ch17रुग्णसेवेचा समृद्ध वारसा घेऊन गेली चार दशके मी रुग्णसेवेचे आणि अध्यापनाचे  देशात-परदेशात काम करतो आहे. त्यातून अनेक विद्यार्थी घडवता आले. असंख्य रुग्णांशी माझ्या ऋणानुबंधाच्या गाठी बांधल्या गेल्या. वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याच्या कामात महत्त्वाचे योगदान देता आले. वैद्यक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करता आले,  त्याचबरोबर ट्रेकिंग, फोटोग्राफीचा छंदही जोपासता आला. समृद्ध आयुष्य जगतानाचा रुग्णसेवेचा हा अमृतानुभव माझ्याबरोबर आता चिरंतन राहणार आहे.

वैद्यकीय व्यवसाय हा मी एक पवित्र व्यवसाय मानतो. रुग्णोपचारासाठीची भावी पिढी घडविणे आणि रुग्णोपचार करण्याचा आनंद काही वेगळाच, तो मी मनापासून अनुभवतो आहे. इतका की ‘केईएम’ रुग्णालय हे आता माझे दुसरे घर झाले आहे. वैद्यकीय विद्यार्थीच नव्हे, तर येथे येणाऱ्या असंख्य रुग्णांशी माझ्या ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्या आहेत. पंधरा वर्षांपूर्वीपासून मी शस्त्रक्रिया केलेले अनेक रुग्ण आजही माझ्या संपर्कात आहेत. खासगी व्यवसायात असतो तर हे चित्र दिसले असते? वैद्यकीय अर्थकारणामागे धावण्याऐवजी सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करण्यातला आनंद मी उपभोगला.. आजही उपभोगतो आहे..
वैद्यकीय क्षेत्रातील गुरुजनांकडूनच हा समृद्ध वारसा मला मिळाला. हा वारसा जपल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय शिक्षणात भरीव कामगिरी करता आली. डॉ. रवी बापट यांच्यासारखे शिक्षक लाभल्यानंतर सामाजिक बांधीलकीचे व्रत जपले जाणारच होते. डॉ. बापटसर, डॉ. सम्सी यांच्यासारखे रुग्णसेवेचे असिधाराव्रत जपणारे शिक्षक आम्हाला लाभले हे आमचे भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्यामुळेच ज्ञानदान व रुग्णसेवेतील अमृतानंदात बुडण्यास शिकलो. मला आजही असे रुग्ण आठवतात त्यांच्यावरच्या उपचारांमुळे त्यांना नवीन आयुष्य मिळाले. पालघरच्या एका गरीब आदिवासी मुलीला पित्तनलिकेचा फुगा (सिस्ट) झाला होता. जर तिचे पोट उघडून शस्त्रक्रिया केली असती तर तिचे लग्न होण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या. दुर्बिणीतून तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे पोटावर त्याच्या काही खुणा उमटल्या नाहीत आणि त्यामुळे तिच्या लग्नात काहीच अडचण आली नाही. जेव्हा लग्न करून ती पेढे घेऊन आली, त्या वेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खासगी रुग्णालयात लाखभर रुपये घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेनंतरही पाहायला मिळाला नसता. अर्थात हा ज्याच्या त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे. अशा आणखीही काही घटना सांगता येतील. एक १६ वर्षांचा एक मुलगा माझ्याकडे आला. चाचणीत (एक्स-रे, सीटी स्कॅन)मध्ये त्याच्या पोटात सांगाडय़ासारखे काही तरी दिसत होते. एक मोठा गोळाही दिसत होता. शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या पोटात ‘बाळ’ सापडले. अशा गोष्टी घडतात; परंतु दुर्मीळ स्वरूपाच्या असतात. या शस्त्रक्रियेला ‘फिट्स इन फिटू’ असे म्हणतात. सोळा वर्षांच्या मुलाच्या पोटात बाळ सापडल्याच्या बातम्या त्या वेळी ‘बीबीसी’नेही दिल्या होत्या.
