ch11करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्या उच्चशिक्षित, व्यावसायिक तरुणींची वाढती संख्या पाहून त्यांच्यासाठी ‘शी रोझ डॉट इन’ हे व्यासपीठ तयार करून त्यांचे मानसिक व आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या दिल्लीतील सैरी चहलविषयी..

मुलींना शिक्षण देण्याविषयीची जनजागृती झाल्याने दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर आपल्या देशातून महिला-मुली पदवीधर होत आहेत. पण त्यातल्या ४६ टक्के मुली करिअरच्या मध्यावधीत नोकऱ्यांमधून ब्रेक घेताहेत, काही परततात तर बहुतांशी पुन्हा करिअरकडे वळतच नाहीत. म्हणूनच तर वरिष्ठ पातळीवरील उच्चपदांवर फक्त ५ टक्के स्त्रिया आहेत. दरडोई उत्पन्नाप्रमाणे मोजल्या जाणाऱ्या एकूण कामाच्या उत्पादकतेमध्ये (जीडीपी वर्कफोर्स) स्त्रियांचे योगदान आहे फक्त १७ टक्के. ही आकडेवारी अस्वस्थ करणारी नाही का? निश्चितच आहे. हेच जाणून दिल्लीच्या सरी चहल या तरुणीने शक्कल लढवली व अध्र्यात करिअर सोडणाऱ्या हजारो जणींना आशेचा किरण दाखवला.
आजही अनेक उच्चशिक्षित मुलींना लग्नानंतर नवराही त्याच क्षेत्रातला असूनही वा सासरचे सुशिक्षित असूनही नोकरी-करिअर वा कुटुंब यांच्यातला एक पर्याय निवडावा लागतोय. पुढे एखादं मूल झाल्यावर तर अपरिहार्य म्हणून अनेक उच्चशिक्षित, हुशार तरुणी आपलं करिअर अर्धवट सोडत आहेत. काही जणी घरून काम करण्याचा पर्याय देणाऱ्या कंपन्या निवडतात, काही जणी अर्धवेळ नोकरीकडे वळतात. पण या संधी मिळणंही तितकं सोपं नाही. मग अनेकींना चक्क काही वर्षांचा ब्रेक घ्यावा लागतो. यात फक्त स्त्रियांचे नुकसान होते अशातला भाग नाही, तर कंपन्यांनाही हुशार, मेहनती, कुशल कर्मचाऱ्यांना मुकावे लागते. हेच जाणून सरी चहल हिने जानेवारी २०१४ मध्ये ‘शी रोझ डॉट इन’ Sheroes.in ची स्थापना केली.करिअरिस्ट स्त्रियांचे व्यासपीठ तयार करणे व त्यांना योग्य मार्गदर्शक व संसाधने उपलब्ध करून देणे व घरून काम करता येण्याचे (वर्क फ्रॉम होम) अनेक पर्याय तयार करणे अशा प्रमुख उद्दिष्टांसह तिने कामाला सुरुवात केली. करिअर व कुटुंब यांच्यातला समतोल निवडून काम करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी तिने नव्या संधी निर्माण केल्या.

यापूर्वी तिने ‘फ्लेक्सीमॉम्स’ हे ऑनलाइन व्यासपीठ तयार केलं होतं. त्यात कामाच्या वेळा ऐच्छिक केल्यानंतर पुन्हा क्षेत्राकडे वळणाऱ्या, तरुण व्यावसायिक मातांची मोट तिने बांधली होती. सरी सांगते, ‘याच वेळी माझ्या लक्षात आले की करिअरमध्ये वरवर प्रगती करणाऱ्या स्त्रियां-मुलींचा पीअर ग्रुप कमी होत जातो. त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या यांच्यातून मार्ग कसा काढायचा याविषयी त्यांना नेमके मार्गदर्शन मिळू शकत नाही. म्हणूनच अशा महिलांसाठी मदतीचा हात म्हणून मी ‘शी रोझ डॉट इन’ हे पुढचं पाऊल उचललं. या नव्या उपक्रमाद्वारे तिने कॅम्पसमध्ये अनेक कार्यक्रम केले. काही अहवाल प्रसिद्ध केले आणि ‘शी रोझ डॉट इन’चे व्यासपीठ इतरत्रही तयार व्हावं म्हणून प्रयत्न केले. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे तिचं काम सुरू आहे. अल्पावधीतच तिला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ११०० ठिकाणी त्यांचं व्यासपीठ तयार झालं. आता या सर्व केंद्रांवरच्या स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी तिने ‘शी रोझ परिषद’ घेतली.
