चिकित्सेची खोली, शस्त्रक्रियागृह, सकाळ-संध्याकाळचा राउण्ड एवढय़ाच काळापुरता फक्त डॉक्टर रुग्णाजवळ असतो, तर बाकी सर्ववेळ या सिस्टर्सच त्याला प्रत्येक गोष्ट हवी-नको विचारत असतात. हे करताना कधी कधी नातेवाईकही करणार नाहीत एवढी आपुलकी व दक्षता त्यांच्या कामात दिसते. नुकत्याच झालेल्या जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आमच्या या लेकींचा हा अल्प परिचय.
प रवा माझ्या रुग्णालयात राउण्ड घेताना मला सिस्टर्सनी सांगितलं, ‘‘मॅडम, आज दुपारी आपल्याकडे एक आजी अ‍ॅडमिट झाली आहे. तिची लघवी तुंबल्यामुळे आम्ही नळी घातली आहे, पण तिला तुम्ही सर्वात आधी तपासाल का; ती आल्यापासून तुमची आणि आपल्या निर्मला सिस्टरची वाट पाहात आहे.’’ मी जाऊन पाहिलं, तर ती होती आमची वर्मा आँटी. साधारण ऐंशीच्या वयाची, अधूनमधून बाजारातून जाता-येता दमली की हॉस्पिटलमध्ये येऊन बसायची, पाणी प्यायची, आम्हा डॉक्टरांची, सिस्टरांची विचारपूस करायची आणि जायची; हा तिचा गेले पंधरा वर्षांचा शिरस्ता होता. याचं कारण म्हणजे तिचे यजमान-वर्माकाका लघवीच्या पिशवीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करून घ्यायला आमच्या रुग्णालयात आले, तेव्हा तब्बल महिनाभर दाखल झाले होते. शस्त्रक्रियेनंतरचे वीस-बावीस दिवस आम्ही अहोरात्र जागून त्यांना नळीतून लघवी येते का नाही, नळी बंद होते का हे बघायचो, मूत्राशयाच्या जागी नवीन केलेल्या आतडय़ाच्या पिशवीला सारखे धुऊन काढायचो. त्यावेळी ही आँटी सतत शेजारी असायची; त्यामुळे आमच्याशी व तेव्हापासून आमच्याकडे असलेल्या निर्मला सिस्टरशी तिचे एवढे ऋणानुबंध जुळले. मी राउण्डला गेल्यावर आजीने माझा हात हातात घेतला व मला म्हणाली, ‘‘अरे बेटी, तुझीच इतका वेळ वाट पाहात होते. तुमचे वर्माकाका गेल्या महिन्यात म्हातारपणामुळे वारले. तुम्ही त्यावेळेस ते सात-आठ र्वष जगतील असं सांगितलं होतं; पण त्यानंतर ते पंधरा र्वष जगले.’’ तिला त्यांच्या आठवणीने भरून आलं. मीदेखील त्या बातमीने हेलावले. ते बघून मग माझ्या चेहऱ्यावरून,पाठीवरून तिचे सुरकुतलेले दोन्ही हात कितीतरी वेळ फिरत राहिले. तिने माझ्या मुलांच्या शिक्षणाची चौकशी केली, त्यांना तोंडभरून आशीर्वाद दिले. पण मध्येच विचारायची, ‘‘निर्मला सिस्टर कुठे आहे?’’ माझ्याबरोबरच्या सिस्टर सांगायच्या, ‘‘आँटी ती तर रजेवर आहे.’’ पुन्हा माझा हात धरून गप्पा सुरूच. आमच्या नव्याने रुजू झालेल्या सिस्टर्सना हे आश्चर्य वाटायचं; की ही आजी आपल्या मॅडमवर एवढं प्रेम कसं करते आणि सारखी निर्मला सिस्टरची चौकशी का करते? राउण्ड संपल्यावर मी त्यांना वर्माकाकांच्या पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या अवघड शस्त्रक्रियेची व त्या वेळेस आम्ही डॉक्टरांनी व निर्मलाने अहोरात्र घेतलेल्या मेहेनतीची माहिती दिली; तेव्हा त्या पण थक्क झाल्या. पुढे दोन-तीन दिवस आँटीचा निर्मलाच्या नावाचा धोशा चालूच होता. माझी उपचारयोजना संपल्यावर मी आँटीला घरी पाठवायला सांगितलं; पण जोपर्यंत मला निर्मला भेटत नाही, तोपर्यंत मी घरी जाणार नाही; असं आजीने घोषित केलं. शेवटी पाचव्या दिवशी रजा संपवून निर्मला कामावर आली तेव्हा दोघींच्या भेटीचा एक हृद्य सोहोळा पार पडला;  जो मला अपेक्षितच होता. सर्व नवोदित सिस्टर्सना काही दिवस या घटनेचं आश्चर्य वाटत होतं.