मुलामुलींवर आम्ही शस्त्रक्रिया करतो, उपचार करतो आणि नंतर त्या त्यांच्या मुलांना घेऊन आमच्याकडे उपचाराला येतात अशा घटना तर किती तरी. २०१० मध्ये गॅस्ट्रोएट्रिक सर्जरी विभागात यकृतरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. देशातील सार्वजनिक रुग्णालयातील ही पहिली यकृतरोपण शस्त्रक्रिया होती. आयटी क्षेत्रातील एका २९ वर्षांच्या तरुणाला त्याच्या साठीच्या वडिलांनी आपले यकृत दिले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तो आनंद काही वेगळाच होता.
तसा मी मध्यमवर्गीय कुटुंबातला. वडील शासकीय सेवेत सहसचिव होते. जन्म नागपूरचा. पुढे वडिलांच्या नोकरीमुळे वांद्रे येथील शासकीय वसाहतीत राहात होतो. सुरुवातीला महापालिकेच्या शाळेत शिक्षण झाले. पुढे सातवीमध्ये विलेपार्ले येथील पार्ले टिळक महाविद्यालयात प्रवेश घेतला. या शाळेने मला घडविले. स्पर्धेला सामोरे जाण्यापासून सर्वागीण विकासात पार्ले टिळक विद्यालयाचे मोठे योगदान होते. तेव्हा मुख्याध्यापक नि. र. सहस्रबुद्धे आणि वाटवेबाईंमुळे विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडल्या. मीही त्यातलाच एक. गणित हा माझा आवडीचा विषय. त्या विषयात कायम पैकीच्या पैकी मार्क मिळायचे. १९७२ मध्ये उच्च गणितात प्रथम आल्याबद्दल टिळक पुरस्कार मिळाला होता, तोही अटलबिहारी वायपेयी यांच्या हस्ते! गणित चांगले असल्यामुळे मी अभियांत्रिकीक डे जाईन असा सर्वाचा होरा होता; तथापि माझे मामा डॉ. दामोदर कोलते, ते मिरज मेडिकल कॉलेजचे तेव्हा अधिष्ठाते होते, तर मामेबहिणीही डॉक्टर होत्या. डॉक्टरांना  मिळणारा मान तसेच रुग्णसेवा यांचे मला आकर्षण होते. त्या वेळी आयआयटी, मरिन इंजिनीयरिंगसह आठ अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिल्या. त्या आठही प्रवेश परीक्षेत पहिल्या पाचात आल्यामुळे मला कोठेही प्रवेश मिळू शकत होता; पण मी केईएम व जीएस वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते वर्ष होतं, १९७४.
केईएमचा अधिष्ठाता म्हणून आज काम करण्यामागे गुरुजनांची प्रेरणा आणि सामाजिक बांधीलकीचा घरच्यांचा वारसा कारणीभूत आहे. आमचे कुटुंब वारकरी संप्रदाय मानणारे. हरिपाठ, ज्ञानेश्वरीचे वाचन नियमित होत असे. यातूनच नकळत सेवाभाव रुजला. वैद्यकीय शिक्षणाच्या काळात अनेक चांगले मित्र मिळाले. सध्याचे टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे व मी एमबीबीएसपासून एकत्र होतो. एमएस केल्यानंतर केईएममध्येच कामाला सुरुवात केली. आठ वर्षांतच प्राध्यापक बनलो. शासकीय सेवेच्या चौकटीत राहूनही जगभर फिरता आले. अनेक देशांमध्ये शिक्षण घेऊ शकलो. फेलोशिप मिळाल्या तसेच तेथील विद्यार्थ्यांना शिकवू शकलो.
वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याच्या कामात महत्त्वाचे योगदान देता आले. पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या जबाबदारीसह संपूर्ण आशियामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील ‘लीडरशिप’ विकसित करण्याची अमेरिकेतील ‘फेमर’ संघटनेने सोपविलेली जबाबदारी पार पाडू शकलो. जवळपास अडीचशेहून अधिक संशोधन प्रबंध जगभरात प्रकाशित होऊ शकले. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. इंग्लंडमधील ‘मेडिकल एज्युकेशन’ या मासिकाच्या संपादकीय मंडळावर काम केले तसेच ‘दि क्लिनिकल टीचर’ या आंतरराष्ट्रीय मासिकाचे संपादकपदही भूषविले.
