आजच्या ज्येष्ठांचा वर्तमानकाळ बदलता आला नाही तरी किमान त्यांच्या अनुभवातून भावी ज्येष्ठांचा भविष्यकाळ तरी बदलता यावा या हेतूने केलेल्या ‘सेज’ या संस्थेच्या सर्वेक्षणातून एक आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामधून ज्येष्ठांना योग्य वयात वास्तवाची रास्त जाणीव करून देण्यात येते. पन्नाशीपुढच्या ज्येष्ठांसाठी कार्यशाळा घेऊन त्याद्वारे समृद्ध ज्येष्ठत्वाला सामोरं जाण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करण्यात येते. ज्येष्ठांच्या समस्यांसाठी व्यापक व्यासपीठ ठरलेल्या ‘सेज’ प्रकल्पाविषयी..
शुक्रवारची दुपार. उन्हं कलायला लागतात. तशी आजुबाजूला राहणाऱ्या आजी-आजोबांची पावलं लिमयेकाकूंच्या घराच्या दिशेने पडू लागतात. लिमयेकाकू प्रत्येकाचं छानसं स्वागत करतात. बघता बघता त्यांच्या घराचा दिवाणखाना भरून जातो. त्या दिवशी ज्या ज्येष्ठ व्यक्तीला बोलायचं असतं तिने आपलं नाव आधीच कळवलेलं असतं. ते पुकारलं की बसल्या जागेवरूनच ती ज्येष्ठ व्यक्ती आपलं मनोगत मांडू लागते. ‘माहेर’चा हा गट! पुण्यातल्या लिमयेकाकूंनीएकटेपणावर शोधलेला उपाय! आज अनेक जणांची संवादाची भूक भागवतोय. सुसंवादाचा आनंद देतोय. त्या गटाच्या एका सत्राला हजेरी लावली तरी लक्षात येते, ज्येष्ठांचे वयोगट, आर्थिक-सामाजिक स्तर, वैचारिक पातळी यांत फरक असला तरी त्यांच्या समस्या किंवा दुखऱ्या जागा यात कमालीचं साम्य आहे.
IPH या ठाण्याच्या मनोविकास संस्थेमधील प्रकल्पाधिकारी डॉ. शुभा थत्ते या एका वृत्तपत्रात ज्येष्ठांसाठी प्रश्नोत्तर स्वरूपाचं सदर चालवत होत्या. तेव्हा त्यांनाही नेमकं हेच आढळलं. त्या सांगतात, ‘‘उत्तर आयुष्यात या ज्येष्ठांची सांपत्तिक स्थिती चांगली असते. पण त्यांच्या जगण्याशी, अस्तित्वाशी थेट संबंध नसलेल्या अनेक दुखऱ्या जागा असतात. त्याविषयी ते कोणाशीही मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. ना मित्रांशी. ना नातलगांशी! ज्येष्ठांच्या दृष्टीने अशा दुखऱ्या जागा कोणत्या आणि त्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करायला लागले, त्या वेळी असं वाटलं की एक सर्वेक्षण करून मोठय़ा प्रमाणावर या माहितीचं संकलन करावं आणि ज्येष्ठांच्या मानसिकतेचा सर्वागीण विचार करावा. सुखी असणं हे सापेक्ष असतं, पण समाधानी असणं हे वृत्तीवर अवलंबून आहे. एखादी समस्या एकच असते, पण कोणी त्याचा खूप बाऊ करून मनस्ताप करून घेतात तर कोणी आहे त्या परिस्थितीत समाधानी असतात. ज्येष्ठांमधील याच समाधानी वृत्तीची पातळी शोधावी व असमाधानी वृत्तीवर नेमकी उपाययोजनाही सुचवावी, असा मी विचार केला.’’