वर्मा आँटी घरी गेली, तरी काही काळ माझ्याही डोक्यात हाच विचार घोळत होता. डॉक्टर स्वत: कितीही सुविद्य, कुशल, वाकबगार असले तरी प्रत्येक रुग्णाला त्याची शुश्रूषा करणारी सिस्टर (परिचारिका) कायम जवळची वाटते. डॉक्टरला रुग्ण देवाच्या जागी मानतात (खरं तर हे आम्हाला नको असतं); पण म्हणूनच की काय ते देवासारखेच दुष्प्राप्य वाटत असावेत आणि आजारपणात सेवा करणारी सिस्टर नावाप्रमाणेच बहिणीच्या जागी असल्याने ती जास्त जवळची, आपुलकीची वाटत असावी. साहजिकच आहे ते! डॉक्टर फक्त चिकित्सेची खोली, शस्त्रक्रियागृह, सकाळ- संध्याकाळची राउण्ड एवढय़ाच काळापुरता रुग्णाजवळ असतो, तर बाकी सर्ववेळ या सिस्टर्सच त्याला प्रत्येक गोष्ट हवी-नको विचारत असतात. रुग्णांना वेळेवर चहा, खाणंपिणं मिळतं आहे की नाही ते पाहणं, त्यांचं स्पंजिंग, शरीराची स्वच्छता, वेळप्रसंगी अन्न भरविणे; नसíगक विधी, शारीरिक वेदना, झोप या सर्व गोष्टींवर त्याच लक्ष ठेवतात. रुग्णांच्या जखमांची ड्रेसिंग करणे, एनिमा देणे, रुग्णांना कपडे घालणे, लकवा असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेणे, पहीलटकरीण आईला स्तनपान व बाळाची निगा शिकवणे; अशी अनेक कामं करताना कधी कधी नातेवाईकही करणार नाहीत एवढी आपुलकी व दक्षता त्यांच्या कामात दिसते. औषधोपचारांव्यतिरिक्त जाऊन याच मुली जेव्हा शस्त्रक्रियेला घेतलेल्या उपाशी रुग्णाच्या तणावग्रस्त नातेवाइकांना बाहेर चहापाणी विचारतात, बाळ आतमध्ये गुदमरू नये म्हणून बाळंतिणीला कळा देण्याला प्रवृत्त करतात, वृद्ध रुग्णांना वर्तमानपत्र वाचून दाखवतात, लहान बाळांना हसतखेळत, चुचकारत इंजेक्शन देतात, शस्त्रक्रियेपूर्वी व त्यानंतर रुग्णाला मानसिक आधार देतात; कधी कधी डॉक्टरांनाही कामाच्या व्यग्रतेत लक्षात न आलेली गोष्ट त्या लक्षात आणून देतात; तेव्हा आपण थक्क होऊन जातो.