‘केईएम’ने मला कायमच भरभरून दिले आहे. आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलच्या संपादकीय मंडळात अथवा संपादक म्हणून काम करताना सुरुवातीला पाश्चात्त्य मंडळी आपल्याला किती स्वीकारतील असा संभ्रम होता; तथापि तुमची गुणवत्ता व ज्ञानाला तेथे संपूर्ण वाव असतो. एवढेच नव्हे तर तुमच्या मतांचा आदर केला जातो असा माझा अनुभव आहे. मी संपादित तसेच मंजूर केलेल्या लेखांबाबत कोणीही कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनात्मक नियतकालिकांमध्ये काम करताना निखळ गुणवत्तेचा कायमच आदर होत असल्याचे दिसले.
केईएम रुग्णालयात स्वतंत्र जठरांत्र शल्यचिकित्सा (गॅस्ट्रोएंट्रिक सर्जरी) विभाग निर्माण करावा, अशी डॉ. रवी बापट सरांची इच्छा होती. ते स्वप्न २००३ साली साकार करू शकलो. तेव्हा आम्हाला केवळ एक हॉल देण्यात आला होता. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सीताराम कुंटे यांना विभागाची गरज व महत्त्व सांगताच त्यांनी तात्काळ दोन कोटी रुपये मंजूर केले. यातून अत्याधुनिक उपकरणे व यंत्रसामग्री घेतली. तुम्हाला खरेच चांगले काही करायचे असेल समाजातील अनेक दानशूर पुढे येतात हा माझा अनुभव आहे. पोटाच्या विकारावरील उपचारासाठीच्या या विभागासाठी नरोत्तम सक्सेरिया ट्रस्ट व संयोग ट्रस्ट यांनी तेव्हा भरीव मदत दिली. यातूनच तेव्हा दुर्बीण शस्त्रक्रियेच्या अनेक कार्यशाळा घेऊन महाराष्ट्रात अनेक डॉक्टरांना या शस्त्रक्रियेत पारंगत करता आले. लातूर, नांदेडसह अनेक छोटय़ा शहरांतील शल्यविशारदांना या शस्त्रक्रियाचे प्रशिक्षण दिल्यामुळे ग्रामीण भागात दुर्बीण शस्त्रक्रिया होऊन त्याचा फायदा रुग्णांना मोठय़ा प्रमाणात झाला. इंडोस्कोपिक सर्जरी, लॉप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेत अनेकांना पारंगत केले. २००१ मध्ये यकृत, स्वादुपिंड तसेच पित्ताशय शस्त्रक्रिया फारशा यशस्वी होत नसत. तेव्हा डॉ. जगन्नाथन यांच्यासह काही डॉक्टरांनी एक संस्था स्थापन करून काश्मीरपासून थेट चेन्नईपर्यंत या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात याबाबत डॉक्टरांच्या अनेक कार्यशाळा घेतल्या. २००८ मध्ये स्वादुपिंड, यकृत व पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया व संशोधनावर  जगभरातील १६०० डॉक्टरांची  एक परिषद मुंबईत आयोजित केली. त्या परिषदेच्या आयोजनानंतर उरलेल्या पैशामधून एक संस्था स्थापन केली व त्याच्या माध्यमातून आजही संशोधन, मार्गदर्शनाचे काम सुरू आहे.