डॉ. थत्ते जसजशा या प्रश्नाच्या मुळाशी जाऊ लागल्या तसतसं त्यांच्या लक्षात आलं, की वृद्धत्वातील अनेक प्रश्नांची सुरुवात तारुण्यातील उत्तर काळात होत असते. उदा. ज्येष्ठांच्या एकाकीपणाचा प्रश्न! जर ज्येष्ठ मंडळी भरल्या घरात एकटी पडत असतील तर वैचारिक स्वातंत्र्य वा व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य त्यांनी स्वत:च गमावलंय का? चाळिशीपर्यंत करिअरमध्ये गुंतून जाणारे पुरुष मुलांशी संवाद साधत नाहीत. त्यामुळे कुटुंबाबरोबर त्यांचे भावनिक बंधच मुळी निर्माण होत नाहीत. तसंच नोकरी, घरकाम, मुलांचं संगोपन यात अडकलेल्या स्त्रिया लग्नानंतरच्या काळात आपले छंद जोपासू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं उत्तर आयुष्य रसहीन होतं. या अशा अनेक गोष्टी डॉ. थत्तेंच्या लक्षात आल्या तेव्हा त्यांना वाटलं, वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू करण्याच्या टप्प्यावर या गोष्टी ज्येष्ठांच्या नजरेस आणून त्यांना सावध केलं तर? तर ज्येष्ठांचे अनेक प्रश्न आपोआप संपुष्टात येतील. अर्थात त्यासाठी मुळात ज्येष्ठांची मानसिकता व त्यांचे भावनिक प्रश्न समजून घेणं अत्यंत गरजेचं होतं. त्याच दरम्यान त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली. त्यांना अपघात झाला. सत्तरीतही अत्यंत कार्यमग्न आयुष्य जगत असताना त्याला खीळ बसली. त्या व्हीलचेअरवर अडकल्या. पण त्यामुळे निराश न होता त्यांनी या प्रकल्पाचं काम हाती घेतलं. या कामानिमित्त नेटवर सर्फिग करत असताना अचानक एक दिवस त्यांना कळलं की, अमेरिकेतील सॅन डिअ‍ॅगो विद्यापीठातील वरिष्ठ पदावरील संशोधक डॉ. दिलीप ज्येष्ठे हे पन्नाशीपुढच्या ज्येष्ठांसाठी संशोधन करत आहेत. ते डॉ. थत्तेंचे केईएममधले सहाध्यायी! SAGE अर्थात ‘सक्सेसफुल एजिंग’ या प्रकल्पांतर्गत ते ज्येष्ठांच्या आरोग्य व वैयक्तिक माहितीचा डेटा गोळा करून त्यावर संशोधन करत होते. डॉ. थत्तेंना ज्येष्ठांमधील भावनिक प्रश्न समजून घेण्यात अधिक रस होता. त्यांनी डॉ. ज्येष्ठेंशी संपर्क साधला. त्यांच्या संशोधनाचं व इतर ठिकाणी चाललेल्या कामाचं स्वरूप समजून घेतलं. त्यानंतरच SAGE अर्थात ‘सॅटिसफाइंग एजिंग’ हा प्रकल्प आकाराला आला. वृद्धापकाळ समाधानी जावा यासाठी कधी व कशी तयारी करावी याचं वस्तुनिष्ठ विवेचन करणारा हा पहिलाच प्रयत्न आहे. यातूनच पन्नाशी-साठीच्या तरुण ज्येष्ठांनी ऐंशीच्या घरातील आई-वडिलांची काळजी घेण्याची वेळ आल्यास काय करावं व काय टाळावं हे सांगणाऱ्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याला ज्येष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ज्येष्ठांच्या भावनिक पातळीवरील संशोधनासाठी व्यक्तिगत मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी एक १६ पानी प्रश्नावली तयार करण्यात आली. त्यातील सर्वच प्रश्न खासगी व भावनिक स्वरूपाचे असल्याने त्यातील माहिती गोपनीय ठेवण्यात येत असून तिचा कुठेही गैरवापर करण्यात येणार नाही, याची ग्वाही देण्यात येते. ज्येष्ठांच्या मुलाखती घेण्याच्या या कामाचं स्वरूप समजावून देण्यासाठी २०० लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं. त्यासाठी ठाणे, पुणे, नाशिक येथे कार्यशाळा घेण्यात आल्या. हे फॉर्म भरून घेणारेही पन्नाशीच्या पुढचे ज्येष्ठच होते. आज त्या वयातील अनेक ज्येष्ठ स्वेच्छानिवृत्तिधारक असतात. त्यांचं आरोग्य उत्तम असतं, पण ते कृतिशील आयुष्य जगत नाहीत. समाजातील दुर्बल घटकांसाठी आपली शक्ती, बुद्धी, ऊर्जा वापरत नाहीत. त्यांना कार्यप्रवृत्त करणं हाही हेतू होताच. वयातील समान धाग्यामुळे औपचारिक मुलाखतींऐवजी जिव्हाळ्याने मारलेल्या गप्पा असंच या संशोधन प्रश्नावलीचं स्वरूप होत गेलं असं अनेक स्वयंसेवकांनी नमूद केलं. या गप्पांमुळे ज्येष्ठांची कोंडलेली मनं मोकळी होत असल्याचं व त्यातून स्वत:ही वैचारिकदृष्टय़ा समृद्ध झाल्याची कृतज्ञ नोंद अनेकांनी केली. या संशोधनासाठी वृद्धांना स्वयंसेवक जसे वृद्धाश्रमात भेटले तसं १३ जणांच्या सुखाने नांदणाऱ्या एकत्र कुटुंबातही भेटले. या मुलाखतींमध्ये रोज नियमित फिरायला जाणारी, योगासनं करणारी, हास्यक्लबात जाणारी मंडळी तुलनेने अधिक आनंदी आढळली.
