एकदा आम्ही लंडनला गेलो होतो. माझ्या गाण्याला साथीला जो तबलावादक होता, त्याचं वादन मला रुचलं नाही. ऐन वेळी मी तौफिकलाच विनंती केली मला साथ करण्याची. त्यानेही आढेवेढे न घेता साथ दिली. झाकीरभाईंना जेव्हा हे कळलं तेव्हा ते गमतीत म्हणाले, ‘‘गीतिका, तू भाग्यवान आहेस. तुझ्या गाण्याच्या साथीला तौफिक कुरेशी मिळाला. आज-काल कुणाला तो मिळत नाही.’’ आमचं पतीपत्नींचं नातंच असं आहे. पतीपत्नींच्या भूमिकांची कामे निश्चित केलेली नसतात. प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवाह नदीसारखा असतो.. सांगताहेत, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका गीतिका वर्दे-कुरेशी पती प्रसिद्ध तालवाद्यवादक तौफिक कुरेशी यांच्याबरोबरच्या २१ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
तुमच्यापासून मुळीच अलग नसणाऱ्या गोष्टीविषयी लिहिणं किती अवघड असतं? ज्या नात्यानं तुमचं अवघं आयुष्य समृद्ध केलंय अशा, तुमच्या आयुष्याचा श्वासच असणाऱ्या नात्याविषयी लिहायचंय! पण कसं?
तुमच्या आत खोलवर सुप्त असणाऱ्या आंतरिक क्षमतांना साद देणाऱ्या संपन्नतेचा अनुभव लाभणं ही अतिशय दुर्मीळ गोष्ट आहे. सामान्यत: लोक काही बाह्य़ अशा कारणांमुळे संपन्न होत जातात. जसं व्यावहारिक जगात तथाकथित यशाच्या पायऱ्या चढत नावलौकिक कमावणं, भरपूर पसा कमावणं आदी. पण कधी तरी असं घडतं की, की तुमच्या आत दडलेल्या ‘त्या’ सुप्त क्षमतांना, तुमच्यापेक्षा वेगळं असणारं कोणी तरी मोकळं करतं. असा कोणता घटक आहे की जो तुमच्यात दडलेल्या संपूर्ण क्षमतांकडे तुम्हाला घेऊन जातो,  या प्रश्नाचं उत्तर आहे – ज्याने त्याने आपल्या आयुष्यामध्ये निवडलेल्या सहजप्रवृत्तीने निर्माण केलेल्या श्रद्धा! या श्रद्धा मिळतात कुठे? त्या मिळतात आयुष्याने तुमच्यासाठी निवडलेल्या तुमच्या जोडीदाराकडून! त्याच्या नुसत्या असण्यातून मिळणाऱ्या- सहज प्रेरणांमधून! अशा जोडीदाराची तुमच्या कृतींवर, सुज्ञतेवर, निर्णयक्षमतेवर, मूल्यमापनावर असीम श्रद्धा असते. तुम्ही त्याच्या आयुष्याचा भक्कम आधार आहात, असा त्याचा दृढविश्वास असतो.
तुमच्या आयुष्याची प्रत्येक पायरी तुम्ही ठरवून निश्चित करता असं नाही.. बहुधा ते विधिलिखितच असतं. पण जेव्हा तुम्ही आयुष्यात मागे वळून बघता, विश्लेषण करता तेव्हा तोवर पार केलेले खाचखळगे, वळणे, त्या त्या वेळी केलेल्या कृती-घटना-प्रसंग हे सारं काही आखून दिल्याप्रमाणे घडलंय असं वाटावं. तौफिक आणि माझ्या सहजीवनाविषयी मागे वळून पाहताना मला असंच जाणवतं. तशी तौफिक आणि मला, कोणतीही वैयक्तिक किंवा एकत्रित अशी ठोस महत्त्वाकांक्षा नव्हती. आम्ही आनंदप्राप्तीच्या दिशेने छोटी छोटी पावलं टाकत गेलो. आमच्यासाठी आनंद म्हणजे प्रिय अशा आदरणीय ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेत, लहानांनी दाखवलेला आदर आहे, मित्र-मत्रिणींची उबदार मत्री आहे, जीवनप्रवाहात वेळोवेळी भेटणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली सहकंपने आहेत! तुमच्या आवडीच्या गोष्टी करताना त्यात स्वतला झोकून देणं यातही आनंद आहे आणि स्वतशीच स्पर्धा करत करत वाटचाल करत राहण्यातही आनंदच आहे. तुमच्याविषयी आणि तुमच्याशी संबंधित अशा प्रत्येकाबद्दलच्या भावनिक आणि नतिक कर्तव्यांची पूर्तता करण्याचा  प्रयत्न करत राहणं म्हणजेच आनंद अशी आम्हा उभयतांची भावना आहे.