देशात दरवर्षी २५ हजार लोकांना स्वादुपिंडाचा कर्करोग होत असतो. यातील २० हजार लोकांचा कर्करोग पुढच्या स्थितीला गेल्यानंतर कळतो. २००१ पर्यंत वर्षांकाठी केवळ शंभर शस्त्रक्रिया होत असत. मात्र गेल्या दशकात आम्ही केलेल्या कामातून दरवर्षी सुमारे दोन हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. केईएममधील गेल्या चार दशकांच्या वाटचालीत चार हजार डॉक्टरांना घडवता आले. अनेक डॉक्टरांना अक्षरश: हाताला धरून शस्त्रक्रिया करायला शिकवले आहे. गेल्या चार तपांच्या अध्यापनात देशा-विदेशातील अनेक विद्यार्थी घडवता आले. त्यातील काही अस्सल हिरे होते. त्यांना केवळ पैलू पाडण्याचे व योग्य कोंदण शोधून देण्याचेच काम होते. अनेक गरीब परंतु हुशार मुलांनी केईएममधून शिक्षण घेतले आहे. त्यातील अनेकांच्या फी भरण्याचे कामही अध्यापक व अन्य विद्यार्थ्यांनी मिळून केले आहे. आशुतोष सिंग याचे उदाहरण मुद्दामहून सांगण्यासारखे आहे. त्याचे वडील शिक्षक होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. केईएममध्ये एमबीबीएस, एमएस तसेच एमसीएचपर्यंतच्या शिक्षणात अनेक सुवर्णपदके त्याने मिळवली. पुढे ब्रिस्बेनला जाऊन हृदय शस्त्रक्रियेचे शिक्षण पूर्ण केले. खरे तर त्याला परदेशात सुखाने राहाता आले असते; परंतु तो भारतात परत आला, एवढेच नव्हे तर सामाजिक बांधीलकी मानून वाडा-मोखाडा येथील आदिवासी भागात जाऊन तेथील हृद्रुग्णांची तपासणी केली.  जवळपास तीनशे रुग्णांच्या तपासणीतून ५७ आदिवासींना शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्याला दिसून आले. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतून डॉ. आशुतोष सिंग याने या सर्वाची मोफत शस्त्रक्रिया केली. असे विद्यार्थी खरंच समाधान देऊन जातात.
‘जागतिक आरोग्य संघटने’ने आशियातील देशांसाठी त्यांच्या गरजांनुसार वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्याची भूमिका मांडली. त्यातून ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने’ अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी ‘केईएम’वर सोपवली होती. त्याचप्रमाणे ‘एमयूएचएस’चा संचालक असताना वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला गेला. माझ्या वाटचालीत अमेरिकेतील ‘फेमर’ संस्थेचे महत्त्व मोठे आहे. वैद्यकीय क्षेत्रात लीडरशिप विकसित करण्याचे काम ही संस्था करते. २००२ मध्ये जगभरातून ११ डॉक्टरांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली होती. भारतातून माझी निवड झाली. आमच्याबरोबर पाकिस्तानमधील एक डॉक्टर होते. जागतिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करताना देशांच्या सीमा कधी पार होतात ते कळतही नाही. त्या पाकिस्तानी डॉक्टरबरोबर माझी गट्टी जमली होती. पुढे ‘फेमर’चा उपक्रम आशियात राबविण्याची जबाबदारी माझ्यापर सोपविण्यात आली. भारतात तो कितपत यशस्वी होईल याबाबत मी साशंक होतो. तथापि त्या त्या देशांतील वैद्यकीय परिस्थितीनुरूप अभ्यासक्रमात आवश्यक बदल केल्यामुळे चीन, बांगलादेश, दक्षिण कोरियासह भारतात या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना केवळ लेक्चर नको असतात तर त्यांना व्यावहारिक प्रशिक्षणही हवे असते हे लक्षात घेऊन ‘फेमर’ तसेच ‘एमसीआय’च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्यात यश आले.  प्रथम मुंबई, लुधियाना व कोइम्बतूर येथे तीन संस्था स्थापन करून वैद्यकीय संशोधन व प्रशिक्षणासह नेतृत्व विकासाचा कार्यक्रम राबविला. पुढे ‘मडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने सोपविलेल्या फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या जबाबदारीतून वैद्यकीय शिक्षणासाठी ३६० कार्यशाळा देशभरात घेतल्या व वीस हजार डॉक्टरांना प्रशिक्षित केले.
