत:वर विश्वास तर वाढवतातच पण इतरांनाही आपल्याकडे नि:शंकपणे मदत मागावीशी वाटते. यातला काही भाग अनुवंशाची देणगी असेलही पण बहुतेक भाग हा स्वप्रयत्नांवर, ठेचा खात शिकण्यावर आणि स्वत:च्याच परखड परीक्षणांवर अवलंबून आहे.
कोण्या कवीनं फार सुंदर शब्दांत म्हटलं आहे, ‘जरी असेल ठरले देवत्वाप्रत जाणे, जरी असेल अमुचे रूपही ओंगळवाणे, सोसून टाकीचे घाव बदलवू जिणे-प्रयत्ने जीवन का न होई तेजाळ?’
‘मग करायची ना सुरुवात?’
डॉ. अनघा लवळेकर – anagha.lavalekar@jnanaprabodhini.org 

Life’s most persistent and urgent question is, ‘What are you doing
for others?’
– Martin Luther King, Jr.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल

The truth is you don’t know what is going to happen tomorrow. Life is a crazy ride, and nothing isguaranteed.
– Eminem