त्यात महिलांना कामाच्या ठिकाणी भेडसावणाऱ्या मुद्दय़ांवर चर्चा केली. अनेक चर्चासत्रे ठेवली. तज्ज्ञांची भाषणे झाली आणि जवळपास दहा हजार तरुणींना या माध्यमातून पुन्हा क्षेत्राकडे वळवण्यात तिला यश आलं. यात मुक्तलेखक, कॉर्पोरेट कर्मचारी, आंत्रप्रनर्स अशा विविधांगी क्षेत्रातील तरुणी/ महिला होत्या. पहिल्याच परिषदेनंतर आलेलं यश पाहून तिचा उत्साह दुणावला. आता ‘शी रोझ’च्या नियमित कार्यशाळा, जॉब फेअर घेतल्या जातात. आतापर्यंत तीन लाख महिला-मुली तिच्या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.
थोडक्यात अनेक नामांकित कंपन्या व अवेळी करिअरपासून दूर गेलेल्या मुली-स्त्रिया यांच्यातली दरी सांधण्याचं अचूक काम सैरीनं केलं आहे. म्हणूनच तर हजारांहून अधिक कंपन्याही तिच्या या उपक्रमांतून चांगले कर्मचारी निवडण्याला प्राधान्य देत आहेत. उदा.- क्लिअर टॅक्स, या सरकारच्या आयकर विभागाशी संलग्न असणाऱ्या कंपनीने त्यांच्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी शी रोजच्या मदतीने सीए असणाऱ्या, वित्त क्षेत्राशी संबंधित असलेल्या मुली निवडल्या व ग्राहकांना उत्तम सेवा दिली. प्रिन्सिपल अ‍ॅडव्हायजर व हनीवेल या कंपन्यांनीही तिच्या कंपनीमार्फतच कर्मचारी भरती केली. अर्थातच तिच्या या उपक्रमात अनेक स्त्रिया सहभागी आहेत, पण काही पुरुषही आहेत. अभियंते, डिजिटल मार्केटिंग अशा जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत. सैरीने नोंदवलेली निरीक्षणंही महत्त्वाची आहेत- ती म्हणते आपल्या देशातला मध्यम वर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढतो आहे. या वर्गाचा शैक्षणिक स्तर वाढतो आहे. शाळा-कॉलेजेस, कंपन्यांमधील कारकीर्द या ठिकाणी मुली, मुलांच्या तुलनेत सरस ठरत आहेत. पण तरुणींवर सामाजिक दबाव फार मोठा आहे.
घरगुती -कौटुंबिक जबाबदाऱ्या- कर्तव्ये, नातेवाईक, सणवार एक ना अनेक गोष्टींचा शेवट त्यांच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालण्यात होतो आहे. या जबाबदाऱ्यांच्या ताणातून, ब्रेकनंतर पुन्हा करिअरमध्ये येताना जे अडथळे जाणवतात, त्यांच्यातून बाहेर काढायचं होतं म्हणूनच हा खटाटोप केला.’