शीव रुग्णालयाचा अधिष्ठाता म्हणूनही चांगले काम करता आले. शीवमधील सर्वच डॉक्टरांनीही रुग्णालयाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे शीव रुग्णालयात असताना थॅलेसेमिया, एचआयव्ही, जनरल सर्जरी, पेडियाट्रिक, हिमोफेलिया विभागांचे नव्याने काम सुरू करता आले. शीव रुग्णालयाचा विकास करणे ही काळाची गरज आहे. येथे वर्षांकाठी काही हजार अपघाताचे रुग्ण येत असतात. रुग्णालयाचा पसारा वाढत चालला आहे. वेगवेगळे विभाग एकीकडे निर्माण होत आहेत तर दुसरीकडे जागा अपुरी पडत आहे. मुख्य इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या विस्ताराची योजना तयार केली असून येत्या काही वर्षांत शीव रुग्णालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदललेला दिसेल.
२०१० मध्ये ‘एमसीआय’ बरखास्त करण्यात आली. तथापि डॉ. सरीन यांच्यासारखी चांगली मंडळी तेथे होती. ‘व्हिजन २०१५’ ही संकल्पना तेव्हा तयार केली. त्यातून नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम तयार केला. फाऊंडेशन कोर्ससह वैद्यकीय ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षा लक्षात घेऊन डॉक्टरांसाठी अ‍ॅटिटय़ूड अ‍ॅण्ड कम्युनिकेशन मोडय़ूलसह काही  उपक्रम अभ्यासक्रमात आणले. जनरल सर्जरी बोर्डाचा अध्यक्ष असताना वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामाची दखल घेऊन तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
केईएम व जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये काम करत असल्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये शिकविण्याचीही संधी मिळाली. केवळ अभ्यास एके अभ्यास यावर माझा विश्वास नाही. व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रत्येकाला एखादा छंद असला पाहिजे, असे मला वाटते. ट्रेकिंगची आवड मला पहिल्यापासून होती. आजपर्यंत २६ वेळा हिमालयात ट्रेकिंगसाठी गेलो असून अनेकदा विद्यार्थ्यांनाही घेऊन गेलो. १९९५ साली कैलास मानसरोवरला गेलो होतो. बरोबर अनेक सनदी अधिकारी तसेच डॉक्टर होते. त्या परिसरातील गावात जाऊन रुग्णांची तपासणीही केली होती. मन:शांतीचा वेगळाच अनुभव त्या ठिकाणी अनुभवला. तसे पाहिले तर १९७९ पासून काश्मीरपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांत विद्यार्थ्यांना घेऊन ट्रेकिंगसाठी गेलो आहे. एकदा काश्मीरला विद्यार्थ्यांसह गेलो असता रस्ता चुकला होता. मुंबईतील प्रथितयश वृत्तपत्रात केईएमचे सोळा विद्यार्थी काश्म्ीारमध्ये हरवल्याच्या बातम्याही त्या वेळी आल्या होत्या. पुढे सरकारी यंत्रणेने आम्हाला शोधून काढले.
काश्मीर हे खऱ्या अर्थाने भूतलावरील नंदनवन आहे. निसर्गाचे असे सौंदर्य केवळ काश्मीर व हिमालयातच अनुभवयाला मिळते. राजस्थान, व्हॅली ऑफ फ्लॉवरसह देशातील अनेक ठिकाणी केईएममधील विद्यार्थ्यांबरोबर गेलो. यातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होण्यास निश्चितच मदत होते. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी होते. पुढच्या आयुष्यात ही मुले रडत राहणार नाहीत हे निश्चित. चांगला डॉक्टर हा चांगला माणूस असलाच पाहिजे, असे मला वाटते.