या सर्वेक्षणातील प्रश्नावलीच्या उत्तरांना रेटिंगही देण्यात आले आहे. विचारांची परिपक्वता, लोकांशी/ समाजाशी संपर्क, नवीन गोष्टी शिकण्याची मोकळी मानसिकता, आरोग्याची जाणीव वगैरे अनेक मुद्दे विचारात घेण्यात आले आहेत. उदा. वय वाढलं की व्याधी येतातच, पण त्यांचा स्वीकार कसा केला जातो ते महत्त्वाचं? एखादा औषधाची गोळी दुर्मुखलेल्या चेहऱ्याने घेईल, तर दुसरा हसतमुखाने! प्रश्नावलीतील एक प्रश्न असा आहे की, जेवताना गप्पा-गोष्टी चालू असताना तुमचं मत तरुण पिढीने खोडून काढलं तर तुम्हाला काय वाटतं? एखादा ज्येष्ठ त्यामुळे दुखावला जातो तर एखादा विरुद्ध मतही हसतमुखाने स्वीकारतो. यावरून ज्येष्ठ परिवर्तशील आहेत का, याचा अंदाज येतो. तुम्ही सेवाभावी काम करता का? या प्रश्नावर ‘मी सोसायटीचा चेअरमन आहे’ इथपासून ते ‘मी गरीब मुलांना शिकवते!’ इथपर्यंत उत्तरं येतात व त्यातूनच त्यांची समाजातील मानसिक गुंतवणूक कळते. काही ज्येष्ठांनी या वयात मौन बाळगावे, मनुष्यसंपर्क कमी करावा व ध्यानधारणा, साधना, ईश्वरचिंतन यात मन रमवावे असे सुचवले आहे. ज्येष्ठांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात का, यावर एक वृद्ध पंचाहत्तरीत फ्रेंच भाषा शिकत आहेत. तर एक ऐंशी वर्षांच्या आजी टी.व्ही.वरील कार्यक्रमातून नवीन पाककृती शिकतात आणि करून बघतात असं आढळलं. अर्थात अशा उत्तरांना हाय रेटिंग मिळतं. बहुतेक ज्येष्ठांचा नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा उत्साह ओसरलेला आढळतो. त्यामुळे मोबाइल, कॉम्प्युटरचं ज्ञान यथातथा असतं. वृद्धापकाळ सुखाचा जाण्याची कारणं प्रत्येक ज्येष्ठ वेगवेगळी देतात. कोणी म्हणतं सुखी सहजीवन, कोणी म्हणतं आर्थिक सुबत्ता तर कोणी उत्तर देतं, उत्तम आरोग्य! बहुतेक वृद्धांच्या जीवनात एक तरी बोचरी जागा असते. कोणाला नातू हवा असतो, कोणाला जोडीदाराशी न पटल्याची खंत असते, तर कोणाला करिअरची लाइन चुकली असं वाटत असतं. एका वृद्धेला तर आपण वडिलांना अंतकाळी भेटू शकलो नाही, ही खंत होती. आता ही जखम सतत भळभळत ठेवायची की विसरून जायचं, हेच वृद्धापकाळापूर्वी त्यांना शिकवायचं हा या संशोधनामागचा खरा हेतू?
आजच्या ज्येष्ठांचा वर्तमानकाळ बदलता आला नाही तरी किमान त्यांच्या अनुभवातून भावी ज्येष्ठांचा भविष्यकाळ तरी बदलता यावा या हेतूने केलेल्या या सर्वेक्षणातून एक आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामधून ज्येष्ठांना योग्य वयात वास्तवाची रास्त जाणीव करून देण्यात येत आहे. पन्नाशीपुढच्या ज्येष्ठांसाठी कार्यशाळा घेऊन त्याद्वारे समृद्ध ज्येष्ठत्वाला सामोरं जाण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करण्यात येते. उदा. तरुण वयात कुटुंबीयांशी भावनिक बंध निर्माण केले तर वृद्धत्वात एकटेपणा वाटय़ाला येणार नाही. नवीन कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात केलं तर त्यातून तरुण पिढीशी सुसंवाद साधता येईल. पन्नाशीपुढच्या वयात शेजारी, मित्रमंडळी यांच्याशी सामाजिक बंध निर्माण केले तर भक्कम पाठबळ मिळू शकतं. उतारवयात झेपेल इतका व्यायाम करणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे या वयात एखादा तरी छंद जोपासणं गरजेचं आहे. वयाची सबब न देता ज्येष्ठांनी स्वत:ला विधायक कार्यात गुंतवलं तर शरीर सक्षम व मेंदू तल्लख राहतो. भविष्यकाळाचा विचार करून पन्नाशीतच स्वत:च्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं आवश्यक आहे हा मंत्र कार्यशाळांमधून दिला जातो. आजोबांनी लावलेल्या झाडाची फळं नातवंडांनी खावीत. तद्वत आजच्या वृद्धांचे अनुभव उद्याच्या ज्येष्ठांचं वार्धक्य निरामय करतात हेच ‘सेज प्रकल्पा’चं खरं यश आहे.