आमच्याकडे मुंबईच्या उपनगरात काय किंवा महाराष्ट्रातील खेडोपाडी काय, नìसग पदवीधारक सिस्टर मिळणं दुरापास्त असतं. जेवढय़ा मिळतात, त्या संख्येने अपुऱ्या असतात. त्यामुळे आम्ही बरेच डॉक्टर्स स्वत: इच्छुक मुला-मुलींना प्रशिक्षित करतो. आपण लावलेल्या झाडाला फळं आल्यानंतर जसा आनंद होतो; तसाच या मुली शिकल्यावर आत्मविश्वासाने कामं करताना दिसतात; तेव्हा खूप समाधान मिळतं. फ्लॉरेन्स नायटिंगेलचा वारसा सांगणाऱ्या या कन्यकांचा ‘जागतिक परिचारिका दिन’ नुकताच १२ मे रोजी येऊन गेला, त्यानिमित्ताने माझ्या आठवणींना एकदम उजाळा मिळाला.
मला आठवतं, मी एम.एस.जनरल सर्जरी करीत असताना सरकारी रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहाच्या मुख्य सिस्टर आम्हाला रागवायच्या, ‘‘डॉक्टर, शस्त्रक्रिया करताना कोणताही धागा मोठा कापून वाया घालवलात ना तर मी आता पुढचा धागा देणार नाही हं! तुमच्या खासगी प्रॅक्टिसमध्ये अशीच उधळपट्टी करणार आहात का तुम्ही?’’ तेव्हा मनातल्या मनात त्यांचा राग येई, पण आता स्वत:चं रुग्णालय सुरू केल्यानंतर या वाक्यांची खरी किंमत कळते आहे. तेव्हासुद्धा आम्हा डॉक्टरांना अशा रीतीने झापणाऱ्या सिस्टर्सच रात्र रात्र आम्ही अत्यवस्थ रुग्णांसाठी जागरण करून पहाटे टेबलखुर्चीवर डुलकी लागली; की सहा वाजता उठवायच्या; ‘‘डॉक्टर, उठा आता, हा चहा घ्या गरमगरम, वॉर्डची कामं सुरू करायचीत ना?’’ एक आईसारखा काळजीचा सूर, माया, हक्क सारं सारं असायचं त्या वाक्यांत!
आजवर बावीस र्वष खासगी प्रॅक्टिस करताना अनेक सिस्टर्स सहवासात आल्या. आमच्याकडे शिकल्या, राबल्या, काही सोडून गेल्या, तर काही नवीन आल्या. यथायोग्य वयात त्यांची लग्नं झाली, त्यांना मुलं झाली, मुलं जराशी सुटी राहू लागल्यावर त्या पुन्हा व्यवसायात रुजू झाल्या. ‘घार िहडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी’ या अवस्थेतून जाताना त्यांना थोडा सवलतींचा मदतीचा हात द्यावा लागला. वयानुसार प्रत्येकीचा बालिशपणा, राग-लोभ, चंचलपणा, नंतर समजूतदारपणा, वाढत्या वयानुसार आलेली वागण्यातली प्रगल्भता हे सर्व आविष्कार मी बघत गेले. समजत गेले. आज माझ्या सिस्टर्सपकी कुणी नìसग ट्रेिनगची जबाबदारी घेतं, कुणी आय.एस.ओ.व्यवस्थापनाची जबाबदारी घेतं, कुणी रुग्णालयामधील वस्तूंच्या दुरुस्तीची जबाबदारी घेतं, कुणी आयाबाईंना हाताशी धरून स्वच्छतेची जबाबदारी घेतं, कुणी स्टेशनरीचं तर कुणी चादरी-कपडय़ांचं मोजमाप ठेवतं, कुणी आम्ही शिकलेल्या नवीन तंत्रज्ञानामध्ये सहभागी होऊन मदतीची तयारी दाखवतं. अशा अनेक गोष्टींत पारंगत होऊन आमच्या रुग्णालयाच्या कुटुंबाची गाडी त्या सुरळीतपणे चालू ठेवतात. आम्हा ‘डॉक्टरांच्या जगात’ या सर्व परिचारिकांचं योगदान फार उल्लेखनीय आहे. डॉक्टर व रुग्ण यामधला हा फार मोठा दुवा आहे. कोणत्याही रुग्णालयातील रुग्णांचं समाधान हे त्या डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रता व प्रात्यक्षिक कुशलतेइतकंच तेथील सिस्टरांच्या वागणुकीवर व तत्परतेवर बरंच अवलंबून असतं; हे मानायला हवं.
