03-zopuझोपेशी निगडित समस्या असणाऱ्या तीस टक्के लोकांमध्ये रात्रीच्या झोपेची वेळ आणि प्रत यांचा काहीच बिघाड नसतो तरीही त्यांची निद्राकेंद्रे उगाचच दिवसाही काम करतात. यालाच ‘अतिनिद्रा’ अर्थात हायपरसोम्नीया असे म्हटले जाते. या ‘अतिनिद्रे’च्या दूरगामी परिणामाबद्दल – भाग १ .भारतामध्ये काही दिवसांकरिता आलो होतो, १९९५ साली. माझ्या मामाने ‘काय अभिजीत, सध्या काय नवीन शिकतोयस?’ अशी पृच्छा केली. मीदेखील उत्साहाने ‘स्लीप मेडिसिन’मधील फेलोशिप आणि त्यातील नावीन्य याचे रसभरीत वर्णन केले. त्यावर त्याची प्रतिक्रिया वेगळीच निघाली. अतिशय थंडपणाने हात उडवून तो म्हणाला, ‘हे बघ, आम्हा भारतीयांना झोपेचा त्रास नाही. ही सगळी तुझी वेस्टर्न फॅडस् आहेत.’ माझ्या चेहऱ्यावरचा संभ्रम बघून त्याने स्पष्टीकरण दिले. ‘अरे, बघ, आम्ही कुठेही, कधीही झोपू शकतो. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बघ कसे बसल्याबसल्या कित्येक जण छान डुलक्या काढतात!’ निद्रेमध्ये आपला मेंदू काही करीत नाही हा जो एक गरसमज आहे. त्याचाच परिपाक म्हणजे माझ्या मामाचे विधान आहे. वास्तविक मेंदूतील काही भागांनी (यांना आपण निद्राकेंद्रे असे म्हणू या.) काम केले नाही (रात्रभर!) तर आपल्याला झोपच येणार नाही. याचाच अर्थ, दिवसाढवळ्या आपल्याला झोप येत असेल तर ही निद्रेची केंद्रे काम करीत आहेत असाच होतो! त्यातही रात्रीची पूर्णवेळ झोप झाल्यावर जर उगाचच ही स्लीप सेंटर्स (निद्राकेंद्रे) काम करीत असतील तर हे रोगाचे लक्षण नाही का? बऱ्याच लोकांना खरोखर असे वाटते की, कंटाळा आला, करण्यासाठी काही नाही आणि बोअर झाले म्हणजे आपोआपच झोप येते. खरे तर कंटाळा आला, बोअर झालो तर.. तर तुम्ही कंटाळलेल्या अवस्थेत राहाल. जर प्रत्येक वेळेला झोप येत असेल तर तुमची रात्रीची झोप कमी वेळ असेल अथवा ही झोप म्हणजे चौऱ्याऐंशीपकी एखादा निद्रारोग असण्याची दाट शक्यता आहे. यामधील रात्रीची कमी वेळ झोप घेणे हा प्रकार आपल्या समाजात (अगदी ग्रामीण भागातदेखील) चांगलाच प्रचलित आहे. या कमी झोपेचे अगदी आपल्या पेशीपेशींमध्ये असलेल्या (डी.एन.ए.) गुणसूत्रांवरही परिणाम होतात. 

पूर्णवेळ झोप घेऊनदेखील दिवसा जेव्हा निद्रेशी सामना करावा लागतो आणि महत्त्वाच्या वेळी (उदा. मीटिंगमध्ये) जांभया दाबत झोप आवरण्याची पराकाष्ठा करावी लागते अशा लोकांबद्दल या लेखात माहिती घेऊ. यापकी सत्तर टक्के लोकांमध्ये रात्रीच्या झोपेची वेळ (क्वांटिटी) पुरेशी असली तरी झोपेची प्रत (क्वॉलिटी) खराब असते. घोरणे, स्लीप अ‍ॅप्नीया वगरे निद्रारोग ही झोपेची प्रत खराब करतात आणि म्हणून दिवसा झोप येते. पण उरलेल्या तीस टक्के लोकांमध्ये मात्र रात्रीच्या झोपेची वेळ आणि प्रत यात काहीच बिघाड नसतो आणि तरीही त्यांची निद्राकेंद्रे उगाचच दिवसा काम करतात यालाच ‘अतिनिद्रा’ अर्थात हायपरसोम्नीया असे संबोधन आहे. आपल्या आजूबाजूला अशी उदाहरणे दिसतात. त्यावर काही वेळेला ‘काय सुखी माणूस आहे, कुठेही आडवा पडला तरी झोपू शकतो’ अशा कौतुकमिश्रित कॉमेंटस् केल्या जातात. झोपाळूपणा ही सामाजिक (सोशल) बाब असून त्याचा आरोग्याशी काही संबंध नाही, असेच अनेकांना वाटते. याच अतिनिद्रेचे काय दूरगामी परिणाम असतात हे पुढील काही प्रत्यक्ष उदाहरणांवरून स्पष्ट करतो. भावेश मेहता (नाव बदललेले आहे) हा बत्तीस वर्षांचा तरुण आहे. वडिलोपार्जति बिल्डरचा व्यवसाय, एकत्र गुजराती कुटुंब. भावेशला स्वत:चा व्यवसाय करायचा आहे. त्याच्या वडिलांची त्याला ना नव्हती, पण आत्तापर्यंत भावेशने काही चमक दाखवली नाही, शेवटच्या क्षणापर्यंत थांबून निर्णय घेणे, महत्त्वाच्या मीटिंगला उशिरा पोहोचणे, मोठय़ा कंपनीबरोबर वाटाघाटी करताना, उच्चपदस्थांबरोबर प्रलंबित