फोटोग्राफीचाही छंद मला आहे. फोटोग्राफीतही मी चांगले काम करू शकलो, कारण डॉ. रवी बापट सरांनी केलेले सहकार्य. त्यांनी स्वत: कॅमेऱ्यात रोल भरून मला दिला होता. गोपाळ बोधे व अधिक शिरोडकर यांनीही त्यांचे कॅमेरे मला वापरायला दिले एवढेच नव्हे तर फोटोग्राफीतील बारकावे समजावून सांगितले. बऱ्याच वर्षांपूर्वी फोटोग्राफीसाठी म्हैसूरच्या बंदीपूर येथे गेलो होतो. चित्रपट अभिनेत्री वहिदा रहेमान तसेच दक्षिणेतील अनेक नामांकित अभिनेते व अभिनेत्री या त्या वेळी आमच्याबरोबर फोटोग्राफीसाठी आले होते. आफ्रिकेत उघडय़ा जीपच्या बोनेटवर बसून तत्कालीन अर्थमंत्री    महादेव शिवणकर व मी वाघ-सिंहांसह अनेक प्राण्यांचे मनमुराद चित्रण केले. शिवणकर हे उत्तम छायाचित्रकार व त्यांची छायाचित्रणाची जाणही उत्तम. डेंटल फोटोग्राफी व मेडिकल फोटोग्राफी हे अभ्यासाचे वेगळे विषय आहेत. फोटोग्राफीच्या वेगवेगळ्या शाखांचा मी अभ्यास केला असून अनेक ठिकाणी या विषयावर माझी व्याख्यानेही झाली आहेत. फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचे २०१२ सालचे सन्माननीय सदस्यत्वही मला मिळाले आहे. भरतपूरच्या जंगलात सकाळी सहा ते बारापर्यंत आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळात भरपूर फोटो काढायचो आणि दुपारच्या वेळात अभ्यासही करायचो. अंटाक्र्टिकाला जाण्याचे माझे स्वप्न आहे. कधी योग येईल ते पाहायचं.
केईएम रुग्णालय सर्वानाच देत आले आहे. विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना आणि रुग्णांना. गेली अनेक वर्षे केवळ देण्याचेच काम ते करत आहे. तुमच्या विकासाला सर्वार्थाने चालना देणारी संस्था आहे. लोकांना-रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना काय देता येईल याचाच विचार केला पाहिजे. घडय़ाळाच्या काटय़ाकडे पाहून काम करणारा चांगला डॉक्टर होऊ शकत नाही. रुग्णसेवा हाच डॉक्टरसाठी आनंद वाटला पाहिजे. मला किती पैसे मिळतात यापेक्षा मी किती रुग्णांवर उपचार करू शकतो हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असून परमेश्वराने मला काहीही कमी पडू दिले नाही. माझी पत्नी डॉक्टर आहे. मुलगीही शीव रुग्णालयात डॉक्टर असून शिष्यवृत्तीवर तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. वैद्यकीय व्यवसायात काही अनिष्ट प्रवृत्ती शिरल्या आहेत. त्या नष्ट होणे गरजेचे असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सर्वाचाच सहभाग आवश्यक आहे. परवडणारी वैद्यकीय सुविधा निर्माण करणे, अनाठायी औषधोपचार व शस्त्रक्रिया बंद होणे गरजेचे आहे. कट प्रॅक्टिसवर काट मारणे गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षणात कराल तेवढे काम थोडे असून डॉक्टरांमध्ये सेवाभाव निर्माण करण्याचे आव्हान वैद्यकीय शिक्षणासमोर आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा, मानणारे अध्यपक मला लाभले. हा समृद्ध वारसा घेऊन गेली चार दशके मी अध्यापनाचे काम करत आहे.
तरुण डॉक्टरांनी पैशाच्या मागे न धावता रुग्णसेवेला आपले मानले पाहिजे. यासाठी शिक्षण पद्धतीत आवश्यक बदल होणे गरजेचे आहे. एक-दोन कोटी रुपये देऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी डॉक्टर बनल्यानंतर सामाजिक बांधीलकी कशी मानणार? वैद्यकीय शिक्षणातील दुकानदारीला निर्दयीपणे आळा
घालण्याची गरज आहे. त्यासाठी प्रबळ इच्छशक्तीची गरज असून राजकीय व्यक्ती ती दाखवणार का, हा प्रश्न आहे.
डॉ. अविनाश सुपे – avisupe@gmail.com
(शब्दांकन- संदीप आचार्य)