सैरीचा उपक्रम नेमकं करतो तरी काय? सर्वात आधी तरुणींना आश्वस्त करतो की अजुनही नोकरीच्या संधी आहेत, त्यानंतर त्यांचा ‘जॉब बोर्ड’ नोकरीच्या संधी, अनेक लहान-मोठय़ा कंपन्यांमधील जागाभरती यांची माहिती देत राहतो. यातील ८० टक्के संधी या वेळेबाबत ‘फ्लेक्सीबल’ असतात. मूलभूत पगार आणि कामाची सोयीस्कर वेळ याची हमी देणाऱ्या संधी इच्छुकांपर्यंत पोहोचवल्या जातात. संधीच्या शोधात असेपर्यंत अगदी बायोडेटा लिहण्यापासून, वैयक्तिक मार्गदर्शन करण्यापर्यंत ते विविध विषयांवरील चर्चासत्रे भरवण्यापर्यंतचे कार्यक्रम पार पाडतात. थोडक्यात घराबाहेर पडण्याचा आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी त्यांचा उपक्रम सर्वतोपरी मदत करतो. एखादीचा करिअरच बदलण्याचा विचार असेल तर तसे मार्गदर्शनही त्यांच्यामार्फत दिले जाते.
हा सगळा व्याप सांभाळण्यासाठी अर्थातच पैशांची गरज आहे. मात्र ना नफा-तोटय़ावर मदत मिळते ती कंपन्यांकडून कमिशनच्या रूपात, नाममात्र रक्कम संस्थेत नाव नोंदवणाऱ्यांकडून तर वैयक्तिक मार्गदर्शन घेणाऱ्यांकडून. सैरी तिच्या संपूर्ण कुटुंबातली नोकरी करणारी पहिली स्त्री होती. म्हणूनच सात वर्षांपूर्वी ती आई झाली, त्या वेळी अनेक मदतीचे हात तिच्यासाठी धावून आले. त्या वेळी त्या सहकार्याचं, पाठिंब्याचं महत्त्व तिच्या लक्षात आलं. मात्र, असा पाठिंबा इतक्या सहजासहजी समाजातील इतर तरुणींना मिळत नसल्याचंही तिला जाणवलं. म्हणूनच असे मदतीचे हात इतर तरुणींसाठी तयार करावेत, हा ध्यास तिने घेतला. ती स्वत: वेळेबाबत कडक नियम नसणाऱ्या संधी देत करिअरमध्ये स्थिरावलीय. २०११ साली अवघ्या २२ कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी देऊ शकणारी तिची ‘फ्लेक्सीमॉम’ ही कंपनी आज ६०० कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू शकली आहे. नवी दिल्लीपाठोपाठ बेंगळुरू, मुंबई, पुणे या ठिकाणी कंपनीचं जाळं पसरत गेलं आहे.‘फ्लेक्सीमॉम्स’चं काम अक्षरश: मातांसाठी हेल्पलाइनच्या स्वरूपात सुरू झालं. पण फ्लेक्सीमॉम्स व ‘शी रोझ डॉट इन’ या दोन्ही व्यासपीठांमुळे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांसाठी नोकरीच्या संधी देणारं प्लेसमेंट अशा स्वरूपापर्यंत आम्ही येऊन पोहोचल्याचं सैरी सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लेक्सीबल वेळेत असणारं कामही पूर्णवेळ कामाइतकं महत्त्वाचं, प्रतिष्ठेचं असू शकतं, हा विश्वास त्यांना निर्माण करता आला. सैरीचे हे दोन्ही उपक्रम आज अत्यंत महत्त्वाची, मोलाची भूमिका बजावत आहेत, कारण स्त्री-पुरुष समानतेचं, कार्यक्षेत्राबाबतचं नवं क्षितिज गाठण्यासाठीची ही धडपड आहे. म्हणूनच तर ‘मोस्ट पॉवरफुल वुमन इन इंडियन बिझनेस २०१२’, टेड स्पीकर आणि कार्टीअर वुमन्स अ‍ॅवॉर्ड इनिशिएटिव्ह २०१२ची अंतिम फेरी उमेदवार’ अशा अनेक मानसन्मानांद्वारे तिच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.
भारती भावसार