 माझ्यासाठी संगीत हा आयुष्याचा अंगभूत घटक आहे. हे कधी घडलं? कसं सुरू झालं? कसं सुरू राहिलं आणि कुठे संपणार आहे याची मला काही कल्पना नाही. पण संगीत माझ्या आत राहतं. मी संगीताकडे कधी करिअर म्हणून पाहिलं नाही की ते पसे मिळविण्याचं साधन आहे असंही पाहिलं नाही. ते माझ्यासाठी एक ‘पॅशन’ आहे. ती एक अनुभूती आहे. अशी अनुभूती की जिच्यासोबत फारच थोडय़ांना आपलं नातं सांगता येतं. जेव्हा ‘अनाघ्रात’ अशा ‘ऋणानुबंधा’मागे असणाऱ्या या नात्याचा अर्थच सांगता येत नाही, अशा वेळी तुमचा जोडीदार त्याच ‘अनाघ्रात ऋणानुबंधा’शी आपलं अस्तित्व जोडू पाहात असेल तर तो, कदाचित, तुम्हाला, तुमच्यापेक्षा अधिक चांगलं समजून घेऊ शकेल. तौफिक आणि माझ्यासाठी हा ‘अनाघ्रात ऋणानुबंध’ आहे संगीत!
तौफिक कुरेशीची व माझी पहिली भेट आमच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या संगीत मंडळात झाली. माझा एक शाळामित्र-रमण शंकर, त्याला ओळखत होता.  तौफिक हा महान तबलावादक उस्ताद अल्लारखाँसाहेबांचा मुलगा आणि त्यांच्या तितक्याच महान मुलाचा, उस्ताद झाकीर हुसेन यांचा धाकटा भाऊ आहे हे मला माहिती होतं. आम्ही संगीताच्या निमित्ताने भेटत गेलो. माणिकताई भिडे यांच्याकडे संगीतशिक्षणासाठी जाण्यापूर्वी मला
पं. विजयकुमार संझगिरी गाणं शिकवायचे. त्यावेळी तौफिक त्यांच्यासोबत रियाझासाठी आमच्याकडे यायचा. पद्मजा फेणाणी, देवकी पंडित यांच्याबरोबर तो साथ करायचा. या रियाझाच्या वेळीच तौफिकची संगीतावरची श्रद्धा माझ्या लक्षात आली. संगीताबद्दलचं त्याचं पॅशनही उमगत गेलं. आम्ही हळूहळू एकत्र येत गेलो. त्या प्रवासातच केव्हा तरी लग्न करायचं ठरवलं. त्याला अर्थातच विरोधही झाला. पण तो नंतर मावळलाही. आमचं सहजीवन सुरू राहिलं – संगीताच्या बळकट धाग्यावर!
आमच्या दोघांतील नात्याच्या भक्कमपणाचा पाया आहे संगीत! आम्हाला बांधून ठेवणाऱ्या अनेक घटकांपकी संगीत हा एक महत्त्वाचा धागा आहे, असं मला वाटतं. ‘अनेक घटकांपकी एक’ असं मी म्हणते, याचं कारण संगीताव्यतिरिक्तही तो दुसऱ्याविषयी आदर बाळगतो, प्रामाणिक आहे या गोष्टीही महत्त्वाच्या आहेतच. या नात्यातील काही धागे असे असतील ज्यात बदल घडायला हवा. त्यामागील सुंदर सत्य हे आहे की आम्हा उभयतांचा या बदल घडण्यावर विश्वास आहे. पण, मूलभूत जीवनमूल्यांवर आणि समाधानी आयुष्य जगण्याच्या तत्त्वावर, आमचं दुमत नसतं. तसे आमच्या दोघांच्या ‘इगों’चे संघर्षही होतातच की! आमच्याही नात्यात अशा वेळी तणाव निर्माण होतो. पण जेव्हा हे धुकं सरतं, ‘इगो’ बाजूला पडतात तेव्हा आमचं नातं अधिक दृढ, गहिरं आणि करिश्माई बनतं. परिपूर्ण नातं असं कधी नसतं. जे परिपूर्ण असतं त्यात बदल संभवत नाही. आम्हाला दोघांनाही ठाऊक आहे की बदल हेच एकमेव शाश्वत सत्य आहे! परस्परांना आकृष्ट करणारं नातं हे बदलत असतं. ते  वयाप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे बदलत असतं. या बदलांमध्ये सहज शिरावं, स्वतभोवतीच्या परिस्थितीला प्रतिसाद द्यावा आणि बदलत्या गरजांनुसार एकत्रपणाची भावना संवेदनशीलतेनं जपावी, यातच नात्याचा अर्थ आहे. मी तौफिकविषयी खूप आदराने बोलते, याचं कारण तो तेवढा आदरणीय आहे!