माझी नीता सिस्टर चौदा वर्षांपूर्वी लग्न होऊन दुसऱ्या गावात स्थायिक झाली व तिकडे एका रुग्णालयात सिस्टरची नोकरी करू लागली. माहेरी आली की मुलांना, नवऱ्याला घेऊन एक फेरी तरी आमच्याकडे करायची. योगायोगाने मागील वर्षी माझ्या मुलाला त्याच गावातल्या मेडिकल कॉलेजमधे प्रवेश मिळाला. पहिल्या आठवडय़ात त्याला अचानक एका संध्याकाळी तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अजून त्याला कॉलेजमधील प्रोफेसर डॉक्टर पण पुरते माहीत नव्हते; ना स्थानिक डॉक्टर्स! घरी आईबाबा सर्जन असूनही त्या अवस्थेत तो इथे येऊ शकत नव्हता. रात्रीचे आठ वाजत आले होते. माझी आई आमच्याच घरी वारली. त्यानंतरचा तो तिसरा दिवस. दोन दिवसांच्या रजेनंतर आम्ही रुग्णालयात गेलेलो असल्यामुळे खूप रुग्ण बाहेर ताटकळत बसले होते, त्यांना न बघता दोघांनी निघून जाणं शक्य नव्हतं. तिकडे मुलगा होता त्या ठिकाणी सोनोग्राफी क्लिनिक, लॅब बंद व्हायच्या मार्गावर होत्या. मी ही परिस्थिती नीताला फोनवरून सांगितली. तिने व तिच्या नवऱ्याने तात्काळ त्याला सोनोग्राफीला नेले, पसे भरले, त्या डॉक्टरांना थांबायची विनंती करून लगेच रिपोर्ट मिळवला, तेथील सर्जनला दाखवून घेतले, औषधे आणली. या सर्व गोष्टी तिने न सांगता करून घेतल्या. माझा नवरा अडीच तासांनी तिथे पोहोचला तेव्हा ती म्हणाली, ‘‘सर, आता याला तपासून सेकंड ओपिनियन द्या. रिपोर्ट सर्व तयार आहेत.’’ नशिबाने शस्त्रक्रिया लागेल असं काही निदान निघालं नाही. पण लहानपणी कामातून दोन मिनिटं वेळ काढून आपल्या ताईशी फुगडी घालणारी नीताआत्या आता आपलं किती मायेने करते; हे बघून तो हेलावला. अर्थात आम्हाला तिच्याबद्दल जे वाटलं, ते तर शब्दांच्या पलीकडचं होतं.
नुकत्याच झालेल्या जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने मनात आलेल्या या आठवणी व रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या या आमच्या लेकींचा हा अल्प परिचय! त्यांच्या परिश्रमांना, सेवावृत्तीला सलाम! माझा नवरा नेहमी म्हणतो, ‘‘अगं, आपल्याला जावई डिपार्टमेंटदेखील चांगलं मिळालंय बरं; म्हणून तर आपल्या लेकी आठ- आठ तास काम करू शकतात, त्यांना विसरू नकोस बरं!’’ तेही अगदी खरं आहे. घरातील अडीअडचणी, मुलाबाळांचं संगोपन, वयोवृद्धांची देखभाल हे सगळं सांभाळून त्या त्यांची व्यावसायिक कर्तव्यं व पर्यायाने सामाजिक जबाबदारी उचलतात; हे लक्षात घेऊन सर्व समाजाकडून त्यांना मान, प्रतिष्ठा, कृतज्ञता मिळत रहावी, ही शुभेच्छा!