वेळाच्या मीटिंग होतातच, अशा वेळेला सगळ्यांसमोर भावेश जांभया द्यायचा आणि एकदा तर चक्क भर मीटिंगमध्ये झोपला! ही बेजबाबदार वृत्ती गेल्याखेरीज तुझ्या धंद्याकरिता माझे पसे का देऊ? अशी वडिलांची रास्त भूमिका होती. कुटुंबाचे सौख्य बिघडून गेले होते. भावेशची अस्वस्थता वाढतच होती. कुठे तरी त्याच्याही मनात स्वत:बद्दल अविश्वास, राग, खेद होताच. सकाळी उठल्यावर त्याला फ्रेश वाटायचे, नवीन काही करावे असा उत्साह असायचा. पण जसजसा दिवस पुढे सरकू लागे तसा हा उत्साह मावळायचा. संध्याकाळपर्यंत पाय जड व्हायचे. नियोजित चार गोष्टींपकी जेमतेम दोन गोष्टीच व्हायच्या. आपले शिक्षण झाले नाही, पण मुलाने भरपूर शिकून आपल्या व्यवसायाला वाढवावे यासाठी भावेशला एका नामांकित ‘बिझनेस अ‍ॅडमिनिस्टेशन’चे शिक्षण देणाऱ्या संस्थेत बक्कळ डोनेशन देऊन प्रवेश घेऊन दिला. भावेशदेखील बुद्धीने तरतरीत होता, पण लेक्चर्समध्ये लक्ष केंद्रित (इच्छा असूनही) करीत नसे. मध्येच डुलकी यायची. आपण कुचकामी ही त्याची न्यूनगंडाची भावना प्रबळ झाली होती. अशा सर्व क्षेत्रांतील पीछेहाटीमुळे भावेशला नराश्याचा जबरदस्त झटका बसला. एकदा गाडी काढून तो एकटाच मुंबईहून पुण्याकडे एक्स्प्रेस वेने निघाला होता. अशात डुलकी लागली आणि गाडी डिव्हायडर ओलांडून पलीकडे गेली. भावेशला हाताला फ्रॅक्चर झाले आणि गाडीची विल्हेवाट लागली. घाबरून गेलेल्या कुटुंबीयांना भावेश निराशेच्या गत्रेत आहे हे कळले होते आणि त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. सुदैवाने या तज्ज्ञाने ही डिप्रेशनची केस नसून याचे मूळ अतिनिद्रेतच आहे हे ताडले व त्याला निद्राचाचणीकरिता धाडले.
अतिनिद्रेकरिता होणारी निद्राचाचणी ही घोरणे/ स्लीप अ‍ॅप्नीयाकरिता करण्यात येणाऱ्या चाचण्यांपेक्षा थोडी वेगळी असते. एक तर ही चाचणी घरी करता येत नाही. दुसरे म्हणजे ही चाचणी दिवसा करायची असते. अर्थात या चाचणीच्या अगोदर बहुतांश लोकांमध्ये रात्रीची चाचणी केली जाते. या रात्रीच्या चाचणीबद्दलची माहिती ‘घोरणे’संबंधित लेखांमध्ये दिली होती. रात्रीची चाचणी अगोदर करून घेण्याची दोन कारणे आहेत. एक तर सत्तर टक्के लोकांमध्ये दिवसा झोप येणे हे रात्रीच्या झोपेची प्रत खराब असल्यामुळे होते. आपण गाढ झोपेत असताना शंभर वेळेला उठलो आणि हे उठणे ‘एक मिनिटापेक्षा कमी’ असेल तर आपल्याला उठण्याचे स्मरणदेखील राहत नाही. त्यामुळे आपल्या झोपेची प्रत खराब आहे (कुठल्याही कारणाने) हे बहुतांश लोकांच्या गावीदेखील नसते. अशांकरिता ही रात्रीची चाचणी महत्त्वाची ठरते. शिवाय कमीत कमी सहा तास तरी झोप मिळाली. याचे ‘ऑब्जेक्टिव प्रूफ’ ही रात्रीची चाचणी देते. दिवसाच्या चाचणीला ‘मल्टिपल स्लीप लेटेन्सी टेस्ट’ (एम.एस.एल.टी.) असे म्हणतात. यात सबंध दिवसभरात चार वेगवेगळ्या वेळांना, दोन तासांच्या अंतराने अंथरुणावर पडून, डोळे मिटून डुलकी घेण्याची संधी दिली जाते. प्रत्येक संधी वीस मिनिटांची असते. तुमच्या मेंदूमधील विद्युतलहरींचा आलेख या वेळेत तपासला जातो. त्यामुळे कुठल्या मिनिटाला (अथवा सेकंदाला) तुमची निद्राकेंद्रे काम करू लागली हे समजते. झोपाळूपणा मोजायची ही सर्वोत्तम (गोल्ड स्टँडर्ड) चाचणी आहे. भावेशच्या बाबतीत तिसऱ्या मिनिटाला ही निद्राकेंद्रे उत्थापित (अ‍ॅक्टिव्हेटेड) होत होती! कहर म्हणजे दोन वेळेला तर साधी झोपच नाही तर चक्क ‘रेम झोप’ आली होती. अतिनिद्रेचे एक कारण आहे ‘नार्कोलेप्सी’ नावाचा विकार! थोडक्यात, भावेशच्या जीवनामध्ये या विकाराने प्रचंड उलथापालथ केली होती. मुख्य म्हणजे हे सर्व शारीरिक कारणामुळे घडले होते. त्यावर उपाय आहेत. या विषयीची माहिती पुढच्या (६ डिसेंबर) लेखात.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?