  तौफिक प्रारंभी तबला वाजवायचा. अब्बाजी आणि झाकीरभाईंसोबत तो घडत गेला. त्याला नादाचं उपजत ज्ञान आहे. हळूहळू तो तालवाद्य वाजवत गेला. वेगवेगळी वाद्यं मिळवायची व ती स्वतच शिकून त्यावर प्रयोग करत राहायचं हा त्याचा स्वभाव आहे. या दृष्टीने तो सेल्फ मेड आहे. दृढ विद्य्ोतून त्याला प्रयोगशीलता लाभली आहे. तो अलीकडे तबला वाजवत नाही. ‘पर्कशनिस्ट’ (तालवाद्यवादक)अशी त्याची ओळख झालीय. ही पळवाट नाही, तर तो वाद्यांवर प्रयोग करतोय. त्याचं वादन बौद्धिकही आहे आणि भावनाशीलही आहे. त्याच्या प्रयोगातून निर्माण होणारं संगीत हे सर्वाना मोहित करतंय. तो या दृष्टीने युनिक आहे. ‘जेंबे’ हे वाद्य आपल्या देशात लोकप्रिय करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. जेंबेवर तबल्याचे विविध तालवादन करण्याचे त्याचे प्रयोग यशस्वी होत आहेत. या विषयातलं त्याचं संशोधन हे अतुलनीय आहे. त्याच्या तबल्यात काही कमी होतं का? तर तसं मुळीच नव्हतं. पण विविध प्रतलांतून ‘नाद’ निर्माण करण्याची त्याची आंतरिक ऊर्मीच त्याला या दिशेने नेत गेली.  
मला आठवतंय, एकदा आम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन विकत घेतला. तेव्हा ते अप्रूप होतं. त्याची भांडी महाग मिळायची. मायक्रोवेव्हमध्ये वापरायचे पाचशे पाचशे रुपयांचे दोन मग्ज आम्ही घेतले होते. जेवणाच्या टेबलावर सकाळी सकाळी तौफिकची स्वारी बोटात मगचा कान अडकवून मग व टेबल वाजवत बसली. त्यावेळी जे नाद निर्माण होत होते ते मोहमयी होते. सुरेल होते. मीही ऐकत बसले. अचानक माझ्यातली गृहिणी जागी झाली. मी तौफिकला म्हणाले,‘‘अरे, किती महाग मग आहेत ते. फुटतील.’’ तौफिक उत्तरला,  ‘‘तू एका पर्कशनिस्टशी बोलतेस. ती तुझी स्वैपाकाची भांडी असली तरी आता ती माझी वाद्य आहेत. माझं वाद्य मी कसं  फुटू  देईन?’’ संगीतावर जिवापाड प्रेम करणारा तौफिक ‘फुडी’ही आहे. पानात आलेलं सर्व काही खातो आनंदानं! मी माझ्या आईसारखी (डॉ. मोहिनी वर्दे) किंवा माँजीसारखी उत्तम जेवण बनवत नाही, पण तौफिकला माझं साधंसं जेवण आवडतं.
तौफिक संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांशी जोडला गेला आहे. सिनेक्षेत्रात जाहिरातीत त्याचं मोठं नाव आहे. त्याची प्रयोगशीलता तिथेही नावाजली गेली आहे. त्याच्या एका सी.डी.च्या प्रकाशन सोहळ्यात राकेश मेहरांसारखा दिग्दर्शक म्हणाले होते, ‘‘आम्ही संगीत बनवताना जेव्हा जेव्हा तौफिक त्या प्रक्रियेत सामील होतो, तेव्हा तेव्हा त्याचा वेगळाच दृष्टिकोन त्या संगीतात अशी काही भर घालतो की त्या संगीताला नवंच परिमाण मिळतं!’’ त्याच्याबद्दल व्यक्त होणारा हा आदर मला थक्क करतो.
तौफिकच्या हाताखाली अनेक विद्यार्थी तयार झाले आहेत. ते आज अनेक नामवंतांच्या कार्यक्रमात तालवाद्यांची साथ देत असतात. त्याचा एक विद्यार्थी नीलाद्री कुमारांसोबत असतो. काही विद्यार्थी शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर आदी मान्यवर संगीतकारांसोबत काम करतात. काही जण शास्त्रोक्त तबलावादन करतात किंवा शास्त्रोक्त गायनाला साथ देतात. त्याचा एक विद्यार्थी तर खुद्द झाकीरभाईंच्या कार्यक्रमात तालवाद्य वाजवतो. आमचा मुलगा शिखरनादही जेंबे वाजवतो. शिखरताल हा तौफिकचा आवडीचा ताल आहे. त्यावरून त्यानंच हे नाव आपल्या लेकाला दिलंय.
गेली काही वष्रे तौफिक तबलावादन करत नाही. अब्बाजींच्या बरसीमधेही तो तालवाद्याचे प्रयोग सादर करतो. पण एकदा आम्ही लंडनला गेलो होतो. माझ्या गाण्याला साथीला जो तबलावादक होता, त्याचं वादन मला रुचलं नाही. ऐन वेळी मी तौफिकलाच विनंती केली मला साथ करण्याची. त्यानेही आढेवेढे न घेता साथ दिली. झाकीरभाईंना जेव्हा हे कळलं तेव्हा ते गमतीत म्हणाले, ‘‘गीतिका, तू भाग्यवान आहेस. तुझ्या गाण्याच्या साथीला तौफिक कुरेशी मिळाला. आज-काल कुणाला तो मिळत नाही.’’ मीही हसून झाकीरभाईंना म्हणाले, ‘‘अहो, माझ्यामुळे तो निदान तबला वाजवायला बसला.’’
खरंच आहे. आमचं पती-पत्नींचं नातंच असं आहे. पती-पत्नींच्या भूमिका निश्चित  नसतात. प्रत्येकाच्या आयुष्याचा नदीसारखा प्रवाह असतो.  ‘‘काही वेळा तो प्रवाह मोकळ्या अवखळपणे वाहतो, काही वेळा तो गंमतजंमत करत जोरदार धावतो. कधी निर्दय पाशवी शक्तीने तो सगळे उद्ध्वस्त करत जातो, कधी निश्चित वळणे घेत जातो, कधी तो प्रवाह अलवार वळणे घेत जातो तर कधी तो छोटय़ाशा ओठय़ासारखा खळखळ वाहतो. त्याला जे नसíगक सौंदर्य लाभलेलं असतं तसंच नसíगक सौंदर्य आयुष्याच्या प्रवाहालाही लाभलेलं असतं. या प्रवाहात पतीपत्नींपकी एक योग्य पावलं उचलतो, योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी योग्य पद्धतीची निवड करतो. अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी, येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी पतीपत्नींच्या भूमिका बदलतात. अशाच पद्धतीने आम्ही जीवन जगत आलो आहोत.
आता या टप्प्यावर आमची छोटीशी अपेक्षा आहे की या जीवनपथावर आम्ही एकत्र चालू, नेहमीच आणि शाश्वतापर्यंत. हे असंच घडावं यासाठी मी ईश्वराची प्रार्थना करत नाही; पण हे असंच घडावं यासाठी ईश्वरानं आम्हाला जी संवेदनशीलता आणि जगण्यातलं तारतम्य दिलंय ते कायम राहावं यासाठी आमच्या प्रार्थनात आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. या जगात शाश्वत काही नाही याची जाणीव मला आहे. शेवटी ऊर्जेचं परिवर्तन होतं. ती बनवता येत नाही की ती नष्ट होत नाही. हे ध्यानी घेऊनच आम्ही अपेक्षा करतो. जगातलं सर्वोत्तम वर्तन आणि जीवनमूल्यं आमच्या मुलानं आत्मसात करावीत आणि प्रमाणिकपणा व प्रखर कष्टाच्या पाठबळावर आपलं आयुष्य घडवावं!    

गीतिकाचा मी कृतज्ञ
मी हिंदी चित्रपटात रमलो होतो. जगण्यासाठी आवश्यक तेवढे पसे मिळत होते. २०व्या शतकाच्या अखेरीस गीतिकानं मला प्रश्न विचारला – ‘‘तू यासाठी आहेस का? स्वतचं काही निर्माण करायचं की नाही? तुझी ओळख काय राहावी?’’ मी खडबडून जागा झालो. सावध झालो. आणि मग ताल वाद्यातले वेगवेगळे प्रयोग घडू लागले. गीतिकाचा मी कृतज्ञ आहे, तिने मला योग्य रस्त्यावर आणून सोडलं.